सध्या श्री सेतू माधवराव पगडीकृत इतिहास वाचन चालू आहे. त्यांनी असंख्य पुस्तके लिहिलीत. त्याचे संक्षिप्तात किंव्हा ज्याला इंग्रजीत overview असे म्हणता येईल असे, शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर ते औरंग्याच्या मरणापर्यंतचा काळ असे हे पुस्तक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकाळ सन १६८९ पर्यंत. मग छत्रपती राजाराम महाराजांचा कार्यकाळ सन १६९९ पर्यंत मग सन १७०७ पर्यंतचा काळ जो ताराबाई राणी यांनी गाजवला. सन १७०७ ला जेंव्हा औरंग्या मेला तेंव्हा मराठ्यांचे २५ वर्षाचे स्वातंत्र्य युद्ध संपले. या पुस्तकातून काही माहिती, विचार आणि द्रुष्टीकोन मला नाविन्यानी कळलेत किंव्हा उमगल्यात.
१) छत्रपती संभाजी महाराज ढाण्या वाघ होते - शिवाजी महाराजांच्या अचानक झालेल्या मृत्यू नंतर संभाजी महाराजांवर जणू फक्त संकटच कोसळत होती. आधी घरातील भाऊबंदकी आणि आजूबाजूला असलेली घरभेदी मंडळी पासून स्वतःला वाचविणे आणि दोन वर्षात औरंग्या दिल्ली हुन समुद्रमय सैन्य घेऊन स्वराज्यात उतरणे, हे बघता कोणीही सामान्य माणूस गांगरून गेला असता. यात त्यांच्यावर दोन जीवघेणे हल्ले हि झालेत. औरंग्याचे दक्खनी उतरणे हि साधारण गोष्ट नव्हती. त्याच्या सोबत दीडशे वर्ष उत्तर भारतात अनभिषिक्त सत्ता गाजवणारी मुघल सत्तेची सर्व संपत्ती, सामुग्री आणि सैन्य होते. औरंगझेबाच्या ध्येय मोघली सत्तेचा प्रसार एवढेच नसून, हंपी हिंदू साम्रज्याच्या सन १५४५ च्या विध्वंसा नंतर जवळ जवळ सव्वाशे वर्षांनी पुन्हा गर्वाने उभे राहिलेल्या हिंदू साम्राज्याचा मुळापासून विनाश करणे हा होता. औरंगझेबाने त्याच्या सरदारांना लिहिलेल्या अनेक पत्रातून 'मी या मराठ्यां विरुद्ध जिहाद करायला आलो आहे' याचा उल्लेख होतो. अश्या अत्यंत बिकट परिस्थितीत संभाजी महाराजांनी ९ वर्षे अखंड आणि अविरत लढा दिला. मोघालाविरुद्ध, उरलेल्या आदिलशाही विरुद्ध, पोर्तुगीसविरुद्ध ते छाती ठोकून लढले. पगडी यांच्या पुस्तकातील संभाजी महाराजांच्या पहिल्या तीन वर्षातील ठळक हालचालींची रूपरेषा बघावी:
सन १६८०-८१ संभाजी महाराजांचे रायगडी आगमन, मंचकारोहण व सन १६८१ ला राज्याभिषेक
सन १६८२ ला शाहजादा अकबर याची पाली ला भेट
सन १६८२ ला दंडापुरीच्या वेढ्यात महाराज उपस्थित
सन १६८३ ला कल्याण-भिवंडी भागात महाराज कार्यरत
सन १६८३ ला रेव-दंड्याच्या वेढ्यात
सन १६८३ ला महाराजांची गोव्याची मोहीम
परिस्थितीला घाबरून काही मातब्बर मराठी सरदार घराणी मोघलांना जाऊन मिळत होती पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांना खरमरीत पत्रे लिहून धर्माची आणि स्वराज्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सगळ्यात मोठे पाठिंबेदार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा एका चढाईत सन १६८७ मृत्यू झाला पण तरी संभाजी महाराज लढत राहिले. औरंगझेब सन १६८२ ला दख्खनी आला. महाराजांनी ताबडतोब सगळ्या किल्ल्यांवर जोरदार रसद आणि सैन्याची तयारी केली. औरंगझेबाच्या मुलाला पाठीशी घेऊन मुघलांच्या सगळ्यात मोठ्या पाठिराख्यांचा - राजपुतांमध्ये फूट पडून, औरंग्याला द्विधा मनस्थिती पाडण्याची खेळी खेळली. गोळकोंड्याचा कुतुबशाह आणि उरलेला आदिलशहाशी गठबंधंन करून एक सामूहिक फळी उभारण्याचा प्रयत्न केला. आणि या दरम्यान ते पोर्तुगीसशी लढलेत. पण त्यांच्या कुठल्याही राजकारणाच्या सोंगट्यांना यश आले नाहीं. किंव्हा यश येण्यास जो अवधी लागतो त्या आधीच ते वीरगतीस प्राप्त झालेत.
"मृत्यो मा अमृतंगमय" सारखेच त्यांच्या धर्मसाठी जीव देण्याच्या वीरतेने सकळ मराठी समाज जागृत झाला. आणि त्यांच्या जीवनाच्या मिटत्या समयीने धर्मांध आणि क्रूर मुसलमानां विरुद्ध लढण्याचा वन्ही पेटला. श्री पगडी यांच्या मते संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर औरंग्याला वाटले कि आता हिंदवी स्वराज्य संपले पण त्याच्या अगदी विरुद्ध झाले. मराठे जागृत झाले, चेतावले आणि जागा मिळेल तिथे, जसे जमेल, जेवढे जमेल तिथे मोघलांना धोपटणे चालू झाले. कोकणापासून ते बिदर, गुलबर्गा, जिंजी पासून ते खानदेशापर्यंत लढणाऱ्यांच्या अनेक फळ्या उभ्या झाल्यात आणि मोगलांशी झुंजू लागल्यात. आणि याच मूळ श्रेय छत्रपती संभाजी यांच्या जीवन संघर्षाला आणि धर्मा साठी मरणाला मिठी मारण्याच्या महान कृत्याला द्यावं लागेल.
गनिमी कावा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून मराठे गनिमी काव्या साठी प्रसिद्ध होते. सह्यांद्रीला जणू सेनापती बनवून स्वराज्याचे सैन्या खूप लढले. पण गनिमी कावा म्हणजे केवळ कडे-कपाऱ्यांचा आधार घेत लढणे नव्हे. शत्रूला गाफील ठेवणे, विजेच्या गतीने हालचाली करणे, आणि झडपीचे किंव्हा लढाईचे अंतिम लक्ष्य हे प्रत्यक्षात उभरत असलेल्या परिस्थितीला बघून बदलविणे आणि बिकट परिस्थिती वाटल्यास ताबडतोब काढता पाय घेणे. याला पळणे म्हणणे चुकीचे आहे कारण मराठ्यांची धाड पुन्हा पडणार हे नक्की. झटापटीतून निसटून परत वार होणारच. युद्धात जय-विजय याची परिभाषा मराठी सैन्यानें बदलविली. खूपदा गनिमी काव्याचा हल्ला मोगलांची तयारी बघणे एवढेच असे. घाई गडबडीत मोगल त्यांचे जणू सगळे पत्ते समोर ठेवत. त्यांच्या सैन्याची परिस्थिती कशी आहे आणि त्यांना चोपायला हवे कि कोंडून खंडणी वसूल करणे बरे ठरेल? तसेच, एका मोघली तुकडीवर हल्ला करून, दूरच्या तुकडीला मदतीस यायला भाग पाडणे आणि ती तुकडी आली की पळ काढणे. स्वराज्याला, लोकांना, मराठी सैन्याला उसंत मिळावी याचा प्रयत्न करणे, मोघलांना नेहमी एका पायावर उभा ठेवणे असे अनेक ध्येय या गनिमी काव्याच्या मागे होती.
शत्रू नेहमी याच विचारात असेल कि पुढला हल्ला कधी होईल. मोगलांकडे पैसे आणि माणसे असंख्य होती त्यामुळे त्यांच्याशी खुल्या मैदानात युद्ध करणे जोहार ठरला असता. मराठ्यांनी ठरवले कि मोगलांना सतत असंख्य जखमा करून, सतत रक्तबंबाळ करून, थकवून मारायचे. या युद्धशैलीत संताजी आणि धनाजी वस्ताद होते. त्यांची घोडी जणू भिंगरी होती आणि त्यांचे सैन्य म्हणजे झंझावात. मोगली घोड्यांना संताजी आणि धनाजी पाण्यात दिसायची म्हणे. अर्थात हे शक्य नसले तरी पाणी प्यायची उसंत मोगली घोड्यांना नव्हती हे या मागची खरी परिस्थिती होती.
३) औरंगझेब तेवढा मुत्सद्दी नव्हता आणि हुशार नव्हता: औरंगझेबाच्या सगळ्यात मोठा गुण म्हणजे तो दीर्घायुषी होता. ज्या काळात लोक चाळीशीहि गाठत नसत तिथे त्याने नव्वदी गाठली. त्यामुळे त्याने असंख्य कारभार आयुष्यभर केलेत. त्यात काहींत यश मिळणे साहजिकच आहे. पण त्याच्या जीवनाचा एकूण आढावा घेतला तर औरंग्या, जो बाबर ने स्थापन केलेल्या राज्याचा सहावा वंशज होता आणि प्रत्येक बाबतीत शेवटला ठरला. त्याच्या नंतरचे मोघल 'सम्राट' भुसा भरलेले पेंढे होते. त्याने राजकीय आणि युद्धक्षेत्रात जितक्या चुका मराठ्यांविरुद्ध केल्यात त्या अजून कोणी केल्या असत्या तर एकतर युद्ध कधीच संपलेअसते किंव्हा त्या राज्याचा दिवाळं निघालं असतं. पण औरंग्या पर्यंत मोघलांनी भारताला इतका लुटलं होत कि त्या घराण्याचा दिवाळं काढायलाही औरंग्याला पंचवीस वर्षे लागलीत. त्याने संभाजी महाराजांची अत्यंत निर्घृण रीतीने हत्या केली ज्यामुळे अगदी जन-सामान्यही चेकाळले. त्याने छत्रपती राजाराम महाराजांना निसटू दिले. मग जिंजीच्या वेढ्यात असंख्य सैन्य आणि पैसे गुंतवला. त्या दरम्यान मराठे प्रत्येक बाजूने त्याच्या सैन्याला घायाळ करू लागले. तो डोक्यात राख घालून मराठ्यांचे किल्ले घेण्याच्या मागे लागला. त्यात त्याच्या लक्षात नाही आले कि मराठ्यांनी त्यांची युद्ध-नीती बदलवली आहे. औरंगझेबाच्या सैन्याला एका एका किल्ल्या मागे महिना-महिना गुंतावून ठेवून, मराठे भारतात इतरत्र पसरू लागले. त्याच्या हयातीतच मराठे नर्मदा ओलांडून माळवा प्रांतात पोचले आणि दक्षिणेत मछलीपट्टणम पर्यंत निर्धास्त हिंडू लागलेत. एवढेच नाहीत तर मराठ्यांनी सगळीकडे आपले सरदार बसवून कर घेणे हि चालू केले. किल्ले घेऊन मराठ्यांना कोंडण्याचा बावळटपणात औरंगझेब स्वतःच जणू किल्ल्यांमध्ये कैद झाला. त्याच्या सोबतीची सरदार एक-एक करून 'अल्ला' ला प्यारे झालेत आणि हा मागे एकटाच खुडत राहिला. मोघलांचे तत्कालीन इतिहासकार लिहितात कि मराठे औरंग्याच्या दिर्घआयुषाचे नवस करीत कारण जो पर्यन्त हा दख्खनी असेल तो पर्यंत उत्तरेतून खजिना दक्षिणेत येत रहाणार आणि मराठ्यांना अनासायास मिळत रहणार. स्वतःच्या बापाला, भावंडांना व पुढे मुलांना मारून हा धर्मान्ध, क्रूर आणि गर्विष्ठ 'बादशाह' शेवटी बापजाद्या पासून जमवलेली संपत्ती आणि राज्य मराठ्यांना देऊन एकाकीच आणि अक्षरशः चिखल साचलेल्या तंबूत मेला.
--
मराठी इतिहास वैभवशाली आहे यात वाद नाही पण यात असंख्य बारकावे आणि घडामोडी आहेत. या साम्राज्यात असंख्य पात्रे पण आहेत. गेल्या हजार वर्षात हंपी च्या विजयानगरच्या साम्राज्य नंतर हिंदुस्थानवर लखलखणारा तारा म्हणजे मराठी हिंदवी स्वराज्य. पण हिंदवी स्वराज्य विजयानगरच्याहि एक पाऊल पुढे होते कारण स्वराज्यकर्त्यांनी शत्रू मुसलमान आहे हे ओळखले होते आणि या परदेशी धर्मान्ध मुसलमानांना भारत भूमीतून हाकलले शिवाय उसंत नाही यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अहिल्याबाई आणि महादजी पर्यंत सगळ्यांनी अखंड कष्ट उपसलेत. भारतीय इतिहासावरची इंग्रजीतील पुस्तके वाचलीत तर मराठे हे जणू मोघल आणि इंग्रजी राज्या मधला स्वल्पविराम म्हणून दर्शविल्या जात. इंग्रजी साम्राज्याची सुरुवात तर पानिपत युद्धाच्या आधीपासून म्हणजे सन १७५९ पासूनच सांगितल्या जात! यात काही तथ्य नाही आणि सत्य तर मुळीच नाहीं.
मग सत्य काय? खरा इतिहास काय? नुसतं 'जय शिवाजी, जय भवानी' म्हणून भागायचं नाहीं? इतिहासाचा रीतसर अभ्यास हवा, त्या अभ्यासाला जागतिक घडामोडींशी पडताळून बघायला हवे. पण याचा उपयोग काय? याच्या उत्तराच्या शोधाचा नवीन लेख लिहावा लागेल. पण गेल्या तीनशे वर्षात फक्त मराठी लोकच आक्रमकांशी प्रखरतेने लढलेत. आणि ते अख्या भारतखंडाच्या स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी लढलेत. स्वजाती, स्वभाषा किंव्हा आप-आपल्या राज्यापुरती त्यांचा लढा सीमित नव्हता. छत्रपती शिवाजीनं पासून ते अहिल्याबाईंच्या पत्रातून देश व धर्मासाठीचा कळवळा प्रकर्षाने जाणवतो. आणि असेच नेतृत्व व अश्याच विचारसरणीची आवश्यकता पुन्हा देशाला आहे. आपण आपला इतिहास जाणला तरच आपल्या उद्याचा भारत साकारायला प्रवृत्त होऊ, नाही का?
No comments:
Post a Comment