मागच्या लेखात आपण लेखन कसे करायचे या विषयाच्या पुस्तकाचा आढावा घेतला. या लेखात आपण अगदी निराळ्या लेखक आणि पुस्तकाचा आढावा घेणार आहोत. फक्त नवीन लेखकच नव्हे तर या पुस्तकाद्वारे एका नवीन खंडाशी आपली थोडी ओळख होईल. चिमामांडा उगोची आडीची ( Chimamanda Ngozi Adichie ) या इंग्रजी भाषेच्या नव-लेखिकेचे आपण 'द थिंग आरौन्ड युअर नेक" ( The Thing Around Your Neck ) या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत. हा लघु-कथा संग्रह सन २००९ ला प्रकाशित झालेला असून यात चिमामांडा यांच्या १२ लघु-कथा प्रकाशित केल्या आहेत. चिमामांडा वयाने अजून पन्नाशीच्या पण नाहीत आणि हे पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस त्या तिशीच्या घरात होत्या म्हणून मी त्यांना नव-लेखिका असे संबोधिले. बहुतांश लेखकांना बरीच वर्षे लिहिल्यावर प्रसिद्धी मिळते. प्रसिद्धी हि सातत्य आणि सर्जनशीलतेचा मंचावर वर्षानुवर्षे लिहूनच झगमगते. पण चिमामांडा या तरुण वयातच प्रथितयश झाल्यात. त्यांनी पंचविशीतच पहिले पुस्तक प्रकाशित केले होते आणि तेंव्हापासून त्यांचे प्रगल्भ लेखन सतत चालू आहे. चिमामांडा यांची इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, आफ्रिकेत आणि प्रामुख्याने नायजेरिया या देशाचे चित्रण, स्थलांतरित व्यक्ती आणि समाजाचे जीवन त्रयस्थपणे वाचकांसमोर ठेवण्याची किमया या गोष्टींमधून प्रस्तुत होतेच पण त्यांचा स्त्री-दृष्टिकोनातून गोष्ट दाखविण्याची कला, धर्मांधता व त्याचे समाजावर आणि प्रामुख्याने स्त्रीवर्गावरचा प्रभाव हे विषय सुद्धा त्यांनी सहजतेने, कुशलतेने आणि सहानभुतीने हाताळले आहेत. लघु-कथांव्यतिरिक्त त्यांच्या कादंबऱ्यासुद्धा प्रसिद्ध आहे. या लेखाचा उद्देश्य लेखकाची ओळख करून देण्याचा नव्हे, पुस्तकाचा आढावा घेण्याचा आहे. पण भारतात आणि भारतीय वाचकांना आफ्रिका खंडाची फारशी ओळख नाहीं. तेथील समाज, तिथला इतिहास, भूगोल, त्यातील विविधता, युरोपीय आक्रांत्यांनी घातलेला उच्छाद आणि यासगळ्याची परिणीतीत वावरणार सध्याचा आफ्रिका याचा आपण अगदी संक्षिप्तात आढावा घेऊ.
पुस्तकात दोन सूर प्रामुख्याने उमटतात. त्यातील पहिला म्हणजे गेल्या पाचशे वर्षात युरोपीय देशांनी ओरबाडलेला आफ्रिका खंड. आफ्रिका समस्त मानवजातीचे उगमस्थान असला तरी आपण आधुनिक जग ज्याला म्हणून त्या जगात आफ्रिकेने सगळ्यात शेवटी पदार्पण केले आहे. आफ्रिकेचा उत्तर भाग हा इस्लाम आणि अरब यांनी सुमारे हजार अधिक अधिक वर्षांपूर्वी जिंकला आणि ते तिथले स्थानिक आणि राज्यकर्ते झाले. इजिप्त, लिबिया आणि अल्जेरिया या देशांच्या दक्षिणेकडील आफ्रिका मात्र आदिवासी जन-जाती आणि टोळ्यांमध्ये विभागलेला होता. आफ्रिकेच्या पूर्वी किनाऱ्यावर समुद्री व्यापार हजारो वर्षांपासून होतो आहे. तर उत्तर-पश्चिमी समुद्र किनारपट्टीवरून आफ्रिकेतील लोकांना मोठ्या प्रमाणावर गुलामीत विकल्या गेले. हळू हळू युरोपीय साम्राज्य आफ्रिका खंडाच्या या भागांमध्ये पाय पसरू लागलीत. इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, डच आणि बेल्जियम राष्ट्रांनी अक्खा आफ्रिका गिळंकृत करून, आफ्रिकेतील जनतेवर अनन्वित अत्याचार केलेत. (बेल्जियम या युरोपीय देशाने आपण सध्या ज्याला कॉंगो देश म्हणतो तेथील सामान्य जाणते इतके अनन्वित अत्याचार केलेत कि ते वाचून अंगावर काटा येतो) आफ्रिकेतील सुपीक जमीन, त्यातील प्राणीवर्गाची तस्करी, आणि खनिजे या साठी युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेतील टोळ्या, जमाती आणि त्यांचा समाज जणू छिन्न-विच्छिन्न केला. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय देशांचे बळ कमी होत गेले आणि त्यांना आफ्रिका खंड सोडावा लागला. पण जातांना (जसे भारतीय उपखंडात केले) या युरोपीय सत्तांनी आफ्रिका खंड वाट्टेल तसा वेग-वेगळ्या देशांमध्ये भागाला, या नवीन देशांना 'स्वातंत्र्य' दिले आणि तिथून पोबारा केला. मागे राहिली ती गरिबी, भ्रष्टाचार आणि अशिक्षित व संभ्रमित समाज व्यवस्था. आफ्रिका खंडाचा हा आढावा फार थोडक्यात मी प्रस्तुत केला आहे. यात असंख्य बारकावे आहेत आणि अनाकलनीय भीषणता दडली आहे.
अश्या आफ्रिकेतील नायजेरिया देशातून आपल्या लेखिका आहेत. नायजेरिया देश म्हणजे एक घरी विणलेली घोंगडी आहे असा म्हणता येईल. नायजेरिया हौसा, योरूबा, इगाबो (आपल्या लेखिका या जमातीच्या आहेत) फुलानी इत्यादी जन-जाती किंव्हा टोळ्या आहेत. देशात शेकडो भाषा बोलल्या जातात आणि हि गुंतागुंती कमी असेल तर देशात ५० टक्के मुसलमान आणि ५० टक्के ख्रिश्चन आहेत. टोळी यातील संघर्ष, भाषेवरून तणाव आणि काही कमी असेल तर दोन अत्यंत आक्रमक धर्मांमधील वैमनस्य! पण या व्यतिरिक्त साम्राज्यवादातून नुकताच उभारत असलेला देश किंव्हा समाज, साम्राज्यवादाने धुडगूस घालून गेलेले घरात जणू शून्यात बघत बसलेला असतो. काय करावे हे जणू सुचत नाहीं. यूरोपीय साम्राज्यवादाची (किंव्हा आत्ताच्या काळात अमेरिकन साम्रज्यवाद जी भांडवलशाहीच्या चॉकोलेटच्या आवरणात असते!) एक वैशिष्ट्य असे कि देश किंव्हा समाज दरिद्री झालीत एवढेच नाहीं तर या युरोपीय राष्ट्रांनी यूरोपीएतर जगाला मानसिकपणे भ्रमित आणि कर्म- दरिद्री केले. बऱ्याच प्रमाणात भारतातही हे आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळात दिसले. वेस्ट इंडिज किंव्हा दक्षिण-पुर्व आशियातही हे दिसते. आफ्रिकेत आणि नायजेरियात हे जणू अजून फोफावले आहे. चिमामांडा यांनी नेमके हे प्रतिसाद हेरले आहेत. The Thing Around Your Neck या पुस्तकाच्या शीर्षकामागे लेखिकेस हे अभिप्रेत असावे.
दुसरा सूर म्हणजे स्थलांतराचा. आफ्रिकेतून अजूनही मोठ्या प्रमाणावर लोक युरोप आणि अमेरिकेत स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत असतात. या स्थातलांतराचे, स्थलांतरितांचे चित्रण, मानसिक, शारीरिक ओढाताण, व्यक्तीवरील आणि समाजावरील त्याचे परिणाम, याचा स्त्रियांवर होत असणारा विपरीत परिणाम हे चिमामांड याने नेमके हेरले आहे. अमेरिकेत स्थलांतराचे हे सूर प्रत्येक देशाचे वेगळे आहे. मेक्सिको या देशातून मोठ्या प्रमाणावर लोक अमेरिकेत जातात त्यांचे अनुभव वेगळे आहेत. जुन्या काळात इटली किंव्हा आयर्लंड मधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले, त्यांचे अनुभव फार वेगळे आहे. पण आफ्रिकेतून आणि नायजेरियातून आता स्थातलांतरित होणार्याचे अनुभव जगासमोर ठेवण्याचे काम लेखिकेने या पुस्तकाद्वारे उत्तमपणे केले आहे असे म्हणायला हरकत नाहीं.
पुस्तकातील पहिली गोष्ट 'सेल वन' ( Cell One ) नायजेरिया देशातील भ्रष्ट आणि दारुण स्थिती टिपते. लेखिकेने स्वतःला गोवले आहे. गोष्टीच्या नायिकेचे वडील विद्यापीठात प्रोफेसर आहेत आणि भाऊ पण त्याच विद्यापीठात विद्यार्थी आहे. पण भाऊ थोडा उनाड असतो आणि वाईट संगतीत तो वहावत जातो. देशात राजकीय परिस्थिती बिकट होत असते आणि त्याचे पडसाद सगळ्यांच्या आयुष्यात कमी-जास्त प्रमाणात का होईना उमटत असतात. विद्यापीठात नोकरी असल्यामुळे कथा नायिकेचे कुटुंब अजून बऱ्यापैकी सुरक्षित होते पण समाज किंव्हा देशाचा हिस्सा राहून, त्याचे दुष्परिणाम भोगणे नाहीं असे शक्य नाहीं. कथानायिकेचा भाऊ हे लोण घरात घेऊन येतो. मग घरच्यांची धावपळ, त्यांच्या जीवाची घालमेल, जेलच्या खेपा आणि देशाच्या झपाट्याने खालावत चाललेल्या परिस्थितीच्या वणव्याचे चटके लेखिकेने नेमके टिपले आहेत.
अ प्रायव्हेट एक्सपेरिअन्स ( A Private Experience ) या कथेत दोन बायका मुस्लिम-ख्रिश्चन दंग्यां पासून पळून एका उध्वस्त केलेल्या दुकानात लपतात. त्यातील एक श्रीमंत आणि ख्रिश्चन असते तर दुसरी बाई कामगार वर्गातील एक मुसलमान असते. एवढाच नव्हे तर त्या भिन्न जमातीच्या पण असतात. खरे तर या गोष्टीत लेखिकेने खूप धागे गोवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जमाती, धर्म आणि आर्थिक परिस्थिती या समाजाच्या घटकांना वेग-वेगळ्या तर्हेने घडविते. या परस्परविरोधी नाहीत पण एकमेकांवर अवलंबून पण नाहीं. तरी लेखिकेने मोठ्या कुशलतेने धार्मिक दंगलींच्या सावलीत दोन स्त्रियांना स्त्रीत्वाची भीती कशी एक आणते हे दर्शविले आहे.
पुस्तकात गोष्टींमध्ये अजून एक धावत धागा म्हणजे गोरे आणि काळे या वर्णनाच्या लोकांचे संबंध, त्यांचे अनुभव, त्यांच्यातील संवाद. त्यातील एक म्हणजे आफ्रिकेतून अमेरिकेत नुकत्याच आलेल्या स्थलांतरितांचा अमेरिकेतील गोऱ्या समाजासोबतचा अनुभव, परस्परसंवाद. तर दुसरा म्हणजे आफ्रिकेत राहणारे गोरे आणि त्यांचे आफ्रिकेतील मूळ निवासी काळे वर्णाच्या लोकांचे संबंध. गोरा समाज वाईट वागतो किंव्हा चांगलाच वागतो असा समज लेखिका करू इच्छित नाहीं. गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांवर अनन्वित अत्याचार केला. आणि त्या ओझ्याखाली हे दोन्ही समाज वावरतात. निदान जेंव्हा एका-मेकांच्या संपर्कात येतात तेंव्हा तरी. इतिहासाचे विपरीत ओझे घेऊन चालणारे हे दोन वर्णच्या समाजाच्या भेटींचे रंग लेखिका The Thing Around Your Neck आणि Jumping Monkey Hill या कथेत टिपते. एका कथेत नायजेरियाहून नुकत्याच आलेली एक होतकरू तरुणी आणि तिच्या गोऱ्या प्रियकराचे संबंध दर्शविले आहे. येथे गोरा मुलगा आफ्रिकेतून नुकतीच आलेल्या मैत्रिणीसाठी नेहमीच अधिक प्रेम दाखवितो. आणि हे प्रेम जरी खरे असले तरी तिला मात्र त्या प्रेमाचे ओझे होते कारण केवळ वर्ण वेगळे असल्यामुळे तो प्रेमाची सतर्कता दाखवितो असे तिला वाटत असते. आता यात खरे-खोटे किंव्हा चांगलं-वाईट असा काहीच नाहीं आणि कोणीच नाहीं पण इतिहासाला विसरून पुढे जा वगैरे म्हणणे सोपे आहे. पण इतिहासाची सावली, खासकरून तो इतिहास दारुण आणि रक्तरंजित असेल तर, फार दूर पर्यंत दाट असते याचा प्रत्यय हि गोष्ट देते.
दुसऱ्या गोष्टीत- Jumping Monkey Hill - साऊथ आफ्रिकेतील निवासी असलेल्या एका गोऱ्या वर्णा च्या माणसाने आफ्रिकेतील उभरत्या आणि होतकरू लेखकांना एकत्र आणून लिहिण्याचे वर्कशॉप भरविले असते. पण वर्कशॉप च्या प्रणेत्याचे मूळ रंग लौकरच आपल्या गोष्टीच्या नायिकेला दिसू लागतात आणि त्यातून अनपेक्षित शेवट पुढे येतो. गोऱ्या वर्णाच्या काही लोकांना काळ्या वर्णाच्या लोकांना 'शिकविण्याची' जी ओढ असते ती जणू वसाहतवादाच्या नवीन स्वरूप आहे. पण अजूनही सत्ता आणि मुख्य म्हणजे पैसे आणि पुढे जाण्याचे मार्ग गोऱ्या वर्णाच्या लोकांच्या हाती असल्यामुळे आफ्रिकेतील जनतेची जी मानसिक ओढाताण होते याची प्रचिती या गोष्टीत येते.
चिमामांडा या प्रथितयश लेखिका आत्ता नक्कीच आहेत पण १५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गोष्टींमध्ये त्यांची प्रतिभाशक्ती, निरीक्षणशक्ती, माणसाकडे बघण्याची आत्मीयता, दैनंदिन जीवनात होरपळणाऱ्या सामान्यांना दर्र्शविण्याचा हळुवारपणा स्पष्टपणे दिसतो. त्यांनी हाताळलेले विषय नवीन आणि नाविन्यपूर्ण तर आहेच पण त्या वाहावत गेल्या नाहीत आणि गोष्टीतील नायक/नायिकेशी त्या तत्वनिष्ठ राहिल्यात. अजून एक वाखाणण्याजोगी बाब म्हणजे, चिमामांडा यांच्या गोष्टीतील नायिका हतबल आणि अशक्त नाहीत. परिस्थितीने त्यांना लढायला जागा ठेवली नसली तरी त्यांनी लढा सोडला नाहीं. स्वतःचे निर्णय घेत आणि परिस्थितीशी सामोरे होत हि स्त्री पात्रे खऱ्या अर्थाने कथेच्या नायिका ठरतात.
एक नवीन लेखिका म्हणूनच नव्हे तर नवीन विषय, नवीन विश्व आणि आपल्या जगाच्या एका नवीन भागाची ओळख व्हायला चिमामांडा यांचे हे पुस्तक अवश्य वाचायला हवे.
पुस्तक परिचय
'द थिंग आरौन्ड युअर नेक' ('The Thing Around Your Neck')
लेखिका - चिमामांडा अडीची
प्रकाशन दिनांक - सन २००९
पृष्ठ संख्या - २१७
ISBN-९७८-०-००-७३०६२१-3
ऍमेझॉन ची लिंक - https://www.amazon.in/Thing-Around-Your-Neck/dp/0307455912