10/14/23

मनोहर - भाग २

**या कथेचा पहिला भाग मी २०११ ला लिहिला होता. तेंव्हापासून या गोष्टीचा शेवट डोक्यात आहे पण लिहिण्याचा योग जुळला नाहीं. आता बारा वर्षांनी पुढला भाग पूर्ण केला आहे. आशा करतो वाचकांना भाग २ आवडेल. हा भाग वाचायच्या आधी कृपया पहिला भाग - https://marathimauli.blogspot.com/2011/09/blog-post.html  आधी अवश्य वाचावा हि विनंती.  

----

मनोहरच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याने डोळे बारीक केलेत. अंगावर त्याच्या साधा पट्ट्या-पट्ट्या ची जर्सी होती पण पोलीसाची खाकी पँट आणि पट्टा होता. पायात जोडे पण पोलीस चे होते. आधी त्याने त्याच्या वाहिनीकडे बघितले. ती ठोकळ्या सारखी जागेवरच थिजली होती. इंस्पेक्टर च्या बंदुकीतून अजूनही बारीक धूर येत होता. सगळं अगदी क्षणार्धात झालं. तेवढ्यात अंगणाच्या पलीकडे पोलीसची एक जीप ढर-ढर आवाज करीत थांबली. एव्हाना भिंतीला टेकलेला माणूस जमिनीवर कलंडला होता आणि रक्ताचं थारोळं साचायला लागला होत.जीप मधून एखाद-दोघे उतरल्याची चाहूल लागली. 

मनोहरने मागे वळून जीप कडे बघितले. तेवढ्यात तो पोलीस अधिकारी घश्यातुन आवाज काढण्याचा प्रयत्न करीत म्हणाला "अरे पकड रे मनोहर ला"

ठयाक-ठयाक आवाज करीत मनोहरची रिव्हॉल्वर कडाडली. तो अधिकारी आणि हवालदार दोघेहि गव्हाच्या पोत्यासारखे जमिनीवर ढासळले. गोळीच्या आवाजाने जीप मधून उतरणारे लोकही दचकलेत. त्यांना तो आवाज ओळखीचा होता. त्यातल्या दोघांनीं तातडीने पिस्तूरिव्हॉल्वर काढली आणि उरलेल्या दोन हवालदारांनी त्यांच्या ब्रिटिश कालीन थ्री-नॉट-थ्री खांद्यांच्या 'म्यानातून' बाहेर काढल्यात. पण त्यांना कळेना कि आवाज नेमका कुठून आला आहे ते. त्यांना रेडिओ वरून या स्थळावर बोलावले होते पण या घरात जायचा हुकूम नव्हता. आणि कुठलं घर हे पण नीटस माहिती नव्हतं. एक अधिकारी आणि एक हवालदार या गल्लीत आहेत आणि त्यांना गाडीत घालून कोणाच्यातरी शोधावर निघायचे एवढेच ठरले होते. जीप मधल्या अधिकाऱ्याने इशाऱ्याने मनोहरच्या घराकडे बाकीच्यांचे लक्ष वेधले. ते एकच दार अर्धवट उघडे होते आणि आत कोणी तरी उभं असाव अशी चाहूल वाटत होती. जीप मधले चौघे एक हि अक्षर न बोलता पांगलीत. दोघे अगदी दबक्या पावलांनी दाराच्या दिशांनी जाऊ लागलीत. दुसरे दोघे घराच्या बाजूला अंगणाच्या कुंपणाच्या आणि घराच्या भिंतीत एक बोळ होती आणि तिथे खिडकी होती त्या दिशेने सरसावले. घराची पूर्ण कल्पना नसल्याने दिसणारा एक दरवाजा आणि एक खिडकी असे त्यांनी 'नाकाबंदी' केली.

'वाहिनी, वाहिनी....इथे बघ. यांना मारणं जरुरी होत. यांनी मला सोडलं नसता आणि तुला हि"

ती बाई फारशी हलली नाहीं. 

मनोहर हळूच चालत त्या अधिकाऱ्याच्या प्रेताजवळ गेला. त्याने त्याच्या पोटाखाली हात घालून रेडिओ काढला. गोल बटणांना मागे पुढे फिरवत अगम्य खुसपूस त्याने लक्ष देऊन ऐकली. 

मग उठून मनोहर त्या बाईचं बकोट धरून आतल्या छोट्या स्वयंपाक घरात नेले. 

"वाहिनी.....वाहिनी.....ऐकू येतंय का मी काय बोलतोय ते?" मनोहर खुसपुसला 

"अजून पोलीस येतच असतील. मी रेडिओ वर ऐकलंय. मी पळतो आता. याचा बदला मी घेणार. कोणाला सोडणार नाहीं. फुकटातच अकॅडेमित पहिला आलो नाही मी."

"आता तरी जाऊ दे मनोहर." 

"माझी चूकच नाहीं या. मी का जाऊ देऊ? त्या हरामखोरांनी जाऊ द्यायला हवं! मला मारायचा ना हिम्मत असेल तर?"

"तुलाच मारायला आले होते. तू नव्हतास. यायचं होतस मग? कुठे होतास? दोन तास छळत होते आम्हाला. कुठे होतास तू? आणि तुझी पिस्तूल? आणि तुझी नेमबाजी?"

मनोहरला ते आवडल नाहीं. 

"आता बघ यांना दाखवतो मी काय आहे ते" मनोहर पुटपुटला

"आणि मग पुढे काय? कोणी उरणार आहे मागे?"    

दरवाज्याच्या अगदी जवळ आले असतांना एका अधिकाऱ्याच्या पायाखालची अर्धवट तुटलेली फरशी कडकडली. त्या शांत वातावरणात तो आवाज दूरपर्यंत गेला. 

मनोहर ने स्वयंपाक घरातून वळून बघितले. त्याला डावी कडच्या खिडकीतहि  हालचाल जाणवली. नाकेबंदी करण्याचा प्रयत्न होतो आहे हे त्याला कळले. त्याने हे पण हेरलं कि या नवीन लोकांना घराची माहिती नाहीं आणि घरात तीन प्रेत आहेत याची जाणीव नाहीं.

मनोहरला कल्पना नव्हती कि एकूण किती लोक आहेत. रेडिओ वर फक्त अजून एक जीप येते आहे एवढच बोलणं झालेलं होतं.

मनोहरच्या श्वास जोरात चालू होतं. त्याने ओट्या खालचा गॅस सिलेंडर हळूच उचलून बाहेर काढला आणि वहिनीला त्या खोबणीत बसायला सांगितलं. कितीही हळू केला तर गॅस सिलेंडर चा टण आवाज आलाच.  बाहेरच्या हालचाली एकदम स्तब्ध झाल्यात. आत काय चाललंय याची चाहूल बाहेरचे घेत होते आणि बाहेर काय होतंय याची चाहूल आत मनोहर घेत होता. सेकंदाचा काटा अडखळत पुढे जात होता. मनोहर ने हातातील रिव्हॉल्व्हर घट्ट धरले. त्याच्या भुवयांवर घाम आलेला होता. त्याने अकॅडेमीत शिकवल्या प्रमाणे मोठ्ठा श्वास घेऊन धडधडत हृदय शांत करण्याचा प्रयत्न केला. हात पाय शिथिल केले. त्याचे डोळे बारीक झालेत. मनोहर ने पुढचा प्लॅन पक्का केला होता. 

समोरच्या दाराजवळ अधिकारी पोचले होते. एकाने कडी धरून हळूच दार इंच भर सरकावले. त्याला रक्ताची थारोळी दिसलीत. त्याने मोठ्ठा आवंढा गिळला. भिंतीमागे दाबून उभ्या असलेल्या अधिकार्याला दोन किंव्हा तीन अशी बोट दाखवलीत. तो अधिकारी पण विचार करू लागला कि आत जायचा कि नाहीं. त्याने खुणा करून विचारले कि उजवीकडून खिडकी कडे गेलेल्यांना परत बोलवायचा का ते. 

तेवढ्यात गोळीचा एक नेहमी आवाज येतो तसा आवाज आला आणि दुसऱ्या गोळीचा आवाज त्याहून कितीतरी पटीने मोठ्याने दुमदुमला. दोघे अधिकारी फटकन जमिनीवर आडवे झालेत. दोघांनीं एका-मेकांकडे बघितले. दोघे हि शाबूत होते. त्यातल्या एक रेडिओ काढून 'बॅक-अप' मागवायला लागला. पुन्हा तिसऱ्या गोळीचा आवाज दुमदुमला. दोघे हि अंगणात गवतावरून सरपटत जीप च्या दिशेने घाईघाईने जाऊ लागले. डावीकडे बघितला तर दोन हवालदार कुंपणावरून उड्या मारून पलीकडच्या घरच्या अंगणातून धावतांना दिसलीत. अधिकाऱ्यांना हुश्श झाला कि सगळे जिवंत आहेत.  

मनोहर ने तांदुळाची जाड लोखंडी कोठी उलटी करून रिकाम्या कोठीत गोळ्या चालवल्या होत्या. त्यामुळे आवाज असा दुमदुमला. खरंतर अधिकाऱ्यांना कळायला हवे होते कि हा रिव्हॉल्व्हर सारखाच आवाज आहे. शेवटी ते पण मनोहरच्या अकॅडेमीचे होते पण घरातील प्रेत आणि रक्ताची थारोळी बघून ते भांबावले असावेत. पण जीप जवळ येऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ते जीप च्या मागे लपले होते. 

"या हवालदारांना जाऊ दे" एक अधिकारी म्हणाला. 

दुसरा अधिकारी तो पर्यंत आपल्या दोन्ही रिव्हॉल्वर लोड करीत होता. 

"आपल्यालाच निपटवावं  लागेल हे प्रकरण. मनोहर मला सिनिअर होता अकॅडमीत. आणि पहिला आला होता" पहिला म्हणाला. "आणि मी तेरावा" तो पुढे म्हणाला. 

"तेरा पर्यंत रँकिंग असत?" दुसर्याने थोडा खौटपणे विचारला. दोघेही याच्यावर फिदीफिदी हसलेत. 

परत एक गोळीचा आवाज आला. 

"हा हवेत मारतोय गोळ्या. आपल्याला घाबरावायला किंव्हा आपण गोळी चालवली तर त्याला आपली जागा कळेल. मुळीच हालचाल करू नको"

दुसऱ्याचा लक्ष नव्हता. तो गल्लीच्या टोकाशी सरकत्या गर्दीकडे बघत होता.

"इथे जवळपास मेळा लागलाय का? खूप गर्दी एकाच दिशेने जातेय." दुसऱ्याने विचारले. 

"हो, दसऱ्याचा मेळा आहे. बंगाली शाळेच्या मैदानात. का?"

"मनोहर बहुतेक त्या दिशेने पळेल. कारण तिथे मिसळून गायब होणे सोपे आहे." दुसरा अधिकारी असे म्हणून जीप च्या आडून डोकावून बघू लागला. 

पाहिल्याने रेडिओ घेतला आणि फ्रीकवेंसी शी खेळू लागला. तेवढ्यात त्याला लक्षात आला कि रेडिओ ची खरखर घरातून हि ऐकू येते आहे. तो एकदम सावध झाला. त्याने पहिल्या अधिकाऱ्याकडे बघितले. 

"मनोहर च्या हातात रेडिओ लागलेला दिसतोय." दुसरा म्हणाला. 

दुसर्याने खालच्या मातीवर चौकोन काढला. पटापट दिशा आखल्यात. एका बाजूला मेळा, मध्ये घर, दोन्ही बाजूच्या जोडणाऱ्या गल्ल्या आखल्यात. 

"आत जायचा एकाच बाजूंनी?" पाहिल्याने विचारले. 

"मी इकडून गोळ्या मारत जातो. म्हणजे त्याला इकडून हुसकावून लावता येईल. याला घरातून काढणं जरूरी आहे." पहिला म्हणाला. 

"आणि तो मेळ्याकडे पळाला तर?"

"घरात जाऊन त्याला पकडणे अशक्य आहे. आतल्या तीन लोकात आपणहि सामील होऊ. त्याच्या मागावर लागता येणं बेस्ट आहे. एकाद वेळेस मेळ्यात इतक्या गर्दीत तो गोळ्या चालवणार नाहीं." 

पहिला अधिकारी पुढे आणि पुढला मागे असे चिचुंद्री सारखे जीप च्या पुढल्या बाजूने एका पाठोपाठ खालती वाकून निघालेत. झाडाच्या बुंध्यावर त्यांनी एका पाठोपाठ अश्या तीन चार गोळ्या मारल्यात. आणि मग ते थांबलेत. दुसऱ्या अधिकाऱ्याने खिडकीच्या गजावर अजून एक गोळी मारली. त्याचा आवाज टणकन आला. 

त्यांना घराच्या मागल्या दारातून बुटांच्या पळण्याचा आवाज आला. तो आवाज मेळ्याच्या दिशेने जात होता. 

(क्रमशः) 

No comments: