7/16/07

सन १६४६

वाड्यासमोर एकदम पंचवीस घोडी उभी राहिल्यावर वाड्यात धावपळ सुरु झाली. अचानक आज हा पाच-हजारी सरदार कसा काय उगावला याचं सगळ्यांनाच कोडं पडल होत. पण इतका विचार करायला कोणाला फुरसतं नव्हती. तबेलेदार घोड्यांच्या निगराणीची सोय करु लागला तर घोडेस्वारांच्या खाण्या-पिण्याच्या सोयी साठी वाड्यातील माणसांची धांदल उडाली. वाड्याचा मालक स्वतः घाई-घाईने तयार होउन पाहुण्यांच्या स्वागतास उंबरठ्यापर्यंत गेला.

"या या राजे. अलभ्य लाभ कि आपले पाय या गरीबाच्या ओसरीस लागलेत" घर मालकाने स्वागत केले.

"या परिसरातुन गुजरत होतो म्हटल की चौकशी करावी थोडी. त्रास तर देत नाहीया ना जास्त?"

"असं बोलुन शरमिंदे करताय राजे तुम्ही. त्रास कसला आला त्यातं. आधी निरोप पाठवला असता तर वेशी पर्यंत आलो असतो की." घर मालक स्वतः बुचकळ्यात पडला होता.

पाच-हजारी सरदार असा दोन-हजारी सरदाराकडे 'डोकावत' नाही. प्रकरण बहुधा गंभीर असणार. पावसाळा नुकताच आटपलाय आणि पेरणी पण व्यवस्थित झाली होती. घोडी फुरफुरायला लागली होती. कुठल्यातरी स्वारीचा बेतं असेल असे घर मालकास वाटले. पण सध्या सगळ्या बादशाह्या शांत होत्या. औरंगझेब दख्खनी बसला होता खरा. बहुधा त्याच्या संबधीतच काही तरी असेल.

सरदारासोबत एक १५-१६ वर्षाचा पोरगा होता. त्याच्या हालचाली कुलीन होत्या व नजरेत भलतीच धार होती. सरदारासोबतीची शिपाई त्या पोरासमोर अदबीने वागत होती. हा पोरगा कोण हा प्रश्न घरमालकाला पडला पण त्या बद्दल तो काही बोलला नाही.

सरदाराला तो आतल्या खोलीत घेउन गेला. "कान्होजींचा निरोप घेउन आलोय" सरदार खोलीत जाता जाताच म्हणाला.

"कान्होजींचा निरोप? राजे, कान्होजींनी हुकुम केला असता तरी त्यांच्या पायाशी दाखल झालो असतो आम्ही. मला ते तीर्थरुपी आहेत. आपण तुकडा मोडा, थोडा आराम करा मग आपण बोलुया"

घरमालक सोबत आलेल्या मुलाकडे बघुन म्हणाला " शिपाई-गड्यांची सोय परसात केलीय."

"त्यांना राहुद्या आमच्यासोबतच" सरदार म्हणाला.

हा पोरगा कोण आहे हे घरमालक विचारणारच होता तेवढ्यात सरदार म्हणाला "राजे. निरोप महत्त्वाचा आणि तातडीचा आहे. किल्ले तोरण्याबद्दल ऐकलच असेल तुम्ही?" सरदारने प्रश्न विचारला.

आता घरमालकाच्या डोक्यात लख्खा प्रकाश पडला. तो एकदम गहन विचारात पडला. त्याच्या चेहर्‍यावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याला काय बोलावे सुचेना. तोरण्यावर झालेले प्रकरण बुध्दीच्या पलिकडे होते. कोकण पट्टीपासुन ते खानदेशा पर्यंतचे सगळे देशमुख आणि सावंत बुचकळ्यात पडले होते. आणि काही कमी असेल तर चक्क कान्होजी यात सामिल होते.

"एवढा काय झालं विचार करायला? मला वाटलं कि तुम्ही एका पायावर तयार व्हाल." सरदार बोलला.

"म्हणजे? निरोप काय आहे ते तर सांगा" घर मालकाने विचारले. खरतर निरोप काय आहे हे घरमालकाला कळले होते.

सरदार उभा राहिला. खोलीत येर-झारा घालु लागला. कान्होजींची सक्त ताकीद होती कि गोडे-गुलाबीनेच माणसं आपली करायची म्हणुन. त्यामुळे विषयासं कसं तोंड फोडावे याचा विचार करु लागला. गोष्ट कठीण होती. सोपी नव्हती. पण या कार्यातील यशावर पुढल्या बर्‍याच गोष्टी निर्भर होत्या. म्हणुनच कान्होजींनी खास या सरदारास गाठी-भेटींच्या मोहीमेस पाठवले होते. त्याने त्या पोराकडे नज़र टाकली. पोरगा शांतपणे सरदार व घरमालकास न्याहाळित होता.

"निरोप? राजे, न कळायला खुळे का तुम्ही. सह्यांद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात काय वारं वहातय हे का कळतं नाहीया तुम्हाला? एवढ्या लढाया तुम्ही झेलल्यात छातीवर. आता या छातीची आणि समशेरीची गरज श्रींच्या कामासं आहे. बोला, कधी दाखल होताय या कार्यात?" सरदाराने विषयात हात घातला.

"राजे, तुम्ही वयाने व मानाने मोठे आहात तरी थोडं स्पष्ट बोललेल चालेल का? घरमालकाने विचारले.

"तुम्हांस आमचे भाऊ मानतो. मन-मोकळेपणाने बोला. तुमचं ऐकायलाच आलोय अस समजा." सरदार उत्तरला.

"अहो, सोळा वर्षाचं पोरगं ते. काय कळतंय त्याला. उनाड मुलांसोबत फिरुन वारं गेलय त्याच्या कानात. या पुंडाईस स्वराज्य म्हणतोय तो. बादशाहची नज़र पडली की कोणात उभी रहायची छाती आहे ते सांगा मला. पण तुम्ही या पोर-खेळात का सामिल होताय? बादशाही वरंवटा काय असतो नेमकं ठाउक आहे तुम्हांस. शेवटी तो वरंवटा आपल्या घरावरुनच फिरणार. त्याचा बा जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्यांस कोणी हात लावित नाही. पण आमच्या सारख्यांचा कोण वाली?" घर मालकाने आपली बाजु मांडली.

"तुम्हांस वाटत तसा काही बच्चा नाहीया तो. छावा आहे तो. वय शौर्याचे माप-दंड नसते. या पोरात चांगलाच दम आहे. चांगल्या-वाईटाची जाण आहे आणि आपल्या माणसांसाठी वाट्टेल ते करण्याची हिंमत आहे. ज्या उनाड मुलांची गोष्ट करताय ती पोरे त्याच्यासाठी प्राण द्यायला मागे-पुढे बघणार नाहीत. वरंवटा फिरला तर सगळ्यांच्या घरावर एकत्रच फिरेल. शेवटी कान्होजी राजे पाठीशी आहेत की त्या पोराच्या. आता कान्होजीस रुचलय तर आपली काय बिशाद नाही म्हणायची. आणि असं बघा शहाजी राजांचा फायदाच आहे आपल्याला. जो पर्यंत शहाजी राजांची ढाल आहे तो पर्यंत स्वराज्याच्या बाजु बळकट करायच्या आणि मग हरं हरं महादेव. तुम्ही लढलात की शहाजींच्या पदरी. त्यांच्या मुत्सद्दीपणाची पहेचान तुम्हास करुन द्यायची काही गरज नाही. " सरदाराने प्रत्यक्ष न बोलता मीठाची जाणीव करुन दिली.

"कान्होजींचे तर अनंत उपकार आहेत आमच्यावर. त्यांच्यामुळे शहाजी राजांच्या पदरी नोकरी लागली. त्यांच्याच पदरी राहुन ही पाच गांवे आणि जमिन देण्याची बादशाहने मेहेरबानी केली. पण नाही म्हटल तरी त्यांचा संसाराची संध्याकाळ होतेय आणि माझा ऐन मध्यात आहे. त्यांच्या म्हातारचळीसाठी मी का सर्वस्वाचे बेल-पात्र चढवु?" घरमालक बोलुन गेला.

खोलीत शांतता पसरली. कान्होजींच्या बाबतीत इतरवेळी असले उदगार कोणी काढले असते तर समशेरी आत्तापर्यंत म्यानात नसत्या राहिल्या. पण आज परिस्थिती वेगळी होती. सरदाराने आपला राग काबुत ठेवला.

"राजे, तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती आम्हास. अहो, किती वर्ष बादशाची चाकरी करायची? काय मिळवायचं यातुन? आज कृपा आहे तर उद्या नाही. तुम्ही आमची साथ द्या किंवा नका देउ पण तुमच्या घरावरुन वरंवट फिरायचा असेल तर फिरेलच. आणि कृपा करणारा बादशहा कोण? हे यवहुन-तुरकी लोक, आपल्या भूमीवर राज्य करता आहेत आणि आपण त्यांच्या मीठाची आण आपण कुत्र्यासारखी खातोय. आधी गांधार गेला, मग सिंधु गेली. आता तीर्थक्षेत्रेही सुरक्षित नाहीत यांच्यापासुन. सोमनाथाच काय झाल? अयोध्येचं काय झाल? दूर कशाला जायचं, पुण्याच्या जमिनीवरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा कुठे होता तुम्ही? किती वर्ष या नाही तर त्या नाहीतर अजुन कुठल्या बादशाहची सेवा करत जगायच? सत्कार्यी ठेविली ती निष्ठा नाही तर ती नुसती चाकरी होते" सरदार म्हणाला

"कसलं स्वराज्य? कसला बंड, कोण बादशहा आणि कोणाची भूमी. हे प्रश्न निरर्थक होउन आज ५०० वर्ष झालीत. स्वतःला 'सिंह' म्हणवून घेणारे राजपुत जातीचे भ्याड, आपल्या पोरी-बाळी निसंकोच पणे मुसलमानी घरात पाठवतायत. त्यांनासुध्दा हे मुसनमान नाही झेपले. या राजपुतांची पेंढा भरलेली ही मढी दिल्लीच्या दरबारात भिंतीला खिळे लाउन ठोकली आहेत आणि तुम्ही मला सांगताय की हे सोळ वर्षाचं पोरग हिंदवी राज्य स्थापन करेल म्हणुन. अख्या हिंदुस्थानात आपणच देव-धर्माबद्दल विचार करण्याची गरज का आहे? " घरमालक उभा राहुन खिडकीजवळ गेला.

"तीर्थक्षेत्रे वाचवुन काय उपयोग आता? हि खालच्या रक्ताची मुसलमानी लोकांनी जेंव्हा सिंधु ओलांडली आलीत तेंव्हाच भ्रष्ट झाल सगळ तीर्थ. आता ही स्थाने सोवळी करण्याची ना कोणाची छाती आहे ना कोणाच्या समशेरीत दम आहे. आणि ज्याने ज्याने बंड केला तो हर एक जण, राजा हरपाल देवासारखा कातडं सोलुन वेशीवर टांगल्या गेला. एवढ इतिहासात कशाला जाताय, इथे आपल्या जवळ दक्षिणेला तालीकोटाच्या युध्दात काय झाल विसरलात का? एक माणुस जिवंत ठेवला नाही या सुल्तानांनी. एक-एक इमारत, एक एक मंदिर जमिनदोस्त केली आणि हर एक बाई बाजारात विकली." घर मालक जणु स्वगत बोलत होता.

"होतो ना मी तिथेचजेंव्हा पुण्यावरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा. शहाजी राजांच्या पाठीशी पाठ लाउन मी सुध्दा लढलोय की. त्यांनी बरीच स्वप्ने दावली आम्हास. त्या बादशाही पोरास गादीवर बसवुन आपणच राज्य करु म्हणालेत ते. सगळे उपाय शेवटी थकल्यावर, शहाजी राजे गुमान आदिलशहाच्या पायाशी दाखल झालेत आणि दक्षिणेस निघुन गेलेत. पण जी शेकडो लोक त्यांच्या स्वप्नांसाठी मेलीत त्यांच काय? कोण विचारतय आता त्यांच्या मढ्यांना?" घरमालकाने आपली व्यथा प्रकट केली.

या बोलण्याचा त्या पोरावर परिणाम झाला होता. त्याच्या करारी नज़रेत आश्चर्य व दयेच्या काहिश्या विचित्र छटा दिसत होत्या. एवढा इतिहास माहिती असुन हा इसम आपली तलवार बादशाहीसाठी कसा लढवतो हे त्याला कळेना. तो काही तरी बोलणार होता पण त्याने स्वतःला रोकले. आज फक्त सरदारच बोलणार असे ठरले होते.

"ज्या अपमानांची गोष्ट करताय ना त्यानी गांगारुन जायच कि स्फुरण चढुन परत लढायला तयार व्हायच? राजपुतांचा कशाला विचार करता, तुमच्या आईच दुध तुम्ही प्यायला आहात का नाही? काही देणं आहे का त्या दुधाच कि बादशाहीची पाय चाटायला दुध पाजलं तुमच्या मायनी? अवघ सोळा वर्षाचा पोरा-टोरांनी स्वराज्याची आणं वाहिली आणि तुम्हा-आम्हा सारखे अनुभवी लढवय्ये सरदार भ्याडासारखे हातात बांगड्या घालुन ५ गावांच्या तुकड्यावर जगत राहिलो तर तुळजापुरची माय हसणार नाही का? इतिहास काय म्हणेल आपल्याला?" सरदार उत्तरला

"फार प्रभावित केलेल दिसतय त्या पोरानी. मी ऐकलय की माणसांना आपलसं करण्यात पटाईत आहे. पण इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या बाता करण्यात काही हशील नाही. तराईच्या युध्दानंतर गेल्या ५०० वर्षात इतिहासाकडे रडण्या पलिकडे काहीही उरलेल नाही. या ५०० वर्षांच्या जखमांवर मलम्-पट्टी करणे आता शक्य नाही. त्याचा बदला घेणे शक्य नाही आणि फारसा अर्थही नाही. सगळ विसरुन मुकाटपणे जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य संपूर्ण कंठण्याची थोडी शक्यता आहे. आजच्या जमान्यात ज्यानी-त्यानी आपली काळजी घ्यायची असते. तसेही या स्वराज्य वगैरे प्रकरणात जरी आम्ही शामिल झालो तर आम्हास काय फायदा आहे? विचारा त्यांस आणि कळवा आम्हाला" घर मालकाने हे बोलुन या विषयावर जणु पाणी सोडले.

पाहुण्या सरदाराने हताशपणे त्या पोरा़कडे बघितले. तो काहीतरी बोलेल अशी सरदाराची इच्छा होती पण तसली काही चिन्हे दिसत नव्हती.

"राजे, फार अपेक्षा होत्या आपल्याकडुन कारण तुमच्या संगे आम्ही सुध्दा शहाजी राजांसोबत लढलो होतो. आम्हास वाटले कि या कार्यात तुम्ही एका पायावर तयार व्हाल म्हणुन कान्होजींनी सोपवलेल्या कामाचा नारळ तुमच्या उंबरठ्यावर फोडायच ठरवल. पण नारळ नेमका नासका निघाला. राजे, मरण शेवटी सगळ्यांच्याच नशिबी असत. पण तुम्ही कशासाठी मरता यावर जगण्याच यश अवलंबुन असत. अपयशाची असंख्य कारणे असतात पण यशस्वी होण्यास फक्त एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आत्मविश्वास. शिवबा आम्हास तो आत्मविश्वास देतो. इतिहासातील पराजयाचे मुडदे खांद्यावर घेउन कधीच भविष्य बनवु शकत नाही. हे मुडदे खाली टाका आणि आजु-बाजुला काय चालल आहे हे डोळे उघडुन बघा. ही तीर्थक्षेत्रे आपली आहेत आणि ती आपल्यालाच सोवळी करायची आहेत. ही भुमी आपली आहे आणि यवनां पासुन आपणच तीला मुक्त करायचे आहे. हे आपल कर्तव्य आहे. हे कार्य शिवबाच नव्हे, हे कार्य श्रींच आहे. या कार्यातील यश-अपयश आपल्या हाती नाही, ती तुळजाभवानीची इच्छा. पण या कार्यात सहभागी होण न होण तुमच्या हातात आहे"

या बोलण्याचा थोडा परिणाम घरमालकावर झाला. तो गहन विचारात गढुन गेला. सरदारांस आशेचे किरण दिसु लागले.

" एवढा नकोय विचार करायला. राजे, स्वप्न भंगली म्हणुन काय स्वप्न बघायची थांबतो का आपण? आज तर ही स्वप्ने सत्यात आणायची सुवर्ण संधी मिळतेय. एक होउन शिवबाच्या पाठी उभे राहिलो तर आपला सामना करण्याची अख्ख्या दख्खनात कोणाची हिंमत आहे सांगा बरे? सरदाराने शेवटचा खडा टाकला.

"राजे, या कार्यात सामिल व्हायला काही हरकत नाही मल पण पुर्वजांच्या अनुभवांवरुन शिकण हे सुध्दा आपलच कर्तव्य आहे व त्यातच शहाणपणा आहे" घरमालक लगेच उत्तरला. वतनाची आस, सत्कार्याच्या निष्ठेपेक्षा वरचढ ठरली.

काहिसा विचार करत त्याने विचारले, "अजुन किती लोक सामिल झाले आहेत?"

सरदाराने नावे सांगितली आणि म्हणाला" बारा मावळातील बरेचसे सरदार सामिल झाले आहेत. काही सरदार आपणहुन सामोरे आले. काहींना कान्होजींचा निरोपच पुरेसा होता." सरदाराने घसा खाकरला आणि शेवटचे विचारले " मग कान्होजींस तुमचं काय उत्तर सांगायचे?"

घरमालकाला काय उत्तर द्यावे ते सुचेना. "आपण केलेली चर्चा खास़गीच राहिल अशी अपेक्षा करतो" एवढच तो म्हणाला.

कान्होजींबाबत काहीतरी पायरी सोडुन बोललो याची त्याला आठवण झाली. "तुम्ही ती चिंता करु नका" अस म्हणत सरदार उभा राहुन निघण्याची तयारी करु लागला.

"राजे, निघालात? जेवणाची पानं वाढली आहेत. न जेवता गेलात तर आम्हास बरे नाही वाटणार. " घर मालक म्हणाला.

"सवड नाही राजे. स्वराज्यप्राप्तीची आणं भवानीच्या पायाशी वाहिली आहे. दिवस वैर्‍याचे आहेत. जिंकलेला प्रदेश टिकवण्यसाठी बरीच कष्ट आहेत."

सगळी लोक घोड्यांवर स्वार झालीत. सरदार व घरमालकाने मिठ्या मारल्या.

" हा पोरगा कोण?" न राहवुन घर मालकाने विचारले.

"कान्होजींच्या पदरीचा आहे. हुशार आहे." एवढेच सरदार म्हणाला व घोड्यावर स्वार झाला. मग काहीसा विचार करुन म्हणाला " याची तुमच्याशी ओळख करुन देण्याची फार इच्छा होती पण तसे होणे नव्हते." व त्याने घोड्याला लगाम दिला. धुराळा उडाला व घोडी वेगाने दिसेनाशी झाली.

सरदाराचे शेवटचे वाक्य घरमालकाच्या डोक्यात घोळत होते. त्या बद्दल विचार करत तो घरात येत होता तेवढ्यात तो मुलगा कोण हे त्यांस उमगले. "म्हणजे चक्क ...?" त्याचा जीव घाबरा झाला. " नुसते कान्होजीच नाही तर शहाजी राजांच्या बाबतीत काय काय बोललो" असे काहीतरी पुटपुटत त्याने नोकरांना घोडी तयार ठेवण्याचा हुकुम केला. घाई-घाईने घोड्यांवर स्वार होउन सरदाराला गाठण्यासाठी त्याने घोडी पिटाळली.
००००००
(हि कथा काल्पनिक असली तरी शिव-कालीन इतिहासाशी निगडित आहे. )

टीप -:
सन १६४६ ला शिवजींनी स्वराज्याची स्थापना केली.

तराईचे युध्द, सन ११९२ - या युध्दात पृथ्वीराज चौहाणचा पराभव झाला व भारतात सुल्तानी अंमलाची सुरुवात झाली.

तालिकोटचे युध्द, सन १५६५ - या युध्दात पाच सुल्तानांनी एकत्र येउन विजयनगर साम्राज्य धुळीस मिळविले.

राजा हरपालदेव हा देवगिरीच्या राजा रामदेवाचा जावई. अल्लाउद्दीन खिलजी देवगिरी जिंकुन परत दिल्लीला गेल्यावर हरपालदेवाने बंड पुकारला. तेंव्हा राजा रामदेवरायाने खिलजीला बंड शमवायला आमंत्रण दिले. खिलजीने तातडीने येउन बंड शमविला व राजा हरपालदेवाला जिवंत सोलुन देवगिरी (म्हणजे औरंगाबादेजवळ) च्या वेशीवर टांगले.

कान्होजी जेधे हे शहाजी राजांचे अत्यंत विश्वासु पाईक. त्यांचे बारा मावळात बरेच वजन होते. ते वयाने शिवाजींपेक्षा बरेच मोठे होते. पण स्वराज्याच्या आरंभापासुन ते शिवाजींच्या पाठीशी ठामपणे उभे होते.