4/26/10

तुर्की साम्राज्या बद्दल अजुन थोडं

लपांटोच्या युध्दाबद्दल लिहिण्याच्या प्रकल्पात तुर्की साम्राज्याबद्दल बरच वाचन झाल. त्यामुळे लपांटोच्या युध्दाचा दुसरा भाग लिहिण्याच्या आधी हा लहानसा लेख लिहिल्या शिवाय मला रहावत नाही. तसदीबद्दल क्षमस्व. लपांटोच्या युध्दाबद्दलच्या लेख मालिकेतला हा व्यत्यय असला तरी त्या लेखांची लय तुटणार नाही याची मी काळजी घेण्याचा प्रयत्न करीन.

तुर्की साम्राज्या महान आणि वैभवशाली होत यात वाद नाही. जगाच्या ज्ञात इतिहासात होउन गेलेल्या राजघराण्यांच्या आणि साम्राज्यांच्या स्पर्धेत तुर्की साम्राज्याचा क्रमांक बराच वरचा लागेल. गंमतीची बाब अशी की हि तुर्की लोक मुळात मध्य आशियातील होती आणि त्यांनी राज्य मात्र अनातोलिया आणि अंकारा भागात प्रस्थापित केल. एकाच कुटुंबाने ६ शतके राज्य करणे हि सुध्दा काही छोटी गोष्ट नव्हे. सतराव्या शतकाते सुल्तान बर्‍याचश्या प्रमाणात शंख असले तरी पहिले तीनशे वर्ष या कुटुंबाने एकाहुन एक सरस असे सेनानी आणि राज्यकर्ते निर्माण केलेत. याच काळात या साम्राज्याची प्रचंड भरभराटा झाली आणि साधारण मानल्या जाणार्‍या आमिर या पदवी पासुन त्यांनी स्वतःला इस्लामी जगताचा खलिफा घोषित केल. अर्थात इतर मुसलमानी सत्ताधिशां साठी एक उदाहरण मांडीत प्रचंड प्रमाणावर विध्वंस केला. या लेखात मी दोन मुद्दे वाचकांसमोर मांडणार आहे. पहिला म्हणजे तुर्की राज्यकर्त्यांची रक्तपिपासु वृत्ती आणि दुसरा, तुर्की इतिहासाच्या झोतात मराठी साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा.

उत्तर भारतात जसा मुसलमानी आक्रमकांनी नाश केला तसला विध्वंस तुर्कांनी पूर्व युरोपातही मांडला. प्रचंड सैन्य उभे करुन यांनी युरोपावर सतत चढाया केल्यात. अतोनात प्राणहानी केली आणि प्रचंड प्रमाणावर गुलामांचा व्यापार केला. पूर्व युरोपातील सुंदर बायकांना आपल्या हारेम मधे दाखल करण आणि सुदृढ पोरांना गुलाम म्हणुन विकल. भारतात मुसलमानी आक्रमकांनी अत्याचार केलेत की नाही यावर वाद घालणार्‍या इतिहासाचार्यांनी तुर्की इतिहास वाचावा. पहिल्या तीनशे वर्षात एक ते दिड लाख सैन्य घेउन त्यांनी इतकाल्या चढाया केल्यात की एवढी लोक त्यांना मिळत कुठुन होती हा प्रश्न मनात येतो. त्यांच्या युध्द पध्दतीचा एक महत्त्वाचा अंग म्हणजे दरोडेखोर आणि भाडोत्री सैनिक होय. ही लोक सगळ्यात पहिले हल्ला करित असत आणि मग त्यांच्या नंतर खर्‍या सैन्याचा पुर फुटत असे. तसेच तुर्कांकडे त्या काळातील प्रगत तोफा होत्या. आणि कुठलाही किल्ला किंवा शहर काबिज केल्यावर ते लुटायला सैनिकांना मुभा होती. ही लुट इतकी महत्त्वाची होती कि सन १५१० च्या दशकात इजिप्तच्या स्वारीत तुर्की सैन्य नाखुश होत कारण इजिप्त मुसलमानी प्रांत असल्यामुळे तो लुटायची संमती सैनिकांना नव्हती. तसच सोळाव्या दशका नंतर ही लुट मिळण कमी होत गेल आणि त्यामुळे बरेच उठाव झालेत.

तुर्की सुल्तान हे खास करुन खुनशी होते हे तर सहाजिकच झाल. सन १४१२ ते १४२० ची कारागिर्द असलेला सलिम पहिला हा त्यांच्यातला हिरा होता. त्याने इतक्या वजिरांना मारल की तुर्कीत की कोणाला शिवी द्यायची तर त्याला सलिम चा वजिर हो अस म्हणत असत. कत्तली करण्याचा त्याला जणु छंद होता. पण स्वतःच्याच लोकांना तो स्वतःच्या डोळ्यासमोर मारायचा. त्याचे अंगरक्षक यासाठी प्रसिध्द होते. सलिम ने हुकुम दिला की त्या वजिराला किंवा अधिकार्‍याचा तिथल्या तिथेच शिरच्छेद केल्या जात असे. सुलेमान ज्याला द मॅग्निफिसंट ही पदवी लोकांनी दिली तो त्यातल्या त्यात बरा होता. त्याने फार कमी कत्तली केल्यात. तरी त्याच्या नेसलेल्या कपड्यांना त्याच्याचा नोकराचा स्पर्श झाला म्हणुन त्याने त्या नोकराला फासावर चढवल. पण या घराण्याचा शिसारी येणारा प्रकार म्हणजे गादी मिळवायला भावंडांची कत्तल करणे होता.

औरंगझेबाने आपल्या भावंडाना मारुन गादी मिळवली यासाठी तो कुप्रसिध्द आहे. (अजुन बर्‍याच कारणांसाठी तो कुप्रसिध्द आहे. पण त्यातल हे एक!) पण तुर्की राजघराण्यात तर ती मानलेली प्रथा होती. पहिले दोन-तीन सुल्तान वगळाता पुढल्या सगळ्यांनी भावंडांच्या रक्ताने माखलेल्या पायांनी राज्यारोहण केले. नुसती भावंड नाही तर त्यांची मुल, त्यांचे जावई सगळ्यांना ओळीनी मारल्या जात असे. एका सुल्तानाच्या भावाला आणि त्याच्या मुलाला मारतांना हा सुल्तान त्यांच्या किंचाळ्या ऐकायला बाजुच्या खोलीत मुद्दाम येउन बसला. आणि त्यांना मारायला उशीर होउ लागला तर त्याला फार राग आला.

सतराव्या शतकानंतर भावंडांना मारण्या ऐवजी त्यांना जन्मभर एखाद्या दुरच्या गावातल्या महालात बंदिस्त करुन ठेवत असत. नुसत भावंडांनाच नाही तर आपल्या मुलांनी उठाव करु नये म्हणुनन त्यांनाही असच महालात बंदिस्त करुन ठेवल्या जात असे. साम्राज्याच्या आरंभीचे सुल्तान त्यांच्या मुलांना वेग-वेगळ्या प्रांतांचे सुभेदार म्हणुन नेमत असत. त्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव मिळत असे. तसच त्यांना नविन प्रांत पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन दिल्या जात असे. त्या अन्वये त्यांचे युध्द कौशल्य दिसे तसेच सैन्याला त्यांची ओळख होई. पण हे सगळ सतराव्या शतका नंतर बंद झाल्यामुळे पुढी सगळे सुल्तान नालायक निघालेत. आणि जरी साम्राज्य पुढे अजुन तीन शतके तगल तरी राज्याची वाढ खुंटलेली होती आणि बहुतांश युध्दे स्थित भाग टिकवण्यासाठीच घडली.


एकाच कुटुंबातील वंशजांनी सहा शतके राज्य केलं असल अजुन कुठलही उदाहरण माझ्या ध्यानात नाही. राज्य विखरुन जातात, परकीय आक्रमणांच्या झंझावात उडुन जातात किंवा अंतर्गत उठाव होउन नाश पावतात. तुर्की राजघराण मात्र लवाच्या पात्यासारख तगुन राहिल. बायझाच दुसर्‍याला तैमुरलंग ने कैद केल्यानंतर या राज घराण्यात पहिला वितुष्ट निर्माण झाल. पण त्याचा शेवट म्हणजे त्याच घराण्यातील वंशजाला सुल्तान म्हणुन नेमण्यात आले. पुढे सतराव्य शतकात नंतर ठराविक अंतरांवर उठाव होत गेलेत. या उठावांपैकी बरेचशे उठाव तुर्की सैन्याच्या जानिसारी नावाने ओळखल्या जाणार्‍या अति-विशिष्ट विभागाने केलेत. यात बर्‍याचश्या सुल्तांनाना मारुन टाकल पण ये-रे माझ्या मागल्या सारख त्याच घराण्यातील अजुन कोणाला तरी सुल्तान नेमण्यात आल. गंमतच वाटते हे सगळ वाचायला.

यांच्या इतिहासातील पहिली तीनशे वर्षांचा उल्लेख मी अनेकदा केला आहे. एका मागोमाग असे धुरंधर गादीवर आलेत आणि तिथेच मला मराठी राजघराणी मला कम नशिबी वाटतात. छत्रपतींच्या कुटुंबातील म्हणा किंवा पुढे पेशव्यांच्या घरातील म्हणा पण कुठल्याच थोराने वयाची पन्नाशी ओलांडाली नाही. छत्रपती पन्नासचे होते किंव्हा सत्तेचाळ, तुम्ही कुठल्या जन्मवर्षावर विश्वास ठेवाल त्यावर ते अवलंबुन आहे. संभाजीराजे बत्तीस. राजाराम राजे तीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे छत्रपती शाहु महाराज. त्यांनी खर्‍या दृष्टीने राज्य भोगल. ते मुत्सद्दी होते पण लढवय्ये नव्हते आणि त्यांनी साठी ओलांडली. पेशव्यांच्या घराण्यात तर अजुन दुर्दशा होती. थोरले बाजीराव चाळीस, नानासाहेब चाळीस, चिमाजी अप्पा चाळीस, सदाशिवराव भाउ तीस, विश्वास राव सतरा किंवा अठरा आणि माधवराव सत्तावीस. या घराण्यातला अपवाद म्हणजे राघोबा दादा पण त्यांच्या तलवारीत कुठलीच कसर नसली तरी बाकी भानगडींनी मराठा घराण्याच फार नुकसान झाल. महत्वाच्या सरदार घराण्यांमधे ही बघितल तर चित्र थोडं बर आहे. महादजी शिंदे आणि मल्हार राव होळकरांची कारागिर्द बराच काळ होती. पण या सगळ्यांची तुलना तुर्की साम्राज्याच्या पहिल्या तीनशे वर्षात प्रत्येक सुल्तानाचा अंमल अठ्ठावीस वर्ष होता. इथे आपल्या थोरा-मोठ्यांची आयुष्य प्रत्येकी पस्तीस असेल आणि तिथे त्यांच्या कारागिर्दी अठ्ठाविस वर्ष होता. सुलेमान दुसरा तर सन १५२० ते १५६६ गादीवर होता.

इतकाली वर्ष आयुष्य आणि राज्य मराठी घराण्याला लाभली असती तर आज भारताचा नक्षाच वेगळा असता. छत्रपतींचाच विचार केला तर अजुन दहा वर्ष आयुष्य म्हणजे कितीतरी कामगिर्‍या यशस्वी झाल्या असत्या. मराठी इतिहासात छत्रपतींचा खरा वारस म्हणजे थोरले बाजीराव मानायला हवेत पण त्यांनी विसाव्या वर्षी राज्य छातीवर घेतले आणि चाळीशीला श्वास सोडला. ही दोन व्यक्तीमत्व जन्मभर नुसती धावत होती. सतत, अविरत. आणि काही कमी असेल तर गृहकलह. म्हणुनच बहुधा त्यांची हृदय थकुन गेलीत. गेल्या हजार वर्षातील भीषण आणि रक्तरंजित भारतावर पसरलेल्या रात्रीत मराठी साम्राज्य म्हणजे प्रखर स्वप्न होत. आणि छत्रपतींपासुन ते सदाशिवराव भाऊ पर्यंतचे सेनानी जणु विजेसारखे लखलख करुन गेलेत. सुर्यासारख तळपायला वेळ मात्र विधिलिखित नव्हता हे दुर्दैव.

मागल्या लेखात छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तुर्क असा उल्लेख आल्याच मी लिहिले होते. मला प्रश्न असा पडायचा की तुर्की सुल्तानांनी भारतावर कधीच आक्रमण केले नाही तर त्यांच्या बद्दल राजे कस काय बोलत होते. त्याच्या मागे दोन कारण असावीत. एक अस की तुर्की साम्राज्याची ख्याती भारतापर्यंत पोचणे सहाजिकच होते. आणि ही सुल्तान स्वतःला मुसलमानी लोकांचे खलिफा मानित असल्यामुळे सगळ्या मुसलमानी आक्रमणांना राजांनी तुर्की शब्दाने संबोधिले असावे. किंवा दुसर म्हणजे मध्य आशियातुन भारतावर मोठ्या प्रमाणावर आक्रमण झालीत. तैमुर लंग पासुन ते बाबर पर्यंतचे सगळी रक्तपिपासु लोक मध्य आशियातुनच भारतावर कोसळलीत आणि मागल्या लेखा म्हटल्या प्रमाणे तुर्की लोकांची मूळ भुमी मध्य आशियाच मानल्या जातो. त्यामुळे राजे त्या आक्रमकांना तुर्क म्हणत असावेत. आता यवन कुठुन आलेत हे मात्र मला माहिती नाही. कारण अलेक्स्झंडर नंतर भारतावर (किंवा त्याच्या आधी कधीही) कुठल्याही यवनाने (ग्रीक) आक्रमण केल नाही. हे यवन म्हणजे राजांना पर्शियन तर अभिप्रेत नव्हेत?

No comments: