तुमच्या सारखं अजुन बरेच लोक विचारतात की गुजराती असुन मी कंम्प्युटर मधे काय काम करतोय? धंदा-पाणी कसा नाही माझा. आमचा होता मोठा दुकानं. कपड्याचा. आम्ही एकुण तीन भाई आहोत आणि बाबा असे सगळे धंदा बघायचो. भेंडी बाजार मधी मोठ्ठा दुकान होता. हाताला नोकर-चाकर होते. बाबांनी टाकलं होत दुकान त्यांच्या जवानीत आणि रक्ताचं पाणी करुन वाढवलं होत. आता ते फक्त गल्ल्यावर बसतात आम्ही पोरच सगळी काम करतो. कपडा कुठला आणायचा, किती माल हवा, किंमत केवढी हवी इथ पासुन तर कपड्याची मांडणी कशी करायची आणि नोकरांचे पगार असा सगळा बराच कामं असायचा. त्यातुन नोकर सोडुन जाणार तो डोक्याला वेगळा ताप असायचा. पण तीन नोकर खास होते. बर्याच वर्षांपासुन आमच्याच कडे होते. आम्ही सगळं कुटुंब एकत्रच रहातो. दोन फ्लॅट जोडुन आहेत. बाबा म्हणत होते की धंदा वाढावायला हवा. तीन भाई किती दिवस एकच दुकान सांभाळणार. आमच्या पत्नी गर्भवती होत्या. माझ्या डोक्यात अजुन एक दुकानं उघडण्याचं होत. मुंबईला कुठे काही स्वस्त असत. आणि नवा धंदा टाकायचा म्हणजे भांडवलाचा मुख्य प्रश्न असतो. तेंव्हाच्या जमान्यात बँका साल्या माजलेल्या होत्या. प्रायवेट बँका येण्याच्या आधीचा जमाना होता. मी अजुन काही शेठ मंडळींशी भेटी-गाठी करत होतो. एक चालतं दुकान असलं म्हणजे पैसा देणार्याला धास्ती कमी वाटते. पैसा एका दुकानात खेळता आहे त्यामुळे दुसर्या दुकानासाठी पैसा दिला तर बुडीत खात जाणार नाही. पण असली कामं हळु-हळु होतात।
गोष्टी कधी कश्या बदलतील हे सांगण नेहमीच कठीण असत. खुपदा असही होत की आपली काही चूक नसते तरी बराच त्रास अंगावर पडतो. खुप तमाशे केले तरी काही फरक पडत नाही. आगीत पडल की नाचुन थोडीच अंगाला चटके लागण थांबत. आमचं दुकान भेंडी बाजारात होत तरी आम्हाला कधी कशाची भीती वाटली नाही. आजु-बाजुला मुसलमानच होते पण आमच्या दुकानांच्या लाईनीत सगळ्या हिंदुंचीच दुकान होती. आमच्या कडचे बरेचशे पोरे मुसलमानच असत. भेंडी बाजा़र तसा भाई लोगचाच इलाका आहे. आम्ही छोटा शकील, दाउद इब्राहिमला आमच्या डोळ्यांनी बघीतल आहे. तेंव्हा पण तेंव्हा त्यांच्या सारखे बरेच भाई लोक तिथे हिंडत असत. एका जमान्यात हाजी मस्तानचा खुप वचका होता. पण तो बाबांच्या जमान्यात. दाऊद इब्राहिम सारख्या घाणेरड्या लोकांपुढे हाजी मस्तान काय किंवा वरदराजच काय, देव माणुस होता. स्मगलिंग करा किंवा हातभट्टीची दारु विका पण खाल्ल्या थाळीत छेद तर नका करु. ज्या देशात रहाता त्याच्याशी तर गद्दारी करायला नको. अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जेंव्हा पेटायला लागला तेंव्हा आमच्या दुकानाच्या इलाक्यात माहोल तंग होऊ लागला. डिसेंबर मधे ती इमारत पडली त्याच्या भूकंप आमच्या बुडाखाली आला. मुंबई सोबत आमची जिंदगीपण पेटली. आजु-बाजुला मुसलमानच असल्यामुळे आमच दुकान सहाजिकच लॉक-डाउन झाल. हळु-हळु दंगली वाढत गेल्या. आमच्या मुलुंडमधे शांतता होती पण दुकानच्या चिंतेनी मन रमत नव्हत. जानेवारीच्या शेवटाला दुकाना पर्यंत पोचता आल. दुकानात काहीच वाचल नव्हत. व्यवस्थितरित्या दुकान उघडुन सगळा माल चोरुन घेउन गेले होते. कुर्हाडीने लॉक तोडल. मग दिवसा-ढवळ्या माल हलवत होते. नंतर सगळीकडे रॉकेल टाकुन आग लावली. आमच्या कडे काम करणार्या पोर्यानी हे सगळं सांगितल. वीस-तीस वर्ष जुनं फर्निचर, बुकं, सगळ-सगळं जळुन गेल. भिंतीवर धमक्या लिहिलेल्या होत्या. हे सगळं बघुन बाबांच्या छातीत दुखायला लागल म्हणुन त्यांना आधी हॉस्पीटल मधे घेउन गेलो पण नशिबानी हार्ट-अटॅक वगैरे काही नव्हता. आजु-बाजुची सगळीच दुकानं जाळुन टाकली होती. तेंव्हा आगीचे इंन्शुरंस होत पण ते लोक म्हणाले की दंगलीमधे झालेल्या नुकसानाची भरपाई ते करत नाहीत.
दुकानात अक्षरशः काहीच शिल्लक राहिल नव्हत. काय कराव सुचतच नव्हत. धंदा म्हणला म्हणजे पैसा सतत खेळता असतो. आमचं सगळ्यांच जे काही बचत होती त्यावर किती दिवस काढायचे. आमच्या नुकसानी बद्दल सरकार कडुन पंचवीस हजार मिळालेत. लाखो रुपयांच्या मालाची होळी झाली आणि शिमग्याला पंचवीस हजार मिळाले. परत डागडुजी करुन करुन माल भरायच म्हटल तरी गिर्हाईक कधी परत येणार माहिती नव्हत .घरचा धंदा असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे आम्ही भावांनी फारस लक्ष दिलं नव्हत. आम्ही आम्ही दोघे मोठे भाई बी. कॉम होतो पण त्याल कोणी भीक घालत नाही. मी आमच्याच अकांउटंट कडे नोकरी धरली. महिन्याला अडीच हजार पगार होता. काही दिवसांपूर्वीच मी नवा दुकान टाकायच्या खटपटीत होतो आणि आता दाण्याला मोताद झालो होतो. पण परिस्थिती नुसार बदललो नाही तर मोडुन जातो. त्या घडीला घरी दोन्ही वेळेसच जेवण सगळ्यांना मिळायला हव हे महत्त्वाच होत. माझ्या भावानी सेल्समनची नोकरी मिळविली. कपडा मार्केट शी संबंधीतच होती.
पण आम्हा सगळ्यांच्या डोक्यात दुकानच घोळत होत. हाताशी काहीच पैसा नाही. बरं मागची थक-बाकी राहिली होती ती वेगळीच. ज्यांची देणी होती ते पाठीशी लागली होती व ज्यांच्याकडुन घेणी होती ती ओळख दाखवीत नव्हती. हळु-हळु लक्षात येत होत की पुन्हा दुकान चालु करायच तर भेंडी बाजारात ते करण अशक्य होत. जळलेल्या दुकानात आता पहिले सारख सुरक्षितही वाटेनास झाल. एक नविनच गेम सुरु झाला. कोणी तरी येउन दुकान विकता का विचारणार. नाही म्हटल तर धमक्यांचे फोन येणार. काहे दिवसांनी साले पोट्टे लोक येउन दम द्यायला लागले. चाकु-सुरे तर खिशात कंगव्या सारखे ते लोक बाळगत होते. शेवटी एकानी येउन पोटाशी नवी रिव्लॉवर लावली. विषाची परीक्षा कशाला करावी? सर बचा तो पगडी पचास म्हणुन एका बाटग्यालाच दुकान विकुन टाकलं. मातीला जास्त किंमत मिळाली असती. महिन्याच्या आत सगळा ठणठणाट झाला.
कपड्याचा सोडुन अजुन कुठल दुकान टाकयची हिंमत होत नव्हती. दुसर्या तर्हेची दुकान चालविण्याचा मुळीच अनुभव नव्हता. आणि इलेक्ट्रोनिक्स सारख दुकान टाकायला भांडवल कुठुन आणणार? मुंबईत नवी जागा विकत घेउन नवा धंदा टाकायचा म्हणजे लाखो रुपये लागणार. माझ्या सासुरवाड गुजरात मधे होत. ते लोकं मला म्हणत होते गुजारत मधे येउन त्यांच्या धंद्यात हात-भार लावायला. पण इथे आई-बाब आणि भावंडांना एकदम टाकुन जाणं अशक्य होत. त्यातुन एका भावाच अजुन शिक्षण व्हायच होत.
बुकं सांभाळण्याची काम करण्यात फारसा काही अर्थ नव्हता. पण अजुन काय कराव सुचत नव्हत. डोळ्यासमोर नुसताच अंधार होता. जुन्या ओळखींनी नोकर्या मिळत होत्या पण त्या अकांउटंट सारख्याच होत्या. अशीच काही वर्ष गेलीत. पोरग बालवाडीत जायची वेळ आली. खर्च वाढत होते, महागाई वाढत होती आणि उत्पन्न मात्र तेवढच होत. तेंव्हा कंप्युटर क्षेत्राचं वारं थोड-थोड वाहु लागली होती. मी घरा जवळच्या एका इंस्टीट्युट मधे छोटे कोर्सेस करायला सुरुवात केली. ते साले लोक लुबाडत होते. मायक्रोस्फॉट वर्ड शिकविण्याचे हजार रुपये घेत होते. अर्थात हे कळायलाही काही दिवस लागले. मी आपला कोर्सच सर्टिफिकीट घेउन मारे नोकर्या शोधायला जायचो आणि जास्तीत जास्त सेक्रेटरीच्या नोकर्या उघडायच्यात. कंप्युटर क्षेत्रातील कंपन्या फक्त इंजिनिअर लोकांनाच नोकर्या देत असत. खर सांगायच तर इंजिनिअर झालेल्या पोरा मधे आणि माझ्यात काहीच फरक नव्हता. या मोठ्या कंपन्यात नोकर्या मिळाल्यात कि तिथेच सगळं शिकविल्या जात. पण मी आत इंजिनिअर नाही त्याला कोण काय करणार? शेवटी मी ठरवलं कि कितीही कठीण गेलं तरी कोडिंग शिकायच. मी परत क्लासेस सुरु केले. पण कोडिंग गम्मत थोडीच असते. मला चांद-तारे दिसायला लागले. लॉजिक काय ते कळेना, लँग्वेज कशी लिहायची ते जमेना. लुप काय हे साध कळायला महिना लागला. क्लास मधे शिकविणारा साला ढ माणुस होता. थोड पुस्तकाबाहेरच प्रश्न विचारले कि त्याची त्-त्-प्-प् व्हायची. दिवसभर काम करुन मी संध्याकाळभर इंस्टीट्युट मधे कंप्युटर समोर बसुन असे. तासोघंटी स्क्रीनकडे बघत बसायचो. पण जागवरुन हलायचो नाही. इथे बुडाखाली आग लागलेली असली आणि डोळ्यासमोर शुन्य अंधार असला म्हणजे काय स्थिती होते हे सांगण अशक्य आहे. हळु-हळु गोष्टी कळु लागल्या. न-कळुन होणार कस! बिल्डिंग मधल्या इंजिनिअर होत असलेल्या काही मुलांचीही मी मदत घेतली. जमिन-आस्मान एक केल आणि कोडिंग मागुन-पुढुन शिकलो.
इंस्टीट्युटची परीक्षा झाल्यावर मला अचानक खुप छान वाटु लागल इतका अभ्यास केल्यावर ती परीक्षा म्हणजे टाईम-पास होता. पण मला कॉन्फीडंट वाटु लागल. पुढे जायला माझ्यात बळ आल. अजुन हवी तशी नोकरी मिळाली नव्हती पण ती न मिळण्याच्या कारणांवर मी मात केली होती. कंप्युटर मला येत नाही किंवा येऊ शकत नाही असं कोणी म्हणु शकत नव्हत. मी सगळ्या मोठ्या कंपन्यांमधे अर्ज करायला सुरुवात केली. अर्थात, कोणीच भीक घातली नाही. बाबांनी सल्ला दिला कि कुठल्यातरी लहान कंपनीत आधी अनुभव घे. मी मग लहान कंपन्यांमधे अर्ज करु लागलो. पण नशिब अजुन साथ देत नव्हत. नशिबाला बोल देउन काय फायदा? एवढ भरलेलं घर,साथ देणारी बायको आणि मेहनत करण्यासाठी धड-धाकट शरीर. अजुन काय हव माणसाला?
मी डोक शांत ठेवल। जे करायला हव ते सगळं मी केल होत आणि करत होत. आता पुढे काय होणार ते होणार. आमच्या दुकानाचा असा सत्यानाश होइल अस कुणी स्वप्नातही बघितलं नव्हत. पण तस घडल. काहीही घडल तरी पुढे जाण्या शिवाय काही मार्ग नसतो. बाटग्यांचा राग करत आणि झालेल्यावर रडत बसलो असतो तर पोरं-बाळ उपाशी पडली असती. कोणी मदतीला येइल याची वाट बघण्यातही फारसा अर्थ नसतो. स्वतःच किंवा स्वतःच्या कुटुंबाच आपल्यालाच बघाव लागत. मी आणि माझ्या मधल्या भावानी घर चालत ठेवण्यासाठी धड-पडाट चालविला होता. तो महत्त्वाचा.
शेवटी दुबईतल्या एका लहान भारतीय कंपनीत ओळखीनी मला नोकरी लागली कोडिंगच काम होत. पगार फार नव्हता पण तीथे टॅक्स नसतो आणि रहाण्या-खाण्यासाठी पगारा व्यतिरिक्त भत्ता मिळणार होता. थोडक्यात, मिळालेला पगार घरी पाठवता येणार होता. ओळखीनी नोकरी मिळाल्याचं मनात खटकत होत. माझ्या कडे स्कीलस् होते. ओळखीची गरज नव्हती. पण आता या बद्दल विचार करण्याची मुभा मला नव्हती. मुंबईतच नोकरी शोधा अस पत्नी म्हणत होत्या पण अजुन वाट बघण शक्य नव्हत. संधी, मग ती कुठल्या का रित्या असो, सारखी मिळत नाही. काही वर्ष जरी अनुभव मिळाला तरी मग मोठ्या देशी कंपनीत नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढणार होते.
आज घर स्थिर आहे. पोरगा कॉलेज मधे जाइल पुढल्या वर्षाला तर त्याच्या फी चे पैसे मी देउ शकतो. धाकट्या भावाचही शिक्षण नीट झाल. मधल्या भावालाही दुबईत चांगली नोकरी मिळवुन दिली. सेल्स च्या संबंधीतच होती. कमिशन बेसिस मधे टक्केवारी जास्त होती त्यामुळे पैसा जास्त मिळणार होता. त्याचाही संसार नीट मार्गाला लागला.
या सगळ्या घटना थोड्या पिक्चर मधल्या सारख्याच झाल्यात. थोडी नाच-गाणी असती तर मजा आली असती! शेवटही गोड झाला. नेहमीच होतो अस नाही. माझ नशिब अजुन काही नाही. अजुनही आठवण येते आणि परत धंदा करावासा वाटतो. पण ते कधी जमणार माहिती नाही. फारसा विचार करण्यातही अर्थ नाही पण झालेल्या गोष्टींचे चटके मधेच जाणवतात. आमच्या कुटुंबा पैकी कोणाचच काही चुकल नव्हत की त्या साथी एवढी शिक्षा का मिळावी? आयुष्यात आपल्या हातात किती कमी गोष्टी असतात हे मात्र लक्षात आल. शेवटी जेवढं जमेल तेवढ करायच.
मी सगळी शक्ती पणाला लावली होती आणि अजुनही लावतो आहे. बाकी सगळ वरच्याच्या हवाली.
1 comment:
khupch chan....
Post a Comment