1/26/21

मराठा साम्राज्याचा ऱ्हास - पार्श्वभूमी

 मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ मराठी माणसाचा गौरव नव्हे तर गेल्या पाचशे वर्षाच्या भारतीय इतिहासाचा एक मानबिंदू मानावा लागेल. दक्षिणेतील विजयानगर साम्राज्याच्या मुसलमानी सुलतानांनी केलेल्या विध्वंसा नंतर भारतात हिंदू साम्राज्य तर सोडाच पण साधे राज्य ही परत उभे राहील असे कोणाला वाटले नसेल. पण अश्या कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजींनी स्वराज्याचे स्वप्न बघितले व मुख्य म्हणजे इतरांनाही दाखवले की हे केवळ स्वप्न नव्हे तर त्यास सत्यात उतरवणे शक्य आहे. हिंदू स्वराज्याचा पाय त्यांनी आधी हिंदूच्या ध्यानी-मनी पक्का केला. त्यामुळेच सन १६८९ च्या छत्रपती संभाजींच्या मृत्यू नंतरही राज्य टिकले आणि सन १७०७ नंतर झपाट्याने वाढले. 

पुढली शंभर वर्षे मराठी साम्राज्य फोफावले, कोमेजले, पुन्हा पुनरुज्जीवित झाले, आणि मग अचानक झपाट्याने कोलमडले. या शंभर वर्षात (सन १८१० पर्यंतचा काळ धरूया. यशवंतराव होळकर हे शेवटले मराठी धुरंधर म्हणायला हरकत नाही) पराजय म्हटला तर पानिपत चे तिसरे युद्ध सोडले तर हृदयी खंजीर लागला असा पराभव मराठ्यांच्या पदरी पडला नाही. आणि पानिपत ही हा अपमान अधिक, पराजय कमी होता. थोडक्यात शंभर वर्षे मराठी तलवारींचा खणखणाट भारतभर दुमदुमत होता आणि मराठी घोडी गंगा-यमुना ते कावेरी चे पाणी पीत होती. एवध्या मोठ्या भूभागावर ( २८ लाख चौरस किमी.) तलवारीने यश संपादन करणारी राज्ये, आपण जगाच्या पटलावर बघितलीत तर ती राज्ये बरीच वर्षे टिकलीत. तुर्की साम्राज्य साधारण १८ लाख चौरस किमी होते. आणि ते तब्बल ५०० वर्षे टिकले. त्यातील शेवटली दोनशे वर्ष तुर्की साम्राज्य बर्याच ठिकाणी नाममात्र होते पण अगदी १९२२ ला जेंव्हा इंग्रजांनी ते राज्य नामशेष केले, तेंव्हा त्या विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रह केला होता. म्हणजे त्या साम्राज्याचे स्थान लोकांच्या मनात कायम होते. मुघल साम्राज्य ४ लाख चौरस किमी होते. सन १६१२ नंतर दिल्ली च्या आस पास चा भाग सोडला तर बाकी ठिकाणी मुघल नामशेष झाले होते पण अजूनही स्वतंत्र्य भारतात या मुसलमानी धर्मान्धाळांचा बर्याच लोकांना पुळका आहे. पण मराठा साम्राज्य केवढे होते याची कल्पना अगदी विदर्भात जाऊन विचारलेत तरी लोकांना नसेल. 

दोन प्रश्नांचा विचार इथे मी करू इच्छितो. एक, एवढे रण -धुरंधर साम्राज्य ज्यांना कारभार ही उत्तम येत असे , ते राज्य १० वर्षाच्या कालावधीत कसे कोलमडले? आणि दुसरे, लोकांच्या स्मृती-पटलातून ही हे राज्य कसे नामशेष झाले? 

दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. 

क्रमश: 

No comments: