6/13/24

राग 'मंत्रमुग्ध'

आमच्या घरी माझी आई पंडित जसराज नेहमी ऐकत असे. मला लहानपणी शास्त्रीय संगीत प्रकार फारसे आवडत नसे. कोणी तरी काही तरी आळवीत बसलय आणि आपण ऐकत बसायचं? ९० च्या दशकात सिनेमाच्या गाण्यांचा ताल बदलत होता. धांगड-धिंगा, मोठं-मोठाले ड्रमस आणि नाचता येईल असे गाण्याचे सूर प्रसिद्ध होत होते. मला हि गाणी साहजिकच आवडायचीत. काही वर्षात माझ्या मोठ्या भावाने इंग्रजी गाणी घरी आणलीत. त्यामुळे घरी अजूनच धमाल. हि गाणी काही बेसुरी नव्हती. छानच होती आणि हिंदी चित्रपटात शास्त्रीय रागांवर आधारित अनेक गाणी आहेत. पण हे शास्त्रीय संगीत नव्हे. माझा मामा घरी आला कि पंडित भीमसेन जोशी लावीत असे. त्याचे ते फार आवडते आहेत. आजीने कधी कधी टेप लावली कि गीत रामायण हमखास लागे. ८० च्या दशकात दूरदर्शन वर 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे भारतीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवून राष्ट्रीय एकात्मीकरण साधण्याची भारत सरकारची कल्पना अतिशय प्रसिद्ध झाली. राग देश वर आधारित हे गान मलाही फार आवडत असे. हा एक राग माझा बहुधा त्यामुळेच आवडता आहे. तसेच सकाळी ८ ते ८:१५ च्या दरम्यान विविध भारतीवर मराठी नाट्यसंगीत लागे. 'वाद जाऊ कुणाला शरण' हे आशाबाई खाडिलकर यांचे गाणे किंव्हा 'घेई छंद मकरंद' हे वसंतराव देशपांडे यांचे नाट्यगीत मला खूप आवडत असे. प्रामुख्याने अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेला आशालता वाबगावकर यांचे 'राजस राजकुमारा' या गाण्याची मी सदैव वाट बघीत असे.

लहान वयात विलंबित आळवलेले राग आवडणे कठीण आहे. निदान माझ्या अल्प बुद्धीला आणि स्वल्प कानांना तरी. पण पंडित जसराज यांचे राग भीमपलासी मध्ये गायलेले 'जा जा रे अपने मंदिरवा' मला फार आवडायला लागले होते. तसेच पंडित भीमसेन जोशींचे 'माझे माहेर पंढरी' पण आवडत असे. पण बाकी माझे लक्ष हिंदी चित्रपटाची गाणी आणि थोडी बहुत इंग्रजी गाण्यांकडेच होते. गंमत म्हणजे मला इंग्रजी गाण्यातील ओ का ठो समजत नसे. पण घरात चाललेल्या शास्त्रीय संगीताचे संस्कार कळत-नकळत माझ्यावर होत होते.  

शाळेत इयत्ता ५वी ते ७वी च्या वर्गांमध्ये आम्हाला संगीत म्हणून एक विषय असे. आमच्या बाई आम्हाला गाणी शिकवण्याचा प्रयत्न करीत आणि मी आणि माझे मित्र अथक कष्ट करीत न-शिकण्याचा प्रयत्न करीत असू. आमचे आवाज तेंव्हा फुटत होते. कंठात गुठळी दिसू लागली होती. त्यात आम्हाला आमच्या बाई  'गुनी गावत काफी राग' या पंक्तीने राग काफी शिकवीत असत. त्यांची काय चूक म्हणा, आमचे शंखा सारखे पोकळ आणि घोगरे गळे, त्यातून शिट्ट्याच वाजणार! 

शिक्षणासाठी परदेशात असतांना आमच्या कॉलेज च्या सांस्कृतिक भवनात पंडित जसराज यांचा कार्यक्रम होता. माझ्या मोठ्या भावाने माझ्या वाढदिवसा निमित्त मला या कार्यक्रमाची तिकिटे भेट म्हणून दिलीत. सोबत आई पण असणार होती. मला सुरुवातीला वाटले कि मला कळत नाहीं फारस त्यामुळे कंटाळा आला तर निघून येईन. लहानपणापासूनचे कानावर पडलेले सगळे सूर आणि ताल येथे एकत्रित माझ्यासोबत जणू बसले होते. सभागृहातील वातावरण वेगळेच होते. निदान मला तरी तसे भासले. त्यादिवशी पंडितजी सुद्धा भलत्याच फॉर्म मध्ये होते. इतके सुरेख गायलेत कि त्या आठवणीने अजूनही अंगावर काटा येतो. श्रीकृष्णाची भजन तर इतकी अप्रतिम होती. मध्यंतराच्या आधी त्यांनी कृष्ण-नामाचा जप केला. ८-१० मिनिटे फक्त कृष्णा-कृष्णा-कृष्णा चा गजरात संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. जप सुरु करायच्या आधी पंडितजी म्हणालेत कि "कृष्ण-जाप करते है. देखते है भगवान आते है कि नहीं" कृष्ण कधी येतो आणि कुठे येतो त्यालाच ठाऊक. पंडितजींची हाक श्रीकृष्णाने ओ देण्यायोग्य नक्कीच होती. माझ्या कानात आणि मनात त्या जपाचे नाद अजूनही आहे. या कार्यक्रमाच्या अनुभूतीने माझा भारतीय संगीताचा प्रवास अश्या प्रकारे सुरु झाला.

त्या नंतर मी पंडित जसराज यांची सगळी प्रसिद्ध भजने अक्षरशः दररोज ऐकू लागलो. त्यांचे 'गोविंद दामोदर माधवेती' हि बिल्वमंगल ठाकूर यांनी रचलेले भजन फार सुरेख आहे. त्याचे सभेत आळवलेली प्रत सगळीकडे उपलब्ध आहे. त्यांच्या साथीला पंडित संजीव अभ्यंकर आहेत. या व्यतिरिक्त पंडित जसराज यांनी आद्य शंकराचार्यांच्या अनेक रचना गायल्या आहेत. त्यांचे गंगा स्तोत्रम मला फार आवडते. स्तोत्र तर अर्थपूर्ण आणि रसाळ आहेच पण पंडित जसराज भक्तिपूर्ण गायले आहेत. जगन्नाथ पंडित लिखित गंगा लहरी हि अजून एक सुरेख रचना पंडित जसराज यांनी गायली आहे. 

अश्यातच मला कर्नटिक शास्त्रीय संगीताची ओळख अचानक झाली. स्वामी दयानंद सरस्वती यांचे अमेरिकेत पेनसिल्व्हेनिया राज्यात आर्ष गुरुकुल आहे. गुरुकुलाची एक दिवसभराचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यात हॉटमेल चा शोधक - सबीर भाटिया याला बोलावले होते. सबीर भाटियाला बघायला मिळेल किंव्हा भेटायला मिळेल म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. त्याला भेटायला मिळाले पण तिथे तास-दोन तासाचा कर्नाटिक संगीताचा कार्यक्रम होता. ते वातावरण धार्मिक असेल म्हणून किंव्हा माझी मनस्थिती ते संगीत ऐकण्याच्या लहरीत असेल म्हणा पण मला ती गायकी फार भावली. दक्षिण भारतात अजूनही रूढ आणि दृढ असलेली हि प्राचीन गायकी पद्धती, उत्तर भारतीय शास्त्रीय किंव्हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतापेक्षा वेगळी नक्कीच आहे. पण कर्नटिक असो कि हिंदुस्तानी, मूळ भारतीय कला, नृत्य, शिल्पकारी, अभिनय आणि गायकीतच आहे. सामवेदांवर आधारित कर्नाटिक राग आहेत. यात गायकीला अधिक महत्व असते. यावर आधारित पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आहे. पण हिंदुस्थानी मध्ये गायकीला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व वाद्यांना (तबला, सितार, वीणा इत्यादी) सुद्धा आहे. राग आळविण्याचे अभिजात स्वातंत्र्य हिंदुस्तानी मध्ये अधिक आहे. त्यामुळे भीमसेन म्हणा किंव्हा किशोरी आमोणकर म्हणा, यांना हवा तसा तो राग सजविण्याचे स्वातंत्र्य आहे. अर्थात, हा राग सजविणे सोपे नाहीं. भीमसेन जोशींचे हे आळविणे फक्त त्यांनाच जमेल. पण कर्नटिक मध्ये शिस्तबद्ध गावे लागते.

हिंदुस्तानी शास्त्रीय मध्ये मुस्लिम गायक पण बरेच आहेत. पण आपल्या नशिबाने इस्लाम धर्म इथे लुडबुड करीत नाही. आणि या मुस्लिम गायकांनी आणि गायकी घराण्यांनी हिंदुस्थानी गायकी पद्धत समृद्ध केली आहे. अगदी गुरु-शिष्य परंपरेतहि हिंदू गुरु आणि मुसलमान शिष्य किंव्हा मुस्लिम गुरु आणि हिंदू शिष्य हे दिसते. बहुधा याचे कारण कि यांचा सगळ्यांचा खरा धर्म शास्त्रीय संगीत आहे आणि सरस्वती, गणपती आणि श्रीकृष्ण हीच आराध्य दैवत आहेत. 

या दरम्यात कर्नाटिक संगीत ऐकण्याची माझी गाडी हळू हळू पुढे सरकत होती. त्यागराज स्वामी हे कर्नाटिक संगीताचे थोर संकल्पक, कीर्तनकार, भजनकार होते. (मराठी तंजोर राज्यकाळात यांनी आपले जीवन कंठिले) त्यांची 'गिरीराज सुधा' ही 'कीर्ती' फार प्रसिद्ध आहे. याची कीर्तीची नवीन काळातील वाद्यांना घेऊन एक नवीन संकल्पना 'रिमेम्बइरिंग शक्ती' नावाच्या एका वाद्यवृदांने (बँड) केलेली आहे. या वाद्यवृंदात संगीत क्षेत्रातील एक से एक धुरंधर आहेत. गायकीला शंकर महादेवन, तबल्यावर झाकीर हुसेन, मंडोलीन वर यु. श्रीनिवास, गिटार वर जॉन मॅकलौघालीं आणि घटकं व मृदंगम वर वी. सेल्वराज आहेत. या सगळ्यांचा 'गिरीराज सुधा' चा नवीन आविष्कार म्हणजे पंचपक्वांनाची मेजवानीच. कर्नाटिक संगीताचा वारसा जपत, तरी नवीन काळाच्या 'कानांना' रुचेल अश्या संगीतात एखाद्या दोनशे-तीनशे वर्ष जुन्या कीर्तीला गुंफणे हे सोपे नाहीं. पण संगीत क्षेत्रातील दिग्गज एकत्र येतात तेंव्हा काहीच कठीण नाहीं! 

कॉलेज च्या शेवटल्या वर्षी मला उस्ताद झाकीर हुसेन आणि श्री अनुप जलोटा यांच्या बैठकीचा अनुभव मिळाला. पहिल्या अर्ध्यात केवळ झाकीर हुसेन आणि मग दुसऱ्या अर्ध्यात अनुप जलोटा यांची भजने, आणि झाकीर हुसेन यांची साथ असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. झाकीर हुसेन यांनी केवळ तबला वादनच केले असे नाहीं. त्यांनी भारतीय संगीत, भारतीय वाद्ये आणि तबला या विषयांवर एक 'मास्टर क्लास' घेतला. भारतीय संगीत परंपरा किती जुनी आहे, आपल्या प्रत्येक देवाचे आणि देवीचे एक विशिष्ट वाद्य असते, तबल्याचा इतिहास कुठून सुरु होतो अश्या तऱ्हेची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रम तर उत्तम होताच पण कार्यक्रमानंतर मी त्यांच्या खोलीशी ताटकळत उभा होतो. तर त्यांनी आत बोलावले. मी रीतसर 'कार्यक्रम बहोत अच्छा हुआ' असं काहीसा म्हणालो आणि नमस्कार करायला खाली वाकलो तर त्यांनी एकदम हात धरलेत आणि "जवान हो, पैर नाहीं, दिल से मिलो" असा म्हणत मिठी मारली. इतका थोर माणूस पण त्यांच्यात विलक्षण नम्रता होती. संगीताचे आणि संगीत परंपरेचे ते खरे साधक आहेत.

या सगळ्या घडामोडीत वर्षे जात होती आणि मला शास्त्रीय संगीताचे नव-नवीन हिरे मिळत होते. मला कुठला राग आहे हे कधीच कळत नाहीं. माझ्या मामा ला राग कुठला आणि कुठला राग कधी गायला हवा हे माहिती आहे. मला अजूनही कळत नाहीं. पण चांगला पदार्थ, चांगलं चित्र, चांगलं वस्त्र यांच्यातील बारकावे कधी नाहीं कळले तरी ते उत्तम प्रतीचे आहे हे नक्कीच लक्षात येते. तसेच माझे शास्त्रीय संगीताच्या बाबतीत होत होते. परदेशी असतांना मी तेथील मंदिरांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना जात असे. दक्षिण भारतीय देऊळ असेल (तेलगू समाजाने अमेरिकेत अनेक मंदिरे बांधली आहेत) तर एकतर भरतनाट्यम किंव्हा कुचिपुडी नृत्यूचं कार्यक्रम असे किंव्हा कर्नटिक संगीत ऐकायला मिळे. कुठलीही नवीन रचना ऐकली किंव्हा नवीन राग ऐकलं कि मी त्यावर उगाच संशोधन करायला लागलो. गायक, घराणे, गान-पद्धती, त्या गायकाचे इतर आविष्कार, आणि गायलेले आवडले तर ते पाठ करायचे. पंडित जसराज यांच्यामुळे आदी शंकराचार्याच्या बऱ्याच रचनांची ओळख झाली. गंगा स्तोत्रम हे गंगा महिमा आहे. त्यातील ११ वे कडवे - "वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।" हे पंडितजी इतके काकुळतेने गातात कि त्यांनी गायलेले गंगा स्तोत्र ऐकून गंगा माई माझ्यासारख्या ऐकणाऱ्यावरही प्रसन्न होईल. 

नुकतीच मला कर्नाटिक पद्धतीत प्रस्तुत केलेली एक जुनी पण प्रसिद्ध रचना - 'कलिंगा नर्तन तिल्लन' ऐकण्यात आले. अरुण साईराम किंव्हा कुलदीप पै या सारख्या प्रसिद्ध गायकांनी  हि 'तिल्लना' प्रस्तुत केली आहे. तिल्लना म्हणजे तालबद्ध रचना. बैठकीच्या शेवटी या पद्धतीत रचना गायली जाते. साधारण या रचनेवर नृत्य केल्या जाते. माझी आवडती 'कलिंगा नर्तन तिल्लन' प्रस्तुती निदमंगलम कृष्णामूर्थी भागवतार यांची आहे. हि तिल्लना चे रचेते श्री उथकुडू व्यंकट कवी म्हणून आहेत. हे मूळचे तामिळनाडूचे कवी आहेत आणि यांचा कार्यकाळ अठराव्या शतकात होता. श्री व्यंकट कवींच्या प्रतिभेचे ठसे अजूनही तामिळ संगीत जगतावर दिसतात. या रचनेचा कल्पनाविलास म्हणजे श्रीकृष्णाने कालियामर्दनाच्या वेळेस कालिया नागाच्या डोक्यावर नृत्य या तालावर केले असणार.  भागवत कीर्तन किंव्हा हरीकथेत, भागवतकार या रचनेला गात असत. नीट लक्ष देऊन ऐकलंत तर मधेच गायक 'हिस्स' असं स्वर काढतात. हा स्वर म्हणजे कालिया थकून आणि पराजित होऊन तलावातून निघून जातो आहे. 

काही महिन्यांपूर्वी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना गातांना ऐकले. सोबत उस्ताद विलायत खान होते. आणि बिस्मिल्लाह खान स्वतः शहनाई पण वाजवीत होते पण मध्ये त्यांनी शहनाई बाजूला ठेऊन गाणे सुरु केले. खर्जातील त्यांचा आवाज वेगळा होता पण गाणे सुरेल आहे. मी त्यांच्या बद्दल वाचायला लागलो तर मागे त्यांनी एका मुलाखतीत त्यांना बाळकृष्ण  ट्रेन मध्ये अचानक कसा भेटला हा अनुभव सांगितला आहे. आणि बाळकृष्ण त्यांना एकदाच भेटला असे नाहीं. तर त्यांच्या लहानपणी त्यांच्या काकांसोबत ते घराजवळच्या बालाजी मंदिरात रियाज करीत असत. एकदा ते तल्लीन होऊन काही तास शहनाई वाजवीत होते. डोळे उघडले तर समोर गाभाऱ्यातील बालाजी बसललेला! अद्भुत प्रसंग आहेत. त्यांचा गुगल वर एक फोटो आहे. बिस्मिल्लाह खान त्यांच्या अंथरुणावर बसून आहेत. त्यात फोटोत समोर भिंतीवर बाळकृष्णाची फोटो आहे. म्हणजे सकाळी डोळे उघडून बसलेत कि त्यांना पहिले समोर बाळकृष्ण दिसत असणार. 

मधे राग देश वर आधारित रचना शोधतांना मला विदुषी शुभा मुदगल यांनी गायलेली  'बाजत नगारे' हि रचना सापडली. या कवितेला ब्रिज भाषेतील 'कवित्त' असे म्हणतात. हे कवित्त मुबारक अली 'बिलग्रामी' यांनी लिहिलेली आहे. मला कवित्त हा प्रकार नव्याने कळला. शुभाबाईंनी हे कवित्त अत्यंत प्रसन्न गायले आहे आणि कवित्तेचे शब्द साधे असले तरी रसाळ आहे. कवित्त वाचतांनाऐकतांना पाऊस होतो आहे असा भास होतो. सगळे शब्द मला समजले नाहीं पण एक ओळ मला भावली - 'नीलग्रीव नाच कारी कोकिल आलाप चारी,'. यातील नीलग्रीव म्हणजे शंकर अपेक्षित आहे कि निळ्या मानेचा मोर? 

विविध तऱ्हेच्या कलांमध्ये संगीत कलेला वेगळ्या पंक्तीत बसवायला हवे. मनुष्य जेंव्हा झाडावरून उतरून वानराचा नर झाला तेंव्हा पासून तो शिट्टी वाजवून गुणगुणायला लागला असणार. आणि तेंव्हापासून कोणी तरी गाणं गातो आणि कोणी तरी गाणं ऐकतो. आनंद देण्याचा आणि आनंद घेण्याचा याहून सोपा मार्ग बहुधा नसावा. भारतीय शास्त्रीय संगीताने या आनंदाला संस्कृतीची कोनशिला बनविली. पिढ्यानपिढ्या पुढे देता येईल असा ठेवा बनविला. सोळाव्या शतकातील मुबारक अली या मुसलमानाने ब्रिज भाषेत इतकी सुंदर कविता लिहिली आणि पाचशे वर्षांनी राग देश मध्ये शुभा बाई मृगाच्या पहिल्या सरी  सारख्या गायल्यात. या संगीताच्या भक्तीत बिस्मिल्लाह खान यांना बाळकृष्ण भेटून नवीन राग शिकवतो तर भारतापासून हजारो मैल दूर पंडित जसराज कृष्णाचा जप करून प्रेक्षकांना देवत्वाचा भास करून देतात. या हजारो वर्ष अखंड चालू असलेल्या संगीत परंपरेचा, संस्कृतीचा आणि संगीत मार्तंडांचा अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो हे माझ्या सारख्या पामराचे भाग्य.