12/23/07

भातुकलीचा खेळ

आज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्‍या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.

मला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार? आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार? पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का? पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.

तो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.

प्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का? मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.

आम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल। मग आमचं का जुळल नाही? आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला? मला असा वार्‍यावर टाकुन कसा गेला?

माझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्रमित होत। हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.

मला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. " ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्‍या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड."

हें काय असलं अभद्र बोलण झाल? माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल? कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का? मग परत का येत नाहीया तो? असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला?.....

12/3/07

॥ निर्वाण-षटकम् ॥

मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोंत्रजिह्ने न च घ्राणनेत्रे।
न च व्योम भूमिर्नतेजो न वायु: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥१॥

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु: न वा सप्तधातु: न वा पंचकोशः।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥२॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥३॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥४॥

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥५॥

अहं निर्विकल्पो निराकार रुपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेद्रियाणाम् ।
न चासङगत नैव मुक्तिर्न मेयः चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥६॥


-- आद्य शंकराचार्य

12/2/07

संगणक जेंव्हा मरतो तेंव्हा!

पंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल। 'प्लग सैल होता का? बॅटरी तर खराब नाही झाली? च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत?' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्‍याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर!) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा? हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात? खर्चाच्या विचाराने पाय लटपाटायची वेळ आली. कानात कुंय्...आवाज येऊ लागले. कसं तरी स्वतःला सांभाळुन मी परत एकदा बॅटरी, प्लग सगळ नीट तपासल. सगळ्या गोष्टी भौतीक जगात आप-आपल्या जागी स्थिर होत्या पर प्राण-पंछी उड गये थे।

'हात्तीच्या कंप्युटरची तर' अस काहीस पुटपुटत मी पुढे काय करायचं याचा विचार करत खोलीत फेर्‍या घालु लागलो। नवीन कंप्युटर घेणं म्हणजे डोक्याला एक ताप आहे. तंत्रज्ञान सश्यासारख उड्या मारत पुढे जातय आणि माझ्या सारख्या कासवाच्या बुध्दीच्या लोकांचा या शर्यतीत मुळीच तगावा लागत नाही. कुठला कंप्युटर घ्यायचा, किती पैशे मोजायचे, काय-काय तंत्रज्ञान त्यात हव याचा हिशोब पूर्ण होई पर्यंत किमान दोन आठवडे कंप्युटर येणार नव्हता. गाणी नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, पिक्चर नाही, काहीही नाही. ठण ठण गोपाळा!

तो रविवार शोक मनविण्यात गेला. पण आठवडा जसा जसा जाउ लागला तस कंप्युटर नसल्याचे बरेचशे फायदे दिसु लागले. संध्याकाळची कामे भराभरा होऊ लागले. अन्न अधिक चविष्ट लागु लागल. कामा व्यतिरिक्त वाचन होउ लागले. आई फोन फर काय बोलतेय ते उमजायला लागलं रेडिओवरही गाणी लागतात आणि वर्तमानपत्रातुन ही बातम्या मिळतात याचा पुनःश्च शोध लागला. कंप्युटरच्या आठवणीने अधुन-मधुन गळा भरुन येतो पण ते तेवढच.

पण या सगळ्यात काही तरी बोचत होत। लाकडाची शिळक तळहातात गेली की मन कस बेचैन होत तस काही तरी रुतत होत. यावर विचार करायला संध्याकाळी बराच वेळ असतो त्यामुळे विचारांची भिंगरी फिरु लागली.

सकाळी ऑफिस, संध्यकाळी कंप्युटर, जेवतांना कंप्युटर, रात्री झोपायच्या आधीसुध्दा कंम्प्युटरच। दुसर्‍या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश्य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात? समस्या दोन पैकी कुठलीही असो पण हा एकाकीपणा समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीची प्रतिमा नक्कीच आहे.

दोन दृष्टींनी समाज झपाट्याने बदलतो आहे. एक, जागतिकीकरणामुळे व त्यान्वये, पैश्यांच्या वाढत्या हव्यासापायी, नात्या-गोत्यांचे धागे सैल व जीर्ण होता आहेत. व दुसरं म्हणजे समाज स्वत:ला एका विशिष्ट प्रतिमेत बघण्याची स्वतःवरच बळजोरी करतो आहे. या दोन कारणांचा संक्षिप्तात विचार करुया.
नाती-गोती म्हणजे रक्ताची नाती एवढाच माझा उद्देश्य नव्हे तर शेजार-पाजार, मित्र-मंडळ व ओळखी-पाळखीतील (आणि प्राची-गच्ची!) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे। मनुष्याचे व्यक्तिमत्व ही सर्व पात्रे रंगवितात. यातील चांगले कोण वाईट कोण, कोण नातेवाईक आवडतो कोण नावडतो हा मुद्दा गौण आहे. पण या सर्वांच्या बोटांचे ठशे आपल्या व्यक्तिचित्रावर उमटलेले असतात. पण व्यक्ति-स्वातंत्र्याचा विपरित अर्थ लाउन, 'मी माझ्यापुर्ताच' किंवा 'मी माझ्या कुटुंबापुर्ताच' या भावनेने आयुष्य जगणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख आहे. सगळ्यांसमोर आपल अगदी उत्तम चाललय हा आव आणायचा आणि इथे मुलं वाया बिघडता आहेत हे बघुन हतबद्ध् व्हायच. काही समस्या कौटुंबिक सीमा-रेषे पलिकडे असतात. तीथे समाजा व्यक्तिला वठणीवर ठेवतो. हे सामाजिक नियम आखलेले नसतात पण ते आवश्यक मात्र असतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे नियम धाब्यावर बसविणे धोक्याचे आहे. व्यक्ति, कुटुंब व समाज या वेग-वेगळ्या संकल्पना नव्हेत तर एक-मेकांच्या प्रतिमा आहेत. हि भावना सगळ्यांनी जपणे आवश्यक आहे.

प्रजातंत्र म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत तर सुदृढ व स्वयंशासित समाज हे प्रजातंत्राचे अंतिम साध्य होय.

दुसरं म्हणजे सगळ्यांना सगळ हव याचा हव्यास. याचा अर्थ असा नव्हे की कमी साधनांमधे जगणे चांगले किंव्हा चैनीच्या वस्तु घेणे चुकिचे आहे. प्रत्येक वस्तुची, कृत्याची, विचारांची, थोडक्यात मानवी पैलुंची किंमत पैश्यात लावण्याकडे जो कल वाढत चालला आहे त्यामुळे समाज निष्प्राण व शुष्क होतो आहे. मला हे हव, ते हव, सगळ हव आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करणार. त्यासाठी लागतील तर सगळी बंधन, रुढी-परंपरा, नाती-गोती मी तोडणार, या गणिताचे उत्तर कधीच बरोबर येणारं नाहीया.

या दोन्ही कारणांमुळे व्यक्ति एकटा पडतो आहे. इंटरनेटवर वेळ तर जातोच पण जे आपल्याकडे नाही किंवा जे आपण नाही ते ही वेबदुनियेत खोटं-नाटं दाखविता येत. हि परिस्थिती भितीदायक तर आहेच पण केविलवाणीसुध्दा आहे. व यावर तोडगा आपला आपल्यालाच काढायचा आहे.