12/23/07

भातुकलीचा खेळ

आज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्‍या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.

मला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार? आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार? पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का? पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.

तो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.

प्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का? मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.

आम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल। मग आमचं का जुळल नाही? आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला? मला असा वार्‍यावर टाकुन कसा गेला?

माझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्रमित होत। हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.

मला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. " ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्‍या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड."

हें काय असलं अभद्र बोलण झाल? माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल? कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का? मग परत का येत नाहीया तो? असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला?.....

3 comments:

यशोधरा said...

कसल लिहिलय...! एक मिनिट मला वाटल, खरच आहे म्हणून... कथा लेबल पहिल्यावर बर वाटल जरा. लिहीत रहा.

Manish Deo said...

Masta ahe re Chinmay

Unknown said...

mala mahiti nahi tu kadhi lihilay..

pan nanyachi dusri baju pahayla nazar lagte.

hats off..!!