प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होणार माझ्या मनात पहिला प्रश्न हा आला कि ही व्यक्ती कोण? आता, मी उत्तर प्रदेशी असतो किंवा तामिळ असतो तर हा प्रश्न पडणे सहाजिक आहे पण मी मराठी असुन सुध्दा ही व्यक्ती कोण याचा गंध मला नव्हता. अजुनही नाहीया. भारतीय राष्ट्रपती पद हे नामधारी मानाचे स्थान आहे. आपल्य देशातील लोकतांत्रिक व्यवस्थेत या पदाला गणतंत्रदिनी भाषण देण्या पलिकडे फारसे महत्त्व आत्ता पर्यंत नव्हते. फाशीच्या शिक्षेचा अंतिम निर्णय राष्ट्रपतींच्या हाती असतो खरा पण हा निर्णय घेण्याची परिस्थिती दुर्मिळ येते. अश्या परिस्थितीत प्रतिभाताईंच्या राष्ट्रपती होणार या मुद्द्याने एवढे वादळ का निर्माण केले?
राष्ट्रपतीपदाची निवडणुक पंतप्रधान पदाच्या निवडणुकी पेक्षा निराळी असते व या पध्दतीचे विश्लेषण येथे करण्याचा माझा विचार नाही. थोडक्यात, जो राजकीय पक्ष सत्तेवर असतो त्याच्या आवडीचा व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवडुन येतो. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाची अनिभिषिक्त सत्ता बरीच वर्षे चालल्यामुळे कॉंग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती म्हणुन निवडुण येतं असे. आणि काँग्रेस पक्ष म्हणजे गांधी-नेहरु घरण्याचा पाणपोई असल्यामुळे सन १९७० नंतरच्या काळात या 'राज-घराण्याचे' जो निष्ठावंत पाईक असेल तो राष्ट्रपती म्हणुन नेमल्या जाईल. याचा अर्थ असा नव्हे कि या काळातील राष्ट्रपती कर्तबगार किंव्हा हुशार नव्हते पण गांधी-नेहरु घराण्याशी निष्ठा असणे याचा बुध्दी असण्याशी काहीसुध्द्दा संबध नाही.
नरसिंम्हाराव सरकार नंतर जो गठ-बंधनाचा काळ आला त्यात राष्ट्रपतीपदाचे महत्त्व वाढले. कारण जेंव्हा लोकसभेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस राष्ट्रपतीस जो पक्ष बहुमत सिध्द करु शकेल अशी आशा असते त्या पक्षास सत्ता स्थापन करण्यास आमंत्रित करण्यात येते. उदाहरणार्थ, १९९७ सालच्या त्रिशंकु निवडणुकीत तेंव्हाच्या राष्ट्रपतींनी सत्ता स्थापन करण्यास सोनिया गांधी यांना आमंत्रण देण्यास राजी होते. पण त्याआधीच समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे गाडं फारस पुढे गेल नाही. पण सत्ता स्थापन करण्यास आवश्यक आकडे सुरुवाती पासुनच नसतांना के.आर. नारायण सोनिया गांधींना निमंत्रण देण्यास एवढे उतावळे का होते? कारण एकतर ते पूर्वी काँग्रेसचे सदस्य होते व दुसरं म्हणजे जवाहरलाल नेहरुंच्या काळापासुन ते गांधी घराण्याचे निष्ठावंत पाईक होते.
जवळच्या भविष्यात तरी त्रिशंकु लोकसभचे चित्र त्रिशंकुच असण्याची शकत्या अधिक असल्यामुळे राष्ट्रपतीपदावर 'आपला' माणुस असणे आता आवश्यक झाले.
भा.ज.प. ने मात्र सत्तेत आल्यावर या परंपरेस तडा दिला. श्री अब्दुल कलाम या एका अत्यंत हुशार, कर्तबगार, राजकारणी नसलेल्या व तरुण पिढीच्या आवडत्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, श्री राजेंद्रप्रसाद किंवा श्री राधाकृष्णन या सारख्या मेधावी पुरुषांना राष्ट्रपती नेमण्याच्या परंपरेचे पुनरुत्थान केले. तसेच हिंदुत्ववादी पक्ष ही ख्याती असलेल्या भा.ज.प. ने एक मुस्लीम व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, हे पद राजकारणापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे पण सिध्द केले.
पण आता परत काँग्रेस सत्तेवर आहे. लांगुललाचन परत जोरात सुरु असतांना एका अज्ञात व्यक्तीला- जीची आत्तापर्यंतची कामगिरी म्हणजे एक सहकारी पतपेढी बुडीत काढणे ही आहे, जी व्यक्ती आपल्या स्वर्गवासी गुरुला अजुनहे 'भेटते' आणि जीचे आयुष्याचे व्रत म्हणजे गांधी घराण्याची सेवा करणे हे होय - राष्ट्रपती पदासाठी नियुक्त करणे म्हणजे सुशिक्षित व कष्टीक भारतीय नागरिकाचा अपमान नव्हे का? तसेच ज्या तर्हेने कम्युनिस्ट पक्ष आपल्या ४० लोकसभा सदस्यांच्या 'बळावर' श्री अब्दुल कलाम यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदावर येउ न देण्याची देशावर जी जबरदस्ती करतोय, तो प्रकार संतापजनक नव्हे का?
अगदी काँग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती करायचा असला तरी काँग्रेस मधे काय कर्तबगार व्यक्तींचा दुष्काळ पडलाय का? राजा करणसिंग अधिक उत्तम उमेदवार नाही का? पण अर्जुन सिंग सारखा व्यक्ती ज्याची सत्तापिपासुता पुढल्या पिढीचा बळी घेणार आहे किंवा शिवराज पाटील ज्यांची आत्ता पर्यंतची कामगिरी म्हणजे पाय चाटणे हीच आहे, त्या पेक्षा प्रतिभाताई बर्या. कर्तबगार नसल्या तरी निदान सत्तापिपासु किंवा फारश्या भ्रष्ट नाहीत.
आपण भारतीयांना दुय्यम दर्जाच्या वस्तु स्विकारायची सवय आहे. जे मिळेल ते गोड मानुन आपण टाळ्या वाजवायला तयार असतो. आपणच काँग्रेस पक्षाला निवडुण दिले आहे. शेवटी जसा राजा तशी प्रजा. किंवा प्रजातंत्रात, जशी प्रजा तसा राजा !
2 comments:
अगदी बरोबर आहे.
http://kasakaay.blogspot.com/2007/06/blog-post_26.html#links
मी अमरावतीची आहे.
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
Post a Comment