1/2/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - बालगंधर्व

नुकताच बालगंधर्व चित्रपट बघायची संधी मिळाली. गेले कित्येक वर्षे या चित्रपटाची, म्हणजे बालगंधर्वांची, गाणी ऐकतोय. अक्षरशः दर एक दिवसा आड 'नमन नटवरा' ऐकतोच. त्यामुळे आणि चित्रपटाचे स्थिर-दृश्य बघून या चित्रपटा बद्दल एक उत्सुकता होती. बघायला वेळ आणि माध्यम (नेटफ्लिक्स) मिळाल्यावर मी आणि सौ. नी मोठ्या आनंदात चित्रपट बघणे सुरु केला. पण निराशा पदरी पडली असे म्हणायला हरकत नाही! 

सुरुवात चित्रपटात काय चांगले होते यांनी करू या. चित्रपटाचे सेट्स, त्याची सृष्टी-निर्मिती, चित्रपटाची काल-निर्मिती, पोशाख, दिवे आणि कॅमेरा हे सगळेच अत्यंत उत्कृष्ट दर्जा चे होते. मराठी चित्रपटांची या सगळ्याच बाबतीत गेलया १५  वर्षात झपाट्याने प्रगती झाली आहे आणि बालगंधर्व चित्रपट या दशकातील या बाबतीतला कळस मानायला हरकत नाही. बालगंधर्वांचे लहानपणीचे घर वा वाडा असो की मोठं झाल्यावर त्यांनी भेट दिलेला कोल्हापूर चा राजवाडा असो, बालगंधर्वांच्या जीवनातील महत्वाच्या क्षणात प्रेक्षक थेट त्या काळात प्रवास करितात. वेगवेगळ्या भूमिकेतील कलाकार हे उत्तम आहेत. छत्रपती शाहू असोत की लोकमान्य टिळक असो, प्रत्येक कलाकाराने काही मिनिटांच्या भूमिकेला नीट न्याय दिला आहे. या चित्रपटाच्या गाण्यानं बद्दल तर लिहिणे म्हणजे लता मंगेशकर यांच्या गळ्याचा गोडवा शब्दात अंकित करण्या सारख आहे. या चित्रपटाची गाणी म्हणजे मराठी चित्रपटाचा एक वारसा आहे. कौशल इनामदार यांनी जुन्या बालगंधर्वांच्या गाण्यांना नवीन शैलीत आणि वाद्यवृंदात मांडले खरे पण तरी मूळ गाण्यांचा आणि चालींचे व्यक्तिमत्व आणि ओळख कायम आहे. 

पण तरी हा चित्रपट एक अत्यंत महत्वाच्या मुक्कामात कमी पडतो. आणि ती म्हणजे कथा. आता बालगंधर्वां चे आयुष्य आणि त्यातील महत्वाच्या घटना बहुतेक करून सर्वश्रुत आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे काम त्या घटनांची फुले नीट गुंफुन साजेसा हार बनविणे होते पण तसे झालेले दिसत नाहीत. घटनाक्रम तुटक वाटतो. बालगंधर्वांसारखे व्यक्तिमत्व दोन-तीन तासांच्या सीमेत  बांधणे फार कठीण कार्य, हे मान्य पण  मला वाटते की निर्माते आणि लेखकांनी एक फार महत्वाच्या प्रश्नाचा विचार केला असता तर जे काही उत्तर त्यांने ठरवले असते ते चित्रपटाच्या क्रमात दृष्टीस आले असते. हा चित्रपट बालगंधरावांच्या जीवनावर बेतलेला आहे के हा चित्रपट बालगंधर्वांच्या जीवनाचा आहे? कारण तुटक पण जो आढळतो तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोष आणि आणि त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांवर चादर टाकण्याच्या केलेल्या  प्रयत्नानंमुळे प्रकर्षाने जाणवतॊ. आणि त्या भानगडीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू झाकोळल्या गेलेत. त्यांना गाणं म्हणजे देवाचे वरदान होते. पण त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे  अगदी लहानपणा पासून त्याच्या वरदानाची कदर करणारे लोक त्यांना मिळत गेलेत. त्यामुळे त्यांना जीवनात झालेल्या हाल अपेष्टा बहुतेक करून स्वतः ओढावून घेतलेल्या होत्या. प्रत्येक घडीला त्यांना हात देऊन वर खेचायला तयार होते (उदा. प्रभात सिनेमा)  पण आता याला हेकड पण म्हणा की अस समजा की कलेचे वरदान प्राप्त असलेल्यांचा झक्कीपणा,  त्यांनी ते हात दूर ढकललेत. त्या सगळ्यात आपल्या बायकोचे हाल केलेत आणि शेवटी तिला सोडून देऊन एका मुसलमान बाई सोबत घर बसविले. आणि हो, त्या भानगडीत स्वतःला आणि स्वतःच्या कलेला त्यांच्या वयाच्या चाळीशीत च कालबाह्य ही केले. 

लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराजांची कृपादृष्टी असलेल्या हा थोर गायक सन १९६७ पर्यंत होता यावर विश्वास बसत नाही. 

नेमका हा चिकित्सकपणा , हा अभ्यास आणि वस्तुनिष्ठ दृष्टी चित्रपटात दिसत नाही आणि माझ्या मते या महत्वाच्या पल्ल्यावर चित्रपट अडखळतो. वर मी अभिनयाचे कौतुक जरी केले तरी अनपेक्षित पणे सुबोध भावे यांचा अभिनय थोडा विचित्र वाटतो. त्यांच्या अभिनय कौशल्यं बद्दल शंका नाही. थोर कलाकार आणि चित्रपट निर्माते आहेत सुबोध पण या चित्रपटात मात्र मला त्यांचा अभिनय अर्धवट वाटतो. खूपदा परिस्थिती आणि घटनेचा ताल जुळत नसल्यामुळे, नेमक्या कुठल्या भावना समोर मांडाव्यात हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.  शारीरिक हावभाव पण पुढे पुढे स्थगित झाल्यासारखे वाटतात. वयाने माणसाच्या हालचाली हळू होतात पण १९३० च्या दशकात त्यांचे वय चाळीशीत होते त्यामुळे ते वय सुबोध भावे दर्शविताना हालचाली हळू करून काय दर्शवित आहेत ते नेमके कळत नाही. 

टीका करणे सोपे आहे. चित्रपट बनविणे महत कठीण. या चित्रपटा मागे प्रचंड मेहनत तर दिसतेच  तसेच मराठी रंगभूमीचे व  नाट्य-संगीताचे उत्कट प्रेम आणि बालगंधर्वांचे मराठी संस्कृतीतील अढळ स्थान दाखविण्याची प्रबळ इच्छा पण दिसते. त्यांची गाण्यांना पुन्हा नवीन जन्म मिळाला. त्यामुळे या चित्रपटाचे कौतुक व्हायलाच हवे. पण इंग्रजी मिडीयम मध्ये शिकलेल्या मराठी पिढीला मात्र हा चित्रपट बघून बालगंधर्वांचा परिचय नीटसा होत नाहीं. या प्रेकशकामध्ये प्रश्नचिन्ह अधिक दिसतील. 

पण शतक बनवितांना ९५ धावा काढणे जरी स्पृहणीय असले तरी विक्रम म्हणून त्याची नोंद होत नाही. तसा काहीसा प्रकार इथे झाला याचे वाईट वाटते. 

1 comment:

Dr. Vidya Deodhar said...

फारच नेमके आणि स्पष्ट विश्लेषण.,.