3/21/11

मन वढाया वढाया

बर्‍याच दिवसांनी लिहिण्याची संधी मिळते आहे म्हणुन मी आनंदात आहे. पण सर्वप्रथम माझ्या गैरहजेरीत संकेतस्थळावर नियमित पणे येणार्‍या वाचकांना आभार मानणे आवश्यक आहे. मी शेवटला लेख २२ सप्टेंबर २०१० ला लिहिला तरीही तुम्ही नियमीत पणे संकेतस्थळावर डोकावत होतात, हे बघुन लिहिण्याला हुरुप येतो. प्रोत्साहन साठी या कच्च्या लेखकाचे आभार कृपया स्विकारावेत ही विनंती. या दरम्यान वैयक्तिक आयुष्यात बर्‍याच गोष्टी घडल्यात. काही चांगल्या, काही वाईट. जे वाईट घडल त्यातुन चांगलच उमलल हा नशिबाचा भाग. आयुष्या सारखा शब्द वापरल्यावर पुढल्या वाक्यात संगणकाने त्रास दिला अस म्हणण थोडं विनोदी वाटेल. पण खरच सांगतो काही नवीन प्रकाशित न करण्या मागे माझ्या संगणकाचा फार मोठा हात (किंवा की-बोर्ड!) आहे. माझ्या संगणकावर मराठीत लिहिणे शक्य नव्हते म्हणुन वहित लिहिलेल बरचस काही वहिच्या पांघरुणात पहुडल आहे.

असो. अजुन महिना - दिड महिनाभर संगणकाचा त्रास कायम असणार आहे. त्यानंतर मात्र लिहिण्यात किंवा लिहिलेले प्रसिध्द करण्यात इतके अंतर पडणार नाही ही आशा.

डिसेंबरच्या महिन्यात माझे भारतात जाणे झाले. मातृभू चे दर्शन करण्याचा अवसर दोन वर्षानी मिळत होता. प्रत्येक वेळेस भारतात गेल की देश वेगळाच दिसतो. पाणी मुळी ठरतच नाही. त्या जलतरंगाचे विचार जे मनात उमटतायत त्याचे चित्र पुढल्या काही लेखात रेखाटु इच्छितो. त्यातले काही विषय अभ्यास केलेल असतील तर काही केवळ माझी वैयक्तिक मत असतील. भारताचा विचार केला तर भ्रष्टाचाराचा वाढता आवाका बघुन मन निर्बल होत. तसच पूर्णतः वेगळ्या विषयावर, पुण्यातल्या कॉफीच्या दुकानातल्या कॉफी बनविणारा इंग्लिश बोलतांना बघुन आधी मानसिक संताप येतो मग इंग्लिशचे दिवसागणित वाढणारे बळ बघुन जीव घाबरा होतो. केरळात गेलं असतांना तिथली प्रचंड आणि अत्यंत रेखीव मंदिर बघुन मन पूर्वजांच्या कर्तुत्वाने उत्स्फुर्त होत तर जागोजागी उभी रहाण्यार्‍या चर्च च्या इमारती बघुन हिंदु धर्माच्या भविष्या बद्दल चिंता वाटु लागते.

विषय विभिन्न आहेत पण विचार साधारण सारखे आहेत. चिंता आणि हतबलतेची गिधाड सतत घिरट्या मारत असतात. कित्येक शतकांच्या कालांतरानी भारताची खर्‍या अर्थानी प्रगती होते आहे. जन-सामान्यास प्रगतीचे नवीन मार्ग उपलब्ध होता आहेत. पैश्याच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. शिक्षणाच प्रमाण वाढतय. हि सगळी प्रगतीची चिन्हे आहेत पण प्रगती हा शब्द जडभारी आहे. त्याचा उपयोग वायफळ करणे चुकीचे ठरते. शिक्षणाच प्रमाण वाढत असल तरी पण समाजाची सुशिक्षितता कमी होते आहे. गरीबी वाढत नसली तरी महागाई इतक्या झपाट्याने वाढतेय की गरीबीची व्याख्या बदलविणे आवश्यक आहे. तसेच गरीब आणि श्रीमंता वर्गातली तफावत अधिक तीव्रतेने जाणवते आहे. महागाई तर तोबा-तोबा! गरीबाने जगु नये आणि वैद्यकीय क्षेत्रातले खर्च बघुन तर त्याने मरण्याचा विचारही मनात आणु नये. मरणारा मरेलच पण मागे रहाणार्‍यांच जीवंत मुडदे उरतील. नुसत भरडलेल आयुष्य जगाव. या सगळ्या रोगांवर एक कुठला तरी रामबाण उपाय असता तर सोप झाल असत पण तस काही नाही या. आज काल नेते मंडळींना दोषी ठरवुन आपण मोकळे होतो पण उद्या जादुने सगळे नेते नाहीसे झालेत तरी या रोगांच निदान होणार नाही याची मी शाश्वती देतो. कारण हे रोग नाहीयात, ती तर केवळ लक्षण आहेत. रोगाच्या लक्षणांच निदान करुन काही सुध्दा व्हायच नाही.

अर्थात आपण तेवढ सुध्दा करत नाहीया ती गोष्ट वेगळी.

हा रोग मानसिक आहे. समाज आर्थिक दृष्ट्या प्रगत होत असला तरी मानसिक दृष्ट्या तो अधिकाअधिक क्षुद्र होतो आहे. समाज विन्मुखता किड लागल्या कर्करोगासारखी आतुन पोखरते आहे. आपण यंत्रां प्रमाणे कामाला जातात आणि पैसा कमवुन घरी येतात. आजुबाजुची घाण, भ्रष्टाचार, अनैतिकता, अराजकता, नेत्यांची मग्रुरी, सामाजिक निर्लज्जता, न्याय व्यवस्थेचे धिंडवडे या सगळ्याकडे बिनधास्त दुर्लक्ष करतो. आपल्याला काय करायचय हे आपल घोषवाक्य. 'साली सिस्टमच बेकार आहे' ही आपली ब्रीदवाक्य. ही सगळी लक्षण, हि मानसिक शंढता, अस्त होणार्‍या समाजाची लक्षणे आहेत उदयास येणार्‍या विश्वसत्तेची नव्हेत. केवळ आर्थिक प्रगती आजवर कुठलाही समाज सत्तधीश झाल्याच उदाहरण विश्व इतिहासात सापडणार नाही. आणि भारत त्याला अपवाद ठरणार नाही.

यावर उपाय काय याची मला मुळीच कल्पना नाही. खुप सार्‍या लोकांना खुप सार्‍या आघाड्यांवर एकत्र होउन खुप वर्ष मेहनत करावी लागणार आहे. जॅरेड डायमंड नावाच्या लेखकाच गन्स, जर्मस अँड स्टील नावाच पुस्तक प्रसिध्द आहे. मनुष्याच्या इतिहासात काही समाज तगुन रहातात तर काही का कोसळतात या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी दिलेल्या कारणांपैकी मला एका कारणाचा प्रत्यय सध्या आपल्याला देशात येतो. नजिकच्या काळातल्या फायद्यासाठी आपल्या भविष्याच नुकसान आजची नेते मंडळी करते आहे आणि शोकांतिका अशी की आपल्याल हे कळत आहे तरी आपण डोळ्यांना ढापण लाऊन दरीच्या दिशेनी भरधाव जातोय.

आपली संस्कृती पाच हजार वर्ष टिकली कारण आपल्या पूर्वजांनी ती टिकवायला कष्ट घेतलेत. आपल्या पुढच्या पिढ्यांना अस आपल्या बद्दल म्हणता येइल का?

3 comments:

काय चालूये.. said...

welcome back..

संस्कृती टिकेल.. इतका पुण्य आहे पाठीशी, वाया जाणार नाही.. :-)

TW said...

मनोगत खरच मननीय आहे.
"शिक्षणाच प्रमाण वाढत असल तरी पण समाजाची सुशिक्षितता कमी होते आहे" हे खरच आहे.
किंबहुना आज जे भ्रष्टाचाराचे विकराळ रूप दिसते आहे त्यात (तथाकथित) सु- आणि उच्च-शिक्षितांचाच सहभाग जास्ती आहे.
याचे प्रमुख कारण, माझ्या मते, 'संस्कार विहीन शिक्षण' हे आहे. अर्थात गांधीजींनी '७ सामाजिक पापकर्म' मधून याबद्दल फार पूर्वीच सावध करण्याचा प्रयत्न केला होता, पण गांधीजींच नाव फक्त मत मिळवण्यासाठी ना !
शाळा, घर, मंदिर - ही समाजाची तीन संस्कार केंद्रे. आज तिन्ही ठिकाणी आनंदी आनंद आहे !
...
संस्कृती केवळ पूर्वजांच्या पुण्याई वर टिकणार नाही, तर ती टिकविण्यासाठी कष्टच घ्यावे लागतील- अपरिमित, अविरत, अचल, निःस्वार्थ, संगठीत, सर्वसमावेशक प्रयत्न करावे लागतील.
केवळ पुण्याई आणि सज्जनपणाने गोष्टी टिकल्या वाढल्या असत्या तर आज पूज्य दलाई लामाना मातृभूमी सोडून ५० वर्षे परदेशात राहण्याची गरज नसती पडली. कळावे.

Kaushal Trivedi said...

Mitra ..how to subscribe to your blog..maybe I'm on iPad so don't see any link...kt@castlegatecapital.com ..Plz subscribe me..