9/23/09

जगाच्या पाठीवर

लोकांकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा माझ मन एक वेगळाच खेळ खेळत असत. हा जो मनुष्य माझ्या समोर उभा आहे तो या स्थितीत कसा पोचला. समोर भिकारी असेल तर तो भिकारी कसा झाला? त्याचे आई-बाबा पण भिकारीच होते का? त्याच लहान पण कस गेल असेल? भिक मागण्यातच का? तो लहान असतांना समाज स्थिती कशी होती? समोर चांगल्या पोषाखात कोणी उभा असेल तर त्याने तरूणपणात कुठले निर्णय घेतले असतील? की तो श्रीमंत घरात जन्मला होता आणि आयुष्यभर एक काडी इकडची तिकडे न करता तो ऐष करत जगला? अर्थात मी प्रत्येकाला जाऊन "तुम यहां पर कैसे पोहोचे?" अस विचारत नाही. तसं करण थोड विनोदीच ठरेल पण अश्या दृष्टीने बघायला लागल की जग वेगळ्याच रंगात दिसायला लागत. माझ्या आजोबांच बालपण १९१० च्या दशकात गेल. तेंव्हा वीज नव्हती, विमान नव्हती आणि इंटरनेटही नव्हत. पण त्यांच्या मृत्युच्या आधी त्यांनी सगळं बघितल. त्यांच्या लहानपणी लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याच नेतृत्व करत होते तर ते जायच्या वेळी कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याची वैयक्तीक मालमत्ता झालेल होत. त्यांच्या लहानपणी जात-पात मानल्या जात असे तर त्यांच्या हयातीत दलित व्यक्ती भारताचा राष्ट्रपती झालेला होता. वैयक्तीक तसच सामजिक पटलावर एवढा प्रचंड बदल घडलेला होता की जर का त्या पिढीला बोलत केल तर इतिहासाच एक आगळ-वेगळ दालन उघडेल.

सामाजिक बदलांना आपण सध्या बाजुला ठेउया. तो वेगळा विषय ठरेल. वैयक्तिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक व्यक्ति स्वतःतच एक कथा असते. काही कथा रोमांचक असतात तर काही भीषण असतात. काही अगदीच सपक असतात तर काही स्फुर्तीदायक असतात. पण या कथाच जगाला रंग देतात. जगात करोडो लोक निवास करतात. मला नेहमी वाटत की कृष्णाने विश्वरूप म्हणजे नेमक हेच दाखवल आणि अर्जुनासारखा पुरुष ते बघुन घाबरला. आपण सामान्य जन हे भीषण रूप बघण्याच्या लायकीचे नसतो आणि अनभिज्ञपणे आपल आयुष्य कंठत असतो. जगाच सोडा, आपल्या आजु-बाजुला, ओळखीचे आणि नुसते तोंड देखले ओळख असलेल्यां पैकी किती लोकांबद्दल आपल्याला माहिती असते. काही यशस्वी असतात आणि अपयशी. पण कुठलाच व्यक्ती अपयशाची अपेक्षा ठेवत नाही. आणि प्रत्येकातच यशस्वी होण्याची कुवत नसते. म्हणुनच व्यक्तीमत्वे प्राप्त आकार घेतात. प्राप्त परिस्थितीत आणि घेतलेल्या निर्णयांच्या परिणामांच्या चौकडीत प्रत्येक मनुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. मूळ स्वभाव बदलत नाही हे जरी मान्य तरी मनुष्य स्वभावाच्या ज्या विविध छटा दिसतात त्यात सोबतीच्या लोकांचे पडसाद आणि आजुबाजुच्या जगाची छायेतच वावरतो.मनुष्य घडविण्यात इतक्या सार्‍या घटना सामिल असतात की त्या व्यक्तिला सुध्दा बर्‍याचश्या गोष्टींची कल्पना नसते. पण लोकांना बोलत केल तर त्यांच्या आयुष्याचीच नव्हे तर त्यांच्या आजु-बाजुच्या परिस्थितीचे चित्र स्पष्ट होत.

आपण आपल्यातच इतके गुंग असतो की जगाला आपण एका विशिष्ट चौकडीत बांधुन टाकतो. ज्या आकलनी पडतात त्यांना आपण स्वतःला मध्यबिंदु ठरवुन विभाजित करतो. हा व्यक्ती माझ्या पेक्षा हुशार आहे त्यामुळे त्याच यशस्वी होण सहाजिकच आहे. तो जर का अपयशी ठरला तर आपण हसतो. या व्यक्ती पेक्षा आपण हुशारच होतो त्यामुळे आपल यशस्वी ठरण सहाजिकच आहे आणि जर का तो यशस्वी ठरला तर नशिब साल्याच! ज्या गोष्टी आकलनाच्या पलिकडे असतात त्याचा आपण विचारच करत नाहीयात यशापयाशाच्या व्याख्या सुध्दा स्वतःला माप-दंड ठरवुन आपण आखतो. या सगळ्या खेळात मी महत्त्वाचा. शिवा-शिविच्या खेळात मीच दाम देणार आणि मीच पळणार. गमतीदारच प्रकार आहे थोडा पण सगळेच खेळत असतात म्हणुन कोणी कोणाला विचारत नाही.

आपण समाजात राहुन, स्वतःला सामाजिक प्राणी म्हणवतो आणि आयुष्यभर समाज विन्मुख जगतो.

यावर उपाय काय मलाही माहिती नाही. जागतिकीकरणाच्या अर्थशास्त्रानुसार आज जग एकामेकांवर अधिकाधिक अवलंबुन रहाणार आहोत. थोडक्यात आपल्याला एकामेकांच्या आयुष्यात डोकावुन बघावच लागणार. पण प्रत्यक्षात परिस्थिती विपरितच आहे. बारकाईने बघितलत तर आपण एकामेकांपेक्षा अजुन दूर जातो आहोत हेच ध्यानात येत. खरतर आजच्या काळात प्रसारण माध्यमांचा इतका सुळसुळाट झाला आहे की जगाच्या कानाकोपर्‍यातल्या प्रत्येक लहान्-मोठ्या घटनेला जगभर प्रक्षेपित केल्या जात. जग लहान होण्याचे परिणाम मात्र विपरीतच होतो आहे. पराकोटीला गेलेली प्रत्येक वस्तु धुळीसच मिळते त्या प्रमाणे अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्याचे परिणाम, माहिती मुळीच उपलब्ध नसण्यासारखेच आहे. जगात असलेल्या पीडांचा, ज्यांच्यावर गुजरत नसते त्यांना मुळीसुध्दा फरक पडत नाही, किंवा ती लोक मुळीच फरक पडुन घेत नाहीत. यात प्रसार माध्यमांची सुध्दा बरीच चूक आहे. उपलब्ध बातम्यांतुन जणु ही माणुसकीच गाळुन टाकतात आणि रहाते फक्त बातमी. इतके-इतके मेलेत, मग ते वाहुन गेलेत काय किंवा बंदुकीनी कोणी मारलेत काय किंवा सगळ्यांनी आत्महत्या केली काय, एकच आहे.सगळ्यांनी उठुन बाबा आमटे बनाव अस माझ म्हणण मुळीच नाही पण जगाकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातुन थोडं मायेने बघितलआणि संवाद साधला तरी पुरेसे आहे.

1 comment:

प्रशांत said...

>>सगळ्यांनी उठुन बाबा आमटे बनाव अस माझ म्हणण मुळीच नाही पण जगाकडे माणुसकीच्या दृष्टीकोणातुन थोडं मायेने बघितलआणि संवाद साधला तरी पुरेसे आहे. <<

सहमत