6/18/08

॥प्रलोभनं॥

आयुष्याच्या यज्ञाची। मोक्षा हीच फलप्राप्ती॥
या यज्ञाची ईष्टदेवता। कान्होबाची भक्ती॥१॥

कुंड धर्माचा बांधुनी। अर्पिल्या कर्माच्या काष्ठा॥
देवून भक्तीचे तूप। पेटविला हा यज्ञाग्नी॥२॥

बुध्दी ज्ञानपर। हृदय भक्तीपर॥
अवयव कर्मोत्सुक। करावे रे ॥३॥

या देहातच चक्रपाणी। तोच शोधूनी॥
मोक्ष अवघाची। प्राप्त झाला रे॥४॥

मोठी मोठी निरूपणे वाचुनी। घेतले हे हातात कार्य॥
या पामरात नसे शक्ती। नेण्यास पूर्णत्वास हे यज्ञकर्म॥५॥

प्रारब्ध कर्माची फळे। भोगण्यास असमर्थ॥
करूनी चुकांची पुनरावृत्ती। दुष्फळ संचित कर्म॥६॥

सांगतात तुकोबा आम्हास। देहात वसे चक्रपाणी॥
हा देहच षड्-रिपुंच्या तावडीत। सांगावी काय राम-कहाणी॥७॥

यात भर कलियुगाची। प्रलोभनांचा नसे तुटवडा॥
या षड्-भुतांची शक्ती अचाट। गिळंकृत करिती भू-मंडळा॥८॥

या षड्-भुतांची वाढे शक्ती। या देहाची जर्जर दशा॥
जैसे राहू-केतू ग्रासती। खग्रास ग्रहणे सूर्या॥९॥

विझविती यज्ञाग्नी। या षड्-भुतांचा अंधःकार॥
भक्ती विफल कर्मे निष्फळ। वाढे सर्वत्र बुभु:कार॥१०॥

या कलियुगात। मनाच्या व्यथेस ना ठाव॥
मन मनालाच फसवुन। प्रलोभनांचे शोधी गाव॥११॥

प्रलोभन-ग्रस्त मनास। औषध काही ना मिळे॥
प्रलोभनांच्या ताटव्यात। पुनर्जन्माचा साप दंश करे॥१२॥

प्रलोभनांच्या जंजाळात। अजून किती गुंतायचे॥
देवघराच्या उंबरठ्यावर। किती जन्म ताटकळायचे?॥१३॥

या चेष्टेचा। अंत कधी ना कळे॥
या जिवा-शिवाच्या खेळाचा। हेतू काय ना उमजे॥१४॥

चिन्मय करी सर्वांस विनंती। हे किंतु नाही नवखे॥
अंतरी केशव-प्रीतीची बांसरी। शब्द केवळ भौतिक रूपे॥१५॥

No comments: