6/28/08

तो मी नव्हेच!

टिप-: हा लेख लिहायला मी मार्च महिन्यातच सुरुवात केली होती. पण परीक्षेच्या भानगडीत लेख पूर्ण करायला जून महिन्याचा शेवट उजाडला. या दरम्यान माझ्या संकेतस्थळावर येणार्‍या वाचकांची संख्या सहा हजाराच्या घरात पोचली. वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी त्यांचा मनापासुन आभारी आहे. वेळ काढुन आपण या संकेतस्थळावर येता आणि मी लिहिलेले शब्द वाचता यातच सगळं पावत. मी देशापासुन बरीच वर्ष झाली दूर रहातो आहे. या लेखनाद्वारे आणि मिळणार्‍या प्रतिसादामुळे मला ते अंतर कमी जाणवत. या आनंदाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे.

माझ्या ब्लॉगवर उजवीकडे 'स्टॅट काउंटर' नावाचे वाचकांच्या संख्येची नोंद करणारे यंत्र आहे. त्याचा फारसा काही उपयोग नाही पण उगाचच फुशारकी मारायला हे यंत्र सोयीचं आहे. "माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत २ हज्जार लोक येउन गेलेत" असं म्हटल की कॉलर वर करायला बरं पडत एवढच. दोन आठवड्यापुर्वीपर्यंत भेट दिलेल्या वाचकांची संख्या २ हजारच्या घरात होती. दररोज बहुधा पाच ते दहा लोक चुकुन-माकुन येउन धडकतात. बहुतांश वेळा मराठीब्लॉग डॉट नेट वरुन ही लोक माझ्या संकेतस्थळावर पोचतात. जर का मी एखादी नविन गोष्ट टाकली तर पाहुण्यांची संख्या तीस-पस्तीसच्या घरात जाते पण ते तात्पुरतीचं.


दोन आठवड्या पुर्वी अचानक या संकेतस्थळावर एकाच दिवसात ३०० लोक येउन गेलेत. मी थोडा चरकलोच. मी या संकेतस्थळाची जाहिरात कुठेच करत नाही.माझ्या बर्‍याचश्या मित्रांना मी काही लिहितो हे माहिती सुध्दा नाही. काही खास मित्र मात्र नियमित वाचुन मला प्रोत्साहन देतात. मग ही अनोळखी ३०० मंडळी कुठुन आली? पण ही नुसती सुरुवात होती. दुसर्‍या दिवशी ७५० लोकांनी संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद स्टॅट काउंटरनी केली. (मी माझ्या संगणकावरुन संकेतस्थळावर गेलो तर त्याने भेट-नोंदीचा आकडा वाढत नाही) मला वाटायला लागल की काही तरी तांत्रिक गडबड असणार. मी लगेच स्टॅट काउंटरच्या प्रशासकीय विभागाला ई-मेल केला. पण त्यांचे उत्तर आले की यंत्रणा व्यवस्थित आहे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक संकेतस्थळावर येउन गेले आहेत. बघता बघता चार दिवसात १८०० लोक येउन गेलेत. मग मी थोडी 'तहकिकात' करायची ठरवली. माझा ब्लॉग कोणी अजुन व्यक्तीने त्याच्या ब्लॉगवर तर टाकला नाही? किंवा कोणी माझ्या ब्लॉगबद्दल प्रतिक्रीया अजुन कुठे व्यक्त तर केली नाही? कारण तस असेल तर अपरोक्षरित्या माझ्या संकेतस्थळाची जाहिरात होइल आणि वाचकांची संख्या वाढेत. मी माझं नाव (भारद्वाज माझ आण्णाव नाही. ते आमचं गोत्र आहे) किंवा संकेतस्थळाचा पत्ता गुगल करुन बघितला पण माझ्या हातात फारस काही लागेना. स्टॅट काउंटरच्या नोंदींमधे मला लोकसत्ताचे संकेस्थळाची नोंद मला अचानक आढळली. मी माझ्या ब्लॉगचे संकेतस्थळ व लोकसत्ता अश्या शब्दांना गुगल केल्यावर मला लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत माझ्या ब्लॉगचा उल्लेख असलेला लेख मला आढळला. लोकसत्तेच्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराने इंटरनेटवर वाढत असलेल्या मराठी ब्लॉगस् विश्वाबद्दल लेख लिहिला होता. या लेखात त्यांना आवडलेल्या काही ब्लॉगस् मधे माझ्या ब्लॉगचा उल्लेख प्रामुख्याने झाला होता. ते बघुन अनेक वाचकांनी माझ्या संकेतस्थळाला भेट दिली. ती संख्या बघता बघता अडीच हजाराच्या घरात गेली.

खर तर माझे लेखन कोणी वाचावं या हेतुने मी लिहित नाही. लिहिण्याजोगं काही तरी माझ्या कडे आहे असं मला वाटत म्हणुन मी माझा की-बोर्ड बदडतो. अर्थात, संगणकावर मराठी लिहिणही फार सोपं झालेल असल्यामुळे गोष्ट लिहायला फारश्या उठाठेवी करव्या लागत नाहीत. माझं लेखन कोणाला आवडलं तरी उत्तम आणि नाही आवडल तरी उत्तम. माझा शब्दांच्या सामर्थ्यावर ठाम विश्वास आहे आणि माझ्या शब्दात फारस सामर्थ्य कुठल्याच दृष्टीने नाही यावरही माझा तितकाच विश्वास आहे. पण नाही म्हटल तरी अचानक मिळालेल्या प्रसिध्दीनी मी हुरळुन गेलो. मी लेखक झाल्याचा भास होऊ लागला. आता घरा बाहेर पडलो तर लोकं ओळखणार तर नाही ना अशी मला भीती वाटु लागली. मी उगाच टोपी घालुन हिंडु लागलो. खर मी पिक्चर मधे काम करत नव्हतो कि लोकं ओळखतील! अजुन काही कमी असेल तर मी परदेशात रहातो आणि तिथे मराठी भाषेचा गंधही कोणाला नाही. पण ही माझी 'लाईम-लाईटची' वेळ होती. आणि तिथेच माझी लेखणी घसरली. राज-महालाच्या मनोर्‍यावर बसल्यामुळे कावळ्याला कोणी गरुड म्हणत नाही.

लेखन बरेच लोकं करतात किंवा करु शकतात. प्रसिध्दीस येणं हा मुद्दा थोडा बाजुल ठेवला तर प्रतिभाशाली लेखक किंवा कवीं आपल्याला का आवडतात? सगळेच लेखक-कवी आवडतात अस नाही किंवा आवडत्या साहित्यिकाने लिहिलेलं सगळंच आवडत असही नाही. पण श्रेष्ठ साहित्यिकांचे शब्द, विचार, भावना आपल्या मनाला कुठे तरी जाउन भिडतात. त्यांनी शब्दबध्द केलेल्या अनुभवांशी आपण नातं जोडु शकतो. आपल्या सोबत अस काही घडु शकत किंवा आपल्या ओळखीतील कोणा सोबत तस घडलेलं असत हे आपल्या लगेच लक्षात येत. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींनाही तसंच वाटत असत पण साहित्यिक त्या भावना शब्दांमधे अचूक पकडतात. आपल्या मूक जीवनाला बोलत करतात.

पु.लं नी लिहिलेल्या व्यक्तिचित्रां मधील अंतु बर्वा किंवा नारायण आपल्याला कुठे ना कुठे भेटले असतात. वि.स. खांडेकरांनी रेखाटलेल्या ययाती-देवयानीतील मनुष्य वृत्ती आपल्याला आपल्याच आयुष्यात नज़रेत येतात.कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत किंवा कोलंबसाचे गर्वगीत यात प्रगट होणार्‍या उंत्तुंग कल्पनाशक्तीनी मन भरुन येतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते गीत वाचल्यावर शब्दांमधे समाजाची अस्मिता जागृत करण्याचे सामर्थ्य आहे याची प्रचिती येते. दु:खाच्या विविध छटा सुरेश भटांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतात. बा. भ. भोरकर किंवा कवी अनिल यांचे सृष्टी-सौंदर्यावरची पद्य मन प्रफुल्लीत करतात. बहिणाबाई चौधरी किंवा भाऊसाहेब पाटणकरांच्या कविता आयुष्याकडे बघण्याचा एक नविन दृष्टीकोन देतात. इंदिरा संत किंवा शांताबाई शे़ळके शब्दांशी जणु लडिवाळ करुन मनाच्या अनभिज्ञ काना-कोपर्‍यांची सैर करुन आणतात. ग. दि. माडगुळकरांच्या कविता म्हणजे सुग्रास अन्नाची मेजवानीच. 'एक तळ्यात होती बदके अनेक' असो किंवा जोगिया असो, सरस्वतीच त्यांच्या घरची पाहुणी होती. गीत-रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. जणु रामाचा पुनर्जन्म महाराष्ट्रात झाला. आपल्या प्रतिभेने समाजाची करमणुक करणे हेच केवळ साहित्यिकांचे कार्य नव्हे. समाजासमोर ते सध्य परिस्थितीचा आरासा ठेवतात. गोमांतक किंवा महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्र्यांच्या लेखणीला तलवारीहुन अधिक धार होती. जाती संस्थेच्या आणि समाजाच्या पराकोटीच्या कर्मठपणाची विष-फळे विजय तेंडुलकरांनी रेखाटलेली व्यक्तिमत्वे आपल्याला चाखवतात. मरगळलेल्या समाजाला दंडुक्यानी मार बसल्याचा भास 'एक तुतारी द्या मजला आणुनी' या केशवसुतांच्या कवितेनी होतो.

जितकी नावे लिहावित तितकी कमी आहेत. आणि त्यांच कौतुक करण्या इतपत माझ्याकडे शब्दांच भांडार नाही. मी अजुन महाराष्ट्रातील संत परंपरेच्या साहित्याबद्दल काहीच लिहिलेलं नाहिया! तेवढी माझी पात्रता नव्हे.थोडक्यात साहित्यिकांना समाजाचे मानबिंदु मानायला हरकत नाही. ते समजाच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. समाजाच्या अस्तित्वाला साकार करतात. समाजाच्या अनुभवांना बोलत करुन ते इतिहासाल जन्म देतात. त्यांच्या कल्पनाशक्तिला वाचा देणारी ही मराठी-माउली धन्य आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा मराठी समाज धन्य.

माझ्या सामान्य जीवनात मला जे काही दिसत त्याला शब्दात बांधतांना मला धाप लागते. इंटरनेटच्या माया-जाळात मला थोडी प्रसिध्दी मिळाली तर मला नाकाखाली पारंब्या लोंबकळल्याचा भास होऊ लागला. अश्या साहित्याच्या उत्तुंग राज-महालाच्या पायथ्याशी मला जागा मिळाली तरी पुरेसे आहे. पण मी तिथेही सध्या पोचु शकत नाही हीच वस्तुस्थिती आहे या विचारानी मला थोडं वाईट वाटल. मला येणार्‍या यत्किंचित अनुभवांनाही जी भाषा प्रेमाने कवटाळते आणि प्रोत्साहन देते त्या भाषेत माझा जन्म झालाय हे काही कमी आहे?

1 comment:

TEJAS THATTE said...

http://www.loksatta.com/daily/20080309/ravi01.htm