3/10/09

धुक्यातील मृगजळ

The young have aspirations that never come to pass, the old have reminiscences of what never happened.
- Saki

जवळ जवळ तीन वर्षांनी भारतात जायचा योग आला. तीन वर्षांनी मी आई-बाबांना भेटणार होतो, मित्रांना भेटणार होतो. परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आलीत पण घरची ओढ तितकीच आहे. आता घर म्हटल म्हणजे ओढ असणारच नाहीतर त्याला घर म्हटल नसत! पण तीन वर्षात इतक्या गोष्टी बदलल्या होत्या की नेमक्या कुठल्या भावना मनात होत्या ते कळत नव्हत. संदर्भ बदलले होते. माझे इतरांकडे बघण्याचे आणि इतरांचे माझ्या कडे बघण्याचे दृष्टीकोण बदलले होते. मी मागल्या दिवाळीला भारतात गेलो होतो. मला परतुन तीन महिने होउनही गेलेत पण त्या प्रतिसादांचे आणि पडसादांची चाहुल मी अजुनही घेतो आहे. त्या सुरांचे नाद मला लागत नाहीत.

परदेशात जायची मी कधीच स्वप्न बघितली नाहीत आणि इतकी वर्ष झालीत तरी माझ्या स्वप्नातुन माझ घर, माझे आप्तजन अजुनही जात नाहीत. म्हणुन मला प्रश्न पडतो की ही सगळी उठाठेव कशासाठी? हे सगळं कुठे घेऊन जाणार आहे? यातुन काय सिध्द होणार आहे? पुरुषार्थ? कि भरपुर पैसा? मला संधी मिळाली आणि मी स्वतःला झोकुन दिल. याच मला यत्किंचतही दु:ख नाही. परत तशी परिस्थिती मिळाली तर मी तेच निर्णय घेईन. पण मनात संदेहाचे काटे जे रुततात त्यासाठी रुईची पान शोधतो आहे. कधी कधी वाटत की उगाचच शुंभासारखा इतका विचार करतो. काही आवश्यकता नाही. बरं रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असला प्रकारही नाही. श्वास घ्यायला फुरसत नाहीया पण थोडाही वेळ मिळाला की मन परत गुढ विचारांशी शिवा-शिवी खेळायला लागत. शांता शेळके यांची एक कविता आठवते.

काळजातले अनेक अज्ञात प्रदेश
ज्यांचे अस्तित्वही ठाऊक नव्हते आजवर,
हलके हलके दिसत आहेत मला
पावलांखाली नव्याच वाटा, आतबाहेर, सर्वभर.

हररोज हरघडी अचानक नवे प्रश्न समोर
जुन्या संबंधांची तेढीमेढी अतर्क्य वळणे
चक्रव्यूहात आपले आपल्याला जपणे जोपासणे
अनेक गोष्टींचे अर्थ आयुष्यात प्रथमच कळणे

माझा मीच आता किती शोध घेते आहे
अज्ञाताशी जुळवते आहे रोज नवी नाती
आतल्या आत घडत, मोडत, पुन्हा घडत
अपरिचीत रुपे घेत आहे माझी माती.

मागे म्हटल्या प्रमाणे खरच माझी सगळी स्वप्न अजुनही माझ्या घरचीच असतात. आई-बाबा, दादा, आजी-आजोबा हेच दिसतात. मी शाळेत पराग, बहार, तेजस सोबत मस्ती करतोय हेच दिसत. बास्केटबॉलचे सामने जिंकतोय हेच दिसत. जाग आल्यावर आठवणींच्या धुक्यातुन बाहेर पडायची मुळीच इच्छा होत नाही. त्या आठवणी आहेत त्यामुळे परत कधीच येणार नाहीत हे माहिती असतांना हा मनाला खेद कसला? बहुतेक तसल्या निर्मळ आठवणी पुढे कधीही येणार नाही याची जाणीव होत असावी. माझ लहानपण चार-चौघांसारखा गेल. कर्तबगार आणि प्रेमळ आई-बाबा, पाठीराखा मोठा भाऊ आणि गोष्टीतल्या सारखी आजी. मी खुप मस्ती केली. मारही बराच खाल्ला. अगदी माझ्या आजी कडुनही. माझी मित्र-मंडळीहीदांडगी होती. ठरवुन अभ्यास नाही केला आणि त्याचे परिणामही भोगलेत. पण या सगळ्यांनी मला संदर्भ दिले होते. यशा-अपयशाचे माप-दंड या सगळ्यांमुळे यांनी बांधले होते. या धाग्यांनी मला विणल होत. आता मनाचा गुंता सुटत नाहीया. तीन वर्षांनी भारतात जाऊन तो गुंता सुटेल अशी आशा करत होतो.

मैत्री असो कि नाते-संबंध, ते टिकवायला सोबतीची गरज असते. माझ्या सगळ्या मित्रांना नोकर्‍या लागल्या होत्या आणि बहुतांश मुंबई-पुण्याला निघुन गेले होते. बर्‍याचश्या मैत्रिणींची लग्न झाली होती किंवा होण्याच्या मार्गावर होती. दिवाळीच्या निमित्ताने बहुतेक मित्र गावी आले होते म्हणुन ओझरती का होईना भेट झाली पण काही तरी विचित्र वाटत होत. त्या सगळ्यांमधे मी माझ्या जुन्या मित्रांना शोधत होतो. अर्थात हा माझा खुळेपणा होता. तीन वर्षाचा हा काळ सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचा आणि घडामोडींचा होता. अनुभवांच्या छिन्नीचे घाव प्रत्येक मुर्तीला वेग-वेगळा आकार देते. माझी मित्र-मंडळीही आशा-आकांक्षांच्या ओझ्या खाली वाकायला लागली होती. आणि हा फरक फक्त तीन वर्षांचा नव्हता. मला परदेशात राहुन सात वर्ष व्हायला आली आहेत. अर्ध्या दशकाहुन अधिक या काळात स्वभाव बदलणे किंवा सवयी बदलणे सहाजिकच आहे. आमचे दृष्टीकोणही संपूर्णतः निराळे झाले होते. मैत्री सोबत घेतलेल्या अनुभवांच्या पायावर भक्कमपणे उभी असते. पण सोबत संपली कि रहाते केवळ ओळख. पतंगाची भरारी मांजाच्या लांबी पूर्तीच सिमित असते तस आमच्या मैत्रिच झाल होत. जुन्या आठवणींना किती वेळा ऊत येणार? भांड्यात आता काही उरलच नव्हत!

यातुन दोन गोष्टी समोर येतात. एक, काळ पुढे जाणार आणि नदीच पाणी वाट काढुन वहातच रहाणार. आठवणींच गाठोड बांधुन पुढे चालत रहाण्याशिवाय गत्यंतर नाही. हे तत्त्वज्ञान काही नवख नाही. ज्या आठवणींच्या आल्हाददायक पाण्यात मी आजतोवर न्हात होतो त्या पाण्याच मृगजळ झाल होत. आणि माझ मन वेड्यासारख त्याचाच मागोवा घेतय. एक दिवस असा येईल कि या आठवणीही घडलेल्या घटना या सदराखाली मनाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात दफ्तरबंद होतील. वयाने मोठं झाल्यावरच्या आठवणी काही वाईट मुळीच नाहीयात पण त्या प्रखर आणि रुक्ष वाटतात. त्याच तेवढ्या रहातील याची धास्ती वाटते. आणि दुसर म्हणजे की याचा अर्थ असा तर नव्हे की मला जी हुरहुर लागली होती ती माझ्या मायदेशाशी तुटत चाललेल्या संबंधांचीच तर नव्हती? आई-बाबा आहेत आणि ते पुरेशे आहेत पण बाकी देशात जाउन काय करायच? सोबतीचे सगळे वेग-वेगळ्या मार्गानी दिसेनासे झाले आहेत. प्रवासात जसे पांथस्थ अचानक भेटतात, गप्पा होतात, हसण होत आणि जसे भेटलेत तसेच ते नाहीसे होतात.

गुंता सोडवायच्या नादात आता लक्षात येतय कि सगळे धागेच नाहीसे झालेत आणि राहिलो मी एकटाच! काळाच्या लाटांनी माझी परतीच्या पाऊलखुणाच नाहीश्या केल्या आहेत. समोर जाण्याशिवाय पर्याय नाही माहिती आहे पण आता मागे वळुन बघण्याचीही मुभा उरली नव्हती त्याची खंत.

1/28/09

निर्माल्य - भाग ५ (अंतिम भाग)

माई हॉस्पीटल मधे पोचल्यात तर त्यांना वातावरण तंग होत. सुनेचे वडिल, भाऊ आणि एक तीशीचा तरूण खोलीबाहेर उभे होते. तिघांपैकी कोणीही माईंशी काहीच बोलल नाही. आई आत सुनेपाशी बसली होती. माई घाई-घाईनी खोलीत गेल्या. विजय बाहेरच थांबला. सुन निपचिप पडली होती. तिला सलाईन लावलेली दिसत होती. पण कुठे दुखल्या-खुपल्याच दिसत नव्हत. माईंना थोड हुश्श झाल.
"काय झाल पोरी?" माईंनी प्रेमाने विचारल.
सुनेनी काहीच उत्तर दिल नाही. तिने डोळे मिटुन घेतलेत आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहु लागलेत.
"रडु नकोस बाळा. मी आहे ना सोबतीला"
तरी सून काहीच बोले ना! सुनेची आई सुध्दा काही बोलायला तयार नव्हती.
"काय झाल पोरी? सांगशिल का?" माईंनी पुन्हा विचारल.
"श्रीकांतला विचारा" सूनेची आई रागाने म्हणाली.
"श्रीकांत?" माईंनी आश्चर्याने बघु लागल्या. "श्रीकांत आहे इथे" माईंनी पुढे विचारल.
"हे जे सगळं दिसतय ना ती सगळी श्रीकांतची करणी आहे" सुनेची आई गरजली.
माई थोड्या ताठरल्यात. त्या मनातल्या मनात काय झाल असेल याचे घाई-घाईने हिशोब करू लागल्यात.
पोलिस स्टेशनात पाहुणचार चालला असेल त्याचा. पहिली फेरी नक्कीच नसावी त्याची" सुनेची आई पुढे म्हणाली.
"अहो काय बोलताय? श्रीकांत पोलिस स्टेशनमधे? पोरी, बोल ग!." माईंनी काकुळतेनी सुनेकडे बघितल. सुनेच्या आईचे शब्द त्यांना नकोसे झाले होते.
"ती काही बोलणार नाही. मी सांगते तुम्हाला काय झाल ते. तुमचा श्रीकांत फार नावाजलेला आहे तुम्हाला माहितीच असेल. पण त्याची इतकी मजल जाइल अस कधी वाटल नव्हत. घरच्या बायका-पोरींवरच नजर टाकायला लागला? इतक पडाव माणसाने?"
"असं नका बोलु. श्रीकांत थोडा बिघडला असेल पण त्याची नजर वाईट नाही. आणि घरच्या पोरी-बाळी म्हणजे कोण? सुनेबद्दलच बोलताय ना तुम्ही? तो फार आदर करतो सुनेचा. अविनाश गेल्या पासुन तोच पाठीराखा आहे तिचा" माईंना बोलतांना श्वास लागत होता. हे सगळ अनपेक्षित होत. नेमकं काय घडलय हे माईंना अजुनही कळेना.
"पाठीराखा! पुत्र-प्रेम आंधळ असत हेच खर."
"अहो वहिनी, स्पष्ट पणे सांगा काय झाल ते. कुत्सित बोलण पुरे झालं"
आतापर्यंत सुनेचे वडिल आणि भाऊ खोलीत आले होते. तो तिशीचा पुरुष दाराशी ताटकळत उभा होता.
"श्रीकांतने पोरीशे छेडखानी केली" सुनेचे वडिल शांतपणे म्हणालेत. त्यांच इतक शांत वागण विपरीत होत.
माई वीज पडल्यासारख्या स्तब्ध झाल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांना काय बोलाव ते कळेना. श्रीकांतची इतकी हिंम्मत? दारू-काडी इतक तर आपल्याला माहिती होत. स्वतःच्या सख्ख्या वहिनीवरवाईट नजर टाकण्या इतका बिघडला असेल यावर माईंचा विश्वासच बसेना.

"त्याला दादरच्या पोलिस स्टेशन मधे दिलय"

"हे अशक्य आहे. श्रीकांत कधीही अस करणार नाही. मला माझा श्रीकांत पूर्ण माहिती आहे. आई आहे मी त्याची. तुम्हाला काही तरी गैरसमज झालाय. पोरी, सांग मला की खरच अस झालय का ते." त्या कश्या-बश्या बोलल्यात.
"माई, हे असलं बोलायला हा काही चित्रपट नाही. तो आत्तापर्यंत काय करत होता हे तरी तुम्हाला नेमक ठाऊक होत का? मग तो इतका पडु शकतो हे तुम्हाला कस कळणार?"

"पोरी, बघ माझ्याकडे. उत्तर दे मला. मी काय विचारतेय" माईंनी सुनेकडे रोखुन बघत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रु संथपणे वहात होते.

"आणि सुमा काही तुम्हाला उत्तर देणार नाही या. ती तुमची कोणीच नाही."

माईंनी असाह्यपणे खोलीत नजर फिरवली. पण त्यांना कुठुनही कसलीही मदत मिळणार नव्हती. सुनेचे वडिल हात पाठीमागे बांधुन माईंना बघत होते.

"निघा आता" सुनेची आई गरजली. "लग्न लावायला निघाल्या होत्या"

सुनेचे हुंदके आता वाढायला लागले होते पण तिच्या तोंडुन एक शब्द बाहेर पडायला तयार नव्हता.

माईंना आजु-बाजुच ऐकु येण बंद झाल. कानात सुं आवाज येऊ लागला. त्यांच्या तोंडुन रडण्याचा आवाज मुळीच येत नव्हता जणु हंबरडा फोडायला त्यांना भीती वाटत असावी.

माई भग्न अवस्थेत खोलीतून बाहेर पडल्यात. त्यांचा पदर पडल्याचाही त्यांना पत्ता नव्हता. माईंना अस बघुन विजय चांगलाच थिजला. त्याला आतला आरडा-ओरडा ऐकु येत होता पण त्याला संदर्भ लागला नव्हता. तो तरूण अस्वस्थपणे माईंकडे बघत होता.

विजय माईंच दंड पकडुन बाकाकडे नेण्याचा प्रयत्न करु लागला पण माईंनी विजयला झिडकारले. त्यांच्या अंगात अचानक अवसान आल.

"दादरच्या पोलिस चौकीत चल" त्या विजयला त्वेषाने म्हणाल्यात आणि तरातरा इस्पितळातून बाहेर पडु लागल्यात.


विजय माईंमागे धावला. "माई, तुम्हाला माहितीय का कुठेय चौकी?"

माईंनी मान हरवली.

"जवळपासच असेल. मी पटकन कोणालातरी विचारून येतो. तुम्ही आत बसा तो पर्यंत"

"नको, मी इथेच उभी ठिक आहे"

विजय पत्ता विचारून येईपर्यंत माईंनी स्वतःला सावरल होत.

"मला वाटलच जवळपास असेल. इथेच गोखले रोडवर आहे" विजय बोलला. मग थोडा चाचरत तो पुढे म्हणाला " श्रीकांत दादा.."

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्यांनी विजयकडे शांतपणे बघुन नुस्ता चलायचा नुसता इशारा केला. त्यांचे डोळे लाल झाले होते.



दादरच्या पोलिस चौकीवर बरीच गर्दी होती. विजय किंवा माईंपैकी कोणी कधीच असल्या वाटेला गेल नव्हत त्यामुळे चौकीत नेमक कोणाला आणि काय विचारायच ते कळेना. पण तेवढ्यात चौकीतून एक तीशीचा इंस्पॅक्टर धावत बाहेर आला.

"माई, या"

"ओळखल नाहीत का तुम्ही मला"

" श्रीराम?"

"नाही मी त्याचा लहान भाऊ अशोक"

" मी आत्ता तुमच्याकडेच येणार होतो श्रीकांतल घेऊन. तुम्ही इथे याव अशी माझी मुळीच इच्छा नव्हती"

"आत या तुम्ही"

"ए, पाणी आण रे लौकर"

"काळजी करू नका. श्रीकांतला इथे आणल्या बरोबरच मी त्याला ओळखल. त्याला आत केलच नाही"

माईंना काय बोलाव ते कळेना. "आत करण" म्हणजे मारहाण करण तर नव्हे या विचाराने त्यांच्या अंगावर काटा आला.

"फार लहान असतांना बघितल होत पण अविनाश सारखाच दिसत"

"अविनाशच ऐकुन फार वाईट वाटल"

माई आत आल्या तर श्रींकांत खोलीच्या टोकाशी बाकावर मांडी घालुन बसला होता. तोंडात रंगलेला खर्रा आणि वरच्या गुंड्या उघड्या टाकलेला तो शर्ट बघुन माईंचा पारा सणसण तापला. त्या तरातरा त्याच्याकडे चालत गेल्या.

माईंना बघुन श्रीकांतने मान खाली टाकली. माईंनी त्याच्या जवळ जाऊन त्याला सणसणीत झापड मारली. श्रीकांत बाकवरून कोलमडुन खाली पडला. तो आश्चर्याने माईंकडे बघु लागला.

"आई, तु मला मारतेयस?" तो कसातरी बोलला.

"नालायका, अविनाशच्या ऐवजी तू त्या बसमधे का नव्हतास" त्या श्रीकांतला अजुन मारण्याचा प्रयत्न करू लागल्यात पण पहिली झापड मारण्यात त्यांचा सगळा त्राण निघुन गेला होता. श्रीकांतला मारण्यात त्यांच्याच हाताल लागत होत पण अंगातल्या त्वेषाला तर आत्त कुठे ऊत येत होता.

"नुस्ता बसुन तुकडे तोडतोस आणि बाहेर उनाडक्या. हे असल काही करण्या आधी मीच मारून टाकायला हव होत"

श्रीकांतही रडत होता पण तो माईंना अडविण्याचा मुळीच प्रयत्न करत नव्हता. तो निमूटपणे मार खात होता. माईंचा आवेश बघुन इतर कोणी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करीत नव्हत.

माईंच्या बांगड्या फुटत होत्या आणि त्यांची मनगट रक्ताळली होती. त्यांनी शेवटी थकुन जमिनीवर फतकर मारल.

पोलिस चौकीत असल प्रकरण नविन नसाव कारण पोलिस अधिकारी, विजय आणि एक महिला अधिकारी माई पडल्या वगैरे तर सावरायच्या तयारीत असलेली सोडली तर बाकी कारभार संथपणे चालू होता.

श्रीकांतने शेवटी माईंचे दोन्ही हात घट्ट धरले आणि केविलवाण्या सुरात त्याने विचारले "आई, काय चुकल माझ?

"तुला काय वाटत मी काय केलय ते?"

"वहिनीकडे असं बघण्याची तू हिम्मतच कशी केलीस? कोणी शिकवल तुला हे सगळ? तू असल काही करणार आहेस माहिती असत तर तू पोटात असतांनाच विहिरीत जीव दिला असता. किती छळशील. मोठ्याने जाऊन छळल आणि लहाना राहुन छळतो" अस म्हणत त्यांनी हंबरडा फोडला.

श्रीकांत माईंकडे रोखुन बघु लागला. त्याच्या डोळ्यातुन अश्रु वहाण थांबल.

"आई, असा वाटलो का मी तुला?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही. त्या रडतच होत्या.

"आई, वहिनीला दुसर्‍या पुरुषासोबत बघुन मी काय कराव अस वाटत तुला" श्रीकांतनी कडक शब्दात विचारला.

श्रीकांतने माईंचे दंड पकडुन गदागदा हलवल. "आई, मी एकदा नाही तीनदा त्या माणसा सोबत तीला वेगवेगळ्या जागी बघितल"

"लक्षात येतय मी काय म्हणतोय?"

"शेवटी आज मला सगळ असह्य झाल आणि मी पुरुषाला मारायला धावलो. त्या भानगडीत वहिनीला लागल असाव पण पोलिसांनी मलाच धरल"

माईंना कळेचना की श्रीकांत बोलतोय ते खर मानायच कि सुनेच! पण सुन तर काहीच बोलली नाही. त्या विस्मित होऊन श्रीकांतकडे बघु लागल्यात.

"नंतर सुमा वहिनीचे वडिल आले होते चौकीत. तक्रार नोंदवायला पण अशोक दादानी त्यांना परतावुन लावल. पण जाता-जाता त्यांनी मला धमकावल की ते त्यांच्या मुलीच लग्न माझ्याशी कधीच होऊ देणार नाहीत"

"आई, ऐकतेयस का? तु वहिनीच लग्न माझ्याशी लावणार होतीस अस त्या लोकांना वाटलच कस? इतके नालायक लोक आहेत ते. तिच्या माहेरचे वहिनीच लग्न लावायला निघालेयत. आपल्याला न विचारता! वहिनी आपल्या घरची सुन ना?"

माईंनी काहीच उत्तर दिल नाही.
"पण सुमा च्या आई-वडिलांशी लग्ना बद्दल कधी बोललेच नाही" अस काहीस पुटपुटत माईं स्तब्ध झाल्यात. प्लॅस्टिक च्या बाहुली सारख्या त्या शुन्यात दृष्टी लाउन तश्याच बसुन राहिल्यात.

(समाप्त)

हि माझी पहिली दिर्घकथा वाचकांना आवडेल अशी मी आशा करतो. आपले अभिप्राय अवश्य कळवावेत हि नम्र विनंती.

शुध्दलेखनाच्या असंख्य चुका आहेत पण वाचकांनी त्या पदरी घ्यावात. आणि चुका दुरुस्त करण्याची सोपी पध्दत माया-जाळावर उपलब्ध असेल तर कृपया मला कळवावे.




1/21/09

निर्माल्य - भाग ४

काळ कधी सरकतो कळत नाही. झाडांवरची गळलेली पान आणि चेहर्‍यावरच्या वाढत असलेल्या सुरकुत्या जणु फक्त साक्षीला असतात. अविनाश ला जाऊन पहाता-पहाता दीड वर्ष झाल. डोळ्यातून अश्रुंची रहदारी थांबली असली तरी डोळे कोरडे झाले नव्हते. जाणारा नेहमीच सुखात असतो कारण मृत्यु जे मागे राहिले त्यांनाच छळतो. माईंना शाळेची बरीच कामं असत. त्या व्यापात त्या मग्न असल्या तरी विषण्णता त्यांच्या हृदयात माहेरी आलेली होती. रंग उडालेल्या सुनेला बघुन त्यांचा जीव थोडा-थोडा होत असे. सुनेच्या आयुष्याची पहाट होता-होताच काळरात्र झाली हा विचार त्यांची दुसरी सावली बनला होता.


त्यांचा स्वतःचा संसार तर सावळा गोंधळच होता पण नावाला का होईना नवरा तर होता. शिवाय दोन सोन्यासारखी पोर होती. माईंच्या मनात नेहमी द्वंद्व चालू असे. अण्णांच जे काही झाल ते काहे व्हायला नको होत. नियतीचा खेळ वगैरे तत्त्वज्ञान ठिक आहे पण अण्णांनी आणि माईंनी कोणाचही कधीही वाईट केल नव्हत तर दोघांची आयुष्य अशी भेसूर का व्हावीत या प्रश्नांशी माई भांडत असत. त्यांच्या थंडगार संसारात अंतरीच्या घालमेलीची त्यांना उब मिळत असे. पण स्वतःच्या पोराचा असला करूण अंत आणि समोर जिवंत शरीरात निर्जिवतेनी वावराणारी सून बघुन त्यांचे मन सुन्न झाले होते. त्या दु:खाच्या भाराखाली त्यांच स्वतःशीच बोलण बंद झाल होत. तत्त्वज्ञानाची गंमत अशी असते की जीवनातल्या दु:खांची उत्तरे तत्त्वज्ञान्यांकडे मुळीच नसतात. म्हणुन जग मिथ्या आहे आणि हे दु:ख दु:खच नाही किंवा ही सगळी देवाचीच करणी आहे असली बाष्कळ बडबड करत असतात. मी मी म्हणणार्‍या तत्त्वज्ञानी माणसाला तरूण मुलाच्या देह बघावा लागणार्‍या आई समोर उभ कराव आणि विचाराव की मृत्युनंतरच्या अनंत सुखासाठी जगण्याचे दु:ख देणारी ही कसली माया? आणि हा खेळ दाखवणारा असा कसला हा देव? कढत अश्रुंचा खारटपणा काढायची 'माया' जो करून दाखविल तो खरा देव! पण त्या भानगडीत देव पडायचा नाही. आणि या प्रश्नाची उत्तर देण्याच्या वाटेला तत्त्वज्ञानी मंडळी मुळीच भटकायची नाही. या प्रश्नांची उत्तरे नाहीत. कारण हे प्रश्नच प्रश्न नाहीत. हे तर केवळ दु:ख आहे. अनंत आणि अथांग. समुद्रासारख. कुठल्या काठा पासुन आरंभ झाला ते माहिती नाही आणि कुठे अंत होणार याचीही कल्पना नाही. सतत येणारी वादळ गिळंकृतही करत नाहीत. प्रत्येक वादळ मनाचा एक-एक टवका फाडुन घेउन जात. वादळ गेल की हे मन परत स्वप्न बघायला लागत आणि सत्र पुन्हा सुरु.


माईंना मरायचीही भीती वाटु लागली होती. मेल्यानंतर भूत होऊन इथेच अडकुन राहिलो तर? त्यामुळे त्या सगळ्यांची काळजी घ्यायची पराकाष्ठा करीत असत. त्यांना सारखा वाटे वाफेने धुसर झालेल्या आरश्यावर काही लिहाव तस त्यांच आयुष्य गेलं. क्षणभंगुर, एकाकी, उदास, श्रांत. वाफ उडुन गेल्यावर आरश्यावर लिहिल्या पैकी काहीच उरत नाही. उरतो फक्त प्रतिबिंब बघवत पण नाही आणि त्या प्रतिबिंबाला टाकुन कुठे दूर जाताही येत नाही.


अविनाश गेल्यानंतर दोन महिन्यातच माईंनी सूनेला जोरा करून शाळेत परत नोकरीला धाडल. माई स्वतः शाळेत असतांना सून घरी वठत चाललेल्या लाकडासारखी पडली आहे याची माईंना फार काळजी लागलेली असे. शाळेत परत नोकरी सुरु झाल्यानंतर सुनेत थोडा-थोडा बदल होऊ लागला. आजकाल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाक्यांमधे यायला लागली. आधी तर फक्त हो किंवा नाही यातच संवादाची घडी होत असे. अण्णांनी "अविनाश आताशा दिसत नाही" अस परवा विचारल. त्यामूळे अविनाश गुडुप झालाय याची नोंद त्यांनी दिड वर्षांनी का होईना घेतली.


श्रीकांतच गाड अजुनही चालूच होत नव्हत. बाहेरुन माईंना बर्‍याच गोष्टी ऐकु येत असत. उनाडक्या करण्यातच त्याचा वेळ जात असे. मग त्याच तोंड पानाने रंगलेल दिसु लागल. सिगारेटचा वास मधे मधे येत असे. त्यासाठी तो पैसे कुठुन आणत होता ते मात्र कळत नसे. हा जुगार वगैरे खेळतो का अशी शंका माईंना येऊ लागली. वडिल भाऊ गेल्यावर त्यात फारसा बदल झालेला नव्हता. घराबाहेर तो काय काय करत होता तोच जाणे पण त्याचं वागण बेदरकार किंवा मुजोर कधीच नव्हत. तो घरी सुता सारखा सरळ वागत असे. विचारलेल्या प्रश्नांची तो उत्तरे देत असे. अविनाश असे पर्यंत तो अविनाशचही ऐकत असे. नुकतच कॉलेज पूर्ण केल्याच त्याने माईंना सांगितल. सर्टिफिकिटही दाखवल. तो त्या दिवशी बराच वेळ देवघरात बसुन माईंशी बोलत होता. आता तो नोकरी शोधतोय आणि लौकरच नोकरी लागेल त्याला. तो आपणहुन अविनाश च्या कामावर जाऊन आला होता. काय खर काय खोट माईंना कळत नव्हत.माईंचा त्या सर्टिफिकिटवरच मुळी विश्वास नव्हता. पण त्यांनी श्रीकांतला काही उलट प्रश्न विचारले नाहीत. अंतरी त्यांना भीती होती की त्यांच्या श्रीकांतबद्दलच्या शंका खर्‍या निघाल्यात तर? त्यांच हे वागण श्रीकांतच गाड रुळावर नसण्याच कारण होत की त्यांचा स्वतःला जपण्याचा प्रयत्न होता कोण जाणे.

श्रीकांतच जे व्हायच ते होईल. त्यांना सध्या सुनेची काळजी होती. त्यांच्या डोक्यात एक नविन विचार पिंगा घालत होता. सुन एवढी तरणी आहे तर तिच पुन्हा लग्न लाउन द्यायच. आताशा समाजहि पुढारला होता. आणि पहिला नवरा मेला म्हणुन तिने का उरलेल आयुष्य कुढत काढाव? म्हणुन त्यांनी एकदा ठरवुन सुनेजवळ तो विषय काढला. पण काहीही न उत्तर देता ती खोलीत चालली गेली. जखम झाली असली तरी मलम लाउन पुढे जाणच भाग असत. तिला ते समजावुन सांगण कठिण होत. सुनेच्या लग्नाच्या विचाराने त्यांच्या मनाला हुरहुर लागली. तीचा संसार परत चालू होणार याचा त्यांना आनंद होत असला तरी घरची पोरगी परघरी जाणार याची त्यांना काळजी वाटत होती. कुठली मुलं विधवेशी विवाह करायला तयार होतील किंवा विधुर मुलंच बघायला लागतील का इत्यादी बरेच गोष्टींवर त्या विचार करू लागल्यात. त्यांच्या ओळखीत विधवा विवाह झाला नव्हता. मग त्यांनी विचार केला की सुनेच्या आई-वडिलांशी या बद्दल बोलाव. त्यांना काही आक्षेप नसणार याची माईंना खात्री होती तर होतीच पण एकाहुन तीन डोकी बरी!


माई नुकत्याच शाळेतून आल्या होत्या. शनिवारी म्हणुन दुपारची शाळा भरत असे. सून आज संध्याकाळी दिवेलागणीला येणार होती. ती सकाळीच माहेरी गेली होती. पुढे मुंबईत कोणा नातेवाईका कडे त्या सगळ्यांना जायचे होते. आल्यावर माईंनी अण्णांसाठी चहा केला व त्या वर्‍हांड्यात विश्रांती घेत बसल्या होत्या. स्वयंपाक काय करायचा असला काही त्या विचार करत होत्या.


"अहो, आज कसली भाजी करू?" माईंनी अण्णांना विचारल.

पुढुन काहीच उत्तर आल नाही. माईं मोठ्ठा उसासा सोडत उठल्या. असला एकला संवाद काही नविन नव्हता मग उसासा सोडायला काय झाल या विचाराने माईंना थोडं हसु आल. तेवढ्यात शेजारचा विजय "माई, माई" ओरडत धावत आला.

"काय झाल रे बाळा?"

"माई, चला लौकर तुम्ही?"

"हॉस्पिटल मधे"

"अग बाई, काय झाल रे?" माईंनी चकित होऊन विचारले. त्यांच्या पोटात खड्डा पडला. श्रीकांतचा दोन दिवस झाले पत्ता नव्हता पण त्याच अस गुडुप होण काही नविन नव्हत.

"चला तर तुम्ही"

"माई, वहिनीला दाखल केलय?" विजय घाबर्‍या घाबर्‍या म्हणाला.

"कोण वहिनी?" माईंना कळेचना.

"सुमा वहिनी"

माईंनी डोळे विस्फारले. ते बघुन विजय अजुन घाबरला.

"बर तुम्ही आधी इथे बसा"

"अरे, चला काय, बसा काय? काय झाल नीट सांग विजय. इथे कोणी लहान नाही या" माईंनी स्पष्ट शब्दात विचारल.

"मला काय झाल नेमक माहिती नाही. मी शाळेतून परत येतांना वहिनींचा भाऊ दिसला. त्यानी तुम्हाला निरोप द्यायला सांगितल की वहिनींना दादरच्या हॉस्पिटलात दाखल केलय. तो म्हणाला काळजीच कारण नाहीया पण तुम्हाला तातडीने बोलावल आहे"

"काळजीच कारण काय नाही डोंबल. हॉस्पिटलात काय गंमत म्हणुन जातात का लोक?"

विजयला काय उत्तर द्याव कळेना.

माईंनी घाई-घाईने वहाणा चढवल्यात व त्या स्टेशन कडे चालू लागल्यात. विजय त्यांच्या पाठी मागे येत होता.
(क्रमशः)

1/17/09

॥जागृहि जागृहि॥

आशया बध्दते लोकः कर्मणा परिबध्द्यते।
आयुक्षयं न जानाति तस्मात् जागृहि जागृहि॥१॥

जन्मदु:खं जरादु:खं जायादु:खं पुनः पुनः ।
अंतकाले महादु:खं तस्मात् जागृहि जागृहि॥२॥

काम क्रोधौ लोभ मोहौ देहे तिष्ठन्ति तस्करा:।
ज्ञानरत्नापहाराय तस्मात् जागृहि जागृहि ॥३॥

ऐश्वर्यं स्वप्न संकाशं यौवनं कुसुमोपमम्।
क्षणिकं जलमायुष्च तस्मात् जागृहि जागृहि ॥४॥

12/13/08

घर

मी आणि बाबा अमरावतीहुन येत होतो. अमरावतीला माझी आत्या रहात असे. बाबांची सगळ्यात मोठी बहिण. अमरावतीचा रस्ता फारच दळिद्री होता. बर्‍याच वर्षात रस्त्याची डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे साधारण चार तासाच्या प्रवासाला सहा तास आरामात लागत असत. आम्ही सकाळची बस पकडली होती. पण सकाळची बस पकडली की माझ पोट नेहमी खराब होत असे. माझ पोट बस सुरु झाल्यापासुन ढवळायला लागल. पेट्रोल चा तो जळका वास आणि रस्त्यातील खड्डे म्हणजे मला कधी घरी पोचू अस झाल होत. प्रत्येक खड्डा जणु आमची प्रेमाने विचारपूस करत होता. मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. पण माझा डावा डोळा फडफडत होता.. अस कधी होत नसे. मी आपला परत खड्डे मोजु लागलो. शेवटी रडत-खडत आमची बस शहरात पोचली. अंगावर थोड सामान होत म्हणुन आम्ही रिक्षा केली. माझी सारखी चुळबुळ चालू होती. कधी घरी पोचीन अस झाल होत. आम्ही गल्लीत आलो तर गल्लीत सामसूम होती. आमच्या घराच फाटक सताड उघड होत. आमच्या घराच्या बाहेरच्या अंगणात सीताफळाच झाड होत. पोर कधी कधी फळांमागे सरळ फाटक उघडुन आत येत असत. तसलीच काही तरी भानगड असावी. मी उतरुन दारापाशी गेलो, बाबा रिक्षेवाल्याला पैसे देत होते. मी दाराजवळ पोचलोच तोच माझा हृदयाचा ठोका चुकला. दाराला कुलुप नव्हत आणि घराचे दार किलकिल उघड होत. मी हळुच सामान खाली ठेवल. बाबा माझ्या मागे येऊन उभे होते. माझ पोटं ढवळण स्विच बंद कराव तस थांबल होत. मी दार ढकलायला हात पुढे नेला तेवढ्यात घरातुन वीट पडण्याचा आवाज आला. माझा हात दारापर्यंत गेलाच नाही. काही क्षण असेच गेलेत. मी वळुन बाबांकडे बघितल. बाबा बारकाईने घराच्या खिडक्यांच निरिक्षण करत होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांच जाळ पसरल होत. खिडक्या सगळ्या घट्ट बंद होत्या. त्यांनी माझ्याकडे बघितल. आम्हा दोघांच्या लक्षात आल कि घरातून कोणी तरी आमची चाहूल घेतय. बाबा माझ्या जवळ येऊन कानात कुजबुजले. " चिन्मय, एक काम कर. मागच्या गल्लीत जा आणि तिथुन भिंतीवरून चढुन गच्चीत ये. मी तो पर्यंत शेजारच्या आणि आपल्या घरामधल्या भिंतिवरुन चढुन पुढल्या बाजुनी गच्चीत येतो. आजुबाजुला इतकी शांतता होती की त्यांच कुजबुजण गल्लीच्या टोकाशी ऐकु गेल असेल. मी हळु-हळू एक पाऊल मागे टाकत अंगणाबाहेर आलो आणि मागच्या गल्लीकडे मी धूम ठोकली. बाबा तो पर्यंत समोरून भिंतीवरून चढण्याचा प्रयत्न करत होते.

आमचं घर फारस मोठ नाही. प्रशस्त होत पण मोठ नव्हत. शेजारच्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी मिळुन ते घर घेतल होत. शेजारच्या आजोबांचा वाटा मोठा होता. आमच्या घरात मध्यभागी अंगण होत आणि तिन्ही बाजुंनी घराच्या खोल्या अंगणात उघडत असत. चौथ्या बाजुला न्हाणीघर होत. डाव्या अंगानी गच्चीवर जायला जिना होता. वरच्या मजल्यावर अजुन दोन खोल्या आणि गच्ची होती. घराच्या मागल्या बाजुला एक लहानशी बोळ होती. तीत बरीच झाडी आणि गवत वाढल होत. माझा बेत त्या गल्लीतून घराच्या मागल्या बाजूनी वर चढण्याचा होता. एक मजलीच घर होत त्यामूळे चढता येण शक्य झाल असत. मी मागल्या बोळात उभ राहून नेमक कुठुन आणि कस चढायच याचा विचार करत होतो. काहीतरी धाडसी कृत्य करणार या विचारानी माझ्या अंगावर रोमांच आला होता. चढायच्या आधी मी भिंतीला कान लाऊन आडोसा घेतला तर घरातून अगम्य असा थड-थड असा आवाज येत होता. मी पाईपला धरून वर चढु लागलो तर तो आवाज वाढत गेला. मी गच्चीवर पोचलो तर घरभर विचित्र वातावरण होत. थड-थड आवाज तर येतच होता आणि कसला तरी जळण्याचा वास येत होता. सगळी कडे जळमट लागली होती. भिंतींवरून काहीतरी ठिकठिकाणी लोंबकळत होत. मी निरखुन बघितल तर कोणीतरी पोपडे खरचचवून काढले होते.आम्हाला जाऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यात घराची एवढी अवदशा ? वरच्या दोन खोल्याच्या दारांवर व खिडक्यांवर गडद पोपटी रंगाचे फुलाफुलांचे पडदे घट्ट लावले होते. त्यामागे गाद्या असाव्यात. बहुतेक आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन असाव. म्हणजे फक्त खालच्या घरात नव्हे तर वरच्या खोल्यांमधेही कोणीतरी आहे या विचारानी मी सावध झालो. पण घरात अस कोंडून घेऊन ही लोक नेमक काय करतायत ते कळत नव्हत. बाबा समोरून चढून येणार होते ते अजुन पोचलेच नव्हते. खरतर घराच्या समोरच्या बाजुनी चढण सोप होत. त्यांना समोरून धरल तर नाही या विचारानी मला घाम फुटला. तसेही ते गच्चीत भेटणार होते की मधल्या चौकात ते त्यांनी सांगितलच नव्हत. वाट तरी किती बघायची? गंमत-जंमत थोडीच चालली होती.

मी मांजरीच्या पावलांनी जिना उतरत मधल्या चौकात आलो. थड-थड आवाज घड्याळाच्या काट्याप्रमाणे येत होता. मधल्या चौकातला पाळणा काढून ठेवला होता. कुंडीतली झाड जळून गेली होती. रॉकेल टाकुन जाळली होती. बहुधा तोच वास असावा. रॉकेल टाकुन झाड जाळावी या कल्पनेनी माझ्या अंगावर काटा आला. च्यायला चालल काय आहे? मला घरातून पावलांची आवाज ऐकु येऊ लागले. सिमेंटच्या पोपड्यावर कसलीतरी खरखरीत पाऊल पडत होती. न्हाणीघराच्या दरवाज्यांना मोठ्ठ कुलुप लावल होत. स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा बाहेरच्या दरवाज्यासारखा किलकिला उघडा होता. संरक्षणासाठी हातात काहीतरी हव म्हणुन मी शोधाशोध करू लागलो. पण काहीच मिळेना. माझ्या अचानक लक्षात आल कि घरातून येणारे आवाज थांबले आहेत. थड-थड आवाजही थांबलाय. माझ्या शोधा-शोधीत माझी चाहूल आतल्यांना लागली असावी. आता मात्र जास्त वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. मी तडक स्वयंपाकाघराच्या दरवाज्याकडे सरसावलो. क्षणभर मी दरवाज्यापुढे रेंगाळलो. आत काय असेल? कोण असेल? हे सगळ गुढ काय आहे? बाबा कुठेयत? उगाच शिवाजी बनुन इथे आलो. आधी दोन-चार लोकांना एकत्र करूनच यायला हव होत. पण आता मागे फिरण नव्हत एवढ नक्की. आता आर-या-पार!
डोंबल आर-या-पार. हातात शंख आणि चाललो मी चोरांना पकडायला. पण घरात चोर आहेत कशावरून? विक्षिप्त विचारांनी डोक्यात पिंगा घातला होता.
शेवटी मी किलकिला दरवाजा हळुच ढकलला. घरात अंधार होता. पण अर्धवट उघड्या दरवाज्याच्या प्रकाशात भिंतींच्या वीटा दिसत होत्या. मी डोकावून उजवीकडे नजर टाकली तर देवघराच्या दारातून कोणीतरी माझ्याकडे डोकावून बघत होत. ती नजर स्थिर होती आणि इतक्या दूरून मला त्या खुनशी नजरेनी थंड केल. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी भीतीनी फडफडु लागली पण ती नजर स्थिरच होती. मी खालती बघितल तर मला त्या आकृतीच्या हातातली कुर्‍हाड पुसटशी दिसली. माझा मेंदू गुंग झाला होता आणिहृदय छातीतून उडी मारून पळून जायची तयारी करत होत. माझ्या पायाला काहीतरी ओल लागल. रक्त होत ते! मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण भीतीनी घशातून आवाजच फुटेना. तोंडाला कोरड पडली होती. तेवढ्यात कुठुनतरी चिन्मय चिन्मय हाक ऐकु येऊ लागली. म्हणजे बाबा आलेत की काय?

"काय झाल बाळा?" बाबा मला हलवुन उठवत होते.

मी खडबडुन जागा झालो. अजुन बस नागपूरला पोचायचीच होती. हे सगळ स्वप्न होत या विचारानी मला हायस वाटल.
पाणी हवय का बाळा?" बाबांनी विचारल. आजुबाजुची बरीच मंडळी माझ्याकडे बघत होती. सगळ्यांसमोर बाबा मल 'बाळ' म्हणत होते त्याची मला थोडी लाज वाटत होती.
"काही तरी विचित्र स्वप्न पडल होत" मी म्हटल.
"नशिबवान आहेस. खड्ड्यातून इतक अंग घुसळत असतांना तुला बरी स्वप्न पडतात!" बाबा हसत म्हणाले.
परत थड-थड आवाज येऊ लागला. समोरच्या सीटवर बसलेल्या कोणाचा तरी स्टील चा डब्ब्याचा तो आवाज होता. त्या डब्ब्यातून तेल गळुन माझा पाय माखला होता.

11/29/08

आपण सारे अर्जुन! *

पोलिस आणि राजकारण्यांना शिव्या मारण आपल्या समाजाचा आवडता छंद आहे. शिव्या मारायला नको अश्यातला भाग नाही. पोलिस भ्रष्ट आहेत आणि राजकीय नेते भ्रष्ट, अप्पलपोटी आणि देशद्रोही आहेत. पण कठिण समय येता पोलिस लोक हेल्मेट घालुन जुन्या-पुराण्या बंदुका घेउन मुसलमानी अतिरेक्यांशी सामाना करायला सज्ज होतात. आपल्या कर्तव्याला उराशी बांधुन मृत्युला आलिंगन देणार्‍या पोलिसांना भ्रष्ट कस म्हणायच आणि देशाला विकुन स्वतःची पोळी भाजणार्‍या राजकारण्यांना जिवंत का सोडायच? मुंबईत घडलेल्यल्या (मी हा लेख लिहतांना हत्या-सत्र चालूच होत) घटनांवर काय लिहायच यावर मी बराच वेळ विचार करत होतो पण शब्दांची लपा-छुपी थांबत नव्हती. या दारूण परिस्थितीवर विचार प्रकट करण्यासाठी शब्द बहुधा बध्द व्हायला तयार नसावेत.

आपला समाज शंढा सारखा हा नर-संहार कसा सहन करतोय? आपल्या समाजाच कौतुक कराव तितक थोडं आहे. बहुतेक सवय झाल्यावर कशाचीही तीव्रता कमी होते. हि भयानक स्थिती काही पहिल्यांदा आपल्यावर लोटली नाहीया. मूर्ख पत्रकार जगत या घटनेला भारताच ९/११ घोषित करू बघत आहे. अमेरिकेच्या भूमीवर ९/११ च्या आधी कधीच हल्ला झाला नव्हता. जेंव्हा की भारतावर अनेक ९/११ च्या भीषणतेचे हल्ले झाले आहेत. १९९३ चे स्फोट कस कोणी विसरू शकत? गेल्या पाच वर्षात (मूर्ख आणि नालायक शिवराज पाटील यांच्या गृह मंत्रालया अंतर्गत) भारताच्या प्रत्येक मुख्य शहरात स्फोट झाले आहेत. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, बंगालुरु, हैद्राबाद, अहमदाबाद. आता फारशी शहरच उरली नाहीयात.

या सगळ्या नर-संहारात अलिप्तपणे मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील वावरतायत. जणु काही झालच नाही. अफझल गुरु ला फाशी का द्यायची? अतिरेक्यांनी गोळीबार केलेला चालेल पण पोलिस अतिरेक्यांना कसे काय मारू शकतात? दिल्लीला एका शूरवीर पोलिसाने आपले प्राण दिलेत तर त्यावर वादंग उठविण्यात (अत्यंत घृणास्पद मुलायम सिंह आणि अमर सिंहा सोबत) मनमोहन सिंहच आघाडीवर होते. स्वदेशाच्या पोलिस अधिकार्‍यांचे मनोबल खच्ची कसं कराव हे या लोकांकडून शिकाव. गेल्या महिन्यात कुठे तरी भाषण देतांना (या अकलेच्या कांद्याला भाषण देण्या पलिकडे काही येत का?) माननीय मनमोहन सिंह म्हणालेत की "सामान्य जनता पोलिस दलावर इतका अविश्वास का दाखवते याचा पोलिस दलाने विचार कराव" अरे नालायका, आपल्या माजघरात-देवघरात येऊन हि मुसलमानी अतिरेकी संहार मांडतायत आणि तू निष्क्रियतेची साक्षात मूर्ती कसा बनलेला आहेस हा विचार करून आम्हा सामान्यांची डोकी पिकली आहेत त्याच काय? आपल्या प्रेमळ शिवराज पाटीलांना मुसलमानी अतिरेकी आणि माओवादी अतिरेकी 'हरवलेले तरूण' वाटतात. त्या दैत्यांवर गोळ्या चालविण्या ऐवजी गुलाब पाण्याचा छिडकावा करायला हवा या मनोवृत्तीचे शिवराज पाटील आहेत. अफझल गुरुला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यावरही "त्याला फाशीची शिक्षा का द्यायची?" हा प्रश्न पाटील साहेबांना पडला. सध्याच्या मुंबई नर-संहाराच्या सुरुवातीसच " दोनशे अति-प्रशिक्षित जवान पहाटेच मुंबईला पोचणार आहेत" ही माहिती पाटील साहेबांनी पत्रकारांच्या द्वारे जणु अतिरेक्यांना पोचविली. किती मूर्ख असाव माणसाने! हा इसम मराठी मातीत जन्मला आहे याची मला खरोखरच लाज वाटते. पण या माणसाची लाळ सोनिया बाईंच्या पद-कमलांशी गळते त्यामुळे बाकी भारत चूलीत गेला तरी जो पर्यंत १० जनपथच्या मालकीण बाईंच ताईत गळ्यात आहे तो पर्यंत पाटील साहेबांचा बाल कोणी बाका करु शकत नाही. सोनिया तारी त्याला कोण मारी?

भारतीयांच्या नामुष्कीची ही परिसीमा आहे.

जुनी शस्त्रास्त्र आणि जुनी चिलखत घालुन चढाईस निघालेल्या पोलिसांना बघितल कि जीव भरून येतो. खरच वाईट वाटत. भ्रष्ट असलेत तरी शेवटी समाज रक्षणासाठी प्राण हीच लोक वेचतात. एकतर राजकारण्यांनी पोलिस खात्याचा तमाशा बनवुन ठेवला आहे. एकी कडुन जनतेचा दबाव आणि दुसरीकडुन राजकारण्यांनी हात बांधुन ठेवलेले पोलिस खाते म्हणजे एक दारूण दृश्य आहे. या लोकांना पगार कमी असतात आणि दिवसाला १४ तास काम करावी लागतात. उच्च अधिकारी खालच्या अधिकार्‍यांशी अत्यंत वाईट वागतात. केवळ नोकरी म्हणुन नाईलाजास्तव काम करणार्‍या हवालदारांची कीव येते. त्यातून या लोकांच्या हातात नुसता दंडुका! हे डोंबल संरक्षण करतायत समाजाच. मुंबईत घडलेल्या घटनांमधे अतिरेक्यांकडील शस्त्रास्त्र बघितलीत तर दंडुके घेउन हिंडणारे हवालदार हे दृश्य हास्यास्पदच आहे. अर्थात यात चूक पैसे खाण्यात मग्न असलेल्या नेत्यांची आहे. विकासाची काम करतांना कोणी पैसा खाल्ला तर तेवढ वाईट वाटत नाही पण आजकालची नेते मंडळी म्हणजे काम न होऊ देण्यासाठी मुख्यत्वे पैसा खातात. गंमत म्हणजे हीच लोक खुप काळ जगतात.

मुंबईवर हल्ला होणार आहे हे सांगायला कोणा वराह-मिहिराची आवश्यकता नव्हती. तीन (दोन?) वर्षापूर्वी लोकल मधे बाँब स्फोट झालेला होता. तसंच सर्व मुख्य शहरांमधे मनात येइल तेंव्हा अतिरेक्यांनी हल्ले केले होते त्यामुळे मुंबई अगला निशाना आहे हे अपेक्षितच होते. पण हा हल्ला थांबवायचा कसा? मुंबईतील करोडाहुन जास्त लोकसंख्येवर लक्ष ठेवायच कस? तसच प्रत्येक दिवशी मुंबईत ये-जा होत असलेल्या लाखो लोकांचा हिशोब ठेवायचा कसा? इतक्या विस्तृत प्रदेशावर लक्ष द्यायला अदृश्य व्हायला हव. गुप्तचर विभाग कार्यरत हवा तसंच त्यांचा पोलिस खात्याशी सतत संपर्क हवा. अतिरेकी सापडला तर त्याला फार वेळ जिवंत ठेवण्याची गरज नको. न्यायलय सजग हव. कायद्यांची अंमल बजावणी कडक व्हायला हवी. अफझल गुरु सारखे सैतान इतकी वर्ष तुकडे तोडत जिंवत ठेवायला नको. कायदा चोख असला तर दुष्कृत्य करायचे ध्राष्ट्य होत नाही. समाज संरक्षणाची हि शस्त्र नीट वापरली तर मुंबई सारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि असं होण फार कठीण आहे अश्यातलाही भाग नाही. के.पी एस. गिल यांनी अश्याच तर्‍हेनी पंजाब शांत केल. पण हे चक्र इथे थांबायला नको.

हे धर्म-युध्द आहे. आणि याची जाणीव जो पर्यंत आपल्या समाजाला होत नाही तो पर्यंत परिस्थिती कठिण आहे. येथे धर्म म्हणजे हिंदु-मुसलमान युध्द अपेक्षित आहे. मुंबईत या क्षणी बरीच मुसलमान पोलिस प्राणाची बाजी लावायला मागे-पुढे बघणार नाही. पण ही सर्व अतिरेकी मंडळी केवळ एकाच धर्मातून येतात हे सुध्दा मान्य करण आवश्यक आहे. या लोकांना प्रगती बघवत नाही. धर्मांध आणि धर्म-पंगु असलेल्या या लोकां विरुध्द लढायला सर्व समाजात एकजूट हवी. शेवटी पोलिस अधिकारी काय, स्पेशल कमांडो काय किंवा न्यायाधीश काय, हे सगळे समाजाचे अंग आहेत. थोडक्यात समाजाने स्वरक्षण स्वतःच करायला हव. श्वान जातीची राजकारणी मंडळी झी-प्लस सिक्युरीटीत रहातात. यांच्या घरच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत. यांच्या वर गोळ्यांचे किंवा बाँबचे हल्ले होत नाहीत म्हणुन ही सगळी गांधीगिरी यांना सुचते. जनतेचे सेवक म्हणवणार्‍या या सैतानांपासुनच आपल्या सामान्यांना स्व-रक्षण करणे आवश्यक आहे. मुसलमानी अतिरेकी तर बोलुन चालून शत्रूच आहेत. पण नेत्यांच्या जातीने उपस्थित घरभेद्यांची खबर आपल्याला आधी घ्यायला हवी. आणि त्या साठी मताधिकारासारखे शस्त्र नाही. या सत्ता-पिपासु कुत्र्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायला मताधिकारासारखा पट्टा नाही. आवश्यक प्रश्न विचारणे हे सुशिक्षित समाजाच कर्तव्य आहे. आणि बरोबर उत्तर न मिळाल्यास निवडणुका जिंकु न देण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.

या युध्दात मार्गदर्शन करण्यासाठी श्री कृष्ण मिळण्याचे आपले भाग्य नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण सर्वांनी अर्जुन बनुन दिढमुढ व्हाव. मुंबई हत्या-सत्र काय किंव्हा दिल्ली, जयपूर आणि गुवाहाटीतील बाँब-स्फोट काय, या सगळ्या अघोरी भविष्याकडे जाणार्‍या पाऊलवाटा आहेत. परिस्थिती बिकट आहे आणि एकजुट होऊन सक्रियतेने बदल घडवुन आणण्यासाठी परिश्रम तातडीने घेतले नाहीत तर भविष्यात अत्यंत भीषण काळोख आहे.
----*----
*आपण सारे अर्जुन हे व. पु. काळे यांच्या शेवटल्या पुस्तकांपैकी एक आहे. ललित शैलीत आपल्या समाजाचे संभ्रमित स्वरूप त्यांनी मांडले आहे. वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे ही विनंती. त्या पुस्तकाचे शिर्षक प्राप्त परिस्थितीस तंतोतंत लागू होते म्हणुन मी माझ्या या लेखालाही तेच शिर्षक कायम ठेवले आहे.

9/30/08

वायफळ बडबड

मला या महिन्यात तीन लेख टाकयचे होते. निर्माल्य कथा पूर्ण करायची होती आणि शिवराज्यारोहणाचा पुढला भाग ही लिहायचा होता. पण मी एक अक्षर सुद्धा लिहिलेलं नाही. आळशीपणाची पण सीमा असते. आणि या सिमोलंघनाचा पराक्रम करण्याची मला लहानपणा पासुन आवड आहे. असो.

गेल्या शनिवारी एका प्रख्यात इतिहासकाराच्या सांनिध्यात वेळ घालविण्याची संधी मिळाली. बर्‍याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यांच्या सारख्या थोरा-मोठ्यांनी माझ्या सारख्या पोरा-टोरांना वेळ द्यावा ही थोडी नवलाईची गोष्ट वाटते. कोणाला भेटाव आणि कोणाला भेटू नये यातून थोरपणा सिध्द करणारे राजकीय नेत्यांच्या जमातीत मोडतात. याला मी भाड्याचा थोरपणा म्हणतो. खरे थोर हे त्यांच्या कार्यामुळे ठरतात. एका ध्येयासाठी आपले आयुष्य वेचण हि काही सोपी गोष्ट नाही. कुठला तरी लेख, भाषण किंवा चित्रपट बघुन भारावून सगळेच जातात पण दुसर्‍या दिवशी ये-रे माझ्या मागल्या सारख आपण आपल्या आयुष्यात परत गुरफटुन जातो. थोडक्यात आपण आपले सामान्यत्व दुसर्‍याच घटकेला सिध्द करतो. पण काही 'वेडगळ' लोक असतात जे नुसते भारावून न जाता त्या विचारसरणीत स्वत:ला झोकुन देतात. समाजाच्या प्रगतीसाठी झटत रहातात. या मार्गातील कठिण परिस्थितीतून ते असामान्य होउन बाहेर पडतात. राजकीय नेते ज्यांचे पुतळे सगळी कडे दिसतात, ते फक्त पुतळ्यांच्याच रूपात समाजाचा एक अर्थहिन भाग बनतात. तर हि असामान्य लोक समाजाला समृध्द करून अमर होतात. असली लोक फार अल्प संख्येत आढळतात. ती लोकं पटकन ओळखुही येत नाही. या लोकांना शोधाव लागत. सध्य-परिस्थितीत या लोकांची आपल्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

भारतात सध्या दिवाळीच्या आधीच धमाक्यांची माळ लागलीय. लोकांचे जीव जातायत आणि आपले शिवराज पाटील मात्र त्यांच्या खुर्चीत स्थिर आहे. एका परदेशी बाईचे पाय चाटण्यात भूषण मानणार्‍या या मराठी माणसाची कीव येते. आणि असल्या शंख माणसाला निवडूण दिल्याबद्दल भारतीय समाजाचा राग येतो. पण काही मार्ग दिसत नाही. समाज जातींच्या विभाजनाने पोखरलेला आहे. प्रत्येकाला आरक्षणात हिस्सा हवा. भारतीय समाजाचे विभाजन करण्याचे इंग्रजी सत्तेने चालू केलेले कार्य आजचे नेते धडाडीने पुढे करतायत. त्यातूनच विश्वनाथ प्रताप सिंह किंवा अर्जुन सिंह सारखे अत्यंत घृणास्पद आणि गलिच्छ व्यक्ति देशाचे भविष्य अंधारात ढकलतात. तरीही कुंभकर्ण रूपी समाजाची निद्रा चळत नाही हे आश्चर्यच आहे. घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजु शकत नाही. तस सगळ्या गोष्टी समजुनही समाज त्यावर काही कृती करण्यास नकार देत असेल तर खुदा बचाए!

बर्‍याच गप्पा झाल्यात. तिसरा लेख लिहिला गेला हे बरं झाल. त्यातून काही फारस निष्पन्न होणार आहे अश्यातला भाग नाही पण मनाला खोटा दिलासा मिळणार एवढच.