3/1/21

माझ्या बालपणीचे वन्यजीवन (शहर आवृत्ती!)

माझे लहानपण शहराच्या मध्यवर्ती भागात गेले. आमचे शहर म्हटंले तर शहर (किंव्हा  प्रमोद महाजनांच्या म्हणण्या प्रमाणे खुप मोठे खेडे!) पण गर्दी फार कमी होती. मी ज्या भागात रहात असे तो नीट आखलेला भाग होता. गल्ल्या आणि प्रत्येक घरा मागे एक 'मागची' गल्ली. त्याला आता 'सर्विस लेन' असे म्हणतात. आमच्या घरा मागची गल्ली कधीही पक्की केली नव्हती. गवत आणि झाडी वाढलेली ही गल्ली म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक परिसंस्था होती. आमच्या गल्लीच्या टोकाशी एक भले थोरले (लहानपणी तरी खूप मोठे वाटत असे) मैदान होते. आणि त्या मैदानाला वळसा घालून नाग नदी (त्याचा नाला झाला होता). गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी गोठा. आमचे घरही जुन्या पद्धतीचे होते. घरात मध्यवर्ती अंगण होते. त्यामुळे धाव-पळ करायाला खूप जागा होती.

तर अश्या या परिसरात माझे बालपणीचे वन्यजीवन सामावलेले होते. त्यात मांजरी , मुंगस , पोपट (आमचा पाळलेला) , मुंग्या (काळ्या आणि लाल), मुंगळे (काळेच), उंदीर, घुशी (घुशींचा अनुभव थोडा कमीच आहे), चिचुंद्र्या, चिमण-चिमण्या, कधी कधी भारद्वाज पक्षी, दुरूनच पण कोकिळा, म्हशी, गायी, बैल, सांड आणि रस्त्यावरची कुत्री (व त्यांची पिल्ले!) असली मंडळी होती. आणि मुख्य म्हणजे मलाही या सगळ्यांशी संवाद साधायला, खेळायला, चावून घ्यायाला (काळा मुंगळा जीवघेणा चावतो!) खूप रिकामा वेळ होता. 

आमच्या कडे एक पाळलेला पोपट होता. माझ्या जन्मा आधी, माझ्या थोरल्या भावाच्या ही आधी हे महाशय आमच्या कडे कुठून तरी उडून आले होते. त्याचे पंख नीट कापले नव्हते म्हणून तो उडू शकला पण घायाळ होता बिचारा. आमच्या आजोबांनी त्याला बादली खाली ठेवले आणि खायला दिले. आता बादली खाली तो कसा सुरक्षित होता देव जाणे कारण आमच्या घरी सामाजिक मांजरींची बरीच वर्दळ असे. पण देवच जाणत होता. कारण हा तोताराम आमच्या घरचा पुढली २१ वर्षे झाला. शुद्ध मराठी घरात हिंदी बोलणारा हा एकटाच होता. मधल्या अंगणात एका कोपर्यात त्याचा पिंजरा असे. तिथुन त्याला स्वयंपाक घर दिसत असे. आईच्या भाजीला फोडणी पडली कि 'माँ रोटी दो ' चालू व्हायचे. आधी ज्या घरात होता तिथून शिकून आला असावा. त्या व्यतिरिक्त त्याची बोलगाडी फारशी धाव घेत नसे. दादाला तो 'मीत' म्हणून हाक मारीत असे. मांजरींचा आवाज तंतोतंत काढीत आणि बाबा जोरात शिंकलेत की तसाच आवाज काढुन शिंकत असे. आणि मोजून तेवढ्याच शिंका देत असे.  आणि हो, सकाळी दूध-साखर पोळी, दुपारी वारण -पोळी, ४ वाजता कधी कधी चहा, रात्री परत वरण-पोळी असा तो जन्मभर जेवला. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला लागेल एवढ्या आठवणी आहेत. 

आमच्या घरा मागच्या गल्लीत खूप मुंगूस होती. पिढ्या ना पिढ्या त्यांच वास्तव्य होत. साप ही असावेत पण कधी दिसले नाहीत. मी गच्चीतून त्यांच्यावर मग्गा भर पाणी टाकीत असे. का? कारण मी एक वैज्ञानिक प्रयोग करीत होतो. खरंच! आई शप्पत! कुठला प्राणी किती पटकन पाण्याला प्रतिक्रिया देतो? खालती बसलेल्या  चिमण्यां वर पाणी टाकणे अशक्य आहे. क्षणार्धात त्या फुर्र. मुंगूस - एकावर पडलं की बाकीचे झपाट्याने बिळात गायब. मांजरीवर मी फक्त एकदाच यशस्वी झालोय. पक्षांसारखंच मांजरीला लगेच कळत. कुत्री सगळ्यात बावळट. पाणी अंगावर पडल की वर बघायची कोणी टाकल ते. आता वाटतं की बहुधा कुत्री भाषेत ती मला शिव्या गाळत असणार. गायी-म्हशी सगळ्यात लोड-लेस - पाणी अंगावर पडल की त्यांचा कातडं थर थरत पण बाकी ढिम्म त्यांना फरक पडत नाही.  जैसे थे, रवंथ चालू. उन्हाळ्यात मी हे उद्योग करीत असे. दुपारी ४ नंतर थोडा ऊन कमी झाल्यावर प्राणी मंडळी बाहेर येत आणि मी पण. 

घराजवळून नाग नदी वहात असे. त्यात डुंबायला म्हशी जात असत. एका म्हशींच्या टीम चा रस्ता आमच्या गल्लीतून जात असे. पावसाळ्यात नदीचे लहानसे पात्र ओलांडून पाणी  बाजूच्या  मैदानात पसरत असे. मग म्हशी तिथेच डुंबत बसत. मी ८-९ वर्षांचा असेंन. दररोज म्हशी घरा समोरून जात तर मी 'ह्या-च्याक-च्याक' करीत  धावित असे. बहुधा त्यांना  माझा बावळट पणा ओळखीचा झाला असेल. लहानपणी मी थोडा अधिकच धीट होतो. एकदा थोड्या ठेंगण्या म्हशीच्या पाठीवर बसायला मी उडी मारली.  पहिल्या खेपेत सहाजिकच मला जमलं नाही. म्हशींचा प्रवास मंद गतीने मैदानाच्या दिशेने चालूच होता. मग मी धावत-धावत त्यांच्या मागे लागलो. पाण्याच्या जवळ येईस तोवर मला नेमकं त्या म्हशीच्या पाठीवर बसता आल. पण नेमकी तेंव्हाच त्या म्हशीने पाण्यात डुबकी मारली. आता विचार करूनही मला घशात 'ब्याक' होत. ते नाल्याच घाण पाणी, शेणाने माखलेल्या म्हशी आणि त्यावर हाल्फ पॅन्ट मधला काडक्या मी! कसातरी मी त्या पाण्यातून बाहेर आलो आणि घरी पळालो. खरी गम्मत अर्थात, घरी आल्यावर झाली. दारात पाऊल ठेवल्या बरोब्बर, घरभर  'सुगंध' दरवळला! आईला मला मारायला  हात ही लाववेना. मी आंघोळ करून आल्यावर, आणि कपडे पाण्यात बुडवल्यावर मात्र आईने चांगलेच चोपले.  

पण हा पराक्रम पहिला नव्हता. रॉकेल ची बैलगाडी येत असे. मी त्या बैलगाडीवर बसून हिंडायचो. रॉकेलच्या डब्ब्यावर बसल्यावर रॉकेल ने आंघोळ केल्या सारख आहे. आणि मुख्य म्हणजे कितीही धुआ, कपड्यातून रॉकेल चा वास (आणि हळदीचा डाग) जात नाही. त्या बैलगाडीचा बैल प्रचंड होता. मला तो हात लावू देत असे. त्याच्या पोळ्याला हात लावायला मजा येत असे. 

(क्रमश:) 

1/26/21

मराठा साम्राज्याचा ऱ्हास - पार्श्वभूमी

 मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ मराठी माणसाचा गौरव नव्हे तर गेल्या पाचशे वर्षाच्या भारतीय इतिहासाचा एक मानबिंदू मानावा लागेल. दक्षिणेतील विजयानगर साम्राज्याच्या मुसलमानी सुलतानांनी केलेल्या विध्वंसा नंतर भारतात हिंदू साम्राज्य तर सोडाच पण साधे राज्य ही परत उभे राहील असे कोणाला वाटले नसेल. पण अश्या कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजींनी स्वराज्याचे स्वप्न बघितले व मुख्य म्हणजे इतरांनाही दाखवले की हे केवळ स्वप्न नव्हे तर त्यास सत्यात उतरवणे शक्य आहे. हिंदू स्वराज्याचा पाय त्यांनी आधी हिंदूच्या ध्यानी-मनी पक्का केला. त्यामुळेच सन १६८९ च्या छत्रपती संभाजींच्या मृत्यू नंतरही राज्य टिकले आणि सन १७०७ नंतर झपाट्याने वाढले. 

पुढली शंभर वर्षे मराठी साम्राज्य फोफावले, कोमेजले, पुन्हा पुनरुज्जीवित झाले, आणि मग अचानक झपाट्याने कोलमडले. या शंभर वर्षात (सन १८१० पर्यंतचा काळ धरूया. यशवंतराव होळकर हे शेवटले मराठी धुरंधर म्हणायला हरकत नाही) पराजय म्हटला तर पानिपत चे तिसरे युद्ध सोडले तर हृदयी खंजीर लागला असा पराभव मराठ्यांच्या पदरी पडला नाही. आणि पानिपत ही हा अपमान अधिक, पराजय कमी होता. थोडक्यात शंभर वर्षे मराठी तलवारींचा खणखणाट भारतभर दुमदुमत होता आणि मराठी घोडी गंगा-यमुना ते कावेरी चे पाणी पीत होती. एवध्या मोठ्या भूभागावर ( २८ लाख चौरस किमी.) तलवारीने यश संपादन करणारी राज्ये, आपण जगाच्या पटलावर बघितलीत तर ती राज्ये बरीच वर्षे टिकलीत. तुर्की साम्राज्य साधारण १८ लाख चौरस किमी होते. आणि ते तब्बल ५०० वर्षे टिकले. त्यातील शेवटली दोनशे वर्ष तुर्की साम्राज्य बर्याच ठिकाणी नाममात्र होते पण अगदी १९२२ ला जेंव्हा इंग्रजांनी ते राज्य नामशेष केले, तेंव्हा त्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला होता. म्हणजे त्या साम्राज्याचे स्थान लोकांच्या मनात कायम होते. मुघल साम्राज्य ४ लाख चौरस किमी होते. सन १६१२ नंतर दिल्ली च्या आस पास चा भाग सोडला तर बाकी ठिकाणी मुघल नामशेष झाले होते पण अजूनही स्वतंत्र्य भारतात या मुसलमानी धर्मान्धाळांचा बर्याच लोकांना पुळका आहे. पण मराठा साम्राज्य केवढे होते याची कल्पना अगदी विदर्भात जाऊन विचारलेत तरी लोकांना नसेल. 

दोन प्रश्नांचा विचार इथे मी करू इच्छितो. एक, एवढे रण -धुरंधर साम्राज्य ज्यांना कारभार ही उत्तम येत असे , ते राज्य १० वर्षाच्या कालावधीत कसे कोलमडले? आणि दुसरे, लोकांच्या स्मृती-पटलातून ही हे राज्य कसे नामशेष झाले? 

दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 

क्रमश: 

1/18/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - सायकल

दोन महिन्याने पूर्वी सायकल मराठी चित्रपट बघण्याची संधी मिळाली. सन २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे  दिग्दर्शन श्री प्रकाश कुंटे यांनी केले आहे. अदिती मोघे याची कथा व पटकथा आहे. तर मुख्य भूमिकेत हृषीकेश जोशी, भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव आहेत.  चित्रपट सुरेख आहे . जणू मनाला लागलेल आल्हाददायक वारे!   उत्तम दिगदर्शन, उत्तम अभिनय, उत्तम पात्रे, उत्तम कथा, उत्तम चित्रपट निर्मिती, आणि एक खराखुरा कौटुंबिक चित्रपट असलेल 'सायकल' ही जणू जाईच्या फुलांची माळच! 

कथा सरळसोट आहे. चित्रपटाच्या नायकाला - केशव ला  (हृषीकेश जोशी)  एक सुरेख सायकल त्याच्या आजोबांनी दिली असते. आपला नायक भविष्य सांगणारा असतो व्यवसायाने, त्याच्या आजोबां सारखा. म्हणून हा वारसाला हक्क. ती सायकल मूळ एका इंग्रजाची असते आणि त्याने आपल्या कथा नायकाच्या आजोबांना दिली असते.  केशव चे सायकलवर अतिशय प्रेम असते आणि केशव चे हे सायकल प्रेम पंचक्रोशात विख्यात असते. कर्म-धर्म संयोगाने  दोन भुरट्या चोरांच्या (भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव) हाती ती सायकल लागते. बस, इथुन गोष्ट  सायकल च्या गतीने पुढे प्रवासाला लागते. गोष्ट नागमोडी वळण घेत नाही, तुम्ही रम्य कोकणात गाणं गुणगणत  सायकलवरून फेर-फटाक्याला निघालया सारखच ही गोष्ट प्रवास करते. गोष्टीच्या शेवटी सायकल परत आपल्या नायका कडे येणार ही प्रेक्षकांना माहिती असते पण  या साध्य चोरीने अनेकांची आयुष्ये बदलतात, अगदी सायकलीचे सुद्धा! 

सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे चित्रपटाची सृष्टी-निर्मिती उत्तम आहे. कॅमेरा संचालन, कॅमेराचा दृष्टीकोण, प्रत्येक शॉट ची प्रकाश मांडणी कोकणाच्या सुरेख भूभागाला बोलत करतो. कोकण जणू चित्रपटातील एक पात्र बनत. चित्रपटात पात्र कमी आहेत आणि अगदी  एका   हातावर मोजता येतील एवढ्याच पात्रांना प्रामुख्याने भूमिका आहेत. त्यामुळे मुख्य भूमिकेतील पात्रे छान रंगली आहेत. त्यांची व्यक्तिमत्वे आणि विचार बदलतांना प्रेक्षकांना जाणवतात. पण मुख्य भूमिका छान आहेत म्हणून सहायक पात्रे कमी पडली नाहीत. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या वेळात उत्तम भूमिका वठवली आहे. केशवची लहान मुलगी, बायको, त्याचे वडील,  गावातील सावकार या सगळ्यांचे गोष्टी ला पुढे नेणाऱ्या भूमिका एकूण चित्रपटात चपखल बसतात. चित्रपटाचा काळ सन ५० किंव्हा ६० च्या दशकातील दाखवला आहे. त्या काळाची वेशभूषा आणि राहणीमान  व्यवस्थित दाखवले आहे.  चित्रपटावर पैसे खर्च केला आहे हे जाणवते पण पैसे जिथे आवश्यक आहे तिथेच टाकलाय आणि जो टाकलाय तो उपयोगात आलेला आहे. कारण चित्रपटाचा जुना कालमान दाखवण्याच्या मागचे कारण जुन्या काळातील थोडा भाबडेपणा , थोडा मनस्वीपणा आणि तरी मुळात असलेला चांगुलपणा आणि त्या चांगुलपणाला वाव व प्रोत्साहन देणारा समाज हे कथेचे व चित्रपटाचे आधारस्तंभ आहेत. साधारणत:, कौटुंबिक चित्रपट बनवायचा तर त्याच्या मुळाशी कुठला तरी ठाम विचार व दृढ तत्वज्ञान हवे. नीट विचाराअंती बनवलेलया चित्रपटात हे तत्वज्ञान प्रेक्षकां पर्यंत बरोबर पोचते. या चित्रपटाची कथा सरळसोट असली तरी त्यामागे संदेश आहे. आणि हा संदेश अत्यंत कल्पकतेने दाखवण्यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे. 

हा चित्रपट म्हणजे बा. भ. बोरकर किंव्हा शांताबाई शेळके यांची कविता वाचल्या सारखी आहे. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची ही कथा मनाला हळुवार स्पर्श करून जाते. प्रत्येकाने अवश्य हा चित्रपट बघावा. 


1/10/21

चांदोबा

अचानक माझ्या हाती चांदोबा मासिक चे अंक ऑन लाईन लागलेत. आठवणींच्या गुहेत गेल्या सारखे वाटले. लहानपणी  आमच्या कडे किशोर आणि चांदोबा अशी दोन मासिके माझ्या साठी व माझ्या मोठ्या भावा साठी येत असत. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकार उपक्रम अंतर्गत प्रकाशित होत असे. आणि ते किशोर वयीन मुलांसाठी असे (नावा प्रमाणे!). मी दर महिन्यात चांदोबाची आतुरतेने वाट बघत असे. आणि एकदा का मासिक आले की कधी वाचून संपवेन असे होत असे. त्यातल्या गोष्टी, चित्रे , मालिका मला फार आवडत असे. आमच्या कडे सगळे अंक जमा करून बॅगेत भरून ठेवलेले होते. उन्हाळ्यात काहीच करायला नसायचे तेंव्हा मी जुने, धुळीने माखलेले अंक पुन्हा पुन्हा वाचत असे. खूप साऱ्या गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. एवढं वाचून एक तर माझा मराठी चांगले झाले होते आणि दुसरा म्हणजे, न कळत माझ्या वर भारतीय नीतिमत्तेचे संस्कार झालेत व भारतीय इतिहासाचा परिचय, जो भारतीयांनी लिहिला आहे,  झाला. 

आता भारतीय नीतिमत्ता म्हणजे नेमके काय? तर चांदोबातील बहुतांश गोष्टी या इसापनीती, हितोपनिषद किंव्हा उपनिषद मधल्या किंव्हा त्या वर आधारित असत. पुराण, रामायण व महाभारतातील गोष्टी, खास करून कृष्णाच्या गोष्टी नियमित प्रकाशित होत असत.  गोष्टींद्वारे लहान मुलं-मुलींना चतुरपणा, हजरजवाबीपणा कसा व कुठे करावा, आणि  कुठे हजरजवाबी पणा करू नये, प्रामाणिकता, इत्यादि संस्कार तर होत असत. भारतीय समाज, नितीमत्ता व धर्माचे वैशिष्ट्य असे हे कधीच एकांगी, एकमार्गी नाही. उदाहरणार्थ, प्रामाणिकता जरी अंतिम सत्य मानिले तर त्यातील बारकावे शिकवायला हवे. परिस्थिती कशी आहे, त्यातून काय सिद्ध होईल, त्याचे काय परिणाम होतील. मी प्रामाणिक राहणार, आजूबाजूचे गेले खड्ड्यात असला एकांगी विचार केला की गांधी तयार होतो! आज काल हा बारकावा शिकविला जात नाही आणि लोकांनाही याचा विसर ही पडला आहे. पाश्चिमात्य विचारप्रणाली जी ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे, आणि ज्यांची नीतिप्रणाली ही मनुष्य मूळ पापी च आहे आणि त्याला न्याय शेवटी येशू च देणार असल्या भ्रामक अंध विश्वासावर आधारित आहे, तशी विचार सरणी हळू हळू भारतात मानल्या जाते आहे. 

चांदोबाच्या ऐतिहासिक गोष्टी पण खूप असत. गोष्टी रूपात आणि कॉमिक्स  शैलीत ही गोष्टी असत. दक्षिण भारतातील बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची ओळख मला चांदोबामुळेच झाली. पण त्याहून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहिलेला मला वाचायला मिळाला. पुरातन ते नवीन भारतीय इतिहास आपला नाहीच, त्या केवळ घटना आहेत ज्याच्या संबंध १९४७ साल नंतरच्या भारताशी नाहीच आणि हिंदू इतिहास तर घृणात्मक असल्याच्या  (पण गांधी नेहरूंचा इतिहास १९४७ च्या आधीचा असला तरी वाचायचाच!) काहीश्या विकृत आणि विभित्स मनोवृत्ती तून आपल्या शाळांमध्ये इतिहास शिकविल्या जातो. अश्या परिस्थितीत चांदोबा मुळे मला इतिहास व पुराणांची ओळखच नव्हे तर आवड व आपुलकी निर्माण झाली. आणि ही आवड आजगयत आहे. 

मला वाटत की चांदोबाचे प्रकाशन बंद झाले आहे. स्वभाषेत वाचणारे आणि लिहिणारे, दोन्ही कमी झालेत. मातृभाषेचा व स्व भाषेचा गळा मोठया अभिमानाने हळू हळू घोटून हत्या करणार भारतीय समाज हा जगातला एकमेव च असावा. आणि चांदोबाचे वाचन वर्ग कमी होत गेल्यामुळे बंद पडलेले प्रकाशन हे भारतीय भाषा, इतिहास, विचारधारेचा जणू अंतिम टप्पा आहे. भविष्य आता इंग्रजीत बोलून पाश्चिमात्य देश, संस्कृतीची नक्कला करणारा देश भारत होणार आहे. 

1/2/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - बालगंधर्व

नुकताच बालगंधर्व चित्रपट बघायची संधी मिळाली. गेले कित्येक वर्षे या चित्रपटाची, म्हणजे बालगंधर्वांची, गाणी ऐकतोय. अक्षरशः दर एक दिवसा आड 'नमन नटवरा' ऐकतोच. त्यामुळे आणि चित्रपटाचे स्थिर-दृश्य बघून या चित्रपटा बद्दल एक उत्सुकता होती. बघायला वेळ आणि माध्यम (नेटफ्लिक्स) मिळाल्यावर मी आणि सौ. नी मोठ्या आनंदात चित्रपट बघणे सुरु केला. पण निराशा पदरी पडली असे म्हणायला हरकत नाही! 

सुरुवात चित्रपटात काय चांगले होते यांनी करू या. चित्रपटाचे सेट्स, त्याची सृष्टी-निर्मिती, चित्रपटाची काल-निर्मिती, पोशाख, दिवे आणि कॅमेरा हे सगळेच अत्यंत उत्कृष्ट दर्जा चे होते. मराठी चित्रपटांची या सगळ्याच बाबतीत गेलया १५  वर्षात झपाट्याने प्रगती झाली आहे आणि बालगंधर्व चित्रपट या दशकातील या बाबतीतला कळस मानायला हरकत नाही. बालगंधर्वांचे लहानपणीचे घर वा वाडा असो की मोठं झाल्यावर त्यांनी भेट दिलेला कोल्हापूर चा राजवाडा असो, बालगंधर्वांच्या जीवनातील महत्वाच्या क्षणात प्रेक्षक थेट त्या काळात प्रवास करितात. वेगवेगळ्या भूमिकेतील कलाकार हे उत्तम आहेत. छत्रपती शाहू असोत की लोकमान्य टिळक असो, प्रत्येक कलाकाराने काही मिनिटांच्या भूमिकेला नीट न्याय दिला आहे. या चित्रपटाच्या गाण्यानं बद्दल तर लिहिणे म्हणजे लता मंगेशकर यांच्या गळ्याचा गोडवा शब्दात अंकित करण्या सारख आहे. या चित्रपटाची गाणी म्हणजे मराठी चित्रपटाचा एक वारसा आहे. कौशल इनामदार यांनी जुन्या बालगंधर्वांच्या गाण्यांना नवीन शैलीत आणि वाद्यवृंदात मांडले खरे पण तरी मूळ गाण्यांचा आणि चालींचे व्यक्तिमत्व आणि ओळख कायम आहे. 

पण तरी हा चित्रपट एक अत्यंत महत्वाच्या मुक्कामात कमी पडतो. आणि ती म्हणजे कथा. आता बालगंधर्वां चे आयुष्य आणि त्यातील महत्वाच्या घटना बहुतेक करून सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे काम त्या घटनांची फुले नीट गुंफुन साजेसा हार बनविणे होते पण तसे झालेले दिसत नाहीत. घटनाक्रम तुटक वाटतो. बालगंधर्वांसारखे व्यक्तिमत्व दोन-तीन तासांच्या सीमेत  बांधणे फार कठीण कार्य, हे मान्य पण  मला वाटते की निर्माते आणि लेखकांनी एक फार महत्वाच्या प्रश्नाचा विचार केला असता तर जे काही उत्तर त्यांने ठरवले असते ते चित्रपटाच्या क्रमात दृष्टीस आले असते. हा चित्रपट बालगंधरावांच्या जीवनावर बेतलेला आहे के हा चित्रपट बालगंधर्वांच्या जीवनाचा आहे? कारण तुटक पण जो आढळतो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोष आणि आणि त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर चादर टाकण्याच्या केलेल्या  प्रयत्नानंमुळे प्रकर्षाने जाणवतॊ. आणि त्या भानगडीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू झाकोळल्या गेलेत. त्यांना गाणं म्हणजे देवाचे वरदान होते. पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे  अगदी लहानपणा पासून त्याच्या वरदानाची कदर करणारे लोक त्यांना मिळत गेलेत. त्यामुळे त्यांना जीवनात झालेल्या हाल अपेष्टा बहुतेक करून स्वतः ओढावून घेतलेल्या होत्या. प्रत्येक घडीला त्यांना हात देऊन वर खेचायला तयार होते (उदा. प्रभात सिनेमा)  पण आता याला हेकड पण म्हणा की अस समजा की कलेचे वरदान प्राप्त असलेल्यांचा झक्कीपणा,  त्यांनी ते हात दूर ढकललेत. त्या सगळ्यात आपल्या बायकोचे हाल केलेत आणि शेवटी तिला सोडून देऊन एका मुसलमान बाई सोबत घर बसविले. आणि हो, त्या भानगडीत स्वतःला आणि स्वतःच्या कलेला त्यांच्या वयाच्या चाळीशीत च कालबाह्य ही केले. 

लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराजांची कृपादृष्टी असलेल्या हा थोर गायक सन १९६७ पर्यंत होता यावर विश्वास बसत नाही. 

नेमका हा चिकित्सकपणा , हा अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टी चित्रपटात दिसत नाही आणि माझ्या मते या महत्वाच्या पल्ल्यावर चित्रपट अडखळतो. वर मी अभिनयाचे कौतुक जरी केले तरी अनपेक्षित पणे सुबोध भावे यांचा अभिनय थोडा विचित्र वाटतो. त्यांच्या अभिनय कौशल्यं बद्दल शंका नाही. थोर कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत सुबोध पण या चित्रपटात मात्र मला त्यांचा अभिनय अर्धवट वाटतो. खूपदा परिस्थिती आणि घटनेचा ताल जुळत नसल्यामुळे, नेमक्या कुठल्या भावना समोर मांडाव्यात हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.  शारीरिक हावभाव पण पुढे पुढे स्थगित झाल्यासारखे वाटतात. वयाने माणसाच्या हालचाली हळू होतात पण १९३० च्या दशकात त्यांचे वय चाळीशीत होते त्यामुळे ते वय सुबोध भावे दर्शविताना हालचाली हळू करून काय दर्शवित आहेत ते नेमके कळत नाही. 

टीका करणे सोपे आहे. चित्रपट बनविणे महत कठीण. या चित्रपटा मागे प्रचंड मेहनत तर दिसतेच  तसेच मराठी रंगभूमीचे व  नाट्य-संगीताचे उत्कट प्रेम आणि बालगंधर्वांचे मराठी संस्कृतीतील अढळ स्थान दाखविण्याची प्रबळ इच्छा पण दिसते. त्यांची गाण्यांना पुन्हा नवीन जन्म मिळाला. त्यामुळे या चित्रपटाचे कौतुक व्हायलाच हवे. पण इंग्रजी मिडीयम मध्ये शिकलेल्या मराठी पिढीला मात्र हा चित्रपट बघून बालगंधर्वांचा परिचय नीटसा होत नाहीं. या प्रेकशकामध्ये प्रश्नचिन्ह अधिक दिसतील. 

पण शतक बनवितांना ९५ धावा काढणे जरी स्पृहणीय असले तरी विक्रम म्हणून त्याची नोंद होत नाही. तसा काहीसा प्रकार इथे झाला याचे वाईट वाटते. 

8/29/20

सायकलवीर

 मी नुकताच सायकल चालविणे शिकलो होतो. मी जिथे वाढलो तो भाग आणि गल्ल्या एकदम व्यवस्थित आखलेल्या होत्या. आमच्या गल्लीच्या एका बाजूला मोठा रस्ता होता. रहदारीचा. पण माझ्या लहानपणी तिथे फारशी रहदारी नसे. सायकल समोरच्या मॉरिस कॉलेज मैदानावर शिकायची. तिथेच प्रॅक्टिस करायची आणि मग काही दिवसांनी मोठ्या रस्त्यावर चालवायची. अशी ग्रॅड्युएशन प्रथा होती.  दादाची सायकल घेऊन, चालत, चालत मी ग्राउंड वर जात असे आणि मग प्रॅक्टीस करीत असे. पण पंख आहेत म्हणून उडायचं की पंखात ताकद असल्यावर उडायचं? हा फार मोठा गहन प्रश्न आहे. मी ठरवलं की पाईडल मारता येत म्हणून मोठ्या रस्त्यावर चालवायच. रविवारी सकाळ च्या वेळी मी घोडी हाकली. आता त्या रहदारी वाल्या  रस्त्याला थोडा उतार होता. त्यामुळे सायकलीने मस्त वेग घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीच्या मध्ये कचरा टाकायची जागा असे. आणि त्यात बाबू कचरा गोळा करीत उभा होता. आता बाबू कोण या बद्द्ल नंतर बोलूया. पण रविवारी सकाळच्या वेळी तो आदल्या दिवशीचा कचरा गोळा करीत उभा होता. आणि मुख्य म्हणजे त्याची पाठ माझ्या उतारावर वेग पकडलेल्या सायकली कडे होते. ही बाब महत्वाची. कारण एका होतकरू सायकल-शिक्या सायकल चालविण्याची प्रक्टिस करीत असतांना त्या कडे कोणीही पाठ फिरवू नये. आता रस्त्याला उतारच नव्हे तर किंचित वळणही होते. आणि उतार, वेग, वळण आणि सायकलीचा ब्रेक याची सांगड मला काही झेपत नव्हती. माझ्या छोट्या पंज्यात ब्रेक च येईना. म्हणून मी दोन्ही हातांनी एक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यात सायकालीन कन्ना खाल्ला. आता सायकल वेगाने, वळणावर वळण्याच्या ऐवजी सरळ जाऊ लागली - खर सांगतो, भूत आल होता सायकलीत. तिने जणू ठरवून  (माझी चूक नसतांना) कचऱ्याच्या ढिगाकडे झेप घेतली. बाबू कडे. मी बाबू अशी कोवळी हाक ही मारली.  आणि ... खडखडाट करीत त्याची गळा -भेट घेतली! त्याची मुळीच इच्छा  नसतांना! त्याच्या पायाला लागलं असणार बिचार्याच्या. 'बाबू कहीं पे भी  खडे रहेते' अस काहीस बडबडत मी सायकल उचलून धावत पळ काढला. 


सायकल शिकून आता बरीच दशके झालीत पण सायकल जेंव्हा पहिल्यांदा शिकलो, स्वतः पायडल मारून, नीट सांभाळून चालवली, तो आनंद अजूनही ताजा आहे. वेगाने, मस्त वार लागतंय आणि बाकी पायी चालणार्या पेक्षा विनासायस पणे पुढं जातोय हा आनंद अप्रतिम होता. वेगाने जाण्याची इच्छा  ही मनुष्यात मूळच असावी. म्हणून आधी आपण बैल माणसावळले असणार. मग घोडे. मग घोड्यावर हजारो वर्षे भागलीत. आणि मग वहाने. नशिबाने मला पुढे बरीच वेगवान वाहने  चालविण्याची संधी मिळाली पण पहिल्यांदा सायकल यायला लागण्याची आठवण अजूनही अवीट आहे. काही आनंद असे असतात की त्याचे पुढले टप्पे गाठलेत तरी पहिला टप्पाच लक्षात राहतो, मनात   मला माझ्या मोठ्या भावाचीच सायकल वारसा-हक्काने मिळाली. बिना दांड्याची (लेडीज), लाल रंगाची सायकल होती. तेंव्हा जुन्या भैय्या सायकल व्यतिरिक्त नुकत्याच नवीन फैशन च्या सायकली येऊ लागल्या होत्या. स्ट्रीट कॅट नावाच्या सायकलीची जाहिरात फार प्रसिद्ध झाली होती. काहीतरी इंग्रजीत होती जाहिरात. कळायचं नाही तेवढं इंग्रजी तेंव्हा.

(क्रमश:)


6/4/17

बाजीरावांची गाथा


नुकतच थोरल्या बाजीरावांच्या लष्करी जीवनाचा आढावा घेणारे पुस्तक* वाचनात आले. मराठी सत्तेला साम्राज्याचे स्वरूप देणारा तसेच पुढली पन्नास वर्ष ते साम्राज्य ज्या स्तंभांवर टिकले त्या मल्हाररावां सारख्या लढवय्यांना नावारूपास आणणाऱ्या या सेनानायकाचे जीवन कुठल्या चित्रपटाहून कमी नाही. दोन वर्षा पूर्वी प्रदर्शित झालेला 'बाजीराव-मस्तानी' चित्रपट, बाजीरावांच्या आयुष्यातील खरी थरारकता एक दशांश ही दाखवू शकला नसेल. अवघ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात इतक्या निरनिराळ्या प्रदेशात, निरनिराळ्या शत्रुंविरुद्ध डाव-पेच करणे, लढाया जिंकणे. तसेच शाहू छत्रापतींना खुश ठेवणे आणि घरातील शत्रूंना अंगठ्या खाली ठेवणे आणि या दरम्यान मराठी सत्ता दिल्ली च्या मुघल दरबाराच्या उंबरठ्याशी पोचाविणे कसे शक्य आहे? थोरल्या बाजीरावांचा इतिहास अद्भूत, विस्मयकारक आणि अनकालनीय आहे. खोगीराचे सिंहासन करुन, मयुरासानाधिष्ट पातशाही टाचेखाली आणणारा हा सेनानी, भारती लष्करी इतिहासाचा उच्चांक आहे. शिवाजी महाराज जर पुन्हा सन १७३६ ला अवतरले असते तर त्यांनी बाजीरावांची युध्दातील गती, शत्रूला सतत हुलकावण्या देण्याची आणि गोंधळात ठेवण्याची कला, युद्धासाठी उचित वेळ आणि परिस्थितीची संयमाने वाट बघणे आणि हव्या त्या परीस्थितीत शत्रूला घेरल्यावर, विजेच्या गतीने आणि वाघाच्या बळाने झडप घालून युध्द जिंकणे बघून, गहिवरून मिठी मारली असती. आणि हिंदवी स्वराज्याचा सच्चा वारीस म्हणून कौतुक केले असते. उदाहरणार्थ,  महाराजांचे अफझलखाना विरुद्धाचे युध्द-पेच, संयम आणि कुशाग्रता याची थेट छाप थोरल्या बाजीरावांच्या पालखेडच्या मोहिमेत दिसते. 

स्वतंत्र भारताची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास न शिकविणे. नेहरूंच्या काश्मीर आणि चीन च्या चुका एखाद वेळेस माफ केल्या जाऊ शकतात पण आपल्या देशाचा प्रगल्भ इतिहास पुढल्या पिढी पासून मुद्दाम लपवून जे ठेवल्या गेले, त्याच पाप नेहरू कुठे फेडतील देव च जाणो. भारत ही एक संकल्पना आणि विविध प्रातांनी त्या संकल्पनेला धरून गेल्या हजार वर्षात घडवलेला इतिहास ही केवळ धरोहर नसून, तो इतिहास आपल्याला सद्य परिस्थितीत काही शिकवू शकतो आणि भविष्यात त्याच चुका करणे टाळू शकतो. सशक्त राष्ट्र केवळ सैन्यावर उभरत नसते तर शक्तीशाली सैन्या मागे शक्तीशाली, सुशिक्षित, आणि ज्वाजल्य देशाभिमान असलेला समाज भक्कमपणे उभा असावा लागतो. आणि आपल्या गेल्या हजार वर्षाच्या इतिहासाची कास धरूनच आपण त्या समाजाची निर्मिती करू शकतो. त्यामुळे गेली सत्तर वर्षे आपल्या समाजाला इतिहासांधळे करण्या साठी धडपडणारे सगळ्या शिक्षण मंत्री आणि शिक्षण क्षेत्रात कामे करणाऱ्या विरुद्ध फौजदारी खटले दाखल करायला हवेत. 

मी महाराष्ट्रात शिकलो म्हणून नशिबानी आम्हाला शिवाजींचा इतिहास शिकविला गेला पण पेशाव्यंबद्दल एक अक्षर ही शिकवले नाही. अक्षर नाही तर निदान अवाक्षरही शिकविले असते तरी ओळख तरी झाली असती! पण पेशवे नाही, मल्हारराव नाही, अहिल्याबाई नाही, आंग्रे नाही, महादजी नाही आणि एवढच काय तर मी नागपूरचा पण मला रघूजीराजे भोसल्यांबाद्द्ल काडीमात्र माहिती नाही. शिवाजी महाराजां नंतर थेट इंग्रज पण पळशी च्या पहिल्या युद्धात इंग्रजांना त्यांच्याच युद्ध शैलीत पाणी पाजणारा आणि अगदी पाच वर्षे अधिक जगले असते तर आजच्या भारताचा चेहरा-मोहरा बदलविण्याची ताकद असलेला मावळत्या मराठी साम्राज्याचा शेवटचा तारा - यशवंतराव होळकर हे नाव तरी महाराष्ट्रात किती लोकांस ठाऊक आहे? 

शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या स्वराज्याच्या वाटेवर पुढी सव्वाशे वर्ष अगणित मराठी योध्यांनी  भारताच्या काना कोपर्यात आपल्या बुद्धीचे आणि तलवारीचे घसघशीत ठसे उमटवले. अगदी आपल्या स्वतंत्र भारताच्या सीमारेखा या सन १७७० च्या मारठी सामार्ज्याची  सीमा आहेत. पण असल्या सेना धुरंधरांना झाकोळून गांधी-नेहरू नावाचा जप गळी घालणार्या स्वतंत्र भारतात पारातंत्रित माने घेऊन वावरणाऱ्या आपल्या समाजाची कीव येते. 

असो. आता देवाच्या (अमेरिकेच्या?) दयेने इंटरनेट चे जाळे सर्वदूर उपलबद्ध आहे. आणि सगळा इतिहास ही विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. त्यामुळे तो वाचून न वाचाणाऱ्याना सांगणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजां पासून ते यशवंतरावा पर्यंतच्या सेनानायकांनी अफझलखाना पासून ते इंग्रजांचा पराभव केला आणि निघून गेलेत. प्रचार आणि प्रसार ही आपल्या काळातली शस्त्रे आहेत. या शस्त्रांचा नीट उपयोग करून आपल्या काळातील करंटे राजकारणी, घरभेदी मिडीया आणि औरंग्या पाकिस्तान ला हरविणे आपल्यालाच प्राप्त आहे.     

- * The Era of Bajirao by Uday S.Kulkarni. 
http://www.amazon.in/Era-Baji-rao-Uday-Kulkarni/dp/8192108031