3/22/23

नोटबंदी

चौकातला हिरवा दिवा लागला. गाड्यांचे रणकंदन माजले. ऑटो, स्कुटरी, बसेस, कार, मालवाहतुकीचे ट्रक्स, सगळ्यांनी एकत्रच भसाड्या आवाजात भोकाड पसरले. दोन मिनिटांची तुंबळ मग उजव्या बाजूच्या रस्त्याची पाळी. संसाराचा अखंड आणि अविरत फेऱ्यांची जणू प्रतिकृतीच. भीषण आणि प्रदूषित. रेटलेला पण तेवढाच आवश्यक. प्रत्येक बाजूचा हिरवा दिवा लागताच पाखर उडावी तशी भिखाऱ्याची पोरं उड्या मारीत रस्त्याचे कठडे गाठीत. आता यांना आई ना बाप मग ती भिखारी झालीत की भिकाऱ्यांची पोरं? मळलेली अंग, धुळीने व गाड्यांच्या धुराने माखलेली तोंड, अर्धवट कपडे. घरातील स्वछता झाल्यावरही कोपऱ्यात एका ठिकाणी धूळ जशी 'अविजयी' असते तशीच ती पोरे चौकात भासत होती. स्वच्छ मोठा रस्ता, त्यात मध्ये झाडे लावलेला दुभाजक, उंच ट्रॅफिकचे दिवे, कॅमेरे सगळ्या दिव्यांवर, रस्त्यांवरच्या महागड्या गाड्या, घाईतली महाग कपड्यातली लोक पण कोपऱ्यात कृश, काळवंडलेली, अर्ध-नागडी पोरं. सगळ्या समाजाने लक्ष देऊन दुर्लक्षित केलेली. 

आज सकाळपासून गर्दी थोडी कमी होती. सदा नेहमी प्रमाणे लाल दिव्यामध्ये फुदकत होता. हातात फडकं घेऊन गाड्या उगाच पुसल्यासारखं करायचा आणि मग पैसे मागायचे. पण भीक मागणं तेवढ सोप नाही. त्याच एक विशिष्ट गणित असत. कोणाला मागायची, कुठे रेंगाळायचा, कुठल्या गाडी जवळ भटकायचं नाहीं. गाडीत एखादाच असेल तर कधी-कधी कारमधली उरलेली नाणी मिळत. साधारण तिशीतले दाम्पत्य असेल तर हमखास दहा ची नोट मिळणार आणि वरून गाडीतले उरलेले अन्न मिळणार. एकदा तर गाडीत अश्या दाम्पत्या सोबत लहान पोरग होत. तर सदाला चक्क गाडीतले एक खेळणे पण मिळाले होते. पण आज सकाळपासून सदाच्या चोचीला फारसा लागलं नव्हतं. ऊन वाढत होता आणि त्याला भूक लागली होती. पण त्यापेक्षा त्याला बोऱ्याची धास्ती जास्त होती. बोऱ्या म्हणजे चौकातला भिकाऱ्याच्या पोरांचा दादा. मिळणारे पैसे आणि तुकड्यात त्याचा वाटा. आणि नाही मिळाले किंव्हा कमी मिळाले तरी त्याचा वाटा नक्कीच. वरून चवीला थोडा मार. 

गाड्या भरधाव पळत होत्या आणि सदाचे डोळे 'लक्ष्य' शोधत होते.  

एक मोट्ठी टोयोटा येऊन थांबली. साधारण या गाड्यांजवळ जाण्यात फारसा अर्थ नसे. एकतर काच पुसायला सदाला त्या गाड्या उंच पडत आणि या गाड्या चालविणारे फार मग्रूर असत. पण खोडी काढायला म्हणून सदा फडके गाडीला घासत पुढे जाई. मग खिडकी खाली होऊन हमखास शिव्या बाहेर येत. त्या दिवशी पण तसे झाले नाही. पण गाडीतल्या एकाने सदाला हाक मारली. 

"पैसे चाहिये?"

सदाने मागे वळून बघितले. 

"पैसा चाहिये? इधर आ जरा"

सदा विचार करायला लागला कि जायचे कि नाही ते. एकदा त्याने कानफडात खाल्ली होती. त्याने दोन पावले घेतलीत आणि मग त्या आठवणीने पुन्हा थांबला. 

कारमधल्या एका जाड्याने त्याच्या पांढऱ्या बुश शर्टाच्या खिशातून दोन करकरीत नोटा काढून नाचवल्यात.

सदाचे डोळे चमकलेत. 

अजून कोणाला त्या नोटा दिसायच्या आत दोन गाड्या ओलांडून त्या मोठ्या गाडीच्या खिडकीशी सदा पोचला. 

"क्या नाम है तेरा?" खिडकीतला गुरकावला आणि नोटांचा हात उंच केला. 

पाचशे च्या दोन नोटा होत्या त्या. 

सदाने एवढी मोठी नोट कधी बघितली नव्हती. त्यांनी मोठ्ठा आवंढा गिळला. या नोटा आपल्याला मिळू शकतात या विचाराने त्याचे थकलेले डोळे लुकलुकलेत. 

"चाहिए?"

"हां" 

"तो नाम बता तेरा" 

"सदा" 

"सदा, आज तेरी लॉटरी लगी है|" ते ऐकून कारमधली त्या जाड्याच्या बाजूला बसलेले दोन लोक उधळल्या सारखी हसलीत. 

तेवढ्यात दिवा हिरवा झाला. 

सदा विचार करू लागला कि नोटा हिसकावुन पळायचे का ते. पण त्या माणसाचा हात आणि मनगट भक्कम दिसत होतं. नोट सुटायची नाहीं त्याच्या हातून आणि चुकूनही पकडल्या गेलो तर भक्कम बत्ती. गाडी हळूहळू पुढे जायला लागली. 

"दे दे भाई" आतला दुसर्याला म्हणाला. 

"सदा भाई, तू भी क्या याद रखेगा" असं म्हणत त्याने नोटा सदाला दिल्यात. 

"याद रखना, नोट-नोट पे लिखा है कमाने वाले का नाम" आणि गाडी झपाटयाने रहदारीत अदृश्य झाली. 

सदा काही क्षण स्तब्ध उभा होतं. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या बुडाशी जोरात हॉर्न वाजवला. दचकून सदाने  घाई-घाईने रस्त्याचा मध्यवर्ती कठडा गाठला. नोटा कुठे ठेवाव्यात त्याला कळेना. हातातल्या पुसायचा फडक्यात त्याने त्या तात्पुरत्या गुंडाळल्यात आणि पुढे काय करायचा याचा तो विचार करू लागला. बोऱ्याला कळले तर तो सगळेच पैसे ढापणार. अख्ख्या ब्रह्माण्डात स्वतःची अशी लपवायला फुटक्या कवडी एवढी जागा सदा कडे नव्हती. खिसे नाहीत, कपाट नाही, बॅग नाही, झोळी नाही,  संपूर्ण गणंग अस्तित्व. मागे एकदा त्यांनी युक्ती लढवून रस्त्याचे काम चालू होते त्यातल्या एका धोंड्याखाली काही नोटा लपविल्या होत्या. सकाळी उठला तर तो धोंडाच नाहीसा झालेला होता, रात्रीतून काम पूर्ण करून सगळे धोंडे मुनिसिपालिटी घेऊन गेली. नोटांच काय झालं कोणास ठाऊक? 

बरं पळून गेलो तर? पण जाणार कुठे? आणि ते पण अनवाणी पायांनी कुठपर्यंत जाणार? बोऱ्याकडे सायकल होती. तो नक्कीच शोधणार आणि मग यथेच्छ बडवणार. हातातल्या पाचशे च्या नोटा सदाला जणू आकाश दाखवीत होत्या पण त्याच वेळी भिंतीही बांधत होत्या. सदाचा मन पतंगा सारखा भराऱ्या घेत होतं पण त्याचा पेच सारखा बोऱ्याशी होत होता. सदाने विचार केला कि तासाभरात नास्ता करायला मिळेल तेंव्हा दुकानात जाऊन पोटभर दही-समोसा खायचा आणि मग उरलेले पैसे बोऱ्याला द्यायचेत. पण चहा राहिला? बरं, मग दही-समोसा आणि चहा आणि मग उरलेले पैसे बोऱ्याला. मार मिळाला तरी दही-सामोसा आणि चहाने भरलेल्या पोटी मिळेल.   

पण बोऱ्या होता कुठे? नेहमी चौकातल्या फ्लाय-ओव्हर च्या खांबाशी बसून तो सगळ्या पोरांकडे लक्ष देत असे. आज मात्र त्याची सावली पण दिसली नव्हती. सदाने नोटा त्याच्या चड्डीत जांघेच्या तिथे खुपसल्यात. तेवढ्यात पाठीवर थाप पडली. 

"का रे? आज आराम आहे वाटतं?" बोऱ्याने सदाला विचारले. 

"सकाळपासून शंभर गाड्या पुसल्यात पण एवढेच मिळालेत" असा म्हणत सदाने दहा-वीस च्या दोन-तीन मळक्या नोटा दाखविल्यात. 

"त्या मोठ्या गाडीच्या खिडकीशी उभा राहून काय गप्पा मारीत होतास?"

"उगाच ढील देत होते मला"

"पण त्यानें नोटा नाचवलेल्या बघितल मी"

"त्याच या वीस च्या आहेत"   

"त्या तर आधीच्या स्कूटरवाल्या बाईने दिल्यात ना?" बोऱ्याकडे कॅमेरा होता कि काय अशी शंका सदाला आली. 

"अजून काही नाही माझ्याकडे" सदा केविलवाणा आव आणून म्हणाला. पण मगाशी सदाने  पाठीवर मारलेल्या थापटीने सदाची हाडे दुखावली होती. 

"तुला काय मी येडा वाटतो का?"

सदाने आजू-बाजूला बघितलं. पोटात भुकेचा शूळ उठला होता. दही समोसे डोळ्यासमोर नाचत होते. उन्हाच दही नको खरं. ते दही कधीच ठेवलेलं असत कोण जाणे. मग समोस्याची चव आंबट होते. दही समोसा नकोच मग. समोसा चाट आणि चहा. आणि चहा पण दोन कप. 

" ऐ, उभ्या-उभ्या झोपला का रे?" 

सदाने झटक्यात रोरावत येणाऱ्या ट्रॅफिक मधे उडी मारली. दोन -चार हॉर्न कर्कश्य वाजलेत पण सदा ट्रॅफिक ची नस-नस ओळखत होता. मोठ्या सफाईने त्यांनी पलीकडचा फुटपाथ गाठला. 

"कुठे जाणार रे तू भाड्या?"

 सदाला फक्त्त 'कुठे' एवढेच ऐकू आले. पुढे कुठे जायचे याचा तो विचार करू लागला. त्यांनी डावा रस्ता ओलांडून फ्लाय-ओव्हरचा खांब गाठला. बोऱ्या त्याच्या मागे नव्हता. पण त्याने पण विरुद्ध दिशेचा फ्लाय-ओव्हर चा खांब गाठला होता. "ओय" अशी त्यांनी आरोळी ठोकली. त्या गाड्यांच्या गदारोळातही सदा ती हाक ऐकून गारठला. आता मार किती मिळणार याची मोजणी तो मनात करीत होता. समोर बसेस ची रांग लागली होती. त्यामागे बोऱ्या दिसेनासा झाला. सदा उभा असलेल्या खांबाच्या मागे विजेचा एक ट्रान्सफॉर्मर सारखा डब्बा होता. सदा त्या डब्याच्या खालती जाऊन लपला. त्याचे हृदयाचे ठोके बाहेर ऐकू येतील इतक्या जोरात धडधडत होते. बोऱ्याच्या रागाची धास्ती चौकातल्या प्रत्येक पोराला होती. कुठल्या थराला जाईल, किती मारेल, कशाने मारेल, कुठे मारेल याचा काही भरोसा नाही. 

त्याला तेवढ्यात डब्याजवळ कोणाचे तरी मळके पाय दिसले. गुण्याचे होते. 

"बोऱ्या दिसतोय का रे?" सदाने गुण्याला विचारले. 

"तुला कल्टी मारायला लागेल इथून" 

"बोऱ्याला माहितीय हि जागा?"

"त्याला सगळं माहिती असत बाबा. कॅमेरा असतो बहुतेक त्याच्या कडे. काय झोल केला तू एवढा? इतक्या दुरूनहि बोऱ्याचे डोळे आग ओकतांना दिसतायत" 

सदा टणकन उडी मारून बाहेर आला. त्याच्या नकळत त्याने सेकंद मोजले होते. पिवळा सिग्नल लागल्याचे त्याला न बघतां दिसल होत. तो वेगाने नाल्याच्या दिशेने धावू लागला. मधे त्याने ओझरती नजर मागे टाकली. डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला बोऱ्या पण धावतांना दिसला. पण तो सदाच्या मागे धावत नव्हता. सदा नाल्याच्या काठावर पोचला तर बोऱ्या जणू त्याची वाट बघत उभा होता. 

सदाने धावता-धावताच दिशा बदलली आणि तो उजव्या बाजूला गेला. तिथे रस्त्याच्या काठावर बांधलेल्या कंबरे पर्यंतच्या उंचीच्या भिंतीच्या कठड्यावर तो चढला. बोऱ्या पण तिथे क्षणार्धात पोचला. 

"आत्तापर्यंत चुपचाप पैसे दिले असतेस तर मार कमी खाल्ला असतास. पण उगाच मला मेहेनत करायला लावलीस. धाववलस. आता काही मी तुला सोडत नाही. तुझ्या सगळ्या नाड्या माझ्या हातात आहेत." असा म्हणत बोऱ्या खिडखिडत हसला. त्याचे खर्रा आणि पान मसाला खाऊन रंगलेले दात विचकलेत. 

सदाकडे आता फारसे पर्याय उरले नव्हते. समोर रस्ता भरगच्च धावत होता. मागे नाला आणि मधे बोऱ्या. सदाने चड्डी सावरली आणि नाल्यात उडी मारली. पच्चकन नाल्याची घाण उडाली. नाल्यातून सदा पलीकडचा काठ गाठायला निघाला. त्याला खात्री होती कि बोऱ्या त्याच्या मागे नाल्यात नक्कीच उडी मारणार नाही. पण आता नाल्याच्या घाणीतून माखलेल्या त्याला नास्ता आणि चहा पण कोणी देणार नव्हते. पण सदाने ठरवले कि काहीही झाले तरी पैसे बोऱ्याच्या हाती लागू द्यायचे नाहीत. शक्यतोवर गतीने तो नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता पण ते तेवढे सोपे नव्हते. घाण, पाणी, चिखल, प्लास्टिक, काचा, झाडाच्या फांद्या आणि इतर अनेक अज्ञात घाणीच्या गोष्टीतुन चालणे सोपे नव्हते. काही वेळ चालल्यावर सदाच्या लक्षात आले कि नाल्यात मात्र घाण वास नव्हता. सगळं वास वरच उडून जात होता. आणि नाल्यात एक विचित्र शांतता होती. ट्रॅफिक चा आवाज दुरून घोंगावत होता. 

सदा प्रवाह बरोबर उजवी कडे वळला. त्याला धास्ती होती कि दुसऱ्या काठाला बोऱ्या उभा असायचा. थोड्या अंतरावर त्याला हनुमानाचे मंदिर दिसले. सदाला युक्ती सुचली.  त्याने ठरवले कि पैसे मंदिराच्या हुंडीत टाकायचेत. कोणालाच ना मिळो. मला नास्ता नको, बोऱ्याला पैसे नको. बोऱ्या दर शनिवारी मंदिरातला प्रसाद वाटत असे. हुंडीत पैसे टाकलेले बघून एखाद वेळेस तो कमी मारेल. 

जुन्या काळात जेंव्हा नदीचा नाला होता तेंव्हा प्रवाह च्या काठाचे हे मंदिर सुबक आणि सुंदर दिसत असणार. आता मात्र मंदिरात पोचणेही कठीण झाले होते. 

त्या घाणीतून सदाचा कंबरेखालचा काळ भाग हळू हळू वर येऊ लागला. त्यानें जांघ चाचपडली. नोटा शाबूत होत्या. काठावरच्या पायऱ्या सराईत पणे चढत सदा मंदिरात पोचला. देवाला नमस्कार करून घाई-घाईने त्याने त्या घाण नोटा हुंडीत कोंबल्या. त्याला हुश्श झाले. तेवढ्यात त्याला कानशिलावर मागून सणसणीत झापड पडली. तो भेलकांडून खालती पडला. त्याचा उजवा कान सुन्न झाला. त्याच्या डोळ्यातून क्षणार्धात अश्रूंची रहदारी सुरु झाली. 

"खूप पळवलंस रे तू मला भाड्या" बोऱ्या म्हणाला. "तुला काय वाटले कि तुला पळायला जागा आहे. तुझ्या सारखी शंभर पोट्टी उगाच नाही सांभाळत. आणि हुंडीत काय टाकलास रे?" हुंडीच्या पैसे टाकण्याच्या छिद्राशी नाल्याच्या घाणीचा पुरावा होता. 

"तुला काय वाटलं हनुमान रक्षण करतो हुंडीचं?"

शांतपणे खिशातून काही तरी काढीत बोऱ्याने खट्ट आवाज करीत हुंडी उघडली. ते बघून सदाचा चेहरा पार पडला. कानशिलं दुखत होती पण बोऱ्याने हुंडी उघडलेली बघून जणू सदाच्या हृदयालाच झापड पडली होती. त्याचा जगावरचा उरला सुराला विश्वासही उडाला. 

बोऱ्याने त्या घाण नोटा उंदीर मानगुटीने उचलावा तश्या उचलल्यात आणि जोर-जोरात खिदळायला लागला. "यासाठी एवढी धाव-पळ करवलीस? या नोटां साठी? कचरा आहेत या नोटा, रद्दी! नोटबंदीत या नोटा निकम्म्या झाल्यात. त्या मोठ्या गाडीवाल्यांना बदलत्या आल्या नाहीत म्हणून तुझा गेम घ्यायला तुला चारल्यात."  प्रत्येक शब्दामागे बोऱ्याचे हसणे वाढत होते. त्यानें त्या नोटा सदाच्या तोंडावर फेकल्यात. नाल्याची घाण सदाच्या नाकावर चिपकली. सदाला नोटबंदी म्हणजे काय झेपलं नाही. पण नोटा निकम्म्या कश्या होऊ शकतील त्याचा तो विचार करीत होता. 

"आता आज दिवसभर भूकाच रहा. बघू कसा खातो ते" असा म्हणत बोऱ्या नाहीसा झाला. 

नाल्याचा वास दरवळत होता आणि सदा तिथेच बसलेला होता. एकटाच.  

No comments: