आज गुरुपोर्णिमा, त्या प्रित्यर्थ माझ्या अराध्य दैवताबद्दल थोडं लिहावस वाटलं. खर तर शिवाजींबद्दल जेष्ठ-श्रेष्ठांनी अगणित गौरवास्पद शब्द उधळले आहेत. पण आजच्या समाजात या स्तुती-सुमनांच निर्माल्य व्हायला मुळीच वेळ लागत नाही. खरतर या व्यक्तीची केवळ गाथा गाउन आपण तीचा अपमानच करतोय. शिवाजी हे मुर्तीमंत कर्मयोगी होते पण त्यांच्या कार्यापासुन शिकण्या ऐवजी आपण त्यांना देवघरात बसवुन मोकळे झालेलो आहोत. आणि एकदा का कोणाला देवघरात बसवल कि आपण वाट्टेल ते करायला आपण मोकळं.
पण शिवाजी थोर का होते? मराठी घरा-घरात तरी प्रत्येक पोरं त्यांच्या गोष्टी ऐकत मोठ होतं. अफझलखान वध, शाइस्तेखानाच पराभव, आग्र्यातुन सुटका या शिव-लीला प्रत्येक मराठी माणसाला कंठस्थ आहेत. पण केवळ या त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा थोरपणा सिध्द होत नाही. अत्यंत धाडसी होते अस म्हणु शकतो. मग काय शिवाजींनी इस्लामी सत्तेच्या ऐन मध्यरात्री हिंदवी स्वराज्याच्या सुर्यास आमंत्रण दिले म्हणुन का ते थोर आहेत? एखाद वेळेस यात थोडं तथ्य आहे पण त्यांची थोरवी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यापूर्तीच मर्यादित नाही. 'हा परिसर माझा आहे आणि येथे आता मुसलमानी सत्ता चालणार नाही' असे त्यांनी म्हटले नाही तर सामान्य नागरिकाला - जो मुसलमानी सत्ते अंतर्गत भरडला जात होता - त्यांनी स्वराज्याचे महत्त्व पटवुन दिले. समाजाला त्यांनी जो आत्मविश्वास दिला त्यामुळेच ते खरे युग-पुरुष आहेत.
ते जरी स्वराज्याचे शिल्पकार असले तरी त्यांनी या लढ्यास केवळ स्वत:वर केंद्रित केला नाही. स्वराज्य निर्मिती हे श्रींचे कार्य आहे असे म्हणुन स्वराज्य निर्मिती ही केवळ आवश्यकता नसुन कर्तव्य आहे हे सामान्य नागरिकाच्या मनात बिंबविले. याचा परिणाम असा झाला कि शिवाजींच्या अकाली व अनपेक्षित मृत्यु नंतरही लढा केवळ चालू न रहाता अजुन फोफावत गेला.
त्यांनी स्वातंत्र-मंत्राचा जणु खो समाजाला दिला. त्यामुळे शिवाजींच्या मृत्यु नंतर औरंगझेब जरी २७ वर्ष दख्खनात तळ ठोकुन बसला होता तरी तो हिंदुपातशाही नष्ट करण्यात यशस्वी झाला नाही. शेवटी मराठ्यांनीच त्याची कबर खोदली आणि त्याच्या मृत्युनंतर २० वर्षातच थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झालेत.
शिवाजींनी जेंव्हा स्वराज्याचा लढा पुकारला तेंव्हा खर सांगायच तर फारसा कोणाला तो ऐकु आला नाही. त्याचे प्रतिसाद उमटण्यास अजुन काही वर्षे जायची होती. ज्यांना त्यांच्या लक्षाची कल्पना होती त्या पैकी बहुतांश लोकांनी त्यांना वेड्यात काढले असणार. कारण मुघली सत्ता तेंव्हा जवळपास ३ ते ४ लाख सैन्य उभे करु शकत होते. दख्खनी सत्ता - आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही- १ ते २ लाख सैन्य उभे करु शकत होते. मुख्य म्हणजे या सर्व मुसलमानी सत्तांना हिंदु पातशाहीची कल्पना बिल्कुल सहन होणारी नव्हती. या सर्व मुसलमानी सत्तांनी पूर्ण हिंदुस्थानाला दार्-उल्-इस्लाम करण्याचा चंग बांधला होता. अश्या परिस्थितीत मुठभर मावळ्यांना पाठीशी घेउन शिवाजींनी बंड करण्याची धाडस केलच कस?
त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेतला तर लक्षात येइल कि अवाजवी धाडस दाखवण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. प्रत्येक युध्द, प्रत्येक चढाई दिर्घ व विस्तृत विचार करुनच त्यांनी आरंभिले. अश्या परिस्थितीत स्वराज्याचा नारळ नासका न निघण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली असेल?
सर्व प्रथम म्हणजे त्यांनी शत्रुची संपूर्ण ओळख होती. त्यांनी इतिहासाचा चांगलाच अभ्यास केला असणार. इतिहासात हिंदु लोकांनी मुसलमानी सत्तांशी लढतांना ज्या चूका केल्यात त्या पुन्हा न करण्याची त्यांनी आरंभापासुन काळजी घेतली. त्यांनी सगळ्यांशी भांडण एकाच वेळेस घेतले नाही. जो पर्यंत शक्य होते तो पर्यंत एका वेळेस एकाच शत्रुशी त्यांनी झुंज केली. सन १६५० पर्यंत निजामशाही बरीच खिळखिळी झाली होती. त्यामुळे त्यांनी आधी फक्त आदिलशाहीशी भांडण सुरु केले. या दरम्यान त्यांनी मुघली सत्तेशी गोडी-गुलाबीचे संबध ठेवले. आता हा पोरगा काय करण्याचा प्रयत्न करतोय हे न कळायला मुघल मूर्ख नव्हते पण शिवाजींनी या मुसलमानी सत्तांच्या आपापसातील भांडणांचा पूरेपुर फायदा घेतला. या दरम्यान बारा मावळ व कोंकण परिसरातील सरदार व देशमुखांना त्यांनी आपलस करण्याची मोहिम जोरात चालू ठेवली. जे ऐकत नव्हते त्यांना जावळीच्या मोहिमेद्वारे स्पष्ट संदेश दिला. पण जावळीच्या मोहिमेमुळे आदिलशाही खवळली आणि शिवाजींची कारगिर्द सुरु झाली.
त्यांना लढाईतुन पळुन जाण्यात मुळीच हशील नव्हते. कारण उगाच 'जोहार' करुन काही साध्य होणार नव्हते हे राजपूतांच्या इतिहासातुन स्पष्ट होते. पण याचा अर्थ ते पळपुटे होते असा नाही. जेंव्हा अफझलखानाशी झुंज घेण्याचा प्रसंग आला तेंव्हा त्यांनी अफझलखानास छातीवर घेतला पण परत उगाच मर्दुमुकी दाखवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. दिलेल्या शब्दास मुसलमान मुकतात व दगाबाजी करतात हे लक्षात घेउन त्यांच्याशी वागतांना शिवाजींनी हेच धोरण पत्कारले. अफझलखानास मुळीच धोका नाही असे वचन देउन त्यांनी त्या राक्षसाला जावळीत दाखल केला व त्याचा निकाल लावला.
त्या काळात हिंदु लोकच एक-मेकास दगा करण्यास मागेपुढे बघत नसत. शिवाजींचे गुप्तहेर खाते शक्तिशाली व प्रभावी होते। या गुप्तहेर खात्यामुळेच शिवाजींना कधीही दगा-फटका झाला नाही. अगदी आग्र्याहुन सुध्दा ते सुखरुप परतु शकले. तसेच केवळ शत्रु सैन्याच्या हालचालीच नव्हे तर सुल्तानी दरबारात काय चालल आहे याची बित्त-बातमी त्यांना लगेच कळे.
त्यांनी सैन्याच्या बांधणीत सुल्तानी सैन्याच्या तुलनेत आमुलाग्र बदल आणला.शिवाजींनी सैन्यातुन हत्ती व तोफांचे वजन कमी करुन टाकले. त्यामुळे त्यांचे सैन्य कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करु शकत. शिवाजींच्या सैन्याच्या चपळतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ते सुरतेची लुट पाठीवर घेउन सुध्दा ते स्वराज्याच्या हद्दीत सुल्तानी सैन्याचा सामना न करता सुखरुप परत आले. वतन व जमिनी वाटण्याच्या प्रथेस त्यांनी बराच आळा घातला. सैन्यातील शिपायांना पगार मिळत असे. तसेच तलवार व घोडे पुरविले जात. यामुळे चढाईच्या वेळेस लुट-पाट करण्याची आवश्यकता पडत नसे आणि शिपाई-गडी स्वराज्यास निष्ठावंत राही.
सध्य परिस्थितीत भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांतर्गत जो सावळा गोंधळ चालतो तो बघता शिवाजींनी खेळलेल्या राजकीय तसेच सैनिकी चालींचे महत्त्व अजुन पटते. पण दु:खाची गोष्ट ही आहे की शिवाजींनी आसेतु-हिमाचल आपला मानला व हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले पण सध्याच्या हिंदुस्थानात शिवाजी हे व्यक्तीमत्व केवळ प्रांतीय बनुन राहिले आहे. मराठा साम्राज्याच्या सन १७६० ची सीमा-रेषाच आजच्या हिंदुस्थानाची सीमा-रेषा आहे. यावरुन शिवाजींनी आरंभिलेल्या कार्याचे महात्म्य लक्षात येते. पण राजकीय पक्षांनी प्रत्येक तत्त्व जणु बाजारात विकायला काढले आहे. त्यामुळे शिवाजींपासुन काही शिकण्या ऐवजी ते सांप्रत राजकारणाचे केवळ प्यादे बनले आहेत. १९४७ सालच्या फाळणीचा नर-संहार काय किंवा चीन युध्दात सपशेल पराभव काय किंवा कारगिल युध्द काय, प्रत्येक वेळेस आपले नेते मूर्ख बनलेत.
दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव, धडाडी नेतृत्वाचा दुष्काळ, इतिहासातुन काहीही शिकण्यास नकार, सत्तांधळी व कुपमंडुक प्रवृत्ती असलेल्या आजच्या नेत्यांनी शिवाजींना गुरु मानले तरच भारताचे भविष्य उज्वल ठरेल नाही तर परिस्थिती कठीण आहे.
1 comment:
tumcha blog phar avadla…tumhi aajun lhivaylcha prayatna kara..hi site paha www.quillpad.in hechana tumala phar madad vahil…vaprun paha…
Post a Comment