3/1/08

श्री गणेश वंदना - भाग ३

पदरचना सुंदर। तेच रंगविलेले वस्त्र।
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥

कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥

पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्‍यातील रत्ने। करगोट्याच्या॥

व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥

ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥

तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥

गणपतीच्या रेशमी वस्त्रांना ग्रंथांमधील सुंदर पदरचनांची उपमा देतांना ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की वस्त्रांना शोभतील असेच अलंकार गणपतीचे आहेत. येथे वाण शब्दाचा अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सुवासिनी स्त्रीयांची वाण भरण्याची पध्दत आहे. वाण म्हणुन बहुधा मुठभर गहु, शेंगा इत्यादी गोष्टींनी ओटी भरल्या जाते. येथे गणपतीच्या वस्त्रांना व अलंकारांना वाणाची दिलेली उपमा अप्रतिम तर आहेच ज्ञानेश्वर महाराजांची कल्पनाशक्ती प्रगल्भ असुनही सामान्य जीवनाच्या किती निकट आहे हे बघुन मन विस्मित होते. ज्ञानेश्वरीची महानता यातच दडलेली आहे. श्रुती व स्मृती या दोहोंचा अपूर्व संगम गीतेत होतो. गीतेतील श्लोक गेय तर आहेच पण प्रत्येक शब्दात तत्त्वज्ञान ठासुन भरलेल आहे. ते सहजा-सहजी सामान्य बुध्दीस झेपत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील प्रगाढ तत्त्वज्ञान केवळ मराठीत उतरविले नाही तर अत्यंत रसाळ भाषेत ज्या कल्पना व उपमा सामान्य जनास सहज रुचतिल त्यांचा वापर करुन मराठी मनं पावन केलं.

गणपतीच्या गळ्यातील रुण-झुणणार्‍या क्षुद्र-घंटांना भारतीय साहित्य व कलेला (काव्य व नाटके) उपमा देतांना महाराज पुढे म्हणतात की या घंटांचा मंजुळवाणा अर्थ-ध्वनी ऐका। येथे अर्थ-ध्वनी शब्द परत मला फार आवडला. मागे आपण अर्थ-शोभा या शब्दाबद्दल बोललो होतो त्याच पठडीत अर्थ-ध्वनी शब्दाचा उपयोग येथे केला आहे. पण भारतीय साहित्य व कला केवळ इंद्रियांनाच सुखावणार नसुन त्यातील विचार हे अर्थपूर्ण आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शविले आहे. महाभारत कथन करण्याचे कार्य आदि व्यासांनी तर लेखनाचे कार्य गणपतीने केले. या अपूर्व संगमातुनच महाभारत व गीतेची निर्मिती झाली. या संगमाचे वर्णन करतांना महाराज गणपती आदि व्यासांच्या मती मेखले सारखा झळाळत होता असे म्हणतात. मेखला म्हणजे तेजस्वी कंबर-पट्टा. (थायलँड मधील एका नदीचेही नाव मेखला आहे!)

गणपतीचे षड्-भुजांना महाराज षड्दर्शनांची उपमा देतात।


वैषशिखा (कानद)
न्याय (गौतम)
सांख्य (कपिल)
योग (पातंजली)
मिमांसा (जैमिनी)
वेदांत (बाद्रायण)


या सहा तत्त्वज्ञानांचा षड्दर्शनां मधे समावेश होतो। हि षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानांचा पाया आहे। प्रत्येक विषयावर लिहिण्याचे ईप्सित येथे नाही. पण यातील वेदांत तत्त्वज्ञान आपण सर्वांस अधिक परिचित आहे. वर्तमान परिस्थितीतील भारतीय समाजाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या बद्दलचे विचार हे आद्य शंकराचार्यांनी प्रसार केलेल्या अद्वैत सिंध्दांतांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पण हा वेदांत सिध्दांत मूळ बाद्रायण ऋषिंनी प्रस्थापित केला होता.


याच ओवीत पुढे महाराज म्हणतात की ही सहा तत्त्वज्ञाने गणपतीचे सहा हात आहेत व या तत्त्वज्ञानातील अभिप्रेत अर्थ हे गणपतीच्या हातातील अस्त्र आहे. तर्काला महाराज परशुची उपमा देतात. परशु म्हणजे परशुरामांचे आवडते अस्त्र. येथे तर्काला परशुची उपमा देण्यामागे काय उद्देश असावा यावर भाष्य करणे थोडे कठिण आहे. परशु एका घावात दोन तुकडे करतो त्याच प्रमाणे जो तर्क कुठल्याही विवादाचे सत्य-असत्य असे दोन तुकडे करतो असा अर्थ अपेक्षित असावा असं मला वाटत. पुढे महाराज म्हणतात की गणपतीच्या हातातील मोदक म्हणजे वेदांत सिध्दांत होय.

No comments: