3/17/21

माझ्या बालपणीचे वन्यजीवन (शहर आवृत्ती!) - भाग २

आमच्या घराच्या फारश्या जुन्या होत्या त्यामुळे दोन फरश्यांच्या मध्ये कुठे-कुठे भेगा होत्या. त्यामुळे त्यातून मुंग्या आणि मुंगळ्यांची अखंड वर्दळ असे. सकाळी नीट झाडलं तरी संध्याकाळ पर्यंत जनता परत जैसे थे ! आमच्या घराच्या मधल्या अंगणात आम्ही क्रिकेट खेळत असू. अंगणाच्या एका बाजूला जिना आणि दुसर्या बाजूला धुण्याचा दगड, एका बाजूला दोन नळ व पायरी चढून न्हाणीघर तर दुसर्या बाजूला खोल्यांचे दरवाजे व जास्वंदीचे झाड. त्यात आम्हे अंडर-हॅन्ड स्पिन क्रिकेट खेळायचो. खूप मजा येत असे कारण चेंडू कुठे लागल्यावर आऊट याची गिनती, कुठल्या भिंतीवर चेंडू लागल्यावर धावा बनणार याहून अधिक होती. मी एकदा कोपऱ्यातला चौका अडवायला म्हणून फिल्डिंग करीत होतो. समोरून, जमिनीवर मुंग्याची ओळ जात होती. एक मोट्ठा मुंगळा पण त्या गर्दीत होता. मला तेंव्हा वाटत असे की मुंगळे कमी दिसतात त्यामुळे त्यांना मारायला नको. म्हणून विचार केला त्याला बोटावर चढू देऊन, त्याला अंगणाच्या कोपर्यात सोडावे. प्लॅन चा पहिला भाग सोपा होता आणि मुंगळा पटकन बोटावर चढला. मी त्याला कोपर्यात नेई तोवर त्या मुंगळ्याने नांगी सपाटून बोटाच्या टोकावर खुपसली. आई ग! काय चावतो मुंगळा, काय सांगु! पण त्या क्षणभरात मी धर्म संकटांत पडलो. झटकला हात तर तो मुंगळा मारणार, चिरडला तर नक्कीच मरणार आणि तसे झाले तर एवढा खटाटोप करायचाच कशाला? या दरम्यान इथे बोटाला झिणझीण्या यायला लागल्या होत्या. मी निष्ठेने त्या मुंगळ्याला कोपर्यात जमिनी लगत झटकून सोडले. मारले नाही. तो मुंगळा पण विचार करीत असेल की "मी आपल्या रस्त्याने जात होतो तर या ढकण्याने मध्ये चावायला त्याचे बोट का दिले?" असो.   होतकरू बावळट मुलांसाठी एवढाच उपदेश की मुंगळ्यांच्या वाटेला जाऊ नये! 

आमच्या घरी चिमण्यांचा खूप कलकलाट असे. घराच्या वेग-वेगळ्या भागात बऱ्याच पिढ्या मोठ्या झाल्यात. कौलारू घर होत आणि मध्ये अंगण होते त्यामुळे खूप खोबण्या मिळायच्यात घरटी बांधायला.  या सगळ्या चिमण्या कपडे वाळत घालायच्या दोरीवर दुपारी बसून खूप गोंधळ घालीत असत. मी खूप पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चाप किव्हा जाळी वगैरे लावून नाही, लपून बसून त्यांच्या मागे अचानक धावून. खूप टाइम पास व्हायचा! अर्थात कधीच एकही चिमणी हाती लागली नाही पण उडायला शिकण्याच्या वेळी पिल्ल मात्र खूप उचलून परत घरट्यात ठेवलीत. एक वेगळा आनंद मिळत असे पिल्लू परत घरट्यात ठेवण्यात. एकदा हात लागलेलया पिल्लाला चिमणी परत घरट्यात घेत नाही वगैरे निव्वळ आख्यायिका आहेत. कवी कल्पना आहेत.  माझ्या सारख्या शंखाचा हात लागला म्हणून कुठली चिमणी आपल्या पिल्लाला टाकून देईल का? जशी चिवचिवाटाची सवय आपल्याला होते तशीच आपली पण सवय त्यांना होते. कपड्यांच्या दोरीवर दररोज मिटिंग भरत होती तर आमच्या घराच्या सगळ्यांचा वास त्यांना परिचित असणारच. असो. आपल्या सेल फोन च्या वेव्ह्स मुळे चिमण्यांची फार वाताहात झाली असे कुठेतरी वाचले. वैज्ञानिक सत्य यात किती माहिती नाही पण संख्या नक्कीच झपाट्याने कमी झाली.  आता ज्या बिल्डिंग मध्ये राहातो तिचे चिमण्या थोड्या बघून दिसतात. माझे लहानपणाचे घर सोडूनही खूप वर्ष झालीत पण ही त्या चिवचिवाटाची आठवण कानात कायम आहे. 

आता घर ही राहिले नाही. आई-बाबा शहराच्या वेगळ्या भागात राहायला गेलेत. ज्याने घर घेतले त्याने ते तसेच खूप वर्ष ठेवले होते पण नुकतेच ते घर ही पाडले. आजूबाजूचा परिसर फार बदलला. मागची गल्ली पण आधी सिमेंट ची झाली आणि मग लोकांनी घर वाढवून घ्यायची म्हणून गल्ली खाऊन टाकली.  तिथल्या मुंगुसाचं काय झाल असेल? कुठे गेली असतील? बोके आणि मांजरी? घराच्या सावलीत उभ्या राहण्याऱ्या गायी?  समोरचे मोठे मैदानात मेट्रोचे अगडबंब  खांब आलेत. वर्दळ ही फार वाढली. नाग नदी अजून छोटीशी होऊन गेली आणि म्हशी पण नाहीश्या झाल्यात आणि रॉकेलचा बैल पण. गल्लीच काय पण शहर सोडून दोन दशक व्हायला आलीत. लहानपणीचा परिसर आता फार लहान वाटतो. गल्ल्या अरुंद वाटतात. घर छोटी वाटतात.  काळाचा पडदा ओळखीच्या वास्तू व खुणावर झपाट्याने ओढल्या जातोय. त्या पडद्याखाली आठवणी सुद्धा आता हळू हळू अंधुक, धूसर होतील या विचाराने मन भ्रमित होते. पण त्याला काही इलाज नाही. काळाच्या काखोटीची आपण खेळणी, पुढे पुढे जात राहण्याशिवाय गत्यंतर नाही. 

माझे लहानपण या शहरातल्या प्राणीमात्रांने मात्र समृद्ध केले. हे मुके जीव त्यांच्या अजाणतेपणे आणि माझ्या नकळत माझे सवंगडी झालेत. या निखळ आनंदाचा धनी झालो हे काय कमी आहे? 

(समाप्त)

1 comment:

Anonymous said...

खूप छान लेख.