7/1/07

इतिहासाची तासिका

'ब' वर्गाला इतिहासाचा विषय शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः शिकवित असत. त्या सेवा निवृत्तीच्या अगदी जवळ आल्या होत्या. ठेंगण्या व आजी सारख्या दिसणार्‍या बाईंचा विद्यार्थ्यांवर मुळीच म्हणजे मुळीच वचक नव्हता. त्यातुन 'ब' वर्ग शिक्षकांना त्रास देण्याचा बराच अनुभवी होता. मराठीच्या व इंग्रजीच्या शिक्षिकां व्यतिरिक्त 'ब' वर्ग कोणालाच जुमानत नसे. त्यातुन मुख्याध्यापिका बाईंना त्रास देण्याची काही औरच न्यारी होती. शेवटी मुख्याध्यापिकेला सळो की पळो करुन सोडलं म्हणजे विशेष शौर्याची गोष्ट होती.

बाई पहिल्या बाकावर पुस्तक ठेउन शिकवत असत. त्यांना थोड कमी ऐकु येत असे. त्यामुळे मुले मागल्या बाकावर बसुन सारख्या 'कॉमेंट्स' करत असतं. "शांत रहा. आजकालच्या मुलांना काहीच लाज वाटत नाही" बाई म्हणाल्या. त्यांची जबडा समांतर हलवित बोलण्याची थोडी विचित्र पध्दती होती. त्यामुळे त्यांचे उच्चार अधिक ठळक होत असत. "पुस्तकं बंद करा" या वाक्यात 'क', 'द' या शब्दांवर जास्त भार त्या देत असत. मुलांना हसायला एवढ कारण पुरेसे होते. बाईंनी शिकवायल सुरुवात केली व मुलांनी मस्ती करायला. जी अभ्यासु मुलं होती त्यांची मात्र पंचाईत होत असे. त्यांना बाई काय शिकवतायत हे ऐकायच असे पण वर्गातील मस्तीखोर मुलांपुढे ते शरण होते.

पहिल्या बाकावर बसलेला मंदार आज विशेष 'फॉर्म' मधे होता. बाई जे काही बोलतील त्यातील एखादा शब्द तो त्याच्या घोगर्‍या आवाजात परत जोरात उच्चारत असे. त्याचा आवाज म्हणजे माईक अगदी तोंडाशी घेउन बोलल की जसा आवाज येइल तसा होता. त्यामुळे अगदी मागल्या बाकावर सुध्दा तो काय बोलतोय ते ऐकु येत असे. एकतर बाईंना मंदारचा वात्रट पणा ऐकु येत नव्हता किंव्हा त्या थकल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत होत्या.

"चिन्मय, हसायला काय झाल तुला? हसणं बंद कर" बाई चिन्मय वर ओरडल्या.
"मस्तीखोर चिन्मय" मंदारने आपले मत स्पष्ट केले.
"हो मॅडम सॉरी" चिन्मय.

"पुस्तक बंद करा व मी काय बोलतेय त्या कडे लक्ष द्या" बाई म्हणाल्यात.
"आता कुठे कुठे लक्ष देउ. मॅडम कडे कि पुस्तका कडे" मंदार उवाच.
पहिल्या बाकावर बसुन असलं काही बोलण म्हणजे मंदारच्या धीटाईची सीमा होती. इतर मुलांवर आता हसुन हसुन पोट दुखण्याची पाळी आली होती.

"चिन्मय, तुला हसायचं असेल तर मागल्या बाकावर जा"
"हो मॅडम, सॉरी मॅडम" अस म्हणत चिन्मय धावत धावत सरळ मागल्या बाकावर दाखल झाला.
"काही लाजच नाही या मुलाला. अगदी लगबगीने मागल्या बाकावर गेला"
"निर्लज्ज चिन्मय" मंदार.

पण मंदार आज एवढ्यावर थांबणार नव्हता. बाईंनी वर बघितलं की तो कागदाचे लहान्-लहान तुकडे पुस्तकावर टाकायचा. शिकविण्याच्या तंद्रीत बाई ते तुकडे बाजुला करायच्या. काही वेळा हे करुन झाल्यावर मंदारने पुस्तकाची पानं बदलवायला सुरुवात केली. पण बाईंच्या काहीच लक्षात कसं येतं नव्हत ही थोडी नवलाईची गोष्ट होती. तेवढ्यात मागल्या बाकावरुन पाय जोर-जोरात जमिनीवर घासण्याचा आवाज येउ लागलेत. बाई तरातरा मागल्या बाकांकडे चालत गेल्या. "कोण मस्ती करतय" म्हणत जो दिसेल त्याला चापट्या मारु लागल्यात. वर्गात 'हॉ..हॉ...' चा गजर झाला. पाय घासण्याचे आवाज मात्र थांबलेत. (तेजसनेच बहुतांश चापट्या खाल्ल्यात.)

या दरम्यात मंदारने कहर केला. त्याने इतिहासाचे पुस्तक बदलवुन त्या जागी गणिताचे पुस्तक ठेवले. बाई शिकवायला परत सुरुवात करणार तेच त्यांच्या हा वाह्यातपणा लक्षात आला. "नालायक" म्हणत त्यांनी मंदारला चापट्या मारायला सुरुवात केली. "आई ग..." मंदार खोटा कळवळला.
पूर्ण वर्ग आता हसुन हसुन लोळायला लागला होता. "तू, तू आणि तू आणि तुझ नाव काय आहे? तू पण वर्गाबाहेर जा" जी मुलं दृष्टीक्षेपात असतील त्यांना बाईंनी वर्गाबाहेर हाकलले.

" मी काय केलं. मी तर काहीच नाही केलं. मार खाउनही वर्गाबाहेरचं जावं लागतं" असली काही वाक्य ऐकु येउ लागलीत. मग उगाच खोटा-नाटा चेहरा पाडुन, फार वाईट वाटतय आणि चुकुन असला गोंधळ झाला इत्यादी भाव तोंडावर दाखवण्याचा प्रयत्न करत वर्गातील मधली ओळ वर्गाबाहेर गेली.

बाईंना शिकवायला जेमतेम १० मिनीटे मिळालीत. तासिकेची घंटा झाल्यावर त्या वर्गाबाहेर आल्यावर त्यांची अपेक्षा होती कि मुले कान धरुन वर्गाबाहेर उभी असतील म्हणुन पण वर्गाबाहेर सामसुम होतं. मुख्याध्यापिका असल्यामुळे त्यांच्याकडे फार काम असे. वर्गाबाहेर चपराशी कोणीतरी आलय हा निरोप घेउन हजर होताच. त्यामुळे त्या घाई-घाईत कार्यालया कडे निघुन गेल्यात. बाहेर काढलेली मुले थोड्याच वेळात जणु काही झालच नाहीया अश्या भावात साळसुद पणे परत वर्गात दाखल झाली.