10/30/07

आद्य शंकराचार्य - भाग १

गीतेतील एक श्लोकात कृष्ण अर्जुनास म्हणतो की धर्म संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात जन्म घेइन. याचा अर्थ बरीच लोकं असा घेतात की विष्णुचे ९ अवतार झाले असुन १० अवतार अपेक्षित आहे. मग गौतम बुध्दाला जरी ९ वा अवतार मानले तर याचा अर्थ असा होतो की गेल्या तीन हजार वर्षात धर्माला कधी ग्लानी आलीच नाही? अर्थात आली. बरेचदा तो मृतवत झाला व प्रत्येक वेळेस थोर-मोठ्यांनी धर्मोत्थापनेस जन्म घेतला. कोणी मुत्सद्दीपणाने तर कोणी शौर्याच्या बळावर धर्माचे रक्षण केले. हे थोर-महात्मे अवतार होते की नाही हा विवाद बाजुला ठेउनच त्यांच्या थोरवीची कल्पना येउ शकते.

ईसवी सन पूर्व पाचव्या शतकात वैदिक धर्माचा र्‍हास झालेला होता व सनातन धर्म अक्षरश: आचके देत होता. अश्या परिस्थितीत केवळ प्रगल्भ बुध्दीच्या बळावर आद्य शंकराचार्यांनी भारतवर्ष अक्षरशः पादाक्रांत करुन सनातन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिसाद आजही सनातन धर्माच्या प्रत्येक कार्यात उमटतात. त्यामुळे भारताच्या मृत्युंजयांच्या मालिकेत आद्य शंकराचार्यांचे नाव अग्रगण्य घ्यावे लागेल.

आद्य शंकराचार्यांनी धर्म संस्थापना केली म्हणजे नेमके काय केले याचा विचार करण्याआधी धर्म म्हणजे काय याचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे. सांप्रत परिस्थितीत 'आपला धर्म कुठला?' अशी पृच्छा केली असता हिंदु-मुसलमान असल्या पैकी कुठले उत्तर द्यावे लागेल. पण भारतीय सनातन जीवनपध्दतीत धर्माची व्याख्या याहुन अधिक व्यापक आहे. धृ धातु पासुन धर्म शब्दाची उत्पत्ती होते. धृ धारयती इति धर्मः। धृ म्हणजे स्थिर. कालामानानेही जे बदलत नाही ते धृ. आणि जी जवाबदारी, जी कर्तव्य कधीही बदलत नाही व ती नेहमीच निभवावी लागते तो धर्म. मनुष्याकडुन अपेक्षित असलेले आचरण, त्याची कर्तव्य, वैयक्तिक नियम व विविध आश्रमांद्वारे अपेक्षित सामजिक नियम इत्यादी सर्व कार्यभार धर्मांतर्गत मोडते. या व्यतिरिक्त त्याचे परमार्थाविषयीच्या तत्त्वज्ञानास धर्मच म्हणतात.

यात लक्षात घेण्यायोग्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमावलीपैकी एकही नियम कोणावर लादलेला नाही. प्रत्येक मनुष्याकडुन विशिष्ट आचरणांची अपेक्षा आहे पण जोरा नाही. असे असताही समाजात या नियमांचे बर्‍यापैकी आपणहुन पालन होतांना दिसते. माझ्या मते यामागचे कारण भारतीय मनावर परमार्थाविषयीचा पगडा होय. कळत- नकळत समाजाचे विविध स्तर परमार्थाविषयीचे तत्त्वज्ञान आत्मसात करित असतात व त्यांचे प्रतिसाद भौतिक आयुष्यात सतत उमटतात.

भारतीय पुरातन इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की विविध विचारप्रणालींनी भारतीय संस्कृतीला नटविले आहे. यातील बौध्द व जैन या नास्तिक विचारधारा वगळता इतर सर्व विचारधारा वेदांशी आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतात. (चार्वक संहितेचा मी या विचार-प्रणालींमधे समावेश केलेला नाही.) यात सर्वात शेवटची संस्था म्हणजे वेदांत होय. आचार्यांच्या बरेच आधी वेदांत विचारप्रणालीचा उगम झालेला होता. आचार्य बद्रायण यांनी 'वेदांत सुत्र' ग्रंथात ५५० सुत्रांद्वारे वेदांतावर भाष्य केले असे मानल्या जाते. या ग्रंथातच ब्रह्मैक्यत्वाचा मुद्दा आढळुन येतो. या तत्त्वावरच पुढे आद्य शंकराचार्यांनी अद्वैत सिध्दांताची मांडणी केली. भारत वर्षात जन्मलेल्या अनेक तत्त्वज्ञानांपैकी आजच्या घटकेला अद्वैत वेदांतच जिवंत आहे यावरुन त्याचे महात्म्य सिध्द होते. याचा अर्थ असा नव्हे की आधीच्या विचारप्रणाली चूक होत्या. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रगतीपथावर अद्वैत शेवटचा मुक्काम मानता येइल.
(क्रमशः)

No comments: