5/24/07

प्रारब्ध

दु:ख म्हणजे काय, या प्रश्नांने माणसाला प्राचीन काळापासुन भांडावुन सोडलेल आहे. अद्वैत सिध्दांता नुसार आपण जे जग बघतो ती सगळी माया आहे आणि या मायेच्या जगात आपण सुख-दु:खाच्या चक्रात फसलेलो आहोत. जेंव्हा आपल्याला या मायेची अनुभुती होते तेंव्हा सत््-चित््-आनंदाची स्थिती प्राप्त होते. अर्थात, ही स्थिती प्राप्त करण्यसाठी, या मायेतुन स्वत:ला वेगळ करण्यसाठी अनेक जन्म घ्यावे लागतात आणि जन्म घेतला म्हणजे परत दु:ख प्राप्त झालेच. स्पेन मधील कुठल्या तरी राजाने म्हणे आनंदी दिवस व दु:खी दिवस याची रोजनिशी ठेविली. मृत्यु समयी त्याच्या लक्षात आले कि संपुर्ण आयुष्यात फक्त १४ दिवस तो सुखी होता. अर्थात, या निर्णयाप्रत पोचायला रोजनिशीची आवश्यकता नाहि. शेवटी "सुखं पहाता जवापाडे, दु:ख पहाता पर्वता एवढे" हेच खरे. पण तरी आपल्य पैकी फार कमी लोक दु:खाची मीमांसा करतात.

सिद्धार्थालाहि हा प्रश्न पडला होता पण त्यालाही बुध्द स्थिती प्राप्त व्हावयला ६ वर्षे लागलीत तर सामान्य माणसानी काय करावे, असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. पण गौतम बुध्दास मनुष्य जातीच्या दु:खाची कारणे शोधायची होती. आपण आपल्या वैयक्तीक आयुष्याचे अवलोकन केले तरी पुरेसे आहे. पण अवलोकन करण्याने दु:ख कमी होइल अश्यातला भाग नाही पण सध्या भोगत असलेले दु:खाचे कारण काय, हे लक्षात आले तर पुढे परत तसलेच दु:ख वाट्याल आले तर त्रास कमी होइल किंवा पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या म्हणी नुसार ते दु:ख वाट्याला येउ न देण्याची काळजी आपण घेउ शकतो. अर्थात, येथे 'पुढचा' पण आपणच आणि 'मागच' पण आपणच.
आपली वर्तमानातली परिस्थिती आपल्या भूतकाळाशी निगडित आहे. आणि भविष्य आपल्या वर्तमानाशी. भूतकाळात केलेल्या कर्माची फळे आपण वर्तमान काळात (उप)भोगत असतो.

वेदांमधे एक सुंदर उदाहरण आहे. पारध्याने जो बाण सोडला आहे तो आपला भूतकाळ आहे. त्याचे परिणाम भोगण्या शिवाय आपल्या हातात काहिही नाही. त्यालाच प्रारब्ध म्हणतात. जो बाण सध्या धनुष्यात ताणलेला आहे तो म्हणजे आपला वर्तमान. (याल अगामी कर्म असेही म्हणतात.) याच्या परिणामांवर आपले बर्‍यापैकी नियंत्रण असते व हे परिणाम आपल्या भविष्यात दिसतात. जे बाण अजुनही भात्यात आहेत त्याल संचित कर्म असे म्हणतात. प्रारब्ध कर्म आपल्या सध्या परिस्थिती ला पूर्व जन्माशी पण जोडते. उदाहरणार्थ आपल्याला ज्या घरात जन्म मिळालेला आहे ते आपल्या पूर्व जन्माच्या प्रारब्ध कर्माचा परिणाम होय.

पण पूर्व जन्माचा मुद्दा सध्या बाजुला ठेवला व या जन्माच्या प्रारब्धाचा विचार केला तरी बर्‍याच गोष्टी थोड्या अधिक स्पष्ट दिसु शकतात. जसे अभ्यास केला नसेल तर परिक्षेत उत्तीर्ण होणे अशक्य आहे. मग माझ काही चुकलच नाही अस म्हणणे मूर्खपणा होय. अर्थात हे उदाहरण फार सोपे झाले. मनुष्य जसा वयाने मोठा होत जातो तसे त्याल अधिक क्लिष्ट व कठीण निर्णय घ्यावे लागतात. बहुतांश वेळा त्याचे निर्णय केवळ चूक-बरोबरच्या पलिकडे असतात. अश्या परिस्थित स्वतःच्या कर्मांचा विचार करणे आवश्यक व उपयोगी असते. जे झालेल आहे त्याचे परिणाम शांतपणे भोगुन, पुढे तशीच परिस्थिती येउ नये या साठी आत्ता तशी पाउले उचलणे हा कर्मयोग नव्हे का?

अर्थात हे तत्वज्ञान लिहायला, वाचायला सोपं आहे, प्रत्यक्षात आणणे महत् कठीण. पण स्वतःच्या कर्माचा हिशोब करुनच वाल्याचा वाल्मिकी झाला तसच आपल्या सारख्या सामान्य माणसांना करणे अपरिहार्य आहे.

2 comments:

Sadhana said...

This Article really shows the main concept of life in simple words

Anonymous said...

phrach chan sopya shbdat sara kahi aala...........ya peksha sopi bhasha kothali?