या मराठी चित्रपटाबद्दल मी चार वर्षांपूर्वीच ऐकले होते. 'New Yorker ' या अमेरिकेतील सुप्रसिद्ध मासिकात या चित्रपटाचा आढावा प्रकाशित झाला होता. या मासिकात एखाद्या भारतीय चित्रपटाची दखल घेतल्या जाणे दुर्मिळ आहे. आणि या मासिकाने नुसती दखल घेतली नाहीं तर चित्रपटाचा आढावा पण घेतला हे प्रशंसनीय तर आहेच पण हि एक उपलब्धी म्हणावी लागेल. मी 'New Yorker 'मधील लेख तेंव्हा मुद्दाम वाचला नाहीं. मला चित्रपट आधी बघायचा होता. कारण कधी कधी आढावा वाचून चित्रपटाबद्दल आपण एक विशिष्ट धारणा घेऊनच चित्रपट बघतो. मला तसे करायचे नव्हते. चित्रपट हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी निगडित होता, त्यामुळे मी चित्रपट बघूनच त्याबद्दल पुढे वाचणार (किंव्हा लिहिणार) होतो.
या सगळ्यात चार वर्षे निघून गेलीत आणि मला आत्ता हा चित्रपट बघण्याची संधी मिळाली. "विलम्बेन इति शुभम्" असे म्हणून आपण विषयप्रवेश करू या.
चित्रपटाच्या नावाचा अर्थ 'शिष्य' असा होतो. चित्रपटाचे नाव इंग्रजीत असले तरी चित्रपट मराठीतच आहे. एका शिष्याची - शरद नेरुळकर ची, गोष्ट आहे. शरद हा भारतीय शास्त्रीय संगीताचा शिष्य आहे. केवळ भारतीय शास्त्रीय संगीताचाच नव्हे तर शरद हा शास्त्रीय संगीत इतिहास, संस्कृतीचा व गुरु-शिष्य परंपरेचा भक्त आहे. आता शिष्य किंव्हा भक्त असून चालत नाहीं. शिष्य होऊन तुम्ही अविरत कष्ट घेऊ शकता. किंव्हा भक्त बनून तुम्ही आयुष्य वाहू शकता पण कष्ट आणि निष्ठा या पायावर तुम्हाला कलेत नैपुण्य मिळेल च असे नाहीं. कधी कधी मुळातच प्रतिभा कमी असते. आणि जमीन-आस्मान एक केलं तरी सामान्यतेच्या चौकडीतून बाहेर येणे शक्य होत नाहीं. चित्रपटाचा हा प्रवास उत्कंठावर्धक यासाठी आहे कि प्रेक्षकांना शरद ची हि तळमळ जाणवते आणि शरदला त्याच्या मनातले यश प्राप्त व्हावे यासाठी प्रेक्षकही आस लावून बसतो.
साधारण चित्रपटाला सुरुवात असते, त्यात गोष्टीची उभारणी होते. मग मध्य असतो जिथे अडचणी सामोऱ्या येतात, एखादा खलनायक किंव्हा खलनायक वृत्तीची परिस्थिती उभारल्या जाते. शेवटी अडचणींवर मात होऊन सांगता होते. काही चित्रपटाच्या शेवटी अडचणींवर मात होत नाहीं आणि दुःखी शेवट असतो. The Desciple चित्रपट या कुठल्याच सांगाड्यात बसत नाहीं. याला सुरुवात नक्कीच आहे पण मग शरदचे अविरत कष्ट जणू चित्रपटाचा नायक बनतो. मग शरदच्या डोळ्याने आपण आशेचा, कष्टाचा, पीडेचा, त्यागाचा व अगतिकतेचा प्रवास करतो. शरदला त्याला अपेक्षित नैपुण्य मिळेल का?
शरदला संगीताचा नाद त्याच्या वडिलांनी लावलेला असतो. प्रेमाने, गोडी-गुलाबीने ते त्याला लहान वयापासून शास्त्रीय संगीताचा ध्यास लावतात. शरदचे वडील स्वतः गायक असतात पण त्यांना फारसे गातांना दाखविले नाहीत. त्या ऐवजी संगीताचा आणि शास्त्रीय संगीत घराण्यांचा इतिहास किंव्हा गायकांच्या आठवणीं मधेच त्यांना रमतांना दाखविले आहे. आणि कळत-नकळत हेच संस्कार शरदवर होतात. पण शरदला मात्र एक प्रसिद्ध गायक व्हायचे असते. म्हणून तो स्वतःला वाहून घेतो. शरदचे गुरु हे शरदच्या वडिलांचे गुरुबंधू असतात. शरदच्या वडिलांच्या गुरु म्हणजे माई. या माईंची शास्त्रीय संगीतावरची भाषणे शरद सतत ऐकत असतो. हि भाषणे जणू त्याच्या असाध्य साध्यासाठीचे दीपस्तंभ असतात. चित्रपटाच्या कथेच्या मुळावर प्रकाश टाकायला या भाषणांचा वापर करण्यासाठी दिग्दर्शक आणि लेखकाच्या अलौकिक प्रतिभेचे कौतुक करावे तेवढे कमी! शरदच्या वडिलांना नेहमी भूतकाळातच दाखविले आहे त्यामुळे सध्याच्या काळात ते नसावेत. संगीताला वाहून घेतलेला शरद आपल्या विधवा आईकडेसुद्धा फारसे लक्ष देत नाहीं. पण आपल्या संगीत गुरुची अगदी पुत्रवत काळजी मात्र घेतो. सगळीकडे विरोधाभास प्रकर्षाने जाणवतो. पण या कथेत कोणी खलनायक नाहीं. कोणी कोणाचे वाईट करायला निघालेला नाहीं. विचित्र ध्येय, असाध्य लक्ष्याची हि कथा दिग्दर्शकाने फार नाजूकपणे आणि हळुवारपणे प्रदर्शित केले आहे.
चित्रपटात शरद आणि त्याच्या आव्हानांव्यतिरिक्त, एकूण शास्त्रीय संगीताची सध्याची परिस्थिती, गुरु-शिष्य परंपरेतील त्रुटी, परंपरेच्या बोर्डाखाली संगीताचे होणारे नुकसान अश्या विवादित मुद्द्यांवर थोडक्यात भाष्य केले आहे. शास्त्रीय संगीताशी संबंधित आपण बऱ्याच विचित्र किंव्हा तर्कट गोष्टी नेहमी ऐकत आलो आहोत. पण ऐकायला मजेदार वाटत असल्या तरी त्यामागची सत्य परिस्थिती बिकट असते. यावर चित्रपटाने मार्मिक टिप्पणी केली आहे.
चित्रपटाच्या नायकाची भूमिका श्री आदित्य मोडक यांनी केलेली असून, ते स्वतः खऱ्या आयुष्यात शास्त्रीय संगीताचे उपासक आणि गायक आहेत. चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत शरदच्या गुरूंची भूमिका श्री अरुण द्रविड, माईंच्या भाषणांच्या आवाजात सुमित्रा भावे, शरद ची मैत्रीण म्हणून दीपिका भिडे-भागवत आणि शरदच्या वडिल्यांच्या भूमिकेत श्री किरण यज्ञोपवीत आहेत. पंडित अरुण द्रविड हे स्वतः शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. आणि दीपिका भिडे-भागवत या जयपूर घराण्याच्या उभरत्या तारा आहेत. उत्तम नटांना घेऊन त्यांच्याकडून गायकाची भूमिका करून घेण्याऐवजी दिग्दर्शकाने उत्तम गायकांना घेऊन त्यांच्याकडून नटांची भूमिका वठविली आहे. हा प्रयोग थोडा धाडसी म्हणावा लागेल पण या सगळ्यांनी त्यांच्या भूमिका उत्तम वठविल्या आहेत. कुठे म्हणजे कुठेच उणीव नाहीं.
चित्रपटाचे दिगर्शक आणि लेखक श्री चैतन्य ताम्हणे आहेत. श्री ताम्हणे यांचा 'Court ' (कोर्ट) नावाचा चित्रपट भारताकडून ऑस्कर साठी नामांकित झाला होता. कोर्ट सारखा विषय हाताळल्यावर श्री ताम्हणे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासारख्या विषयाला धरून चित्रपट लिहिणे यात त्यांच्या प्रतिभेच्या झेपेची कल्पना येते. चित्रपटाच्या छायांकनाबद्दल (Cinematography ) विशेष कौतुक करायला हवे. अश्या तऱ्हेचे छायांकन मी भारतीय चित्रपटात फारसे बघितले नाहीं. वीस वर्षांपूर्वी आलेल्या श्वास चित्रपटाची शैली थोडीबहुत अशी होती. चित्रपटात दाखविलेले मुंबई, छोटे-छोटे संगीत हॉल्स, ट्यूब लाईट चे दिवे, दारिद्र्य नसले तरी शास्त्रीय संगीत गायकीतील एकूण कमतरता प्रकर्षाने जाणवावी यासाठी हळू-हळू फिरणारे कॅमेरा अँगल इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण छायांकनाने फार सुरेख वातावरण निर्मिती होते. छायांकन Michał Sobociński यांचे आहे.
संगीतावर आणि शास्त्रीय संगीताशी संबंधित अनेक चित्रपट आहेत. कृष्ण-धवल चित्रपटांच्या काळात 'बसंत बहार' किंव्हा 'बैजू-बावरा' अतिशय प्रसिद्ध झाले होते. 'बसंत बहार' चित्रपटात पंडित भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांची जुगलबंदी दर्शविली आहे. (आणि जुगलबंडीत मन्ना डे चा आवाज असलेला नायक, भीमसेन जोशी चा आवाज असलेल्या पात्राला हरवतो) पुढे अनेक चित्रपटांमध्ये नट किंव्हा नटी गायक दाखविल्या गेले आहेत. ९० च्या दशकात 'साझ' नावाचा सई परांजपे यांचा चित्रपट आला होता. त्यात झाकीर हुसेन यांनी अभिनय केला होता. पुढे सलमान खान आणि मनीषा कोईराला यांचा 'खामोशी' म्हणून चित्रपट प्रसिद्ध झाला होता. त्या आधी 'आशिकी' नावाचा चित्रपटहि फार चालला होता. पण या चित्रपटात संगीत हे मुख्य पात्र नव्हते. आशिकी चित्रपटात मुख्य पात्रे उभारते गायक दाखविले आहेत आणि एकाला यश मिळाल्यावर त्यांच्यातील गैरसमज/संघर्षावर चित्रपट आहे. अमिताभ-जया भादुरी यांचा 'अभिमान' चित्रपटही असाच होता. गोष्ट हे नायक-नायिकेचीच असते. फक्त फरक एवढाच कि हि पात्रे संगीताशी निगडित असतात. या चित्रपटांच्या यशामागे चित्रपटातील गाणी चांगली होती एवढेच.
The Desciple चित्रपटात शास्त्रीय संगीत हे मुख्य किरदार आहे. रियाझ करून संगीतातील राग प्रसन्न होतील हि आशा, त्यासाठी चाललेली तळमळ आणि शास्त्रीय संगीतावरची अढळ निष्ठा आणि त्यासाठी भौतिक जगातील यशाला सुद्धा तर्पण देण्याची तयारी या सगळ्याचा अनुभव चित्रपट आपल्याला देतो. पंडित भीमसेन जोशी वयाच्या ११व्या वर्षी संगीत शिकायला म्हणून गुरूच्या शोधात घरून पळून गेले. आणि पुढील १२-१५ वर्षे शिकत राहिलेत. देवाच्या दयेने आपल्यापैकी बहुतांश साधे सुरात गुणगुणु पण शकत नाही. आणि आपल्या पैकी भीमसेन जोशींसारखी साधना करण्याची ऐपत आहे. पण हजारो वर्षे असंख्य गायक शास्त्रीय संगीताने का झपाटले जातात आणि स्वतःला का झोकून देतात याचा संक्षिप्तात अनुभव हा चित्रपट अनोख्या शैलीत टिपतो.
शंभर-दीडशे वर्षांपूर्वी पंडित पळूस्कर आणि पंडित भातखंडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि सुधारणेसाठी फार महत्वपूर्ण योगदान केले होते. त्यांच्या भूमीतील श्री चैतन्य ताम्हणे यांनी हा चित्रपट काढून पळूस्कर-भातखंडे यांच्या तुलनेत अल्पसा का होईना पण हातभार लावला आहे. म्हणूनच The Desciple मराठी चित्रपटसृष्टीत अजून एक उच्चांक मानायला हवा.
No comments:
Post a Comment