**या लेख मालिकेला मी 'चंद्रप्रकाशी' अश्यासाठी म्हणले आहे कारण हे माझे मूळ संशोधन नाहीं. 'जावळीचे चंद्रराव मोरे' हे श्री रमेश साठे यांचे पुस्तक पुन्हा वाचनात आले. त्यातील संशोधनाचा मागोवा आणि काही प्रमुख घटना संक्षिप्तात मी येथे सादर करण्याचा हा प्रयत्न. पुस्तकाचा आढावा आणि त्यान्वये मला अजून उमजलेल्या छत्रपती आणि मराठा इतिहासाचे हे पडसाद आहे. हा लेख चांगलंच लांब झाला आहे. तरी आरामात किंव्हा टप्प्या-टप्प्यात वाचावा. पण अवश्य वाचावा.
पार्श्वभूमी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या काळात, म्हणजे सन १६५६ च्या काळात, जावळीच्या मोहिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या मोहिमे बद्दल फारसे बोलले जात नाहीं कारण हे मोहिमेत राजकारण जास्त होते. सिंहगड किंव्हा आग्रा या घटना रोमांचक आहेत त्यामुळे त्याची माहिती जनमानसात अधिक आहे. जेंव्हा जावळीचा उल्लेख होतो तेंव्हाहि, 'चंद्रराव मोरे ला परास्त करून, पिढीजात असलेला 'चंद्रराव' किताब काढून, जावळी महाराजांनी जिंकली' असा थोडक्यात होतो. पण या मोहिमेत महाराजांनी त्यांच्या उत्तर आयुष्यातील त्यांच्या यशाची, आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली असे म्हणता येईल. त्याचे कारण असे:
१) महाराजांनी ताडलेले जावळीचे भौगोलिक महत्व.
२) भविष्यातील मानसुब्यांसाठी जावळीचे आवश्यकता. उदा. जावळीतल रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड
३) जावळीवर वर्चस्व किंव्हा जावळीचे मोरे स्वराज्यात दाखल होणे यापैकी कुठलीही वस्तुस्थिती इतर देशमुख, पाटील, किंव्हा मानसबदारांना स्वराज्याच्या कामात रुजू व्हायला प्रवृत्त करण्यास किंव्हा स्वराज्याबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्यास कामी येणार होती.
४) जावळीच्या राजकारणात महाराजांनी जेंव्हा लक्ष दिले तेंव्हापासून ते जावळी जिंकेपर्यंत महाराजांनी जे डाव-पेच, युक्त्या लढवल्यात त्या पुढल्या सगळ्या महत्वाच्या मोहिमांमध्ये नियमित पणे दिसून येतात.
जावळीच्या मोहिमेची माहिती श्री बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'श्री राजा शिवछत्रपती' पुस्तकात उपलब्ध आहे. पण या विषयावर अचानक एक अमूल्य पुस्तक माझ्या पदरी पडले. 'अचानक धनलाभ' म्हणतात तसे. पुस्तक श्री रमेश साठे यांनी लिहिलेले आहे. श्री साठे हे बाबासाहेब पुरंदऱ्यांचे खास मित्र, महाराजांच्या इतिहासाचे व्यासंगी आणि इतिहास जिथे घडला ती भूमी यांना त्यांच्या मागच्या अंगणासारखी ओळखीची आहे. हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या एका महत्वाच्या मोहिमेची संक्षिप्तात माहिती देतेच पण घटनेच्या इतिहास व्यतिरिक्त पुस्तकाचे लेखक श्री साठे, महाराजांचा मुत्सद्दीपणा, त्यांची दूरदृष्टी, एवढ्या कमी वयात त्यांनी दर्शविलेला राजकीय प्रौढपणा आणि त्यांचा संयम आणि तसेच जेंव्हा आवश्यकता निर्माण झाली तेंव्हा महाराजांचे संयोजन आणि धाडस या गुणांची सूक्ष्मतेने जाणीव करून देतात.
--
जावळीचा इतिहास:
जावळी हा भाग सध्याच्या सातारा जिल्ह्यात येतो. जावळीचे जंगल घनदाट आणि दुर्गम आहे. जावळीच्या पुढे कडा ओलांडून कोकणपट्टी. जावळी मोक्याची यासाठी कि जावळीत सैन्य पाठवून तो भाग किंव्हा जावळी ज्याच्या अधिपत्या खाली आहे त्याला जिंकणे महत्कर्म आहे. आणि जावळीत जम असेल तर जावळीचे अरण्य, किल्ले आणि खालती कोकणपट्टी व समुद्र किनारा, या सगळ्यावर वर्चस्व स्थापन होते. महाराजांचे जावळीकडे कधीपासूनच लक्ष असणार. पण जावळी, पिढीजात, मोरे घराण्याच्या हाती होती. आणि जो मोरे वंशज गादीवर असेल त्याला 'चंद्रराव' खिताब प्राप्त होत असे. जावळीत जरी या मोरे घराण्याची सत्ता अनभिषिक्त असली तरी हे सगळे 'चंद्रराव' मोरे, नाममात्र का होईना, चाकरी बादशहाची करीत असत. जो कोणी निझाम किंवा आदिलशाही बादशाह तेंव्हा आरूढ असेल त्याच्या पदरी हे दाखल होत. पण बादशहाचा पदर धरला तरी जावळीत बादशाही सत्ता नसे. तिथे सत्ता मोरे घराण्याचीच. जावळीच्या अजिंक्यतेची पावती देणारी एक घटना फार रोमांचक आहे. शिवाजी महाराजांच्या दोन शतके आधी मलिक उत्तुजार नावाचा एक मुसलमान बहमनी बादशहाचा सेनापती होता. त्याने शिर्के (शिरकावली गावाचे) नावाच्या स्थानीय सरदाराला युद्धात हरविले. आणि मग मुसलमान होण्यासाठी भाग पाडले. शिर्के त्याला म्हणाला कि मी मुसलमान होईन पण जवळच्या मोरेला पण मुसलमान करायला हवे म्हणजे मी एकटा पडणार नाहीं. मलिक उत्तुजारला ते पटले. शिर्के मग मलिकला घेऊन मोरे वर चढाई करायला जावळीत निघाला. शिर्केने आधीच मोरेला या सगळ्याची बित्तमबातमी दिली होती. जावळीच्या घनदाट जंगलात प्रवास करितांना मलिक उत्तुजार व त्याच्या सैन्याचे अतोनात हाल झालेत आणि शेवटी, मोरे आणि शिर्केच्या सैन्याने गनिमी काव्याने हल्ला करून मलिक उत्तुजार आणि त्याच्या सैन्याला गायब केले. जवळपास दहा हजाराच्या सैन्यातून एकही जीव जावळीतून बाहेर आला नाहीं. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातही हि घटना नमूद केली आहे. या घटनेनंतर कोणीही बादशहा जावळीच्या वाटेल गेला नाहीं. जावळी जणू अजिंक्य होती.
शिवाजी महाराजांचा समकालीन जो दौलतराव 'चंद्रराव' मोरे होता त्याचा सन १६४८ ला मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपर्यंत मोरे घराण्यात भाऊबंदकी नव्हती. पण दिवंगत चंद्ररावास स्वतःचे अपत्य नव्हते. त्यामुळे आता जावळीचे गादी अचानक मोकळी झाली होती. या चंद्ररावाच्या आईस - माणकोइ बाई, वाटू लागले कि गादी कोणी तरी मोरे घराण्यातच बळकावणार किंव्हा कोणी शिर्के इत्यादी येणार आणि किंव्हा हा गोंधळ बघून बादशाह जावळी गिळेल. पण माणकोरीबाई हुशार होत्या. तिने मग तिच्या माहेरच्या नात्यातीलच एकाला - येसाजी मोरे, दत्तक म्हणून घेतले, आता दत्तक घेतलेला कोणी लहान पोरगा नव्हता तर चांगला तिशीच्या घरातला होता. दत्तक घेण्याच्या कामात उगाच दगा-फटका होईल याची भीती माणकोइ बाईंना होती. भाऊ-बंदकीत घराणी निर्वंश होण्याच्या अनेक घटना तेंव्हा सातत्याने घडत. माणकोइ बाईंनी शिवाजी महाराजांचे वाढते बळ आणि त्यांचा वाढत वचक हेरला होता. त्यामुळे बाईंनी लगेच महाराजांना गाठले आणि अभय मागितला. जावळी स्वतःच्या अधिपत्यात नसली तरी तिथल्या गादीवर हिंदवी स्वराज्याचा पाईक बसला तर उपयोगीच ठरेल असा विचार करून महाराजांनी हवी ती मदत मोरे बाईंना देण्याचे मान्य केले. माणकोइ बाईंनी मग दत्तक घेण्याचा कार्यक्रम उरकला आणि नवीन येसाजी 'चंद्रराव' मोरे जावळीच्या गादीवर स्थानापन्न झाला.
गादीवर आल्यावर येसाजीने जातीने जावळीच्या व्यवस्थेत लक्ष घातले. आणि या छोट्या राज्याजी घडी नीट लावली. आणि गादीवर आपली पकड मजबूत केली. पुढे त्याने अत्यंत आदर व प्रेमाने श्री समर्थ रामदासांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून उपदेश घेतला. तसेच शिवथर घळीची जागा श्री समर्थांना उपलब्ध करून दिली. शिवाजी महाराजांचे उपकार न विसरता त्याने, निदान सुरुवातीला तरी, महाराजांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. पण बहुधा हे सगळे त्याच्या दृष्टीने एक राजकीय खेळी होती. जावळीच्या गादीवर आणि प्रदेशावर सत्ता मजबूत पणे आपल्या हातात केंद्रित होई पर्यंत त्याने सगळ्यांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेवले. पण सत्ता हे असे भूत आहे कि एकदा कि मानगुटीवर बसले कि मग त्या भुताला काढणे अशक्य होते. आणि येसाजी मोऱ्याला सर्वनाशाच्या मार्गावर हे सत्तेचे भूत बकोट धरून घेऊन जात होतं.
युद्धाची रुखरुख:
जावळीच्या मोसे खोरे भागात रंगो बापूजी त्रिमल नावाच्या एका कुळकर्ण्याने एका बाईवर अत्याचार केला. हि तक्रार महाराजांना पोचताच त्यांनी रंगो ला धरून आणण्याचे आदेश दिले. महाराजांचे प्रशासन चोख असे आणि बदकर्माच्या बाबतीत तर त्यांचा कडक अंमल एव्हाना सर्वश्रुत होता. त्यामुळे घाबरून रंगो त्रिमलने थेट येसाजी मोऱ्यांचा पदर धरला आणि असले घृणात्मक कृत्य करूनही येसाजी ने त्याला चक्क अभय दिला. हळू हळू येसाजी ने आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आणि त्याच्या क्षेत्रात अन्यायाला वाव मुद्दाम द्यायला सुरु केला. जणू तो महाराजांना अप्रत्यक्षपणे आव्हान देत होता. त्याच्या साठी हा सगळा राजकीय आणि सत्तेचा खेळ होतं पण त्याला कळले नाहीं कि शिवाजी महाराज हे जुना 'खेळ' खेळत नव्हते. त्यांनी नवा डाव मांडला होता आणि या स्वराज्याच्या डावात येसाजी सारख्यांना जागा नव्हती.
शिवाजी महाराज आता जावळी आणि येसाजी 'चंद्रराव' मोरे कडे जातीने लक्ष घालू लागले. त्यांनी येसाजी ला दिलेली संधी त्याने आपल्या कृत्यांनी गमावली होती. पण महाराज कुठलेही काम तडका-फडकी करीत नसत. सगळ्यात पहिले त्यांनी त्यांचे गुप्तचर जावळीभर पसरवलेत. मग पत्र व्यवहार आणि वकिलांच्या मार्फत त्यांनी येसाजी मोरे ला भेटीची बोलावणी पाठवलीत. पण येसाजी काही जुमानेना. शेवटी शिवाजी महाराजांनी अंतिम चेतावनी-सम एक पत्र पाठवले. हे पत्र शिव-इतिहास प्रेमींना ओळखीचे आहे - "तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता, राजे आम्ही - आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे. तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन, मुलुख खाऊन बरोबर राहून चाकरी करावी. नाहीतर बदफैली करून फंद कराल तर जावळी मारून तुम्हास कैद करून नेऊ" शिवाजी महाराजांच्या या पत्राचे उत्तर येसाजी मोरेने फार गुर्मीत आणि उर्मट पणे दिले " तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणी दिधले! मुस्तफद राजा आपले घरी म्हटलियावर कोण मानतो! येता जावळी, जात गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाहीं"
तरीही एक शेवटची संधी म्हणून शिवाजी महाराजांनी पुन्हा एक पत्र येसाजी ला लिहिले आणि त्याला पुन्हा समजविण्याचा प्रयत्न केला. पण येसाजीची मती फिरली होती. त्याने जावळीचे सोय उत्तम केली होती म्हणून त्याला भीती वाटत नव्हती. पण त्याने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या स्वराज्याच्या ध्येयाने भारावलेल्या मावळ्यांना नक्कीच कमी लेखले होते. आणि त्याची किंमत त्याला मोजायला लागणार होती.
--
जावळीचे फत्ते:
जावळीचे हि भानगड चालू असतांना, मुसलमानी सत्तांमध्ये वेगळे राजकारण घडत होते. आणि हा भाग साधारण आपण लक्षात घेत नाहीं. महाराजांचे पराक्रम हे शून्यात बघणे चुकीचे आहे. त्यांनी उचलली पावले आणि त्यांच्या स्वाऱ्या, तात्कालीन मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही यांच्यातील राजकारण लक्षात घेऊनच पारखायला हवे. जावळीवर हल्ला करून उगाच आदिशाहीला डिवचण्यात अर्थ नव्हता. स्वराज्य, स्व-सैन्य आणि खजिना या सगळ्या गोष्टी अजून अल्प आणि अननुभवी होत्या. पण सन १६५० च्या दशकात मुघली सैन्य, आणि खुद्द औरंगझेब दक्षिणेत येणार होता. शहाजहान ने त्याला दक्षिण भारत जिंकून मुघली पंजाखाली आणण्याचे काम दिले होते. त्यामुळे आदिलशहा आणि कुतुबशहा औरंग्याला कसे सामोरे जायचे या तयारीत होते. जावळी-बिवळी आदिलशाहच्या पटलावर नव्हते. अर्थात, हेच महाराजांना हवे होते.
या दरम्यान महाराजांच्या हेरांनी सगळी जावळी पोखरली होती. सगळ्या भागाची आणि स्थानिक सरदारांची माहिती महाराजांना होती. येसाजी चा एक भाऊ, हणमंतराव मोरे या येसाजीच्या महाराजांविरुद्ध कान भरीत असत. महाराजांनी रघुनाथ बल्लाळ यांना या हणमंतरावाचा बिमोड करायला पाठवले. रघुनाथ बल्लाळ यांनी एक वेगळीच खेळी खेळली. लग्नाची बोलणी करायला म्हणून पन्नास मावळे घेऊन ते थेट हणमंतरावाच्या वाड्यात पोचले. आणि त्याला गफलतीत आणून, रघुनाथ बल्लाळ आणि त्यांच्या मावळ्यांनी हणमंतरावाला ठार केले. आणि त्याची गढी हस्तगत केली.
कान्होजी जेधे, जे वयाने महाराजांहून बरेच मोठे होते आणि आत्तापर्यंत ते आदिशहाच्या पदरी होते, यांनी महाराजांसोबत स्वराज्याची कास धरली होती. मोहिमेची सुरुवात होईपर्यंत त्यांना खरेतर आदिशहाचा हुकूम आला होता कि महाराजांवर चालून जायचा, पण काहीतरी टाळा-टाळ करून त्यांनी तो हुकूम जुमानाला नाहीं. आणि आता संधी साधून त्यांनी उलट जावळीवरच हल्ला करून महाराजांना जावळीत शिरायचं अजून एक मार्ग मिळवून दिला.
मग फारशी उसंत न घेता, नेताजी पालकर, येसाजी कंक, तानाजी मालुसुरे आणि महाराजांचे सैन्य वेग-वेगळ्या घाटातून (रडतोंडी, पारघाट, निसणीचा इत्यादी) जावळीत शिरू लागलेत. ठरलेल्या ठिकाणी सगळे सैन्य एकत्र आले आणि जावळीवर हल्ला केला. स्वतः चंद्रराव त्याच्या कुंटुबासोबत कुमठे नावाच्या गावी पळाला पण मागे मुरारबाजी देशपांडे याला लढायला ठेवले. महाराज आणि मुरारबाजी देशपांडे यांच्या सैन्यात कडाक्याचे युद्ध झाले पण मुरारबाजी काही मागे हटेना. महाराज त्याचा पराक्रम बघून अचंबित झाले. या धुमश्चक्रीत चंद्रराव मोरेची दोन मुले पकडल्या गेली होती. त्यांना पुढे करून महाराजांनी युद्ध थांबविले आणि मुरारबाजी पण ते बघून शरण आला. जावळीचे गढी महाराजांच्या सैन्याने जिंकली. मुरारबाजी चा पराक्रम महाराजांच्या नजरेत भरला होता. त्यांनी त्याला स्वराज्यासाठी झटायचे आव्हान केले आणि मुरारबाजींनी ते लगेच स्वीकारले. मुरारबाजी देशपांडे यांनी पुढे सन १६६५ च्या पुरंदरच्या लढ्यात राजा जय सिंह च्या मुघली सैन्यासमोर अतुलनीय पराक्रम गाजविला. आणि या युद्धातच त्यांना वीरगती प्राप्त झाली होती.
मुख्य जावळीची गढी हाती लागल्यावर उर्वरित जावळीत असलेल्या मोरे घराण्याचे इतर वंशावळीचा मागे महाराज लागले. गोडी-गुलाबीने स्वराज्य कामात आणणे नाहींतर हुसकावून लावणे हे कार्य महाराजांच्या सैन्याने पुढी काही महिने केले. स्वतः येसाजी मोरे रायरीला (आपण याला आज रायगड म्हणून ओळखतो) लपून बसलेला होता. महाराजांनी स्वतः सन १६५६ च्या उत्तरार्धात रायरीला धडक मारली. आता राजे येसाजीला सोडणारे नव्हते आणि त्यांचा हा मनसुबा शेवटी येसाजीने ताडलं. त्याने समझोत्याची बोलणी सुरु केला आणि तो महाराजांना शरण आला. रायरीचा किल्ला हातास लागल्याने महाराज फार आनंदी झाले. भविष्यातली राजधानी म्हणून त्यांनी मनोमनीच रायगडाची योजना केली असणार.
जावळी हाती लागली असली तरी येसाजीची कहाणी इथे संपत नाहीं. येसाजी आणि त्याच्या मुलांना स्वधर्म, स्वराज्य याचा मार्ग रुचेना. येसाजीच्या मुले बंदिगृहातून पळून गेलीत. त्यातील एक लगेच हाती लागला पण दुसरा - बाजी मोरे पळून विजापूर बादशाही दरबारात पोचला. तेथे बाजी घोरपडे सोबत त्यांनी स्वतःच्या बापाला आणि भावाला सोडविण्याची खटपट सुरु केली. (या बाजी घोरपड्याला पुढे महाराजांनी परास्त करून यमसदनी पाठविले) महाराजांना हे कळताच येसाजी मोरे आणि त्याचा एक पोरगा -कृष्णाजी मोरे ला मृत्युदंडाची शिक्षा दिली. सात पिढ्या जावळीवर राज्य केलेले सरदार घराणे असे नामशेष झाले.
जावळीनंतरचे स्वराज्य, जावळीनंतरचे महाराज:
मी महाराजांचा जावळी-विजय संक्षिप्तात सादर केला आहे. अजून बारकाव्यांसाठी हे छोटेखानी पुस्तक अवश्य वाचावे. महाराजांचे जीवन अद्भुत पराक्रमांनी भरलेले आहे आणि त्यांचा चाणाक्षपणा, राजकीय मुत्सद्दीपणा आणि धडाडी याचा प्रत्यय पावलो-पावली येतो तरी जावळीचा विजय हि साधारण घटना नव्हती. जावळी जिंकून महाराज आणि मावळे, मुसलमानी बादशाहीच्या पटलावर ठळकपणे उभे झाले. महाराजांचा जीवनकाल जावळी विजया आधीच काळ आणि जावळी विजया नंतरचा काळ, अश्या दोन भागात करू शकतो. जावळी महाराजांच्या हाती आल्यापासून त्यांच्यावर एका-पाठोपाठ मुसलमानी बादशाहिची आक्रमणे सुरु झाली. आधी अफझल, मग सिद्दी जौहर, मग शाईस्ता आणि काही वर्षांच्या कालावधीत जयपूरचा जयसिंह असे क्रूर मुसलमान आणि हिंदू-धार्जिणे आक्रमक स्वराज्यावर आणि महाराजांवर चालून आले. जयसिंह ला सोडून महाराजांनी बाकी मुसलमानांचा नायनाट केला. आणि आग्र्याहून पलायन करून, त्या अन्वये जयसिंहचा बिमोड केला. पण जवळीनंतरची दहा-पंधरा वर्षे महाराज अखंड लढत राहिले. आणि शेवटी सन १६७४ विजयानगरच्या राजा रामरायानंतरचे पहिले हिंदू स्वराज्यकर्ते बनलेत.