मला अजून तरी चाळीशीचा चष्मा लागलेला नाही. चाळीशी नक्कीच ओलांडली आहे कारण आता तीन-चार महिन्यात ४१ चा पूर्ण होणार. पण चष्मा लागलेला नसला तरी त्यातून मागे वळून बघण्याचा प्रयत्न मी बरेच महिने करतो आहे. भारतीय पुरुषाचे वय साधारणत: ७६ असते म्हणजे माझे अर्धे आयुष्य उरकले. तसा मी धड-धाकट आहे, धष्ट-पुष्टतेच्या मापावर काटा उजवीकडेच जातो. चाळीशी नंतर सुद्धा लोक आजकाल काय काय प्रताप करतात त्यामुळे चाळीशीला आता लोक प्रौढ मानीत नाही. डोक्यावरचे (उरलेले) केस पांढरे झालेले जणू नव-तारुण्याचं! वाढते वय केवळ एक आकडा मानून पुढे पुढे जात रहाणे हे जीवनाचे उत्तम तत्वज्ञान आहे. पु.ल. एखादवेळेस 'जीवन' शब्द वाचून थट्टेने हसले असते. पण गत आयुष्याच्या आठवणी झपाट्याने धूसर व्हायला लागल्यात कि प्रौढ झालो एवढे नक्की. 'पंचवीस वर्षांपूर्वी' किंव्हा 'पेट्रोल मी ३७ रुपयांनी भरले' इत्यादी वाक्यप्रचार तोंडी आलेत म्हणजे माणूस प्रौढ झाला असे समजावे. त्या प्रत्येक्ष व्यक्तीला ते मान्य नसले तरी!
पण प्रौढ होणे म्हणजे काय? असंख्य व्याख्या मिळतील. जगात चाळीशी गाठलेले आणि चाळीशी ओलांडलेले जितके लोक असतील तितक्या व्याख्या मिळतील. आणि या असंख्य व्याख्यांमध्ये अनेक सूक्ष्म रंग आणि छटा पण दिसतील. पण या व्याख्या बहुतांश समाज व कुटुंबाने थोपलेल्या किंवा जवाबदारीने निर्माण केलेल्या असतात. आणि यातील छटा, ज्या वैयक्तिक आहेत, अगदी हातावरच्या (भाग्य) रेषांसारख्या विशेष, त्या व्यक्तीला आलेल्या अनुभवांच्या छिन्नीच्या घावांनी उत्पन्न झालेल्या असतात. या सामाजिक भाराच्या व्याख्या आणि वैयक्तिक अनुभवांचे घाव, याच्या तफावतीत आपण तळ्यात-मळ्यात करीत असतो. यालाच बहुधा मिड-लाईफ क्रायसिस म्हणत असावेत.
थोडक्यात चाळीशी पर्यंत आपण सगळे अर्जुन झालेलो असतो.
मोठ्यांचा ऐकायचा कि नाही? आणि किती ऐकायचे? आणि कधी ऐकायचे? लहानाचे किती ऐकायचे आणि किती सांगायचे? आणि त्यातून ते किती ऐकणार? कि काही ऐकणारच नाही? तब्येत कि पैसे? आत्ता पैसे खूप जीव तोडून कमवायचे आणि मग आराम कि संथ गतीने कमावत सत्तरी पर्यंत काम करायचे? तस आराम म्हणजे नेमके काय? स्वतःचा धंदा उघडण्याची वेळ गेलेली असते पण मनात कुठे तरी टाटा-अंबानी ची स्वप्ने खदखदत असतात. घर आधी फेडायचे कि भविष्यासाठी कुठे तरी जमिनीचा तुकडा घेऊन ठेवायचा? जमिनीचा तुकडा किमतीने वाढेल या आशेत. कुरुक्षेत्रामधले अर्जुन, कृष्णाच्या शोधात किंव्हा चक्रव्यूहातले अभिमन्यू 'निकास मार्गा' च्या शोधात.
आशा हा एक शब्द न रहाता एक मनस्थिती झालेली असते. मोठ्यांना आपले, या काळाचे, संघर्ष कळतील हि आशा, लहांनाना आपले संघर्ष कळू नयेत हि आशा पण त्यासोबत आपल्या संघर्षातून लहानांनी काही शिकावे हि पण आशा. आपले संघर्ष आपल्यालाच काही शिकवतील हि आशा. लहाने मोठे होऊन नीट शिकतील-सवरतील आणि चांगलं करतील हि आशा. मोठ्यांच्या आपल्यावर असलेल्या आशांना आपण पुरे पडतोय हि पण आशा. प्रमोशन होईल, पगारवाढ होईल किंव्हा वाढत्या पगारावर नवीन नोकरी मिळेल हि आशा.
इतक्यांदा आशा शब्द वापरला कि आमच्या वर्गात एक आशा होती. तिला ठसका लागला असेल.
'तसे हे गाव आणि मी एकमेकांचे काहीच लागत नव्हतो देणे.
टिपायचे होते तेवढे टिपून घेतले झाले चोचीत दोनचार दाणे
मग गावासाठी मी उरलो नाही आणि संपले माझ्यापुरती हे गाव
पुन्हा शोधणे, नवे रस्ते, नवी माणसे पुन्हा एकदा नवे गाव
(ऋणानुबंध, प्रभा गणोरकर)
जाहिरातींच्या जग झपाट्याने उपकरणांचे जग एका दशकात झाले. आपल्या (चाळीशी वाल्यांच्या) युवा वयात असतांना एखाद्या कडेच कॅमेरा असायचा आणि आता फोन च्या जाहिरातीत कॅमेराचा दाखवतात. फोन लागत नाही किंव्हा लागला नाही तरी चालेल पण फोन च्या कॅमेरा ने चंद्राच्या खड्ड्यांचा फोटो काढता आला पाहिजे. या भानगडीत होता काय कि अनुभव वयाच्या मैलांचे दगड ओलांडायला लावीत ते होत नाही. सगळे वर्तमानात जगण्याचा तडफडाट करतात आणि या भानगडीत फोटोंच्या माध्यमाने भूतकाळ वर्तमान च बनून राहतो. कोणी मोठा होऊ बघतच नाही. आमच्या चाळीशीवाल्यांची मुलं काहीच वर्षात 'पार्ट्या' करायला लागतील पण आमच्याच पार्ट्या थांबत नाही. पार्ट्या थांबाव्यात असे नाही पण त्याचे रूप बदलू शकते. किंव्हा बदलायला हवे. दारू झेपत नाही, अरबट-चरबट खाल्लेलं पचत नाहीत, झोप नीट येत नाही, पँट कंबरेला फिट होत नाही पण विशीत केलेल्या पार्ट्यांसारखी मस्ती करण्याची खाज जात नाही. तारुण्याच्या आठवणींचं हि उब अर्थात खोटी आहे. ते एक मृगजळ आहे. पुन्हा, पार्ट्या करू नये असा नाही पण आता आपण चौथीतून पाचवीत गेलो आहोत. चौथीत खूप मस्ती-मजा केली म्हणून आपण सारखं सारखं चौथीच्या वर्गात जाऊन बसू शकत नाही. उंची वाढली आहे, चौथीच्या डेस्क-बेंचला गुढघे लागतात!
पण उंची वाढली म्हणजे नेमके काय? आत्ता पर्यंत वाचणाऱ्यांना असा वाटत असेल कि या लेखात काही गुरुकिल्ली मिळणार आहे तर असा काही होणार नाही. वरील विचार आणि निरीक्षण माझी परिस्थिती, मनस्थिती, वयोमान, कालमान याचे सूर आहेत. दुसऱ्या कोणावर नव्हे तर माझ्या प्रतिबिंबावर केलेले समीक्षण आहे. माझ्या कडे उत्तर थोडी फार आहेत पण प्रश्न मात्र भरपूर आहेत.
प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगळा असतो. प्रत्येकजण शर्यत जिंकू शकत नाही. खूप साऱ्यांना तर शर्यतीत भाग हि घ्यायचा नसतो. पण आपली सध्याची समाजस्थिती आणि आर्थिक आवश्यकता अशी आहे कि सगळ्यांना भाग घेणे अनिवार्य करण्यात येत. भानगड तिथेच सुरु होते. पहिल्या पाचांसाठी शेवटले ऐंशी फरफटल्या जातात. महत्वाकांक्षा आवश्यक आहे पण प्रत्येकाची आणि प्रत्येकामधली महत्वाकांक्षा वेगळी आणि वेगळ्या प्रमाणात असते. आणि हा नेमका फरक ज्यांना लक्षात येतो ती लोक निदान चाळिशीनंतर शांत मनस्थितीत पोचू शकतात. स्वरूप पहा, विश्वरूप बघू नका असे विनोबा भावे म्हणतात, यात तथ्य आहे. (भाव्यांच्या बहुधा या एकाच विचारात तथ्य आहे!) ज्यांना लक्षात येत नाही त्यांचा ठण-ठण गोपाळा होतो.
कारण आता अजून पहिला नंबर येणे कठीण आहे. कुठल्या कंपनीचा मालक किंव्हा सी-इ-ओ बनणे कठीण आहे. अचानक अर्जुन बनून मासळीचा डोळा छेदणे कठीण आहे. कारण अर्जुना सारखे फक्त पोपटाचा डोळा दिसणारे आपण बहुतांश नव्हतो. पोपट ज्यांना दिसला तेच भाग्यवान कारण आपल्या पैकी बहुतांश झाडावरची पाने मोजणारे लोक्स होतो. थोडक्यात आपण सामान्य आहोत आणि जरी आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आपण अर्जुन असलो तर जगाच्या महाभारतात, ढाल-तलवारी घेऊन उगाच इकडून तिकडे धावपळ करणारे शिपाई गडी आहोत. ते पण ज्यांना तलवार जेमतेम पेलता येते.
थोडक्यात मला माझ्या सामान्यत्वाची जाणीव चाळीशीत होते आहे. आपण आता जगाच्या रहाटगाड्यात फारसा प्रभाव पाडू शकत नाही. आपण दुनिया बदलवू शकत नाही. दुनिया आपल्या मुठ्ठीत नाही. आपल्या मतांना आपल्याला जेवढा वाटतं तेवढा महत्व नाही. आपण जे काम करतो, आणि खूपदा अभिमानाने व सचोटीने करतो, ते एखाद वेळेस क्षुल्लूक नसेल पण महत्वाचेही नाही. खूप साऱ्या लोकांना याची कल्पना येत असते पण वळणी पडत नाही. ओंजळीने समुद्र रिकामा करण्यासारखं ते आरश्यात प्रतिबिंबाला महत्व प्राप्त करून देण्या साठी अट्टाहास करीत बसतात, मनस्ताप करून घेतात.
आत्तापर्यंतचे शब्द आणि सूर निराशात्मक वाटणे शक्य आहे पण तसा प्रयत्न नाही, तसा विचार नाही. बहुतांश मंडळी चाळीशी गाठे पर्यंत आर्थिक दृष्ट्या सुदृढ असते आणि करियर मध्ये पुढला रस्ता बहुतांशांना स्वछ दिसत असतो. सामान्यत्वाची जाणीव होते या जाणीव होणे हा भाग महत्वाचा. (आणि समाज जाणीव झाली नाही तर सामान्यत्व थोडीच बदलणार आहे!) मग हि वस्तुस्थिती आत्मसात करून त्याचा ढाल आणि तलवार असा दोन्ही वापर करून घेतला तर? स्वतःवर जास्त भार न घालणे म्हणजे ढाली सारखा वापर आणि जे चालू आहे त्यात जास्तीत जास्त यश किंव्हा आनंद, किंव्हा दोन्ही, प्राप्त करणे म्हणजे तलवारी सारखा वापर करणे झाले. स्वतःच्या पोराबाळांमध्ये जास्त लक्ष घातले तर त्यांच्या यशात आपल्यालाच आनंद मिळणार. आपल्या तब्येतीत जास्त लक्ष घातले तर सुदृढ शरीर आपल्यालाच आनंद देणार, आपल्या बायको सोबत जास्त वेळ घालविला तर स्वभावाचे आणि नात्याचे नवीन पैलू कळू शकतात, त्यातही आनंद मिळणारच. मित्रांसोबत जास्त वेळ घालविला, जुन्या मित्रांना पुन्हा नव्याने भेटलो, नवीन मित्रांना जुन्या मित्रांसारखा जिव्हाळा दिला तरी आनंद आपल्यालाच मिळणार. नवीन छंद जोपासला, जुन्याला छंदाची उजळणी केली तर स्वतःबद्दलचे नवीन आयाम समजतील. समाजसेवा केली तर? पुन्हा, जग बदलायला नाही. एक तास द्यायचा आठवड्यात. शाळेत शिकवायचा, तरुण मुलासोबत वेळ घालवून अनुभव ऐकायचेत, सांगायचेत. प्रायमरी शाळेत गोड वाटायचं सरस्वती पूजन करून दर शुक्रवारी? किती म्हणजे किती तरी कल्पना आहेत या क्षेत्रात.
'पण आपण चालावे, दरवेशी नसलो तरी
सोबत घेऊन आपली सावली
शोधावा नवा रस्ता. पायांना जर फुटल्याचा आहेत दिशा आणि जर आहेतच
गाव प्रत्येक रस्त्यावर तर सापडेलही एखादे आपल्यासाठी थांबलेले.
नाहीतर हा आहेच रस्ता रस्त्यांना मिळणार आणि ते रस्ते दुसऱ्या रस्त्यांना मिळत जाणारे'
(ऋणानुबंध, प्रभा गणोरकर)
थोडक्यात, स्वस्थ बसून 'इति' ची वाट बघत टवाळक्या करीत बसायचे नाही. परिस्थिती स्विकारणे म्हणजे खंत करणे नव्हे. जाणीव होणे म्हणजे हार मानणे नव्हे. अर्जुन आणि पोपटाच्या डोळ्याची गोष्ट नवीन अंगाने समजायला हवी. जीवनात (पुन्हा!) आपल्या अनेक संध्या मिळतील, अर्जुन बनून पोपटाचा डोळाच फक्त बघण्याच्या. एकदा नाही, दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा नाहीत तिसऱ्यांदा. नवीन झाड, नवीन पोपट अहो, पोपटाचा डोळा दिसला म्हणून तो अर्जुन नाही झाला. अर्जुन होता म्हणून त्याला डोळा दिसला. आपण अर्जुन बनून प्रयत्न करीत राहायचे.
Do not go gentle into that good night,
Old age should burn and rave at close of day;
Rage, rage against the dying of the light
(The Poems of Dylan Thomas, Dylan Thomas)
नवीन मार्ग, नव्या दिशा, नवीन आनंद आणि, प्रौढ पण आपण हि नवीनच!
---
ता.क. - एवढं लिहिलं, पण वाचणाऱ्यांपैकी कोणाला सुचला नाही कि चाळीशीचा चष्मा जवळच बघायला असतो. आणि हा शंख तो लावून दूरच बघण्याचा प्रयत्न करतो आहे. डोंबल दिसणार आहे काही!
No comments:
Post a Comment