पंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल। 'प्लग सैल होता का? बॅटरी तर खराब नाही झाली? च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत?' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर!) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा? हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात? खर्चाच्या विचाराने पाय लटपाटायची वेळ आली. कानात कुंय्...आवाज येऊ लागले. कसं तरी स्वतःला सांभाळुन मी परत एकदा बॅटरी, प्लग सगळ नीट तपासल. सगळ्या गोष्टी भौतीक जगात आप-आपल्या जागी स्थिर होत्या पर प्राण-पंछी उड गये थे।
'हात्तीच्या कंप्युटरची तर' अस काहीस पुटपुटत मी पुढे काय करायचं याचा विचार करत खोलीत फेर्या घालु लागलो। नवीन कंप्युटर घेणं म्हणजे डोक्याला एक ताप आहे. तंत्रज्ञान सश्यासारख उड्या मारत पुढे जातय आणि माझ्या सारख्या कासवाच्या बुध्दीच्या लोकांचा या शर्यतीत मुळीच तगावा लागत नाही. कुठला कंप्युटर घ्यायचा, किती पैशे मोजायचे, काय-काय तंत्रज्ञान त्यात हव याचा हिशोब पूर्ण होई पर्यंत किमान दोन आठवडे कंप्युटर येणार नव्हता. गाणी नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, पिक्चर नाही, काहीही नाही. ठण ठण गोपाळा!
तो रविवार शोक मनविण्यात गेला. पण आठवडा जसा जसा जाउ लागला तस कंप्युटर नसल्याचे बरेचशे फायदे दिसु लागले. संध्याकाळची कामे भराभरा होऊ लागले. अन्न अधिक चविष्ट लागु लागल. कामा व्यतिरिक्त वाचन होउ लागले. आई फोन फर काय बोलतेय ते उमजायला लागलं रेडिओवरही गाणी लागतात आणि वर्तमानपत्रातुन ही बातम्या मिळतात याचा पुनःश्च शोध लागला. कंप्युटरच्या आठवणीने अधुन-मधुन गळा भरुन येतो पण ते तेवढच.
पण या सगळ्यात काही तरी बोचत होत। लाकडाची शिळक तळहातात गेली की मन कस बेचैन होत तस काही तरी रुतत होत. यावर विचार करायला संध्याकाळी बराच वेळ असतो त्यामुळे विचारांची भिंगरी फिरु लागली.
सकाळी ऑफिस, संध्यकाळी कंप्युटर, जेवतांना कंप्युटर, रात्री झोपायच्या आधीसुध्दा कंम्प्युटरच। दुसर्या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश्य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात? समस्या दोन पैकी कुठलीही असो पण हा एकाकीपणा समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीची प्रतिमा नक्कीच आहे.
दोन दृष्टींनी समाज झपाट्याने बदलतो आहे. एक, जागतिकीकरणामुळे व त्यान्वये, पैश्यांच्या वाढत्या हव्यासापायी, नात्या-गोत्यांचे धागे सैल व जीर्ण होता आहेत. व दुसरं म्हणजे समाज स्वत:ला एका विशिष्ट प्रतिमेत बघण्याची स्वतःवरच बळजोरी करतो आहे. या दोन कारणांचा संक्षिप्तात विचार करुया.
नाती-गोती म्हणजे रक्ताची नाती एवढाच माझा उद्देश्य नव्हे तर शेजार-पाजार, मित्र-मंडळ व ओळखी-पाळखीतील (आणि प्राची-गच्ची!) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे। मनुष्याचे व्यक्तिमत्व ही सर्व पात्रे रंगवितात. यातील चांगले कोण वाईट कोण, कोण नातेवाईक आवडतो कोण नावडतो हा मुद्दा गौण आहे. पण या सर्वांच्या बोटांचे ठशे आपल्या व्यक्तिचित्रावर उमटलेले असतात. पण व्यक्ति-स्वातंत्र्याचा विपरित अर्थ लाउन, 'मी माझ्यापुर्ताच' किंवा 'मी माझ्या कुटुंबापुर्ताच' या भावनेने आयुष्य जगणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख आहे. सगळ्यांसमोर आपल अगदी उत्तम चाललय हा आव आणायचा आणि इथे मुलं वाया बिघडता आहेत हे बघुन हतबद्ध् व्हायच. काही समस्या कौटुंबिक सीमा-रेषे पलिकडे असतात. तीथे समाजा व्यक्तिला वठणीवर ठेवतो. हे सामाजिक नियम आखलेले नसतात पण ते आवश्यक मात्र असतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे नियम धाब्यावर बसविणे धोक्याचे आहे. व्यक्ति, कुटुंब व समाज या वेग-वेगळ्या संकल्पना नव्हेत तर एक-मेकांच्या प्रतिमा आहेत. हि भावना सगळ्यांनी जपणे आवश्यक आहे.
प्रजातंत्र म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत तर सुदृढ व स्वयंशासित समाज हे प्रजातंत्राचे अंतिम साध्य होय.
दुसरं म्हणजे सगळ्यांना सगळ हव याचा हव्यास. याचा अर्थ असा नव्हे की कमी साधनांमधे जगणे चांगले किंव्हा चैनीच्या वस्तु घेणे चुकिचे आहे. प्रत्येक वस्तुची, कृत्याची, विचारांची, थोडक्यात मानवी पैलुंची किंमत पैश्यात लावण्याकडे जो कल वाढत चालला आहे त्यामुळे समाज निष्प्राण व शुष्क होतो आहे. मला हे हव, ते हव, सगळ हव आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करणार. त्यासाठी लागतील तर सगळी बंधन, रुढी-परंपरा, नाती-गोती मी तोडणार, या गणिताचे उत्तर कधीच बरोबर येणारं नाहीया.
या दोन्ही कारणांमुळे व्यक्ति एकटा पडतो आहे. इंटरनेटवर वेळ तर जातोच पण जे आपल्याकडे नाही किंवा जे आपण नाही ते ही वेबदुनियेत खोटं-नाटं दाखविता येत. हि परिस्थिती भितीदायक तर आहेच पण केविलवाणीसुध्दा आहे. व यावर तोडगा आपला आपल्यालाच काढायचा आहे.
12/2/07
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment