9/18/24

स्वरगंधर्व सुधीर फडके - चित्रपट परीक्षण आणि निरीक्षण

"श्रीराम.....श्रीराम....श्रीराम"

या गीत-रामायणाच्या पहिल्या काव्याच्या सुरुवातीला असलेल्या राम-आव्हान ऐकलं कि अजूनही अंगावर काटा येतो. धन्य ते ग.दि.मा. ज्यांच्या लेखणीतून बहुधा स्वतः सरस्वतीने हि काव्ये लिहिलीत. आणि धन्य ते सुधीर फडके ज्यांनी हि काव्ये गेय स्वरूपात लोकांसमोर ठेवून अजरामर केलीत. जेंव्हा गीत रामायण ऑल इंडिया रेडिओ वर प्रक्षेपित झाले तेंव्हा सुधीर फडके आणि ग.दि.मा. फक्त ३७ वर्षाचे होते. त्याआधीही सुधीर फडके प्रसिद्धीस आले होते पण इतक्या लहान वयात गीत रामायणाला सुरबद्ध करण्याची प्रतिभा असलेले श्री फडके मराठी आणि हिंदी संगीत दुनियेतील झळकता तारा होता. अर्थात गीत रामायण हा सुधीर फडके यांच्या कारगीर्दीतील एक टप्पा होता. पुढे त्यांनी त्या काळातील बहुतांश प्रसिद्ध मराठी चित्रपटांना संगीत दिले. आणि हिंदी चित्रपटांनाही संगीत दिले. मला माहिती नव्हते कि 'खुश है जमाना आज पहिली तारीख है' या किशोर कुमारच्या प्रसिद्ध गाण्याची चाल श्री फडक्यांनी दिली आहे. याव्यतिरिक्त त्यांची अनेक भावगीते ("स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला") आणि भक्तिगीते ("विठ्ठला तू वेडा कुंभार") अजरामर आणि अविस्मरणीय आहेत. श्री फडके यांची कारागिर्द, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या स्वरांच्या पाऊलखुणा प्रत्येक मराठी मनावर उमटलेल्या आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची सगळेच वाट बघत होते.

मागल्या आठवड्यात 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट बघितला. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बघण्याचे मनात होतेच. पण मला हा चित्रपट बघून मनात संमिश्र भावना निर्माण झाल्यात. या थोर माणसाचे आयुष्य नवीन पिढी समोर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे हा चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांचे कौतुक करायला हवे आणि त्यांचे आभार मानायला हवेत. पण चित्रपट बघून प्रेक्षक जर का गोंधळणार असतील किंव्हा चित्रपट बघूनही त्या थोर व्यक्तीच्या कलेचे, कष्टांचे मोल नेमके कळणार नसेल तर चित्रपट न बनवलेला बरा!  दिग्दर्शक किंव्हा लेखकाने नेमके ठरवले नाहीं कि त्यांना चित्रपट करायचंय कि माहितीपट. चित्रपटातून लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्याचे श्री. फडके त्यांच्यावरची श्रद्धा स्पष्ट होते. वातावरण निर्मिती, सेट्स, मुख्यतः जुन्या काळाचे चित्रण, वेशभूषा हे सगळे उत्तम दर्जाचे आहे. पण भानगड कथा आणि पटकथेत आहे. 

आपण काही मुख्य मुद्द्यांचा सविस्तर विचार करू. 

चित्रपटाची कथा-पटकथा - चित्रपटाची पटकथा फार तुटक वाटली. सुरुवात श्री फडक्यांच्या बालपणी होते. पण सुरुवातीच्या पाच-दहा मिनिटानंतर आपण फारसे बालपणात डोकावतच नाहीं. त्यांचे बालपण फार आनंदात आणि सुखवस्तू गेले. त्यांच्यावर संगीत संस्कार तेंव्हाच झाले. त्यामुळे या काळात चित्रपट अजून रेंगाळला असता तर चालले असते. पुढे त्यांनी तरुणपणात फार हाल-अपेष्टा भोगल्यात. अक्षरशः कफल्लक अवस्था झाली होती. पण त्यांनी संगीताचा पदर सोडला नाहीं. पेटी घेऊन वण-वण भटकलेत. त्यांच्यातील प्रतिभा त्यांनी जपली. त्यामुळे जशी संधी मिळाली तशी त्यांची कला फोफावली. हा प्रवास फार तुटक दाखविला आहे. त्यांच्या वडिलांकडे पैसे असतांना, त्यांनी त्यांच्या मामांकडून पैसे का घेतला. पुढे मामांसोबत पैश्यांवरून गैरसमज झाला तर ते अचानक असे रस्त्यावर कसे आलेत. संघातील काही लोकांनी लुबाडले पण डॉ. हेडगेवारांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या लबाड लोकांना बाहेर केले आणि श्री फडक्यांचे पैसे परत केले. मग तरी पैश्यांची एवढी चणचण का? असे अनेक प्रश्न मला पडलेत आणि त्याची उत्तरे मिळाली नाहीत. (त्यांचा जीवश्च-कंठश्च मित्र बगिच्यात त्यांच्यासोबत बेंच वर झोपलेला, तो अचानक गायब काय होतो आणि मग थेट आर्मीत कसा दाखल होतो? थोडा अजब प्रकार वाटला.) 

पटकथेला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे चित्रपट श्री सुधीर फडक्यांच्या जीवनप्रवासावर आहे कि त्यांच्या संगीत जीवन प्रवासावर? दोन्ही गोष्टीत फार महत्वाचा फरक आहे. कारण वाढत्या वयात झालेले संगीत संस्कारांनी त्यांचे संगीत जीवनकाल सुरु झाला आणि पुढे आलेल्या असंख्य आव्हानांनी पण त्यांचे संगीत तावून-सुलाखून निघाले. पण हा संगीताचा प्रवास चित्रपटात दिसत नाहीं. गीत रामायणाच्या चाली त्यांनी काय ठरवून दिल्यात? त्यातील वाद्ये, सोबतचे गायक कसे निवडलेत? त्या सीन्स मध्ये अचानक माणिक वर्मा अवतरतात. आता एवढ्या प्रसिद्ध गायिका त्या एकदम गीत रामायणाच्या पहिल्या रेकॉर्डिंग ला कश्या उगवल्यात? श्री फडके व ग.दि.मा. यांची घनिष्ट मैत्री दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण या जोडीने दिलेल्या असंख्य सुरेख गाण्यांचा एक श्रोता म्हणून या दोघांनी बसून गाणी कशी बसवलीत हे बघायला आवडले असते. 

श्री फडके यांच्या पत्नी त्यांच्या तारुण्यात प्रथितयश नटी आणि गायिका होत्या. लग्नानंतर त्या श्री फडके यांच्या आयुष्यातील जणू कणा होत्या. पण त्यांची भेट कशी झाली? त्यांनी का लग्न केले? चित्रपटात याबद्दल फक्त एकाच ओळ आहे. चित्रपटाच्या शेवटी सुद्धा श्री फडके यांनी संगीत देण्यातून संन्यास का घेतला? काही तरी विचार केला असणार. अश्या कितीतरी गोष्टी उलगडल्या नाहीत आणि कितीतरी पैलूंवर प्रकाश पडला नाहीं.  

अभिनय - प्रमुख भूमिकेत सुनील बर्वे यांनी श्री फडके यांची भूमिका केली आहे तर मृण्मयी देशपांडे यांनी ललिताबाई फडके यांची भूमिका केली आहे. मृण्मयी देशपांडे या वयानी भूमिका करायला लहान आहेत. कारण प्रामुख्याने ललिताबाईंना ६०च्या घरात दाखविले आहे. पण मृण्मयी देशपांडे यांनी अभिनय उत्तम केला आहे. सुनील बर्वे हे उत्तम नट आहेत. आणि त्यांनी भूमिका वठवण्याचा प्रयत्न केला आहे. पण छोटीशी गोष्ट- श्री फडके यांच्या तरुणवयाची भूमिका करणाऱ्या नटाच्या हालचाली आणि लकबी आणि वयाच्या श्री फडके यांची भूमिका करणारे सुनील बर्वे यांच्या हालचाली आणि लकबी यात काही हि साम्य नाहीं. जणू आपण दोन संपूर्ण वेगळ्याच व्यक्तींना बघतो आहोत. यात सुनील बर्वे यांची चूक नाहीं. दिग्दर्शकाची आहे. 


तरुण फडके यांची भूमिका आदिश वैद्य यांनी केली आहे. त्यांचा अभिनय आणि हालचाली स्लो-मोशन का होत्या मला कळले नाहीं.  यात पुन्हा दिग्दर्शकाची चूक आहे म्हणू शकतो. अभिनय करायला पटकथा आणि संवाद पुरेसे नसतील  तर हवेत हात-वारे करून नट त्या सीन मध्ये जीव ओतण्याचा प्रयत्न करतो. 

श्री फडके हे स्वतः एक अतिप्रसिद्ध व्यक्तिमत्व होतेच पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या एवढ्याच किंव्हा त्यांच्याहून मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींसोबत कामे केलीत किंव्हा त्या थोर मोठ्यांच्या सानिध्यात वेळ घालविला होता. या चित्रपटात आपल्याला अशी अनेक पत्रे दिसतात. किशोर कुमार असो कि मोहम्मद रफी. डॉ हेडगेवार ते गुरुजी. आणि पंडित नेहरू ते अटल बिहारी वाजपाई. पण यातील कुठलेही पात्र नीट फुलले नाहीं असे मला जाणवले. मोहम्मद रफी ला एक मंगलाष्टकांची ओळ गातांना दाखविले आहे तर किशोर कुमारला अक्खा सीन आहे. प्रेक्षकांना आणि तसेच कलाकारांना कळत नव्हते कि नक्कल करायची कि नुसत्या पोशाखात कॅमेरा समोर उभे राहायचे. जसे आदरणीय श्री हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व श्री पोंक्षे यांनाही उत्तम वठवलीय. पण त्याला भूमिका म्हणता येणार नाहीं. पुढे तर आदरणीय श्री गुरुजी गोळवलकरांच्या भूमिका करणाऱ्या कलाकाराला तर एकही संवाद नाहीं. श्री वाजपाई यांचे भाषण दाखविले आहे तर पु. ल. देशपांडे यांचा परिचय हि दिला गेलेला नाहीं. आशाताई भोसले यांना संवाद नाहीत पण स्क्रीन वर बऱ्याचवेळा आहेत तर लताबाईंना पाठमोरेंचं दाखविले आहे. माझ्या मते स्वातंत्रवीर सावरकरांना थोडी अधिक भूमिका द्यायला हवी होती. श्री फडके हे सावरकर भक्त होते आणि सावरकरांचा श्री फडके यांच्या व्यक्तिमत्वावर विलक्षण प्रभाव होता. ग.दि.मा यांची भूमिका छान वठवल्या गेली आहे. त्यांची आणि श्री फडके यांची मैत्री चांगली दाखविली आहे. पण पुन्हा काही तरी कमी वाटते. मला वाटतं श्री फडके यांची कारगिर्द बघता, "भाई' चित्रपटासारखाच, हा चित्रपट हि दोन भागात केला असता तर श्री फडके यांच्या आयुष्यातील महत्वाचे क्षण आणि त्यांच्या सोबत गाजलेली इतर व्यक्तिमत्वे अजून रंगवता आली असती. 

चित्रपटाची वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे चित्रपटाचे सेट्स आणि वातावरण निर्मिती. यावर निर्मात्यांनी बराच खर्च केलेला आहे. मुख्यतः ३० किंव्हा ४० च्या दशकातील देश, समाज फार छान उभा केला आहे. घरे, पोशाख, लोकांच्या पगड्या, गाड्या, ट्रेन स्टेशन अशी विविध अंगे दिग्दर्शकाने कौशल्याने दाखविली आहेत. चित्रपटात जुनी गाणी कोणाकडून नवीन गाऊन घेण्यापेक्षा, मूळ गाणी तशीच ठेवली आहे. गाणी आणि गाण्यांची कथानकातील जागा चपखल बसली आहे. तशीच जुनी गाणी नवीन चित्रपटात ऐकतांना प्रेक्षक श्रोता होतो. 

कुठल्याही थोर मनुष्याचे जीवनचित्रं पुस्तकात किंव्हा चित्रपटात रेखाटने फार कठीण काम आहे. त्या थोर माणसाचे किती आणि कुठले पैलू दर्शवायचे, कुठल्या घटना आणि व्यक्ती दाखवयाच्यात आणि कुठल्या घटना गाळायच्या? तो व्यक्ती होता तसा दाखवायचा कि भासला तसा दाखवायचा? त्या व्यक्तीचे अंतरंगावर चित्रपट केंद्रित करायचा कि त्याच्या कामगिरी आणि कारगीर्दीवर? बरं, या व्यक्तीबद्दल सगळी माहिती उपलब्ध असतेच असे नाहीं. आणि जी माहिती उपलब्ध असते ती विश्वसनीय असते असेहि नाहीं. एक उदाहरण घ्या - आचार्य अत्र्यांवर चित्रपट बनवायचा तर काय काय त्यात दाखवाल? त्यांचे स्वतःचे लेखन, कि त्यांचे राजकारणातील उठाठेवी? कि त्यांचे चित्रपट जगतातील पराक्रम? कि त्यांचे वृत्तपत्र आणि त्यातील लेखन? थोडक्यात हे प्रश्न सोपे नाहीं आणि साहजिकच आहे इंग्रजीत ज्याला 'बायोपिक (' Biopic ) असे म्हणतात तसा चित्रपट काढणे फार कठीण काम आहे. 

मागल्या शतकात महाराष्ट्रात आणि मराठी समाजात एका पेक्षा एक  दिग्गज व्यक्तिमत्वे होऊन गेलीत. लेखन, गायन, चित्रपट, अभिनय, राजनीती, तुम्ही म्हणाल त्या क्षेत्रात मराठी माणसाच्या ठसठशीत पाऊलखुणा आहेत. त्यातील एक म्हणजे श्री सुधीर फडके. त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांची नव्याने ओळख नवीन पिढीला करण्याचे काम हा चित्रपट नक्कीच करतो. आणि त्यासाठी आपण चित्रपटाचे आभार मानायला हवेत. 

No comments: