मराठी भाषेच्या भविष्याबद्दल आज काल बरीच चर्चा होते। पुष्कळश्या मराठी वेब-साइट्स वर या विषयावर विचार मंथन चालू असत. शाळेत मराठी आवश्यक करण्यापासुन ते दुकानांवरचे फलक मराठीत लिहिण्यापर्यंत अश्या बर्याच गोष्टी सुचवल्या जातात. यातल्या किती गोष्टी कितपत उपयोगी आहेत हे सांगण कठीण आहे. जर का लोक मराठीत कमी बोलत असतील किंव्हा बोलतांना ईंग्रजी शब्दांचा अधिक प्रयोग करत असतील तर दुकानावरच्या पाटया कुठल्या भाषेत आहेत हा गौण मुद्दा ठरतो.
ईंग्रजी सत्तेच्या काळात उदय झालेल्या मराठी मध्यम वर्गाने ईंग्रजी भाषेचे महत्व लौकरच ताडले। ईंग्रजीच्या 'अमर वेलीने' याच काळातच मुळं पकडलीत। सरकारी नोकरी मिळण्याच्या हेतुने संस्कृत आणी मराठी सारखाच ईंग्रजीचा अभ्यास १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झाल असावा. तर्खडकर भाषांतर पाठमाला याच दरम्यान प्रसिध्द झाली. त्या काळात बिन-सरकारी नोकर्या कमी असल्यामुळे आणि सरकारी नोकरी साठी ईंग्रजी आवश्य असल्यामुळे, ईंग्रजी भाषा ही सामाज व्यवस्थेत वर चढण्याची पायरी मानल्या जाउ लागली. पण गंमतीचा भाग असा की हा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानता येईल.
स्वातंत्र्योत्तर काळात जरी औद्योगिकीकरणात महाराष्ट्र जरी आघाडीवर होता तरी राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात मराठी माणुस पडद्याआड गेला. त्यामुळे केसरी ईत्यादी मराठी वर्तमान-पत्रांना जे महत्व होते ते स्वातंत्र्योत्तर काळात कमी होऊ लागले. थोडक्यात मराठीचे राजकीय महत्व कमी झाले. भारतीय सरकारने भारतीय भाषांचे जेवढे नुकसान केले तेवढे नुकसान ब्रिटिश सत्तेने केले नसेल. तांत्रिक किंवा वैद्यकीय उच्च शिक्षण ईंग्रजी माध्यमातच शक्य होते त्यामुळे प्राथमिक शिक्षण मराठी करण्यात फारसा अर्थ राहिला नाही. त्याचा परिणाम असा झाल की मराठी, संस्कृत किंवा अन्य प्रांतीय भाषा केवळ बोली-भाषा राहिल्यात. ईंग्रजी ईयत्तेत शिकणारी मुले आपो-आपच हुशार मानली जाउ लागली. आणी ही 'हुशार' मुले मात्र मराठी साहित्यात अक्षरश: निरक्षर असतात. आता याचा अर्थ असा नव्हे की मराठी माध्यमात शिकणारे विद्यार्थि सहित्य प्रचुर असतात पण निदान त्यांच्यात मराठी साहित्य वाचण्याची क्षमता तर असते.
जागतिकीकरणात मराठी शिकुन करायच तरी काय, हा प्रश्न नेहमी विचरला जातो। मराठी शिकुन किंवा न शिकुन उच्च शिक्षणासाठी चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळतोच. आपली बोली-भाषा मराठीच आहे (अजुन तरी !) आणी अमेरिकेत जायला मराठीचा काय उपयोग? त्यामुळे कुसुमाग्रजांच्या कविता वाचल्या आहेत काय किंवा नाही काय, एकच आहे.
पण भाषा हे केवळ संवादाचे साधन नसते. भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते। ती इतिहास असते आणी वर्तमान पण. आणी भाषेतच भविष्य घडविण्याचे सामर्थ्य असते. भाषा म्हणजे जणु समाजाचा आरसा असतो. समाजातले बरे-वाईट असे सगळेच गुण थोर-मोठ्यांच्या वाणी द्वारे किंवा शब्दां द्वारे प्रगट होतात. मुसलमानी सत्तेखाली भरडल्या गेलेल्या मृतवत समाजाला संतांच्या अभंगांनी संजीवनी मिळाली तर टिळकांच्या अमोघ वाणीने भ्रमीत समाजाला आत्मविश्वास मिळाला. सावरकरांच्या तेजस्वी शब्दांनी समाजात देशभक्तीची बीजं परत रोवल्या गेली तर कुसुमाग्रजांच्या कल्पना शक्तीने समाजाला नवीन पंख दिलेत. खांडेकरांच्या लेखणीतुन आयुष्याची ओळख पटली तर पु. लं.नी लिहीलेल्या व्यक्तीचित्रांतुन माणसाच्य अंतरंगीचे विविध रंगांचे दर्शन झाले. तेंव्हा जर का आपली सध्याची शिक्षण पद्धती किंवा समाज व्यवस्था तरुण पीढीला मराठी भाषेला लाभलेल्या या तारकांचा चांदण भोगायला असमर्थ करत असेल तर आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारत नाहीया का?
मराठीचा आग्रह म्हणजे ईंग्रजीला नाकरणे नव्हे. ईंग्रजी शिकणे आवश्यक आहेच. पण ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण किंवा 'प्रगती' च्या नवीन व्याख्ये अंर्तगत जर का आपल्या माय बोलीला नाकरणे येत असेल तर ते अयोग्य आहे. आपल्या भाषेचे भविष्य आपल्या हातात आहे. शेवटी आपणच आपली ओळख ठरवायची असते.
2 comments:
Good Analysis. Quite Rational. Like it.
good one
Post a Comment