4/13/09

चांदोरकर सर- भाग २

सरांचे लेंढ्रा पार्काजवळ मोठ्ठ घर होत. त्यांनी नुकतच ते बिल्डर ला विकुन फ्लॅटस बांधुन घेतले होते. त्या इमारतीतच त्यांचा मोठ्ठा फ्लॅट होता. त्यांच्या कडे येणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते शिकवणी वर्गात प्रवेश देत असत. त्यामुळे बंड मुले बरीच येत असत.आता बंडपणा सगळीच मुलं करतात (काही शंख अभ्यासु मुळे वगळता!) पण मस्ती करण्यातही बरेच रंग असतात. आणि त्यातला सगळ्यात शेवटचा गडद काळा रंग म्हणजे वाया जाण्याची मुख्य चिन्हे असत. असली नालायक मुलेही त्यांच्या वर्गात असत. त्यामुळे शांतपणे वर्ग चालला आहे आणि सरांनी शिकविलेलं सगळ्यांना समजतय अस नेहमीच होत नसे. एकतर सर स्वतःच सतत विनोद करायचे. त्यामुळे मुले ही सारखी मस्ती करायची. बहुधा म्हणुनच "हुशार" मुलांनी सरांच्या शिकवणी लावणे बंद केले. आणि मेरिट येण्यार्‍या लोकांची संख्या कमी झाल्यावर सरांना शिकविता येत नाही अशी समजुन नविन पालकांनी करुन घेतली. सरांना हे कळत नव्हत अस नाही पण यावर उपाय काय हे सुचत नसाव. त्यांची खिन्नता मधुन मधुन डोकावत असे. जुन्या नावाजलेल्या विद्यार्थ्यांचा ते सारखा उल्लेख करत असत पण कधी कधी मुलांच्या मस्तीनी ते कावुन जात असत. मग ते खालच्या आवाजात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना सांगत की 'श्रीकृष्ण मराठे कधीच अशी मस्ती करत नसे. नेहमी प्रश्न विचारित असे. हुशार होता पण अभ्यासही खुप केला त्याने. म्हणुनच इतक्या वरचा मेरिट आला'.

श्रीकृष्ण मराठे आमच्या शाळेतुन बहुधा पहिल्या दहा मधे मेरिट होता. शाळेच्या वाचनालयात त्याच नाव लावल होत. तो माझ्याहुन ३-४ वर्ष मोठा असावा.

आमच्या वर्षी सरांच्या शिकवणितुन कोणी मेरीट आल नाही. 'पहिला मेरिट' तर मेरिट लिस्ट च्या आस-पास हि भटकला नाही. मला गणितात अपेक्षेप्रमाणे टक्केवारी मिळाली. मला डि ग्रुप ची गणित सोडविता आली याचा मला खुप आनंद झाला. गणिता बद्दलची भिति सरांनी काढुन टाकली. (१२ वीच्या शिकवण्यांनी ती भीती परत मनात कायमची बसली!) सरांच्या पुढल्या वर्षीच्या शिकवण्या व्यवस्थित सुरु होत्या. तेच विनोद पण हशे मात्र नविन पिकत होते. मी अधेमधे सरांकडे डोकावत असे. दसर्‍याला हमखास मी सोनं द्यायला जात असे. खुपदा संध्याकाळी सर फाटकात उभे असायचे. सरांच्या हातात कला छान होती. पेंटिंग तसंच कागदाच्या किंवा लाकडाच्या कलाकृती ते फार छान करत असत. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे ते क्लासच्या जागेत छोटस प्रदर्शन लावित असे. त्यांना त्यांच्या कलाकृतींचा फार अभिमान होता. शिकविण्याच्या तापातुन निघण्याचा तो त्यांचा मार्ग असेल. मला आणि पराग ला नेहमी ते म्हणत असत कि "एवढे गोरे-गोमटे आहात थोड्या कलाकृती विकुन द्या" मग आम्ही म्हणायचो की "सर, कमिशन किती देणार?".

आम्हीही वाह्यातच पोरं होतो!


सरांची तब्येत तेवढी धड-धाकट नव्हती. आमच्या वर्षी आम्हाला त्यांच्या तब्येती मुळे एक-दोन आठवडे सुट्टी मिळाली होती. ते बरेचदा 'आज मुळीचबरं वाटत नाही या' अस म्हणत असत. त्यांच्या इतर विनोदांपैकी हा पण एक विनोद होता की ते खरच म्हणत असत हे कळायला मार्ग नव्हता. तेंव्हा सरांच्या गणितोत्तर प्रत्येक वाक्याला आम्ही हसत असु. मी दहावी झाल्या नंतर दोन वर्षाच्या आत सर वारलेत. मला उशीरा कळल. रामदास पेठेच्या टवाळखोर मित्रांशी भेटी कमी होत असत आणि तरूण भारताने नेहमीच्या नियमाने निधनाची बातमी छापायला दोन दिवस घेतलेत. अंत्ययात्रेला जाता आल नाही याच मला फार वाईट वाटल. मनात उगाचच अपराधी भाव येत होता. सरांना तुम्ही खुप छान शिकविता अस एकदा तरी म्हणायच होत.

मी आणि पराग नंतर त्यांच्या घरी दिव्याला नमस्कार करायला गेलो होतो. घराच्या फाटकात "का, रे, पार्कात कोणा-कोणासोबत दिसतोस तू! चांगल्या पार्कात घेउन जाव "कोणा-कोणाला" लेंढ्रा पार्कात काय?" अस म्हणायला सर नव्हते. सर नसल्याची जाणीव पहिल्यांदा तिथे झाली.

बाहेरच्या खोलीत दिवा तेवत होता. त्यांच्या पत्नी बसल्या होत्या. "सर, नेहमी साठी गेलेत" अस त्या कसतरी म्हणाल्यात. त्यांना हुंदका आवरत नव्हता. आमच्याकडेही फारस बोलायला काय असणार. नमस्कार करून आम्ही परतलो. आमचा जेमतेम सहवास एक वर्ष तरी आम्हाला एवढ वाईट वाटत होत. सरांच्या कुटुंबियांवर काय बितत होती ते न कळलेलच बर.

सर नेहमी वर्गात म्हणत कि मला शिकवितांच मरण याव. गणिताचा थिओरम शिकवुन, कोरोलरी शिकवायच्या आत इथेच खडुने माखलेल्या फरशीवर धाडकन कोसळुन जाव. मरतांना गंगेच्या पाण्या ऐवजी तोंडात थोडा खडुचा चुरा टाका अस ते म्हणत असत.

"का रे पहिला मेरीट करशील एवढ माझ्या साठी?"

"हो सर"

"कसला नालायक आहे हा पोरगा. माझ्या मरायची वाट बघतोय. फी आण उरलेली आधी. माझ्या तोंडात खडु टाकायला एका पायावर तयार आहे"

वर्गात परत हशा पिकत असे.

तसल काही झाल नाही आणि सर सर्व मान्य मार्गाने हॉस्पिटल मधे गेलेत. पण त्या आठवणींनी अजुनही हसु येत. आणि सरांनी शिकविण्यावर किती निरातिशय प्रेम केल हे बघुन नवल वाटत. आजकालच्या निव्वळ पैश्यासाठी शिकविणार्‍यांच्या गर्दीत शिकविण्याच्या प्रेमापोटी शिकविणार्‍या पैकी ते बहुधा शेवटलेच होते.

(समाप्त)

3 comments:

Amit Rahalkar said...

Chhan lihila aahe

शब्दबंध said...

नमस्कार.
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी http://marathi-e-sabha.blogspot.com/ येथील नवीनतम पोस्ट वाचा.
सहभागी होण्यासाठी ३० एप्रिल २००९ पूर्वी shabdabandha@gmail.com येथे ईमेलद्वारे संपर्क करावा.
धन्यवाद.

Anonymous said...

नमस्कार.
"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. सहभागासाठी shabdabandha@gmail.com येथे ३० एप्रिल २००९ पर्यंत संपर्क करावा. अधिक माहितीसाठी वाचा http://marathi-e-sabha.blogspot.com/2009/02/blog-post.html