1/10/21

चांदोबा

अचानक माझ्या हाती चांदोबा मासिक चे अंक ऑन लाईन लागलेत. आठवणींच्या गुहेत गेल्या सारखे वाटले. लहानपणी  आमच्या कडे किशोर आणि चांदोबा अशी दोन मासिके माझ्या साठी व माझ्या मोठ्या भावा साठी येत असत. किशोर हे मासिक महाराष्ट्र राज्य सरकार उपक्रम अंतर्गत प्रकाशित होत असे. आणि ते किशोर वयीन मुलांसाठी असे (नावा प्रमाणे!). मी दर महिन्यात चांदोबाची आतुरतेने वाट बघत असे. आणि एकदा का मासिक आले की कधी वाचून संपवेन असे होत असे. त्यातल्या गोष्टी, चित्रे , मालिका मला फार आवडत असे. आमच्या कडे सगळे अंक जमा करून बॅगेत भरून ठेवलेले होते. उन्हाळ्यात काहीच करायला नसायचे तेंव्हा मी जुने, धुळीने माखलेले अंक पुन्हा पुन्हा वाचत असे. खूप साऱ्या गोष्टी मला पाठ झाल्या होत्या. एवढं वाचून एक तर माझा मराठी चांगले झाले होते आणि दुसरा म्हणजे, न कळत माझ्या वर भारतीय नीतिमत्तेचे संस्कार झालेत व भारतीय इतिहासाचा परिचय, जो भारतीयांनी लिहिला आहे,  झाला. 

आता भारतीय नीतिमत्ता म्हणजे नेमके काय? तर चांदोबातील बहुतांश गोष्टी या इसापनीती, हितोपनिषद किंव्हा उपनिषद मधल्या किंव्हा त्या वर आधारित असत. पुराण, रामायण व महाभारतातील गोष्टी, खास करून कृष्णाच्या गोष्टी नियमित प्रकाशित होत असत.  गोष्टींद्वारे लहान मुलं-मुलींना चतुरपणा, हजरजवाबीपणा कसा व कुठे करावा, आणि  कुठे हजरजवाबी पणा करू नये, प्रामाणिकता, इत्यादि संस्कार तर होत असत. भारतीय समाज, नितीमत्ता व धर्माचे वैशिष्ट्य असे हे कधीच एकांगी, एकमार्गी नाही. उदाहरणार्थ, प्रामाणिकता जरी अंतिम सत्य मानिले तर त्यातील बारकावे शिकवायला हवे. परिस्थिती कशी आहे, त्यातून काय सिद्ध होईल, त्याचे काय परिणाम होतील. मी प्रामाणिक राहणार, आजूबाजूचे गेले खड्ड्यात असला एकांगी विचार केला की गांधी तयार होतो! आज काल हा बारकावा शिकविला जात नाही आणि लोकांनाही याचा विसर ही पडला आहे. पाश्चिमात्य विचारप्रणाली जी ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे, आणि ज्यांची नीतिप्रणाली ही मनुष्य मूळ पापी च आहे आणि त्याला न्याय शेवटी येशू च देणार असल्या भ्रामक अंध विश्वासावर आधारित आहे, तशी विचार सरणी हळू हळू भारतात मानल्या जाते आहे. 

चांदोबाच्या ऐतिहासिक गोष्टी पण खूप असत. गोष्टी रूपात आणि कॉमिक्स  शैलीत ही गोष्टी असत. दक्षिण भारतातील बऱ्याच ऐतिहासिक पात्रांची ओळख मला चांदोबामुळेच झाली. पण त्याहून एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे की आपला इतिहास आपल्या लोकांनी लिहिलेला मला वाचायला मिळाला. पुरातन ते नवीन भारतीय इतिहास आपला नाहीच, त्या केवळ घटना आहेत ज्याच्या संबंध १९४७ साल नंतरच्या भारताशी नाहीच आणि हिंदू इतिहास तर घृणात्मक असल्याच्या  (पण गांधी नेहरूंचा इतिहास १९४७ च्या आधीचा असला तरी वाचायचाच!) काहीश्या विकृत आणि विभित्स मनोवृत्ती तून आपल्या शाळांमध्ये इतिहास शिकविल्या जातो. अश्या परिस्थितीत चांदोबा मुळे मला इतिहास व पुराणांची ओळखच नव्हे तर आवड व आपुलकी निर्माण झाली. आणि ही आवड आजगयत आहे. 

मला वाटत की चांदोबाचे प्रकाशन बंद झाले आहे. स्वभाषेत वाचणारे आणि लिहिणारे, दोन्ही कमी झालेत. मातृभाषेचा व स्व भाषेचा गळा मोठया अभिमानाने हळू हळू घोटून हत्या करणार भारतीय समाज हा जगातला एकमेव च असावा. आणि चांदोबाचे वाचन वर्ग कमी होत गेल्यामुळे बंद पडलेले प्रकाशन हे भारतीय भाषा, इतिहास, विचारधारेचा जणू अंतिम टप्पा आहे. भविष्य आता इंग्रजीत बोलून पाश्चिमात्य देश, संस्कृतीची नक्कला करणारा देश भारत होणार आहे. 

3 comments:

Anonymous said...

कृपया चांदोबाची लिंत द्या

Anonymous said...

please give link of CHANDOBA

Chinmay 'भारद्वाज' said...

https://www.chandamama.in/marathi/marathi.php