1/18/21

चित्रपट परिक्षण आणि निरीक्षण - सायकल

दोन महिन्याने पूर्वी सायकल मराठी चित्रपट बघण्याची संधी मिळाली. सन २०१८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे  दिग्दर्शन श्री प्रकाश कुंटे यांनी केले आहे. अदिती मोघे याची कथा व पटकथा आहे. तर मुख्य भूमिकेत हृषीकेश जोशी, भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव आहेत.  चित्रपट सुरेख आहे . जणू मनाला लागलेल आल्हाददायक वारे!   उत्तम दिगदर्शन, उत्तम अभिनय, उत्तम पात्रे, उत्तम कथा, उत्तम चित्रपट निर्मिती, आणि एक खराखुरा कौटुंबिक चित्रपट असलेल 'सायकल' ही जणू जाईच्या फुलांची माळच! 

कथा सरळसोट आहे. चित्रपटाच्या नायकाला - केशव ला  (हृषीकेश जोशी)  एक सुरेख सायकल त्याच्या आजोबांनी दिली असते. आपला नायक भविष्य सांगणारा असतो व्यवसायाने, त्याच्या आजोबां सारखा. म्हणून हा वारसाला हक्क. ती सायकल मूळ एका इंग्रजाची असते आणि त्याने आपल्या कथा नायकाच्या आजोबांना दिली असते.  केशव चे सायकलवर अतिशय प्रेम असते आणि केशव चे हे सायकल प्रेम पंचक्रोशात विख्यात असते. कर्म-धर्म संयोगाने  दोन भुरट्या चोरांच्या (भालचंद्र कदम आणि प्रियदर्शन जाधव) हाती ती सायकल लागते. बस, इथुन गोष्ट  सायकल च्या गतीने पुढे प्रवासाला लागते. गोष्ट नागमोडी वळण घेत नाही, तुम्ही रम्य कोकणात गाणं गुणगणत  सायकलवरून फेर-फटाक्याला निघालया सारखच ही गोष्ट प्रवास करते. गोष्टीच्या शेवटी सायकल परत आपल्या नायका कडे येणार ही प्रेक्षकांना माहिती असते पण  या साध्य चोरीने अनेकांची आयुष्ये बदलतात, अगदी सायकलीचे सुद्धा! 

सुरुवातीला म्हणाल्या प्रमाणे चित्रपटाची सृष्टी-निर्मिती उत्तम आहे. कॅमेरा संचालन, कॅमेराचा दृष्टीकोण, प्रत्येक शॉट ची प्रकाश मांडणी कोकणाच्या सुरेख भूभागाला बोलत करतो. कोकण जणू चित्रपटातील एक पात्र बनत. चित्रपटात पात्र कमी आहेत आणि अगदी  एका   हातावर मोजता येतील एवढ्याच पात्रांना प्रामुख्याने भूमिका आहेत. त्यामुळे मुख्य भूमिकेतील पात्रे छान रंगली आहेत. त्यांची व्यक्तिमत्वे आणि विचार बदलतांना प्रेक्षकांना जाणवतात. पण मुख्य भूमिका छान आहेत म्हणून सहायक पात्रे कमी पडली नाहीत. प्रत्येक कलाकाराने मिळालेल्या वेळात उत्तम भूमिका वठवली आहे. केशवची लहान मुलगी, बायको, त्याचे वडील,  गावातील सावकार या सगळ्यांचे गोष्टी ला पुढे नेणाऱ्या भूमिका एकूण चित्रपटात चपखल बसतात. चित्रपटाचा काळ सन ५० किंव्हा ६० च्या दशकातील दाखवला आहे. त्या काळाची वेशभूषा आणि राहणीमान  व्यवस्थित दाखवले आहे.  चित्रपटावर पैसे खर्च केला आहे हे जाणवते पण पैसे जिथे आवश्यक आहे तिथेच टाकलाय आणि जो टाकलाय तो उपयोगात आलेला आहे. कारण चित्रपटाचा जुना कालमान दाखवण्याच्या मागचे कारण जुन्या काळातील थोडा भाबडेपणा , थोडा मनस्वीपणा आणि तरी मुळात असलेला चांगुलपणा आणि त्या चांगुलपणाला वाव व प्रोत्साहन देणारा समाज हे कथेचे व चित्रपटाचे आधारस्तंभ आहेत. साधारणत:, कौटुंबिक चित्रपट बनवायचा तर त्याच्या मुळाशी कुठला तरी ठाम विचार व दृढ तत्वज्ञान हवे. नीट विचाराअंती बनवलेलया चित्रपटात हे तत्वज्ञान प्रेक्षकां पर्यंत बरोबर पोचते. या चित्रपटाची कथा सरळसोट असली तरी त्यामागे संदेश आहे. आणि हा संदेश अत्यंत कल्पकतेने दाखवण्यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे. 

हा चित्रपट म्हणजे बा. भ. बोरकर किंव्हा शांताबाई शेळके यांची कविता वाचल्या सारखी आहे. सुरवंटाचे फुलपाखरू होण्याची ही कथा मनाला हळुवार स्पर्श करून जाते. प्रत्येकाने अवश्य हा चित्रपट बघावा. 


No comments: