10/22/24

पु. ल. - एक ठेवा ( भाग १ )

पु. ल. देशपांडे हे एक थोर विनोदी लेखक होतेच पण त्याहून अधिक ते एक थोर विचारवंत होते. त्यांच्या विनोदी लेखनातून पण त्यांच्या विचारवंत व्यक्तिमत्वाची सावली सतत भासतेच पण तो विनासायस विनोद वाचण्यात त्यामागील त्यांचे संवेदनशील मन, जगण्यावर उत्कट प्रेम, मानवतेवरचा अढळ विश्वास, मनुष्याकडे सदैव सकारात्मक दृष्टीने बघण्याचा अट्टाहास आणि समाजाच्या दृष्टीने असलेली कर्तव्य दक्षतेकडे कानाडोळा होतो. थोर मोठ्यांच्या बाबतीत नेहमीच असे होते. त्यांच्या असामान्यत्वात आणि आपल्या अती-सामान्यत्वात इतकी तफावत असते कि त्या थोर माणसाच्या सगळ्या पैलूंकडे बघणे किंव्हा त्यांच्या सगळी पैलूंची कल्पना येणे अशक्य असते. पु. ल. यांचे लेखन, चित्रपटातील कामगिरी, अभिनय, त्यांची संगीताची ओढ, अश्या अनेक अंगांकडे बघण्यात धांदल उडते. 

कुठल्याही लेखकाची किंव्हा लेखनाची महती कशी ठरवायची? जे लेखन जेंव्हा प्रकाशित झाले तेंव्हा प्रसिद्ध झालेले असतेच पण कालानुरूप त्यातील ताजेपणा तसूभरही कमी होत नाहीं. काही दशके असो कि काही शतके असो पण नव-नवीन वाचकवृंद जणू काही नुकतेच प्रकाशित झाले आहे असल्या रसिकतेने किंव्हा प्रसन्नतेने त्या लेखनाचे स्वागत करतो तेंव्हा त्या लेखकाची किंव्हा लेखाचे महात्म्य निश्चित होते. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हजार वर्षांनी पण तेवढ्याच भक्तिभावाने वाचल्या जाते आहे आणि वाचणाऱ्यांचे जीवन मधुर करिते आहे. अर्थात अशी उदाहरणे कमी आढळतात. काळ आणि वेळ बदलला तरी वाचकाला लिहिलेल्या शब्दांशी आपुलकी वाटणे, त्यातील कल्पनेचा गोडवा किंव्हा विचारांची उत्तुंगता जाणवणे किंव्हा मांडलेल्या विचारांना काळाचे बंधन न जाणवता सध्या परिस्थितीतही ते लागू होण्याची प्रचिती येणे हे लेखकाचे खरे यश. जणू लेखकाला चिरंतन सत्य गवसले आहे आणि निव्वळ आपल्या साठी त्याने सोप्या भाषेत शब्दांकित केले आहे. 

पु. लं. चे लेखन या सगळ्या कसोटींवर यशस्वी ठरते. नुकतेच त्यांचे लेख, स्फुट लेखन, भाषणे इत्यादींचे संकलित पुस्तक वाचनात आले. नवीन काळात या तऱ्हेच्या लेखनाला ब्लॉग्स म्हटल्या गेले असते. त्यांनी अनेक विषयांना हाताळले आहे. यात काही विनोदी लेख पण आहेत पण त्यातील विनोद आत्ताच्या काळाच्या चवींना रुचणारा नाहीं असे मला वाटते. पण त्यांचे वैचारिक लेख मात्र अजूनहि पटतात आणि वाचणाऱ्यास विचान्मुख करितात. 

पुस्तकातील पहिला लेख गांधीजींवर आहे - "जेंव्हा माझं नातं एका सूर्याशी जडलं होतं...". आता गांधी हे व्यक्तिमत्व किंव्हा विचारधारा मराठी माणसाला पटल्याजोगी नाहीं. सन १६४६ चा तोरण्याची मुहूर्तमेढ असो कि सन १८५७ चा स्वातंत्र्यलढा असो, मराठी माणूस गेले तीनशे वर्षे आधी मुसलमान मग इंग्रजांशी अखंड झुंजत आला आहे. अश्या परिस्थिती मुस्लिम धार्जिणे धोरणे किंव्हा इंग्रजांशी प्रेमाचे संबंध, दोन्ही पचायला जड आहे. पण गांधींजींमध्ये काही तरी होते कि सन १९३० नंतर भारत त्यांच्या मागे उभा राहिला. पु. ल. या लेखात गांधी-माहात्म्य गात नाहीत, पण एका त्रयस्थ दृष्टिकोनातून गांधी आणि गांधी विचारांची मीमांसा करितात. 

"आपल्याला न पटलेल्या गोष्टींविषयी विरोध नोंदविणे हे वास्तविक गांधींच्याच विचारसरणीला धरून आहे. फक्त विरोधात विनयची कास सोडू नये हा गांधींच्या विचाराचा धागा असल्या विरोधकांना रुचला नसावा" या पुढे पु.ल म्हणतात:

"मतभेद नोंदवणं आणि असहिष्णुता बाळगणं यातला मुख्य फरक कुठला असावा याचा मी विचार करायला लागलो. मतभेद व्यक्त करणारा माणूस एका विचाराच्या जागी दुसरा विचार आणू इच्छितो, आणि असहिष्णू माणूस विचार नष्ट करता येत नाहीं हे दिसल्यावर विचार मांडणाऱ्या व्यक्तीला नष्ट करू इच्छितो" 

तुम्हाला गांधी पटो वा न पटो पण लेख वाचून त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होईल. गांधींच्या विचारधारेला विरोध करणारे त्यांच्या काळातही कमी नव्हते पण तरी १९३० च्या दशका नंतर त्यांचे वलय वाढत गेले, ते का? 

"गांधींना ज्या काळात खादीच सूत्र सापडलं त्या काळात, त्या सूट काढण्याच्या क्रियेला अगदी तपाचरणाचं सामर्थ्य आलं होत' कारण या क्रियेमाग व्रताची भावना होती. व्रती माणसाला अनेक पथ्य पाळावी लागतात. धैर्यानं अनेक गोष्टींना नकार द्यावा लागतो. किंबहुना, सामर्थ्याची उपासना स्वीकारण्यापेक्षा मन:पूत नकारातून होत असते. अशा जीवासाधनेला काही तंत्राचरणही करावं लागत. तास पहिला तर पंचपात्रीभर पाणी काय गतकं पिऊन टाकता येत नाहीं? मग "केशवाय नमः, नारायणाय नमः" असं म्हणत आचमन कशाला घ्यायला हवीत? गिरणीत धडाधड कापड विणलं जात असतांना हि सावकाश सावकाश विणली जाणारी खादी कशाला? पण आचमन म्हणजे तहान भागवण्यासाठी पाणी पिणं नव्हे; आपण व्रतबद्ध आहोत याची नित्य जाणीव करून देणार हे एक तंत्र असतं. पण ह्या मंत्र-तंत्रमागची ध्येयनिष्ठा, सात्विक व्रताची प्रेरणा नष्ट झाली, कि ढोंगाचा जन्म होतो, टिळेमाळे उरतात, अंतरीचा उमाळा नाहीसा होतो" 

एकाच परिच्छेदात पु. ल. यांनी गांधींच्या यशामागचे कारण आणि त्यांच्या जीवनकाळातच सुरु झालेल्या त्यांच्या गांधीवादाचा सपशेल पराभावाचे कारण, हे दोन्ही सुरेख मांडले आहे. पु. ल. गांधीवाद पटवून द्यायला निघाले नाहीत. तो उद्देश्य तरी मला या निबंधात जाणवला नाहीं पण नावडलेल्या किंव्हा न पटलेलेल्या धुत्कारणे सोपे आहे म्हणून कवटाळायाला हवे असे नाहीं. अपेक्षित आहे तो तत्वशुद्ध विचार करण्याचे धाडस. 

विचार करण्याची एक प्रक्रिया असते, विषय कुठलाही असो. धसक-फरक करीत, बेताल शब्दांना  हाताशी घेऊन उद्दाम आणि प्रक्षोभक वाक्यांच्या क्षेपणास्त्र चालवीत कुठल्या विषयावर लिहिणे सोपे आहे. पण स्वतःला त्रयस्थ आसनावर बसून समोर घडत असलेल्या किंव्हा घडलेल्या घटनांचा स्पष्ट विचार करणे सोपे नाहीं. पु. ल. यांना नेमके हे जमले आहे. 

या पुस्तकातील सगळेच लेख किंव्हा विनोदी कथा-निबंध कालानुरूप पक्व झालेत असे नाहीं. पण त्यातला खुसखुशीत पण अजून ताजा आहे. तसेच विनोदी लिहीत, वातावरण हलके करीत असतांना पु. ल अचानक एखादा धीर-गंभीर मुद्दा साळसूदपणे भिरकावतात. हसता-हसता एकदम वाचक स्तब्ध होतो. त्यांच्या "विनोदी लेखकाची दुःखं" या निबंधाचा शेवट अचानक गंभीर होतो. 

"तरीही "लोकांना मला हसवावस का वाटतं?" ह्या प्रश्नच उत्तर, "रडवावंसं वाटत नाहीं म्हणून" एवढच आहे. रडण्यासारखं खूप असलेल्या जगात ते रड थोडा कमी करता आला तर पाहावं एवढाच उद्देश. मात्र हे सार करतांना हसवणारा लेखक अनेकदा आतून उमटणारं कसलस ते रडू आवरत हसवत असतो, हे मात्र लोक विसरतात. विनोदी लेखकाचं सर्वात मोठं दुःखं आहे ते हे"  

"रसिक मंडळी - एक उच्छाद" हा लेख मला फार आवडला. खरं सांगायचं तर हा लेख आपल्या सारख्यांना लागू होत नाहीं. आपल्या १०० पैकी ९९ लोकांना रसिक नाहीं. पु. ल. केवळ साहित्यिक नव्हते ते आपण ज्यांना आता सेलिब्रिटी म्हणतो तसे ५०, ६० च्या दशकातील ते सेइब्रिटी होते. त्यांचा लेख हा कलेचा आस्वाद घेण्याचे आव्हान होते. पण त्यांचा लेख आजच्या काळात वेगळ्या कारणासाठी साठी लागू होतो कारण 'उचलली जीभ लावली टाळ्याला' याचा ऊत आत्ताच्या काळात आलेला आहे. सोशल मीडिया मुळे प्रत्येक गणू- गंपू  आपल्या मतांच्या पिंक टाकीत हिंडत असतो. पात्रता काय तर फोन विकत घेऊ शकतो. मत प्रत्येकाला हवे पण मत प्रदर्शन करणे हा हक्क नाहीं तो मिळविलेला मान आहे. चर्चा चालेल पण ठाम पणे मत मांडायला अधिकार प्राप्त करावा लागतो. आणि सतत प्रत्येक घटनेवर, वस्तूवर, कलेवर, माणसावर मत प्रदर्शन करणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे मनात नेहमी विचारांऐवजी शब्दांची धांदल असते कि यावर मी काय मत देऊ. मनाची तृप्ती कमी होते, मिळणारे सुख अंगाला लागत नाहीं. 

"साहित्य-संगीत-कलाविहीन माणूस हा शेपूट किंव्हा वशिंड नसलेला साक्षात पशू आहे असा कोण्या सुभाषितकारांनी म्हणून घोसाळी करून ठेवला आहे. समाज, असा पशू तर काय बिघडलं? पशू दुःखी असतात म्हणून कोणी सांगितलं? चिखलात पडलेलं डुक्कर उलट माणसाकडे "लेको, तुम्हाला नाही कळणार ह्या चिखलात लोळण्याचा मजा!" अश्या ऐटीत पाहत असतं.आपण उगीच त्यांना बिचार्याला चिखलात लोळावं लागत म्हणून हळहळतो. डुकरांची भाषा आपल्याला कुठं कळते? त्यांच्यातसुद्धा वयोवृद्ध डुक्कर तरुण डुकरांना "अरे, आमच्या वेळचा चिखल आता ह्या तुमच्या सिमेंट-काँक्रीटच्या दिवसात पाहायला मिळणार नाहीं. एकदा त्या चिखलात शिरलं कि आठ-आठ दिवस बाहेर यावंसं वाटायचं नाहीं." वगैरे बोलत असतील."

हे वाचून हसून हसून माझ्या डोळ्यात पाणी आलं. डुकर समोर आलीत. 

(क्रमश:) 

(या लेखाचे दोन भाग होतील असे मला अपेक्षित नव्हते. पण अजून पुस्तकातील पु.ल. च्या निदान अजून दोन लेखांवर लिहणे आवश्यक आहे असे वाटते. एकाच रुंदीत लांब लांब लिहीत गेले तर वाचायला या माध्यमात कठीण जाते म्हणून मी पुढील लेख दुसऱ्या भागात प्रकाशित करेन.) 

No comments: