10/24/25

छत्रपतींच्या उदयाच्या वेळेसच्या जागतिक सत्तांचा संक्षिप्तात आढावा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनकाल आणि त्यांच्या पराक्रमाचे स्मरण हे नित्य कार्य आहे. इतिहास या गत-काळातील घटना असल्यात तरी त्याच्या सावलीतच वर्तमान जगतो.  स्वराज्य स्थापना, परकीय इस्लामी धर्म व सत्तांचा नाश करणे, हिंदू छत्रपती बनणे, नवीन युद्धशैलीची स्थापना, परराज्य नीती, त्यातील मुत्सद्दीपणा आणि शैली आणि तसेच त्यांची दूरदृष्टी इत्यादी कामगिरी अतुलनीय तर आहेच पण त्या काळातील त्यांच्या शत्रू शाह्यांचा बलाढ्यापणा लक्षात घेतला तर त्यांची कारगिर्दी अदभूत ठरते. आपण त्यांच्या काळातील जागतिक पातळीवरील सत्तांचा थोडक्यात आढावा घेऊ. जागतिक सत्ता म्हटले कि आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही इत्यादी छोट्या मुसलमानी शाह्यांना आपण या लेखापुरते तरी वगळूया. याचा अर्थ या शाह्या शक्तिशाली नव्हत्या असे नाहीं. पण मुघल, पोर्तुगीज किंव्हा तुर्की आटोमान पुढे या दक्षिण भारतातल्या शाह्या फारच लहान होत्या.   

छत्रपतींचा जन्म सन १६३० ला झाला. त्या काळात उत्तर भारत - म्हणजे अफगाणिस्तान पासून ते बंगाल पर्यंत आणि कश्मीर पासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत मुघली सत्ता घट्ट झाली होती. शहाजहान मुघली बादशाह होता आणि तो मुघली सत्ताधाऱ्यांच्या वंशावळीत पाचवा बादशाह होता. मुघली राज्य तो पर्यंत जवळपास ९० वर्ष जुने होते. मोघली सैन्य महाकाय होते. शहाजहानच्या काळात मोघली पायदळ व घोडदळ एकूण २० ते ४० लाखाच्या घरात होते. "आई-ने-अकबर" हे अकबराच्या कारगीर्दीचा लेखाजोखा, जो अकबराच्या जीवनकाळात त्याच्या दरबारात लिहिल्या गेला होता. त्याप्रमाणे मुघली सैन्य सन १५९९ ला ४४ लाख होते. यात घोडदळ, पायदळ बंदूक-तोफा दळ आणि अनियमित किंव्हा भाडोत्री सैनिक होते. दरबारात लिहिल्या जात असल्यामुळे या आकड्यामध्ये अतिशयोक्ती नक्कीच असणार. तरी मुघली सैन्य २० लाखावर नक्कीच होते. 

औरंग्या जेंव्हा सन १६८२ ला दक्खनी उतरला तेंव्हा तो लाख-दोन लाख सैन्य घेऊन आला होता. औरंगाबाद शहर, जेथे त्याने मुक्काम केला त्यात चार लाखाची भर त्याच्या येण्याने झाली असे नमूद केल्या गेले आहे. सैन्य व्यतिरिक्त जगाच्या अर्थव्यवस्थेचा २०% भाग मुघली अंकुशाखाली होता. तरीही १०० वर्षात मुघलांनी एकही शाळा-विद्यालय किंव्हा कुठल्याही तऱ्हेची उपलब्धी केली नाहीं. नुसते शोषण आणि उपभोग घेतला आणि शेवटी सत्यानाश करून नाहीसे झालेत. असो. थोडक्यात, मुघली सत्ता अनन्यसाधारण बलाढ्य आणि शक्तिशाली होती. मुघलांच्या आधी जवळपास ४०० वर्षे वेग-वेगळे मुसलमान सत्ताधारी दिल्लीत होते. त्यातील कोणाचे हि सैन्य किंवा कोणाचाही खजिना मुघलांएवढा नव्हता. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात मुघलांचा दबदबा प्रचंड होता. महाराजांच्या तीर्थरुपांना, श्री शहाजी महाराजांना, जेंव्हा आदिशहाने बंदी केले तेंव्हा आदिलशहाला घाबरावयाला शिवाजी महाराजांनी मुघलांशी तह केल्याचा आव आणला. त्याचा परिणाम आदिलशहावर लगेच झाला. त्याने शिवाजी महाराजांनी देऊ केलेले किल्ले आणि जमीन घेऊन, शहाजी महाराजांना लगेच मोकळे केले. 

पोर्तुगीज सत्ता भारतात वास्को-द -गामा सोबत स्थापित झाली असली तरी अल्फान्सो-डी-अल्बुकर्की याने गोवा आदिलशाही कडून सन १५१० ला जिंकले. ते जिंकण्यात त्याला तीमण्णा नावाच्या भारतीय सरदाराने मदत केली. म्हणजे छत्रपतींच्या जन्माच्या वेळी, भारतात पोर्तुगीज सत्ता शंभर वर्षांहून अधिक घट्ट झाली होती. गोवा जिंकल्याच्या काही वर्ष आधी पोर्तुगीजांना (पेद्रो काब्राल) सध्या ज्याला आपण ब्राझील म्हणतो तो प्रदेश सापडला होता आणि त्यांनी तो प्रदेश लगेच गिळायला सुरु केले. पण या कामात त्यांना बरीच वर्षे लागली. या दरम्यान पोर्तुगीजांनी, म्हणजे सन १५२० च्या दशकात इंडोनेशिया चा भाग पादाक्रांत केला. एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी - मुघली साम्राज्यासारखे लाखोंच्या संख्येने पोर्तुगीज कधीच नव्हते पण त्यांच्याकडे परकीय प्रदेश पादाक्रांत करून राज्य करण्याचे ज्ञान आणि अनुभव भरपूर होता. इबेरिया द्वीपकल्पातील हा छोटासा देश पण एकाच वेळेस पूर्वेला गोवा आणि मग इंडोनेशिया तर पश्चिमेला ब्राझील आणि इतर प्रदेश यांनी ढापले. केवढी दुर्दम्य इच्छाशक्ती, बळ, सागरी वाहतुकीचे ज्ञान आणि जिथे पोचू तिथे लोकांना मारून तिथली जमीन गिळायची क्रूर वृत्ती! त्यांनी भारताचा पूर्वी किनारा चांगलाच ताब्यात घेतला होता आणि कोकणातून आणि पूर्वी कर्नाटकातून बळजबरीने लोकांना ते घेऊन अरब देशात गुलामगिरीत विकत असत. तसेच सध्याचा ज्याला आपण अरेबियन समुद्र म्हणतो त्यातील भारतीय मसाल्यांचा व्यापारावर त्यांनी वर्चस्व स्थापन केले होते. छत्रपतींच्या काळात पोर्तुगीज राज्याला उतरती कळा होती. स्पॅनिश साम्राज्याने त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण छत्रपतींच्या उदयाच्या वेळी पोर्तुगीज उभरत्या मराठा शक्तीपुढे तरी नक्कीच बलाढ्य होते. 

जागतिक सत्ताधाऱ्यांचे सन १६३० चे चित्र बघितले तर स्पॅनिश, डच आणि फ्रेंच साम्राज्य भारतात फारसे पाय रोवू शकले नाहीं. स्पेन आणि पोर्तुगीजांमधे सन १४९४ ला तेंव्हाच्या पोप ने एक करार घडवून आणला. त्या कराराला "तोरदेसीलास चा करार" म्हणतात. त्यानुसार अटलांटिक समुद्राचा पश्चिम भाग स्पेनचा (जिंकलेला आणि न जिंकलेला) तर पूर्वेचा भाग पोर्तुगिजांचा. विचार करा, या दोन देशांनीआपापसात जग वाटून घेतले होते! पण या करारामुळे स्पेन कधी भारताकडे भटकले नाहीं. डच लोकांनी प्रयत्न केला होता पण केरळ मधील त्रावणकोर राज्याचे श्री मार्तंड वर्मा या राजाने त्यांचा इतका मोठा पराभव केला आणि डचांनी पाय काढता घेतला. पुढे मराठा साम्राज्याचे श्री कान्होजी आंग्रे यांनी सुद्धा डचांना हरवले. फ्रेंच साम्राज्याची चुरशीची लढाई इंग्रजांशी जगाच्या काना-कोपऱ्यात होती. ते सध्याच्या उत्तर अमेरिकेत लढले, युरोप मध्ये काढलेत आणि मग प्लासीच्या लढाईत, भारतात लढले. युरोप सोडून, सगळी कडे फ्रेंच इंग्रजांशी हारलेत. प्लासीच्या लढाई जिंकून इंग्रजांनी भारत जिंकले असे दर्शविल्या जाते. माझ्या मते ते बरोबर नाहीं. १७५९ साली कोणीहि वर्तवू शकले नसते कि इंग्रज भारतावर राज्य करतील. कारण मराठ्यांना हरवून बहुतांश भारत पादाक्रांत करायला त्यांना सन १८१८ उजाडला आणि त्यानंतर पंजाब जिंकायला १८३९ उजाडला. असो, तो विषय वेगळा. पण इंग्रजांशी भारतात हारल्यावर पॉण्डेचेरी सोडून फ्रेंच पुन्हा भारताकडे आले नाहीत. 

त्या काळातील अजून एक साम्राज्य म्हणजे ऑटोमन तुर्की मुसलमानी साम्राज्य पण त्यांना युरोप जिंकण्याची इतकी तहान होती कि त्यांना भारताकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तुर्की आरमार बलाढ्य होते पण सन १५७१ च्या लपांटोच्या लढाईत त्यांचा युरोपिअन सामूहिक सत्तांकडून सपाटून पराभव झाला आणि त्यानंतर तुर्की आरमाराने फारशी कधी मान वरती काढली नाहीं. 

आता राहिले इंग्रज. हेन्री ओक्सेंडेन हा सन १६७४ ला मुंबईच्या इंग्रजी वखारीत अधिकारी होतं. तो पुढे १६७७ ते १६८१ मुंबई वखारीचा मुख्याधिकारी पण झाला. (इंग्रजांनी नेहमीप्रमाणे त्या पदाला गव्हर्नर ऑफ बॉम्बे अशी पोकळ गर्जनास्पद नाव दिले होते!) हा ओक्सेंडेन शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडी उपस्थित होता आणि त्याने ईस्ट इंडिया कंपनी तरफे महाराजांना नजराणा दिला होतं. श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' शिवाजी महाराजांच्या चरित्रात राज्याभिषेकात या क्षणाचे फार सुंदर चित्र रेखाटले आहे. पण महाराजांच्या दृष्टीने इंग्रज किंव्हा ईस्ट इंडिया कंपनी किती महत्वाची होती? राज्याभिषेकाला नंतर  तब्बल दीडशे वर्षांनी इंग्रज भारतावर राज्य करू लागले. म्हणून आजच्या काळात या ओक्सेंडेनच्या राज्याभिषेक भेटीला आपण महत्व देतो. महाराज स्वतः इंग्रजांना नेमके जाणून होते पण त्यांच्या दृष्टीने इंग्रजांना फारसे महत्व नसणार. व्यापारी आणि धूर्त असे इंग्रज हि कल्पना महाराजांची असणार म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडून फायदा आणि व्यापार करून घेण्याचा सदैव प्रयत्न केला. इंग्रजांची महत्वाकांक्षा जरी फार मोठी असली तरी त्यांची परिस्थिती १७ व्या शतकाच्या भारतात फारशी ताकदीची नव्हती. येथे इंग्रज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. इंग्रज म्हणजे इंग्रजी राजसत्ता नव्हे. सन १६१३ ला मुघली जहांगीर ने ईस्ट इंडिया कंपनी ला सुरत बंदरावर 'फॅक्ट्री' टाकण्याची अनुमती दिली. पण व्यापारी धंद्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काही पाऊलखुणा भारतात पुढली दीडशे वर्ष नव्हत्या. पोर्तुगीज आणि स्पॅनिश सत्तांपुढे ब्रिटिश फारच चिल्लर होते. सन १७व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी सध्याच्या उत्तर अमेरिकेत - मॅसॅचूसेट्स राज्यात आपली 'कॉलोनी' स्थापन केली होती. आणि सध्याच्या वेस्ट इंडिज बेटांवर पण कॉलोनी स्थापन केली होती. पण तेवढेच. छत्रपतींच्या काळात किंव्हा शंभर वर्षे पुढे, अगदी सन १७७० ला सुद्धा कोणी वर्तविले असते कि इंग्रज भारतावर राज्य करतील तर त्याला वेड्यात काढले असते. इंग्रजांचे भारतावर राज्य जिंकले हे खरे पण तेवढेच आपण राज्य त्यांना दिले, हे पण तेवढेच खरे आहे. त्यांची महत्वाकांक्षा, त्यांची हुशारी आणि एका-मेकात लढायला लावून देण्याचा मुत्सद्दीपणा कौतुकास्पद आहे. आणि त्यांचे राज्य स्थापन होण्याची हि महत्वाची कारणे आहेत. पण तो विषय वेगळा आणि त्यावर नंतर नक्की लिहीन. 

या लेखा मागचा उद्देश म्हणजे छत्रपतींच्या काळातील इतर बलाढ्य साम्राज्यांचा थोडक्यात आढावा देणे होतं. मोघल काय किंव्हा पोर्तुगीज काय किंव्हा आदिलशाही काय, सगळ्यांकडे छत्रपती आणि मराठी स्वराज्याच्या तुलनेत अमाप पैसे, सैनिक आणि शस्त्रात्रं होती. तरी एक एक करून शिवाजी महाराजांनी धैर्याने, शौर्याने, मुत्सद्दीपणाने, दूरदृष्टीने, चपळाईने आणि लागेल तिथे संयमाने, या सगळ्यांवर मात केली. त्यांचा इतक्या बलाढ्य आणि क्रूर साम्राज्यांना लढा लक्षात घेतला तर त्यांचे कर्तृत्व अजूनच झळाळते, लखलखते. 

हा लेख लिहितांना छत्रपती आणि इतर परराज्य सत्तां मधील एक महत्वाची भिन्नता लक्षात आली. आजकाल पुरोगामी किंव्हा सेकुलर जमातीत एक नवीन विचारप्रणाली दिसते. छत्रपतींचे हि लोक आता कौतुक करतात पण या जमातीचे म्हणणे असे कि मराठी स्वराज्य किंव्हा छत्रपती किंव्हा पुढे पेशवे हे भारतातील इतर राज्यकर्त्यासारखेच होते. थोडक्यात मुघल किंवा आदिलशाही आणि मराठ्यांमध्ये फारसे अंतर नाहीं. यासारखे थोतांड ऐकले कि कानशिले तापतात. विचारांचा नालायकपणा या सेकुलर जमातींकडून शिका! सूर्याजी पिसाळच्या औलादी आहेत हे लोक. 


महाराजांनी 'हे राज्य श्रींचे' म्हणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या राज्यस्थापनेमागे परराष्ट्रांची, परकीय किंव्हा परधर्मीयांची कत्तल करणे, लूट करणे, विध्वंस करणे हे कधीच नव्हते. भारतात हिंदूंवरचे अत्याचार थांबावे, त्यासाठी रक्तपिपासू परकीय मुसलमानी सत्तांना हरविणे आणि हिंदूंचे राज्य स्थापन करावे हि त्यांची मनीषा होती. हे वैयक्तिक भरभराटीची स्वप्न नव्हते तर देश, समाज आणि धर्म यांचे संरक्षण, संगोपन आणि उत्कर्षाचा लढा होता.

"In art books and history books, people write of the Muslims "arriving"in India, as though the Muslims came on a tourist bus and went away again. The Muslim view of their conquest of India is a truer one. They speak of the triumph of the faith, the destruction of idols and temples, the loot, the carting away of the local people as slaves, so cheap and numerous that they were being sold for a few rupees. The architectural evidence-the absence of Hindu monuments in the north-is convincing enough. This conquest was unlike any other that had gone before. There are no Hindu records of this period. Defeated people never write their history. The victors write the history. The victors were Muslims. For people on the other side it is a period of darkness. "  - V.S. Naipual


 

छत्रपती जर का दिल्लीधीश झाले असते तर त्यांनी मशिदी किंव्हा चर्चेस तोडल्या नसत्या. मुसलमानांवर इस्लाम अनुयायी म्हणून कर लादला नसता, मुसलमानी बायका किंव्हा ख्रिश्चन ब्याक  पळविल्या नसत्या आणि त्यांची पोरे गुलामगिरीत विकली नसती. मुसलमानांची किंव्हा ख्रिश्चनांची लाखोंनी हत्या केली नसती. किंबहुना, दिल्लधीश नसूनही त्यांनी किंव्हा मराठ्यांनी हि असली कामे केले नाहीत. मुघल असो, ब्रिटिश असो, पोर्तुगीज असो, डच असो किंव्हा फ्रेंच असो, हि सगळी राज्य आणि राज्यकर्ते  रक्तपिपासू, स्वार्थांधळी, आत्यंतिक उपभोगी, क्रूर आणि विध्वंसक होती. भारत देश त्यांच्यासाठी परका होता, भारत देश जिंकून लुटायला होता. भारतीय, आणि हिंदू, त्यांच्यासाठी लुटायला, मारायला आणि गुलाम करायला होते. आपली धर्मस्थळे विध्वंस करायला होती. आणि याचे व्रण अजूनही आपल्याला सगळीकडे दिसतात. 

अलीकडेच मुघल आपलेच आहेत अशी वदंता उठविली जाते आहे. कारण म्हणे ते भारत सोडून निघून नाहीं गेलेत. इथेच राहिलेत. आणि राहून काय केले? एक उदाहरण देतो. सेतू माधवराव पगडी यांच्या मराठा इतिहास पुस्तकातील आहे. बहुधा सन १६९० चे दशक असेल. औरंग्याच्या कुटुंबातील काही कुटुंबीय महाराष्ट्रात प्रवास करतांना मराठ्यांनी हल्ला केला. निकाराचे युद्ध सुरु झाले. मराठे वरचढ ठरत होते. मुघली तुकडीला पळायला हि वाट मिळेना. तेंव्हा त्या कुटुंबियांमधली एक बेगम प्रोत्साहनार्थ ओरडू लागली कि "आपण चंगेझ चे वंशज आहोत आणि काफ़िरांशी हारु शकत नाहीं" त्याचा काय परिणाम झाला त्यांचा चंगेझच जाणे पण त्यांना पळायला वाट मिळाली. सगळी सामुग्री मराठयांच्या हाती लागली. यातला चंगेझ म्हणजे चेंगीझ खान. पहिला मुघल हुमायून स्वतःला चंगेझ खानचा वंशज म्हणवीत. या मुघलांना स्वतः कधी आपण भारतीय आहोत वाटले नाहीं पण आत्ताच्या पुरोगामी थोतांडवाडी मात्र त्यांना आपले बाप बनवायला तयार आहेत. 

आपले राजे असे नव्हते, आपले मराठे असे नव्हते, आपले पेशवे असे नव्हते, आपले होळकर, शिंदे, भोसले असे नव्हते. याचा आपण सार्थ अभिमान बाळगायलाच हवा. 

10/8/25

झाकली मूठ सव्वा लाखाची

 


खाडकन केतनच्या थोबाडीत पडली. त्याचे कान सुन्न झालेत. खरंतर केतनने कोचने शिकविल्या प्रमाणे बॉक्सिंग ची नीट पोज घेतली होती. डावा पाय थोडा पुढे आणि उजवा पाय थोडा मागे. आणि डावी मूठ वळून पुढे आणि उजव्या हाताने मूठ वळून कान-गाल-डोळा झाकला होता. निदान त्याला वाटले कि त्याने चेहेऱ्याचा उजवा भाग नीट झाकला होता. उजवा खांदा थोडा वर करून त्याने चेहरा खालती केला होता. पूर्ण लक्ष देऊन तो समोरच्या कडे बघत होता. 

केतन बॉक्सिंग चे क्लासेस नुकतेच घ्यायला लागला होता पण त्याने प्रगती झपाटयाने केली होती. मुळात त्याची उंची चांगली होती आणि नियमित व्यायाम केल्या मुळे त्याच्यात ताकद चांगली होती. 

निदान त्याला असे वाटत होते. 

"सर, आप को मारना कैसे है, ये मैं सिखा सकता हुं. पर, मार खाना एक अलग बात है. ये तो सिखाया नहीं जा सकता." कलीम सर, केतन चे बॉक्सिंग कोच जणू त्याच्या कानात बोलत होते. 

"आय-टी कंपनी मी काम करने वाला आदमी हुं, लडाई-झगडे का मौका कभी नही मिलेगा" 

"तय्यारी होना सहाब" 

केतनला वाटलं तेवढा त्याचा उजवा चेहरा झाकल्या गेला नव्हता. त्याला कानाजवळ गरम काही तरी ओघळतंय असे वाटले.

" हा बघ, चॊमु, बॉक्सिंग करणार आहे माझ्याशी. बांडगुळा सारखा काही तरी पोज घेऊन उभा आहे." समोरचा खिदळत त्याच्या मित्राला म्हणाला. 

'मी बांडगुळासारखा उभा आहे?' केतनला प्रश्न पडला. बांडगुळ म्हणजे परजीवी वनस्पती. बांडगुळासारखा कसा कोणी उभं राहू शकत?" केतन विचार करू लागला. पण विचार करणें जरी चांगली सवय असली तरी नको त्या ठिकाणी विचार करणे तोट्याचे ठरू शकते. 

या भानगडीतच तो समोरचा अचानक पुढे आला आणि त्याच्या डाव्या हाताच्या सणसणीत झापडेने केतनच्या गालाची हिंसक पापी घेतली. केतन जागचा हलला. पण त्याच्यात तेवढीही कमी ताकद नव्हती. त्याने तोल सांभाळला आणि तो दोन-तीन पावला मागे गेला. 

"अगर मारने का मौका ना भी मिले तो भी चलेगा पर. पर आपने  मार खाना नहीं है. डिफेन्स फर्स्ट!" केतनच्या डोक्यात कलीम सर पुन्हा बोलू लागले. जणू ते तिथे त्याच्या बाजूलाच उभे आहेत. त्याने विचार केला डोक्यात असण्यापेक्षा कलीम सर प्रत्येक्षात तिथे उभे असते तर जास्त फायद्याचा असत. 

" मैं आप को बॉक्सिंग रिंग का बॉक्सिंग सिखा रहा हूँ. पर रास्ते पे झगडा होता है तो डिफेन्स फर्स्ट के भी पाहिले आप भागने का सोचो. रास्तो पे झगडा करने में किसी का भला नहीं होता. और झगड के क्या हि मिलेगा?" 

"सर, आप भी मजाक करते हो. मुसीबत बता के थोडी ना आती है. और गलत जगह फस गया फिर हात-पैर तो घुमाने हि होंगे." कलीम सर पुढे काही बोलले नाहीं. 

चुकीच्या जागी केतन नक्कीच फसला होता. डोंगर चढायला म्हणून तो बायको पोरा सोबत निघाला. त्या साठी मुद्दाम प्रवास करून त्या गावात आदल्या रात्री पोचला. सकाळचे अवरोहण छान झाले. उतरतांना निमुळत्या वाटेबाजूला दोन लोक दारू पीत बसले होते. त्यांनी काही ओंगळवाण्या टिप्पण्या केल्यात. केतन त्यावर त्यांना काहीतरी म्हणाला आणि आता तो बॉक्सिंग ची डिफेन्सिव्ह पोज घेऊन उभा ठाकला होता. त्याच्या उजव्या कानातून रक्त येत होते. 

समोरचा पुन्हा सरसावला आणि त्याने या वेळेस त्याचा उजवा हात सपाट्याने फिरवला. पण केतन ने त्याचा पंच बरोबर ओळखला आणि घुडघे थोडे वाकून, डोकं बरोबरअसे मागे केले कि त्या माणसाचा हात वेगाने त्याच्या धरधरीत नाकापासून काही इंचावरून निघून गेला. 




पण या संधीचा फायदा घेत केतन ने डिफेन्सिव्ह पोसिशन, ऑफेन्सिव्ह मधे बदलली. आणि डाव्या हाताने वळलेली मूठ समोरच्याच्या हनुवटीवर खाडकन बसवली. 

'अप्पर-कट!' कलीम सरांचा आवाज पुन्हा कानात फिरला. 

समोरचा पुन्हा केतन च्या अंगावर आला. केतन ने त्याला हुलकावणी दिली आणि विरुद्ध बाजूने पुन्हा त्याच्यासमोर उभा झाला. 

केतन ने मगाशी मारलेला उप्पर-कट आता त्याला बोटांना आणि बोटांच्या सांध्यांना जाणवायला लागला होता. आत्ता पर्यंत बॉक्सिंगच्या क्लासला त्याने बँडेज आणि ग्लोव्हस घालूनच पंचिंग केले होते. इथे आयुष्यात पहिल्यांदा त्याने कोणाला पंच मारला आणि ते पण उघड्या मुठीने! त्याने पंच अगदी पुस्तकी मारला होता. कारण समोरच्याच्या तोंडातून रक्त यायला लागले होते आणि केतनची मूठ दुखत असली तरी तो अजून मूठ वळू शकत होता. केतनचा आत्मविश्वास थोडा वाढला. 
या मारा-पिटीत एक चांगली गोष्ट म्हणजे, दुसरा दारुडा फारच हलका-फुलका होता. बहुधा तो एका पायाने अधू होता. खिदळण्या पलीकडे तो फारसा काही लायक नव्हता. केतनच्या समोरच्याच्या तोंडातून रक्त येतांना बघून दुसऱ्याचे खिदळणे मात्र आता बंद झाले होते. 
"तू पोराला घेऊन पळ इथून. मी बघतो काय करायचं ते." केतन बायकोला म्हणाला.
"तुला एकटं सोडून मी इथून निघत नाहीं या. जे काही आहे मिळूनच करू या" केतनची बायको त्याला म्हणाली. ती घाबरली होती पण तिने हिम्मत हारली नव्हती. तिनी जवळचा एक गरगरीत गोटा उचलून त्या अधू-दुसऱ्याला फेकून मारला. त्याच्या मांडीला का कमरेला तो सपाटून बसला. 
"आई ग...लागलं रे" असा काहीस म्हणत तो मागे सरकला. 
" बायकोला समोर कर तू. कारण तू मारलेला पंच मला पापी दिल्या सारखा वाटला" तोंडातून येणारे रक्त थुंकून केतनच्या समोरचा बरळला. 
" साब, सामने वाला कुछ भी बोले आपने ऊसपे ध्यान नही देना है. बोलने दो सामने वाले को. बॉक्सिंग में ताकद  बचा के रखना है. और जब जरुरत पडे तभी इस्तेमाल करना है.   
केतनच्या कानात पुन्हा कोचिंग सुरु झाले. 
तेवढ्यात केतनच्या बायकोने अजून एक गरगरीत गोटा केतनच्या समोरच्यावर पूर्ण ताकदीने फेकला. त्याला तो खांदा आणि मानेच्या सांध्यावर सपाटून बसला. 
"आई ग....." तो केकाटाला. आता त्याला कळेना नेमके काय करायचे. तो खांदा दाबून मागे झाला आणि त्याने केतनच्या बायकोवर नजर रोखली. 
" आता तरी पळतेस का?" पण केतनच्या बायकोच लक्ष नव्हते. ती आणि आणि केतनच्या १० वर्षाचा पोरगा दगड शोधत होते.
"अरे टोण्या, काही कर! काही नाहीं तर त्या बाई ला आवर" केतनच्या समोरचा अधू-दुसऱ्यावर खेकसला. 
"दगड मारते कि हि बया! सगळी उतरून गेली. पैसे वाया!" असे म्हणत लंगडत तो दुसरा तिथून खसकला.
केतनच्या समोरच्याचा खांदा-मान चांगलीच ठणकत असणार. त्याने केतनच्या बायकोच्या दिशेने मुसंडी मारली. केतन त्याच्या समोर आला आणि त्याच्या छातीला मिठी मारली आणि त्याची कंबर पकडून त्याला मागे रेटू लागला. समोरचा केतन ला पुढे रेटत होता. 

"बॉक्सिंग में साब, सामने वाले का ताकद जलना है. आदमी को मार के कमजोर कर सकते है या थकवा के. जैसे हि आदमी थका, उसका बॅलन्स गया"

केतन पाय रेटून पूर्ण ताकद लावून त्याला ढकलले आणि मग त्याला मारलेली मिठी सोडून एकदम बाजूला झाला. केतनच्या समोरचा तोल जाऊन भेलकांडत दाणकन जमिनीवर आदळला. 
केतन त्याच्या अंगावर बसला आणि दनादन त्याच्या डोक्यावर कानावर, जिथे मिळेल तिथे पंचेस मारू लागला. केतनची बायको जवळ आली आणि ती तिच्या ट्रेकिंगच्या बूटाने केतनच्या समोरच्याची बोटे चेंदु लागली. आता समोरच्याची पूर्ण वाट होती. पण तरी त्याने उजव्या हाताने अंगावर बसलेल्या केतनच्या उजव्या कानशिलावर सपाटून झापड मारली. 

केतन पुन्हा सुन्न झाला. आता त्याच्या उजव्या कानातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात केतनच्या बायको केतनच्या समोरच्याच्या उजव्या हाताची बोटे चेंदु लागली. केतनच्या समोरचा आता वेदनेने जोरात ओरडू लागला.          
केतन त्याच्या अंगावरून उठला आणि काही पावले मागे गेला. समोरचा लगेच उठला. केतनला ते अपेक्षित नव्हते. केतनची बायको काही फूट त्याच्या मागे उभी होती. 

"तू तुझ्या मार्गाने जा आणि आम्हाला आमच्याने जाऊ दे" केतन त्याला म्हणाला. 

हळूच केतनच्या बायकोने एक चपटा दगड केतनला दिला आणि ती अजून थोडा अंतर मागे गेली. केतन आणि ती दोघे बघत होते कि समोरचा आता काय करतो. त्याच्या शर्टावर रक्त सांडत होते. तो कातावला होता. अश्या मनस्थिती एकतर दारू उतरून माणूस ताळ्यावर येतो किंव्हा डोक्यात राख घालून टोकाला जातो. समोरच्याने टोकाला जायचे ठरवले होते. काही कमी असेल तर त्याने आज बाई कडून मार खाल्ला होता. 

"साब, बॉक्सिंग रिंग मी ठीक है. रूल्स है, रेफ़री है.   बाहर मारा-पिटी करनी है तो बचाव और फिर बचना सबसे मेन है. अगर खुदा-ना-खास्ता ऐसी नौबत आती है तो जो हात लगे वो सोना. पीटो और फिर भागो" 

समोरच्याने तोंडाचे रक्त पुसले आणि हेलकावे घेत पुन्हा केतन वर धाव घेतली. केतन ने चपटा दगड घट्ट मुठीत दाबला. समोरचा जवळ येताच, केतन पुन्हा गुढघ्यात वाकला आणि पूर्ण ताकदीने हुक पंच मारला. पंचच्या शेवटच्या क्षणाला त्याने मूठ उघडली आणि त्या दगडाने अक्षरश: गालाचे हाड फोडले. समोरचा पुन्हा कोलमडून पडला. दुःखाने त्याला नीटसं रडता पण येईना. पण रडू येऊन त्याचा जबडा अजून दुखत होता. स्वतःला रेटत तो केतन पासून अजून दूर गेला. केतनच्या बायकोच्या हातातला दगड त्याला दिसला असावा. 


"चल, चल, निघ." केतन बायकोला म्हणाला. तिने पोराची बकोट धरली आणि सगळे तिथून पळाले. 
"चांगले पंचेस मारलेस आणि ते पण दोनदा मार खाऊन. ट्रैनिंग कामात येतंय." केतनची बायको धावता धावता केतन ला म्हणाली. 
"तुला तर ट्रैनिंग ची पण गरज नाहीं. वाघीण आहेस तू आतून" केतन म्हणाला. 
ते ऐकून बायकोच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित-हास्य होते. 
--