6/7/08

गीता-माऊली

सनातन संस्थेत तत्त्व अनेक। जणु मोगर्‍याच्या फुलांची रास॥
यावर थोरांची निरुपणे। दरवळे चोहिकडे याचा सुवास॥१॥

पाय फुटले कि अर्भक। धावु लागती वाट फुटेल तिथे॥
तशी स्थिती होते। वाचु लागताच हि निरुपणे ॥२॥

या पामराची मती कुंठित। कळण्यास हा गुढार्थ।
झाकलेली हि शिवज्योती। षड्-रिपुंच्या घोंगडीत*॥३॥

माझ्या सख्या कान्होबास। आहे आमुची काळजी॥
आम्हा प्रश्नांकितांचे शंकानिवारण। करतो युध्दारंभी॥४॥

ऐन युध्दक्षेत्री। कृष्ण अर्जुनास सांगी॥
कर्म-भक्तिचे ज्ञान। भगवद्-गीते रुपी॥५॥

भ्रांत मिटली। युध्द क्षेत्राचे धर्म क्षेत्र झाले॥
कौरवांचे पतन झाले। गीतार्थाने॥६॥

गीतार्थाचे मूळ कठोर कर्मपर। रुप ज्ञानमय गोजिरे॥
गंध भक्तिपर गोड। दरवळे चोहिकडे॥७॥

या गीतेचे रुप काय वर्णावे। जणु आईचे प्रेम कथावे॥
शब्दांचे घडेच्या घडे भरावे। तरी ते अपुरेच॥८॥

या गीता वृक्ष-वल्ली। श्रांत-जन अनेक येती॥
धर्म-मोक्षाचे चिंतन करिती। ईप्सित फळे चाखुन॥९॥

युगा मागुनी युगे गेलीत। गीतार्थ गंगा वाहे अखंड॥
सर्वजन यात नाहुन। सत् चित् नित्य आनंदघन॥१०॥

कान्होबाची भक्ति ऊतु आली हृदयी। लिहिले हे शब्द प्रेमापोटी॥
अन्यथा या अर्भकाची बुध्दी जडभारी। थोरांनी हे साहस घ्यावे पदरी॥११॥

माझ्या राया भगवंता। धन्य झाला चिन्मय जन्मुन भारता॥
मोक्ष होतो जीथे प्राप्त। श्रवुन निव्वळ श्रीकृष्णा उधृत भगवद्-गीता॥१२॥

No comments: