3/1/21

माझ्या बालपणीचे वन्यजीवन (शहर आवृत्ती!)

माझे लहानपण शहराच्या मध्यवर्ती भागात गेले. आमचे शहर म्हटंले तर शहर (किंव्हा  प्रमोद महाजनांच्या म्हणण्या प्रमाणे खुप मोठे खेडे!) पण गर्दी फार कमी होती. मी ज्या भागात रहात असे तो नीट आखलेला भाग होता. गल्ल्या आणि प्रत्येक घरा मागे एक 'मागची' गल्ली. त्याला आता 'सर्विस लेन' असे म्हणतात. आमच्या घरा मागची गल्ली कधीही पक्की केली नव्हती. गवत आणि झाडी वाढलेली ही गल्ली म्हणजे एक स्वतंत्र नैसर्गिक परिसंस्था होती. आमच्या गल्लीच्या टोकाशी एक भले थोरले (लहानपणी तरी खूप मोठे वाटत असे) मैदान होते. आणि त्या मैदानाला वळसा घालून नाग नदी (त्याचा नाला झाला होता). गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी गोठा. आमचे घरही जुन्या पद्धतीचे होते. घरात मध्यवर्ती अंगण होते. त्यामुळे धाव-पळ करायाला खूप जागा होती.

तर अश्या या परिसरात माझे बालपणीचे वन्यजीवन सामावलेले होते. त्यात मांजरी , मुंगस , पोपट (आमचा पाळलेला) , मुंग्या (काळ्या आणि लाल), मुंगळे (काळेच), उंदीर, घुशी (घुशींचा अनुभव थोडा कमीच आहे), चिचुंद्र्या, चिमण-चिमण्या, कधी कधी भारद्वाज पक्षी, दुरूनच पण कोकिळा, म्हशी, गायी, बैल, सांड आणि रस्त्यावरची कुत्री (व त्यांची पिल्ले!) असली मंडळी होती. आणि मुख्य म्हणजे मलाही या सगळ्यांशी संवाद साधायला, खेळायला, चावून घ्यायाला (काळा मुंगळा जीवघेणा चावतो!) खूप रिकामा वेळ होता. 

आमच्या कडे एक पाळलेला पोपट होता. माझ्या जन्मा आधी, माझ्या थोरल्या भावाच्या ही आधी हे महाशय आमच्या कडे कुठून तरी उडून आले होते. त्याचे पंख नीट कापले नव्हते म्हणून तो उडू शकला पण घायाळ होता बिचारा. आमच्या आजोबांनी त्याला बादली खाली ठेवले आणि खायला दिले. आता बादली खाली तो कसा सुरक्षित होता देव जाणे कारण आमच्या घरी सामाजिक मांजरींची बरीच वर्दळ असे. पण देवच जाणत होता. कारण हा तोताराम आमच्या घरचा पुढली २१ वर्षे झाला. शुद्ध मराठी घरात हिंदी बोलणारा हा एकटाच होता. मधल्या अंगणात एका कोपर्यात त्याचा पिंजरा असे. तिथुन त्याला स्वयंपाक घर दिसत असे. आईच्या भाजीला फोडणी पडली कि 'माँ रोटी दो ' चालू व्हायचे. आधी ज्या घरात होता तिथून शिकून आला असावा. त्या व्यतिरिक्त त्याची बोलगाडी फारशी धाव घेत नसे. दादाला तो 'मीत' म्हणून हाक मारीत असे. मांजरींचा आवाज तंतोतंत काढीत आणि बाबा जोरात शिंकलेत की तसाच आवाज काढुन शिंकत असे. आणि मोजून तेवढ्याच शिंका देत असे.  आणि हो, सकाळी दूध-साखर पोळी, दुपारी वारण -पोळी, ४ वाजता कधी कधी चहा, रात्री परत वरण-पोळी असा तो जन्मभर जेवला. त्याच्यावर एक स्वतंत्र लेख लिहायला लागेल एवढ्या आठवणी आहेत. 

आमच्या घरा मागच्या गल्लीत खूप मुंगूस होती. पिढ्या ना पिढ्या त्यांच वास्तव्य होत. साप ही असावेत पण कधी दिसले नाहीत. मी गच्चीतून त्यांच्यावर मग्गा भर पाणी टाकीत असे. का? कारण मी एक वैज्ञानिक प्रयोग करीत होतो. खरंच! आई शप्पत! कुठला प्राणी किती पटकन पाण्याला प्रतिक्रिया देतो? खालती बसलेल्या  चिमण्यां वर पाणी टाकणे अशक्य आहे. क्षणार्धात त्या फुर्र. मुंगूस - एकावर पडलं की बाकीचे झपाट्याने बिळात गायब. मांजरीवर मी फक्त एकदाच यशस्वी झालोय. पक्षांसारखंच मांजरीला लगेच कळत. कुत्री सगळ्यात बावळट. पाणी अंगावर पडल की वर बघायची कोणी टाकल ते. आता वाटतं की बहुधा कुत्री भाषेत ती मला शिव्या गाळत असणार. गायी-म्हशी सगळ्यात लोड-लेस - पाणी अंगावर पडल की त्यांचा कातडं थर थरत पण बाकी ढिम्म त्यांना फरक पडत नाही.  जैसे थे, रवंथ चालू. उन्हाळ्यात मी हे उद्योग करीत असे. दुपारी ४ नंतर थोडा ऊन कमी झाल्यावर प्राणी मंडळी बाहेर येत आणि मी पण. 

घराजवळून नाग नदी वहात असे. त्यात डुंबायला म्हशी जात असत. एका म्हशींच्या टीम चा रस्ता आमच्या गल्लीतून जात असे. पावसाळ्यात नदीचे लहानसे पात्र ओलांडून पाणी  बाजूच्या  मैदानात पसरत असे. मग म्हशी तिथेच डुंबत बसत. मी ८-९ वर्षांचा असेंन. दररोज म्हशी घरा समोरून जात तर मी 'ह्या-च्याक-च्याक' करीत  धावित असे. बहुधा त्यांना  माझा बावळट पणा ओळखीचा झाला असेल. लहानपणी मी थोडा अधिकच धीट होतो. एकदा थोड्या ठेंगण्या म्हशीच्या पाठीवर बसायला मी उडी मारली.  पहिल्या खेपेत सहाजिकच मला जमलं नाही. म्हशींचा प्रवास मंद गतीने मैदानाच्या दिशेने चालूच होता. मग मी धावत-धावत त्यांच्या मागे लागलो. पाण्याच्या जवळ येईस तोवर मला नेमकं त्या म्हशीच्या पाठीवर बसता आल. पण नेमकी तेंव्हाच त्या म्हशीने पाण्यात डुबकी मारली. आता विचार करूनही मला घशात 'ब्याक' होत. ते नाल्याच घाण पाणी, शेणाने माखलेल्या म्हशी आणि त्यावर हाल्फ पॅन्ट मधला काडक्या मी! कसातरी मी त्या पाण्यातून बाहेर आलो आणि घरी पळालो. खरी गम्मत अर्थात, घरी आल्यावर झाली. दारात पाऊल ठेवल्या बरोब्बर, घरभर  'सुगंध' दरवळला! आईला मला मारायला  हात ही लाववेना. मी आंघोळ करून आल्यावर, आणि कपडे पाण्यात बुडवल्यावर मात्र आईने चांगलेच चोपले.  

पण हा पराक्रम पहिला नव्हता. रॉकेल ची बैलगाडी येत असे. मी त्या बैलगाडीवर बसून हिंडायचो. रॉकेलच्या डब्ब्यावर बसल्यावर रॉकेल ने आंघोळ केल्या सारख आहे. आणि मुख्य म्हणजे कितीही धुआ, कपड्यातून रॉकेल चा वास (आणि हळदीचा डाग) जात नाही. त्या बैलगाडीचा बैल प्रचंड होता. मला तो हात लावू देत असे. त्याच्या पोळ्याला हात लावायला मजा येत असे. 

(क्रमश:) 

No comments: