7/4/08

देशभक्ति

माझ्या मायभूमीबद्दल लिहायला शब्द शोधु लागलो
मनाच्या काना-कोपर्‍यात तुडुंब भरलेल्या भावनांमधे नाहु लागलो॥१॥

पण या भावनांच्या सूरांना शब्दांची कोंदणे सापडेना
शब्द पारख्या या भावनांचे कोड मला उमगेना॥२॥

मनात आले देशभक्तिचे बोल हे मोठ्यांचे कार्य असावे
त्यांच्या कल्पनाशक्तीची भव्यता कळाली तरी आम्ही धन्य व्हावे॥३॥

मग वाटे देशप्रेम हि केवळ थोरा-मोठ्यांची संपत्ती नव्हे
या हृदयात तेवत असलेल्या देशभक्तीची किंमत कशाहुन कमी नव्हे॥४॥

मान्य माझ्या देशभक्तिच्या बगीच्यातनसतील कल्पनांचे ताटवे
नसतील मंजुळ गाणी किंवा नसतील शब्दसंपन्न वृक्षे॥५॥

मग आम्हा सामान्यांनी आमची देशभक्ति सिध्द कशी करावी
काय केलतं देशाबद्दल विचारले तर काय उत्तर द्यावी?॥६॥

घातली गांधी टोपी चढवले पुतळ्यांना हार आणि काढले मोर्चे सगळीकडे
राजकारण्यांनी मांडलेल्या देशभक्तिचा हा बाजार शिसारी येण्यापलिकडे॥७॥

वाढता भ्रष्टाचार वाढती महागाई वाढती आपापसातील भांडणे
घसरती माणुसकी घसरत्या नीती-मत्ता घसरती समाजाची माप-दंडे॥८॥

या व्याधीग्रस्त समाजाच्या पीडा आकलना पलिकडे
यावर उपाय शोधण्यापुढे जगाला प्रकाश देण्याचे काम उपरे॥९॥

म्हणुन काय या पणतीने तेवू नये काय?
देश धर्माची आण वाहुन जमेल तितका प्रकाश पसरवु नये काय?॥१०॥

सांगतो तुम्हांस हार-तुरे निवडणुकीं पलिकडे खरी देशभक्ती
संघटीत होउन समाज कंटकांवर मात करणे यातच खरी कीर्ती॥११॥

दीन-पिडितांची सेवा करणे हाच खरा धर्म
मायभूमीचे ऋण फेडण्याची भीष्म-प्रतिज्ञा हेच अंतिम कर्म॥१२॥

No comments: