'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट बघण्याचा योग्य फार उशिरा आला. त्या चित्रपटाची गाणी मी गेले कित्येक वर्षे नित्य नेमाने ऐकतोय. 'सूर निरागस हो' या स्तवनाने माझे अनेक दिवस अजूनही सुरु होतात. आणि कितीतरी संध्याकाळी मी 'मन मंदिरा' नित्य नेमाने ऐकतो. पण हा चित्रपट बघण्याची संधी मात्र कधी प्राप्त झाली नाही. माझा ठाम मत आहे कि इच्छा झाली म्हणून चित्रपट बघितल्या जात नाहीत. प्रत्येक चित्रपटाचे एक वेगळे व्यक्तिमत्व असते आणि त्या 'चित्रपट-पुरुषाची' इच्छा असेल तेंव्हा तो कलेचा आविष्कार बघण्याचा योग येतो.
आणि हा चित्रपट बघण्याचा योग पण काय योग असावा! जणू वर्षानुवर्षे मेहनत करून कलाकाराने, त्याच्या मनात असणार, देवाच्या गळ्यात गुंफता येईल असा एक सोन्याचा दागिना बनावावा! अप्रतिम! अलौकीक!
हा चित्रपट याच नावाच्या नाटकाचे पुनर्निर्माण आहे. मूळ नाटक श्री पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित असून, त्यात मराठी हिंदुस्थानी संगीताचे दिग्गज, श्री वसंतराव देशपांडे यांनी प्रमुख भूमिका केली होती. नाटकास संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दिले होते. हे नाटक सन १९६७ ला रंगमंचावर आले आणि त्या काळात फार प्रसिद्ध पण झाले. त्यातील कैक गाणी मराठी जनमानसाच्या मनात बिंबली आहेत, रुजली आहेत. माझ्या सारख्या तरुण पिढीला (मराठी मिडीयम) हे नाटक जरी माहिती नसेल तरी त्यातील गाण्यांचा परिचय नक्कीच आहे. नागपूर ला दररोज सकाळी ८ ते ८:१५ रेडिओ च्या विविध भारतीवर मराठी नाट्य संगीत लागत असे. त्यात मी मूळ नाटकातली 'तेजोनिधी लोहगोल', 'घेई छंद मकरंद' इत्यादी गाणी मी अगदी लहान पणापासून ऐकत आलो आहे. खास करून, 'घेई छंद मकरंद' हे माझे फार आवडीचे गाणे होते. पण मला हे कुठल्या नाटकातील आहे याची कल्पना नव्हती. तेंव्हा आशालता वाबगावकर यांनी गायलेले 'राजस राजकुमारा' हे गाणे सुद्धा मला फार आवडत असे.
या चित्रपटाचे सगळ्यात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे यातील नट-नट्या. अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे, कसलेले आणि मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील दिग्गज या चित्रपटात आहेत. अगदी नवीन कलाकारांनी पण छान अभिनय केला आहे. शंकर महादेवन यांना शास्त्रीजी ची भूमिका देणे एक प्रेरणादायी जुगार म्हणावा लागेल. जरी शास्त्रीजी या पात्राला चित्रपटात तेवढा वाव नव्हता तरी एका पट्टीच्या गायकाला आणि अति-उत्तम संगीतकाराला हि भूमिका देणे म्हणजे चित्रपटाला साजेसे होते. या पात्राचे व्यक्तिमत्व म्हणजे संगीताबद्दल आत्यंतिक जिव्हाळा असलेले आणि संगीतात श्रेष्ठत्व प्राप्त केल्याने नेहमी आदर उत्पन्न करणारे आहे. शंकर महादेवन हे बरोबर हेरले असावे कारण त्यांचा अभिनय चपखलपणे बसतो.
सुबोध भावे आणि सचिन यांच्या अभिनयाने हा चित्रपट कौशल्याच्या नवीन उंचीवर नेऊन ठेवला आहे. सुबोध भावे यांच्या सदाशिवाची आर्तता, मनाची घालमेल प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सचिन यांचा खानसाहेब याचे बरेच अंतरंग आहेत. एका बाजूला ईर्षा आणि पराभवची आत्यंतिक ठेच पण तरीही चांगल्या-वाईटाची चाड खानसाहेब असते कारण आपण जे केले ते चूक होते याची त्याला पूर्ण कल्पना असते आणि मनात कुठे तरी खंत असते. पण खोटेपणाने का होईना समोर मिळणारे यश आणि स्वागतास उभा असलेला मान याचा मोह खानसाहेबाला नाकारणे कठीण जाते. खानसाहेबाच्या या सगळ्या कोलांट्या-उड्या सचिन यांनी नेमक्या टिपल्या आहेत. कुठल्याही कलाकाराचा उच्चांक म्हणजे त्याने उद्धृत केलेल्या पात्राचे नाव घेतले कि तो कलाकारच डोळ्यासमोर येतो. श्रीकृष्ण म्हटलं कि नितीश भारद्वाज आणि श्रीराम म्हटलं कि अरुण गोविल. तसेच 'दिल कि तपीश' गाणारा खानसाहेब म्हणलं कि डोळ्यासमोर फक्त सचिन च येणार.
अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे आणि छोट्या भूमिकेत साक्षी तनवर यांच्या भूमिका ठळक, बांधेसूद आणि गोष्टीत चपखल बसतात. या सगळ्यांना कथेत महत्वाचे भाग आहेत. मुख्यतः साक्षी तनवर यांचा अभिनय व्रण उमटवून जातो.
आता आपण जेंव्हा कथानकाचे कौतुक करतो तर मूळ नाटकाच्या कथेचे कि चित्रपटाच्या कथेचे? मूळ गोष्ट श्री रंजन दारव्हेकरांनी लिहिली आहे. मी मूळ नाटक बघितले नाही पण नाटकाचे रूपांतर चित्रपटात करणे सोपे नाही आणि त्याचे दिग्दर्शन करणे पण मुळीच सोपे नाहीं. नाटकाला रंगभूमीचे बंधन असते पण चित्रपटाला तसले कुठलेच बंधन नसते म्हणूनच खूपदा नाटक किंव्हा पुस्तकाचे चित्रपट रूपांतर वहावत जात. या दोन्ही फळ्यांवर श्री प्रकाश कपाडिया - पटकथाकार व सुबोध भावे यांनी शतक मारली आहेत. सुबोध भावे यांचे कॅमेरा इतका सुंदर चालतो कि बघणार्याला प्रत्येक्षात तिथे असण्याचा भास होतो. नाटकाची कथा हि संगीताच्या दर्दी लोकांसाठी लिहिली आहे. शास्त्रीय संगीताची आत्यंतिक ओढ आणि प्रेम, त्यात यश मिळवण्याची तळमळ आणि त्यामुळे उत्पन्न होणारी मानवी आसूया या सगळ्या घालमेलीतून माणुसकीचा र्हास होतो. पण त्यावर उपाय पण संगीताचे सूर च आहेत. हे सगळे प्रेक्षांसमोर मांडायला सुबोध भावे यांनी प्रेक्षकांनाच जणू चित्रपटातील 'जनता' म्हणून रूप दिले. म्हणूनच चित्रपट लोकांच्या जिव्हारी लागला आणि जिव्हाळ्याचा झाला. चित्रपटाची वातावरण निर्मिती उच्च प्रतीची आहे. सेट्स, पोशाख श्रीमंत आहेत. राजवाडे आणि वाडे दोन्ही बरोबर घेतले आहेत. राजवाडा संस्थानाच्या राजाचा आहे त्यामुळे तो भव्य असू शकत नाहीं पण श्रीमंत नक्कीच असणार. चित्रपटाचे लायटिंग फार सुरेख आहे. मधल्या काही काळात मराठी चित्रपट अंधारातच असत.
चित्रपटाच्या गीत, संगीत आणि गाणाऱ्यांवर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. सुरेल आणि सुंदर शब्द याची जणू मेजवानीच! नवीन आविष्कारात राहुल काळे आणि राहुल देशपांडे अप्रतिम गायले आहेत. शंकर महादेवन यांच्या मराठीत गाण्याच्या ताकदीची कल्पना मराठी जनतेला आहेच पण त्यांचे 'मन मंदिरा' हे नवीन गाणे म्हणजे प्रत्येकाने दररोज सकाळी ऐकावे, मन प्रफुल्लित करायला. पण इथे खरे कौतुक मूळ धुरंधरांचेच. पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे. आणि त्यांच्याबद्दल काही हि लिहायची ऐपत अजून पुढच्या सात जन्मात येणार नाहीं.
सध्याच्या मराठी चित्रपटांच्या गीतांवर एक टिप्पणी करावीशी वाटते. सध्याची गीते हिंदीमय आहेत असा मला वाटतं. आणि शब्द फार मिळमिळीत वाटतात. शब्दांना जडत्व हवे, त्याला धार हवी, त्यात अर्थ आणि संदर्भ हवा. त्यामागचा अनुभव जाणवायला हवा. तो आता प्रतीत होत नाहीं. शब्द संस्कृतप्रचुर असतील, जे नाट्यसंगीतात असे आणि चाली शास्त्रीय संगीताच्या जवळ असतील तर अजूनही सुंदर गाणी निर्माण होतील. बरं तस नसेल तरी शब्दांच्या मागचा अनुभव लोकांना जाणवायला हवा. 'झिंगाट' गाणे ऐका, एका इच्छुक प्रेमाने गायलेले गाणे आणि शब्दहि अगदी साधे आहेत पण ते 'खरे' आहेत कारण एका सामान्य तरुण काय डोक्यात ठेवतो आणि त्याला काय वाटते ते नेमके टिपले आहे.
या चित्रपटातील अभिनय, वातावरण निर्मिती, कलाकार, वेशभूषा, संचालन इत्यादी बाबतींबद्दल आपण बोललो पण या चित्रपटाचा प्रभाव काय या बद्दल बोलणे आवश्यक आहे. मराठी चित्रपट सृष्टीला ८० व ९० च्या दशाकातील अवकळे बद्दल मी आधी ही बोललो आहे पण मराठी नाट्य संगीताची पण पार रया गेली होती. नामशेष होण्याच्या मार्गावर म्हणायला हरकत नाही. तसेच काही मराठी नाटकांबद्दल म्हणायला हरकत नाही. मला आठवत की टाइम्स ऑफ इंडियात ९० च्या दशकात एक आख्खे पानभर नाटकाच्या जाहिराती असत पण प्रदर्शने व खेळ केवळ मुंबई पुरतीच असत. आता तेंव्हा टाइम्स ऑफ इंडिया मुंबईत च प्रकाशित होत असे, मान्य. पण त्यातली हातावर मोजण्याजोगी नाटके नागपूर पर्यंत येत असत.... वर्षभरात! आता नागपुर चे माहात्म्य काय? पण महाराष्ट्र्याच्या एका टोकाला होत असणारी नाटके जर महाराष्ट्रयच्या दुसऱ्या टोकापर्यंत पण पोचत नसतील तर मराठी नाट्यभूमी आणि नाट्यभूमीशी संबधीत धंदा, या दोन्ही बाबी काळजीच्या सान्निध्यात होत्या म्हणायला हरकत नाही. अश्या परिस्थितीत चित्रपटाद्वारे नाट्य संगीताचा इतिहास सांगणे, प्रसिद्ध नाट्यसंगीतांचे थोडक्यात चित्रण लोकांसमोर ठेवणे, चित्रपटाद्वारे नाट्य संगीताच्या दिग्गजांची जीवन दाखवणे ही काम केवळ स्पृहणीयच नव्हे तर आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मराठी चित्रपट पुन्हा दर्जेदार या मार्गास लागल्या आहेत. श्वास असो कि हरिश्चंद्राची फॅक्टरी, किल्ला असो कि मी वसंतराव, विविध विषय मराठी चित्रपटसृष्टी ने कौशल्याने हाताळले आहेत. या रांगेत 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाला मानाचे स्थान नक्कीच प्राप्त आहे.
No comments:
Post a Comment