8/28/11

माझा भारत - भ्रष्ट भारत, भाग २

मी मागल्या शुक्रवारी २४ तास उपास ठेवला. श्रावण म्हणुन नाही तर माझ्या भारतातल्या बांधवजनांनी समाज कल्याणार्थ जो 'गोंधळ' घातला त्यांना साथ म्हणुन. देशापासुन हजारो मैल दूर बसुन उपास करण्यात काय निष्पन्न होणार? माहिती नाही. देशात बसुनही उपास करुन काय उपाय होणार? ते बघायच. पण भ्रष्टाचारा विरुध्दही आपण एकत्र येणार नसू तर आपल भविष्य गडद आहे. या सगळ्या खटाटोपातुन काही निष्पन्न होणार नाही अस बरीच लोक अजुनही म्हणतात. बहुतेक ते सत्य असेल पण असंतोष मनात ठेवण्याची वेळ गेली. 'नेते कुत्रे आहेत' अशी वायफळ बडबड करण्याची वेळ गेली. आपल्या मायभूमीचे जात, धर्म आणि आता, आर्थिक परिस्थितीवरुन चिंधडे करुन बाजारात विकणार्‍या मिंध्या, कूपमंडुक, भ्रष्ट आणि एकुण ढेकुण जातीला जास्त शोभणार्‍या नेत्यांना धडा शिकविणे आवश्यक आहे. भारतातून प्रंचड प्रमाणावर पैसा परदेशी लंपास करायला भ्रष्ट लोक एकत्र आली आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला आपल्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य नागरीकांनी एकत्र येण ही केवळ आवश्यकताच नव्हे तर आपल कर्तव्य आहे.

मागल्या भागाला अनुरुपे मी या लेखात लोकपाला बद्दल बरचस काही लिहिल होत पण परिस्थिती गेल्या आठवड्यात झपाट्याने बदलली. कॉंग्रेस सरकारने लोकशाहीचा जो धडधडीत अपमान केल आहे आणि सत्तेच्या माजाचे जे प्रदर्शन मांडले आहे ते बघुन मन विस्मित होते. पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय घटनांचा आणि राजकारणाचा आढावा घेतला तर कॉंग्रेस सरकार जुनेच कित्ते गिरवते आहे हे लक्षात येइल.

इंदिरा गांधीच्या जमान्यात या नेत्यांनी भ्रष्टाचार जन्मसिध्द अधिकार केला. या जमान्यात देशापेक्षा गांधी आण्णावाच्या व्यक्तीची पूजा परम ठरली. आणि कॉंग्रेस पक्ष या घराण्याची वैयक्तिक मालमत्ता झाली. सत्ता टिकविणे हे राजकारणाचे ध्येय बनले. राजकारण आणि प्रशासन व्यवस्थेतील लक्ष्मण रेखा नाहीशी झाली. देशाची आणि समाजाची प्रगती केवळ भाषणां मधे बंदिस्त झाल्यात. इंदिरा गांधींना केवळ केंद्रीय सत्तेचीच चटक नव्हती तर राज्य स्तरावरही काँग्रेस व्यतिरिक्त दुसर कुठल सरकार आलेल त्यांना फारस रुचत नसे. केरळ, पंजाब आणि आसाम मधे त्यांनी काँग्रेस सरकार प्रस्थापित करण्यासाठी राजकीय कपटाचा कळस गाठला. १९७५ सालच्या केंद्रिय निवडणुकांना लोकशाही त्यांना निवडुण देणार नाही हे ध्यानात आल्यावर त्यांनी सत्तेत कायम रहाण्याचा . एक सोपा उपाय त्यांनी काढला. त्यांनी लोकशाहीच बरखास्त केली. सत्तांधळे होउन बेदुंध वागण्याचे बाळकडु त्यावेळच्या राजकारणातल्या पिल्लांना याच काळात पाजल्या गेलेत. आज हिच पिल्ल सत्ताकेंद्री आहेत.

ही अधोगतीची सुरुवात होती. इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर सत्तधारी कॉंग्रेसच्या लोकांनी सिखांच जे हत्यासत्र चालू केल ते असो किंवा राजीव गांधींच्या कारागिर्दीतले शहाबानो प्रकरण असो किंवा बाबरी मशिदीची दार आरती साठी उघडण असो, दूरदृष्टी आणि सामंजस्याचा अभाव प्रत्येक वळणावर आढळुन येतो. सिखांची निर्मम हत्या म्हणजे आपल्या देशाची आणि समाजाची शोकांतिका आहे. या वर गांधी आण्णाव असल्यामुळे अहेरात पंतप्रधान पद मिळालेल्या राजीव गांधींनी काय म्हणाव ? "वटवृक्ष पडल की गवताला इजा होतेच"

सन १९८४ ते १९८७ च्या कालावधीतील सांसदीय कार्यवाही म्हणजे गुंडगिरी झाली होती आणि प्रशासन पोरखेळ. या दरम्यान भारताची अर्थ व्यवस्था भंगारात काढायची वेळ आली होती. १९९१ ला आपल सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. पण आपल्या सत्ताधार्‍यांनी अर्थव्यवस्थेला रांगी लावण्याच्या ऐवजी आरक्षणाच्या द्वारे समाजाच जातींवरुन अजुन विभाजन करण्याच ठरवल. पुढे नरसिंहाराव सरकारच्या काळात अर्थ व्यवस्थेची डागडूजी झाली पण भ्रष्टाचाराने त्या काळात अक्राळ-विक्राळ रुप धारण केले. या आधी वरचे सत्ताधारी बराच पैसा खात असत आणि खालच्यांना थोडाच मिळायचा पण १९९१ नंतर सगळेच - नेते आणि बाबु, मिळुन अमाप पैसा ढापायला लागलेत.

गेल्या दोन आठवड्यात काँग्रेस सरकारची वर्तणुक आश्चर्यकारक कशी नव्हती आणि या सत्ताधार्‍यांनी राजकारणाच्या रंगमंचावर देशाचे धिंडवडे कसे काढलेत हे संक्षिप्तात मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. काँग्रेसची स्थापना ब्रिटिशांनीच केली होती आणि सध्याची मंडळी ब्रिटिशांचीच पिल्लावळ असल्यासारखी वागतायत.

पुढल्या लेखात भ्रष्टाचाराचे सहजा-सहजी न दिसणारे पण कर्करोगासारखे घातक रुप दाखवण्याचा यत्न करीन. मागल्या महिन्यात डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे भ्रष्टाचारावरचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांने पार्टीसिपेटरी नोटस् बद्दल सांगितल. सध्याच्या गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या बाबतीत धडाडीचे नेतृत्व दाखवत भारतातून बाहेर नेलेला भ्रष्ट पैसा भारतात परत आणण्याचा राजमार्ग बांधला. एवढ नेतृत्व आणि धडाडी बाँब-स्फोटाच्या वेळेस दाखवायच मात्र त्यांना सुचल नाही.

पण गेल्या दोन आठवड्यात घटना इतक्या झपाट्याने बदलतायत की एखाद वेळेस दुसर काही लिहिण्याची वेळ येइल.

आशा करतो की लोकपाल स्थापना झाल्याबद्दलच लिहायला मिळेल!

(क्रमशः)