8/29/20

सायकलवीर

 मी नुकताच सायकल चालविणे शिकलो होतो. मी जिथे वाढलो तो भाग आणि गल्ल्या एकदम व्यवस्थित आखलेल्या होत्या. आमच्या गल्लीच्या एका बाजूला मोठा रस्ता होता. रहदारीचा. पण माझ्या लहानपणी तिथे फारशी रहदारी नसे. सायकल समोरच्या मॉरिस कॉलेज मैदानावर शिकायची. तिथेच प्रॅक्टिस करायची आणि मग काही दिवसांनी मोठ्या रस्त्यावर चालवायची. अशी ग्रॅड्युएशन प्रथा होती.  दादाची सायकल घेऊन, चालत, चालत मी ग्राउंड वर जात असे आणि मग प्रॅक्टीस करीत असे. पण पंख आहेत म्हणून उडायचं की पंखात ताकद असल्यावर उडायचं? हा फार मोठा गहन प्रश्न आहे. मी ठरवलं की पाईडल मारता येत म्हणून मोठ्या रस्त्यावर चालवायच. रविवारी सकाळ च्या वेळी मी घोडी हाकली. आता त्या रहदारी वाल्या  रस्त्याला थोडा उतार होता. त्यामुळे सायकलीने मस्त वेग घेतला. दुसऱ्या व तिसऱ्या गल्लीच्या मध्ये कचरा टाकायची जागा असे. आणि त्यात बाबू कचरा गोळा करीत उभा होता. आता बाबू कोण या बद्द्ल नंतर बोलूया. पण रविवारी सकाळच्या वेळी तो आदल्या दिवशीचा कचरा गोळा करीत उभा होता. आणि मुख्य म्हणजे त्याची पाठ माझ्या उतारावर वेग पकडलेल्या सायकली कडे होते. ही बाब महत्वाची. कारण एका होतकरू सायकल-शिक्या सायकल चालविण्याची प्रक्टिस करीत असतांना त्या कडे कोणीही पाठ फिरवू नये. आता रस्त्याला उतारच नव्हे तर किंचित वळणही होते. आणि उतार, वेग, वळण आणि सायकलीचा ब्रेक याची सांगड मला काही झेपत नव्हती. माझ्या छोट्या पंज्यात ब्रेक च येईना. म्हणून मी दोन्ही हातांनी एक ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यात सायकालीन कन्ना खाल्ला. आता सायकल वेगाने, वळणावर वळण्याच्या ऐवजी सरळ जाऊ लागली - खर सांगतो, भूत आल होता सायकलीत. तिने जणू ठरवून  (माझी चूक नसतांना) कचऱ्याच्या ढिगाकडे झेप घेतली. बाबू कडे. मी बाबू अशी कोवळी हाक ही मारली.  आणि ... खडखडाट करीत त्याची गळा -भेट घेतली! त्याची मुळीच इच्छा  नसतांना! त्याच्या पायाला लागलं असणार बिचार्याच्या. 'बाबू कहीं पे भी  खडे रहेते' अस काहीस बडबडत मी सायकल उचलून धावत पळ काढला. 


सायकल शिकून आता बरीच दशके झालीत पण सायकल जेंव्हा पहिल्यांदा शिकलो, स्वतः पायडल मारून, नीट सांभाळून चालवली, तो आनंद अजूनही ताजा आहे. वेगाने, मस्त वार लागतंय आणि बाकी पायी चालणार्या पेक्षा विनासायस पणे पुढं जातोय हा आनंद अप्रतिम होता. वेगाने जाण्याची इच्छा  ही मनुष्यात मूळच असावी. म्हणून आधी आपण बैल माणसावळले असणार. मग घोडे. मग घोड्यावर हजारो वर्षे भागलीत. आणि मग वहाने. नशिबाने मला पुढे बरीच वेगवान वाहने  चालविण्याची संधी मिळाली पण पहिल्यांदा सायकल यायला लागण्याची आठवण अजूनही अवीट आहे. काही आनंद असे असतात की त्याचे पुढले टप्पे गाठलेत तरी पहिला टप्पाच लक्षात राहतो, मनात   मला माझ्या मोठ्या भावाचीच सायकल वारसा-हक्काने मिळाली. बिना दांड्याची (लेडीज), लाल रंगाची सायकल होती. तेंव्हा जुन्या भैय्या सायकल व्यतिरिक्त नुकत्याच नवीन फैशन च्या सायकली येऊ लागल्या होत्या. स्ट्रीट कॅट नावाच्या सायकलीची जाहिरात फार प्रसिद्ध झाली होती. काहीतरी इंग्रजीत होती जाहिरात. कळायचं नाही तेवढं इंग्रजी तेंव्हा.

(क्रमश:)


1 comment:

PATIL said...

माहिती खुप छान आहे. आमच्या ब्लॉग नक्की भेट द्या.
JIo Marathi