8/10/08

निर्माल्य- भाग १

मुंबईच्या इतक्या जवळ असुनही हे गाव थोडं विचित्र होत. ते अजुनही गावच होतं. मुंबईत माणसांचा क्षणाक्षणाला वाढणारा पूर आणि इथेय अजुनही जमिनीने हिरवा शालू नेसलेला होता. मुंबईकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याहुन दोन मैल आत, आडवळणाला एक जुना वाडा होता. आजु-बाजुला सगळेच वाडे होते. स्वतःला कबुतरांसारख खुर्‍हाडात बंद करुन घेण्याची हौस इथे कोणांस नव्हती. वाड्याची बांधणी जुन्या पध्दतीची होती. कौलांच उतरतं छप्पर होतं. समोर वर्‍हांडा त्यापुढे आंगण. आणि मोठ्ठ परसदार अशी टुमदार बांधणी होती. दोन घरांमधे कुंपण नसल्यामुळे आवार मोठं भासत असाव. अंगणात विहिर होती. तीतं काही कासवं पोहत होती. आजुबाजुला गर्द झाडी होती पण परसदारी कोणीतरी लक्ष देउन झाड लावली होती. केळी, पेरु, फणसाची झाडं होती. आंबा पण होता. परसदार मातीचं होत आणि फरश्यांची पाउलवाट होती. घरातही काळ्या-भोर थंडगार फरश्या होत्या. परसात पाण्यांच भलं-मोठं टाक होत. एकतर कोकणात वर्षातून सहा महिने पाऊस आणि वरुन समोर अंगणात विहिर असतांना, हे टाकं थोडं मजेशीरच वाटत होत.


घरात शांतता होती. मुसमुसण्याचे आवाज ऐकु येत होते. नुकताच पाऊस पडुन गेला होता. वातावरण ओलं होत. वर्‍हांड्याच्या पायर्‍यांसमोर, अंगणाच्या मध्यभागी एक तरूण देह ठेवला होता. वर्‍हांड्याच्या एका टोकाला, लाकडी खांबाला टेकुन माई देहाकडे बघत बसली होती. त्यांचे डोळे शून्य होते. वर्‍हांड्याच्या दुसर्‍या टोकाला अण्णा शांतपणे पेपर वाचत आरामखुर्चीवर बसले होते. समोर देह ठेवला असतांना त्यांच पेपर वाचण अंगावर शहारे आणणारं दृश्य होतं. माईंनी गर्दीतील एकाला खुणेनी जवळ बोलावल.



"कोणाची वाटं बघणं चाललय?"
"वहिनी अजुन खोलीतून बाहेर आल्या नाहीयात. शेवटचा नमस्कार करायला हवा तीने"
"बरं. बघते मी काय करायच ते" असं म्हणत माई गुढघ्यांचा आधार घेत उठल्या आणि आत जाऊ लागल्या.
"माई"
माईंनी मागे वळुन बघीतल.
"श्रीकांत कुठेय?"
माईंनी मोठ्ठा नि:श्वास टाकला. काही उत्तर न देताच त्या माजघरात गेल्या.
"पोरी, शेवटचा नमस्कार करुन घे"
एक तरूण पोरगी लोखंडी पलंगावर पडलेली होती. आजु-बाजुला बायका रडत उभ्या होत्या.
"नाही आई मी त्यांना अस जाऊ देणार नाही"
"असं नकोस ग करु. चल, उठ. मी आहे तुझ्या सोबत." माईंनी सूनेला बळे-बळे उठवण्याचा प्रयत्न केला आणि हात धरुन अंगणात आणल. पण मृतदेह बघुन सूनेनी धाडकन आंग जमिनीवर टाकल.
पेपर टाकुन अण्णा धावत आलेत. कोणीतरी पाणी आणले.
"असं करुन कसं चालेल. नमस्कार करून टाक."
"मग तुम्ही सगळे लगेच त्याला घेउन जाल आणि मी ईथे एकटीच मागे राहीन." लहान मुलीसारखे हुंदके देत सून बोलत होती. माईंचा गळा भरून आला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना.
सूनेनी कसातरी नमस्कार केला आणि ती परत बेशूध्द पडली. तीला उचलुन आत घेउन जावं लागल.
अंत्य-संस्काराची तयारी सुरु झाली.
"माई, अग्नी कोण देणार? श्रीकांतचा नेहमीच्या ठिकाणांवरही पत्ता नाहीया"
"कधीच परत नाही आला तरी चालेल" असं काहीस पुटपुटत "हे देतील" असं त्या म्हणाल्यात.
"अहो, ऐकता का? ऊठा, या लोकांसोबत जा आणि ते सांगतील तस करा"
हो म्हणत अण्णा लगेच उठलेत. "अगं पण माझा चहा व्हायचाय. ते मग तू करतेस का ते लौकर"
"अहो काय बोलताय तुम्ही? कळतय का चाललय ते? आपला अविनाश आहे हा." देहाकडे बोट दाखवत माई बोलल्या. बाईचा जीव अगदी कावुन गेला होता.
"आणि तुम्हाला चहाची पडलीय?"
अण्णांच्या आकलनी फारस काही पडलेलं दिसत नव्हत पण चहा मिळणार नाही एवढ मात्र त्यांच्या लक्षात आल.
"बरं, लगेच जायचं असेल तर मी ते आपलं म्हणजे बाहेरचे कपडे घालु की ते आपले घरातलेच चालतील"
माई मट्टकन जमिनीवर फतकर मारुन बसल्या व भकास डोळ्यांनी जमिनीकडे बघु लागल्यात.
पुरुष मंडळींपैकी कोणी तरी आत गेलं. नात्यातलंच असाव कारण त्याला घरातल काय कुठे आहेय माहिती होत. आत जाउन त्यांने झब्बा आणला.
"अण्णा झब्बा घाला आणि चला"
"अरे पण ते म्हणजे हा झब्बा घरातला आहे" अण्णा तक्रारीच्या स्वरात म्हणालेत.
त्या पुरुषाने जबरदस्ती अण्णांना झब्बा घालायला लावला आणि दंड पकडुन फाटकापाशी घेउन गेला.
माईंना रडू आवरत नव्हतं.
श्रीराम जय राम जय जय राम चा गजर झाला. लोकांनी तिरडी खांद्यावर टाकली.
अंगणात फक्त माईच उरल्या होत्या.
दूरून एक सायकल भरधाव घराच्या दिशेनी येतं होती.
(क्रमश:)

No comments: