4/1/10

लपांटोचे युध्द

तुर्कीसाम्राज्याचे नौदल आणि एकत्रित युरोपच्या नौदलात भीषण युध्द मेडिटेरियनच्या समुद्रात सन १५७१ ला लपांटो च्या जवळ झाले. लंपाटो म्हणजे मेडिटेरिनियन (युरोप आणि तुर्की यांच्या मधे स्थित) समुद्रातील खाडी आहे.

या युद्ध्दातील मुख्य पात्रे म्हणजे त्या वेळेसचा तुर्की सम्राट सलीम॥ (या राजघराण्यात बरीच सलीम झालेत. या सलीम ॥ चा आजोबा म्हणजे सलीम ।), त्याचा प्रमुख वजीर सोक्कुल्लु, नौदलाचा सेनापती, कारा मुस्तफा, पियाल मुस्तफा आणि युरोपिय लोकांमधे पोप पायस, स्पेन चा राजा चार्लस आणि डॉन जॉन ऑफ ऑस्ट्रीया हे आहेत.

लपांटोच्या युध्दाचा वर-वर बघता भारताशी काही सुध्दा संबंध नाही. पण भारताच्या शोधात ख्रिस्ती आणि मुसलमानी सत्तांमधील वैमनस्याचे महत्त्व कमी होत गेले आणि या युद्धातील विजयाने युरोपिय सत्तांचा व्यक्तीमत्वात आमुलाग्र बदल झाला. आपण तुर्की साम्राज्याला इतका जबरदस्त तडाखा देउ शकतो तर जगातील इतर कोणालाही पराजित करु शकतो या आत्मविश्वासाने या युरोपियलोकांनी जगावर बेधडकjavascript:void(0) आक्रमण केले. भारतावर पकड जमवायला त्यांना जरी अजुन ३०० वर्ष लागणार होती तरी त्या दरम्यान त्यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकन खंड, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया नेहमीसाठी गिळंकृत केल.

लेखाच्या पहिल्या भागात आपण तुर्की साम्राज्याबद्दल माहिती करणे आवश्यक आहे. मुसलमानी सत्ताकेंद्रां पैकी, हारुन अल रशिद च्या बगदाद (तो बगदाद चा खलिफा होता) केंद्रा व्यतिरिक्त, तुर्की साम्राज्याच्या इस्तंबुल केंद्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. अरब नसलेले पण स्वतःला सर्व मुसलमानी लोकांचे राज्यकर्ते मानणारे हे पहिले राज्यकर्ते होते. पण इतर मुसलमानी राज्याधिशांच्या तुलनेत हे सर्वाधिक यशस्वी ठरले. यांच्या आक्रमणाचा मुख्य लक्ष्य युरोप होते. कर्डोबा, स्पेन मधुन मूर लोकांना १३ शतकात हाकलुन दिल्या पासुन (मूर हे स्पेन चे मुसलमानी सत्ताधिश होते. जवळ जवळ ५ शतके आयबेरियन प्रांत यांच्या अधीपत्त्याखाली होता. या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होत.) युरोपच्या भूमीवर राज्य प्रस्थापित करण्याची खटाटोप या तूर्की लोकांनी जवळ जवळ दोन शतके केलीत. यात ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी ठरले. तुर्की साम्राज्या शिखरावर असतांना युरोप खंडातील ग्रीस, बल्गेरिया, बरचस हंगेरी, बोस्निया भागावर तुर्की अंमल होता. आणि तुर्की साम्राज्याची राजधानी इस्तंबुल या शहराचे मूळ नाव कॉन्स्टंटीनोपोल होते. व स्वतःला ख्रिश्चन धर्माचे पालनकर्ते म्हणवणार्‍या बायझेंटाईन साम्राज्याची ही राजधानी होती. तुर्कांनी सन १४५३ ला ही राजधानी जिंकुन, साम्राज्याला नेस्तनाभूत केल. तेंव्हापासुन रोम जिंकण्याची स्वप्न ही तुर्की लोक बघायला लागलेत. या मुसलमानी लोकांना जसा हिंदु लोकांचा द्वेष होता तसाच ख्रिश्चन लोकांचाही यांनी प्रचंड द्वेष होता. त्यामुळे रोम जिंकुन ख्रिश्चन धर्माच्या सर्वात पवित्र स्थळाला जमिनदोस्त केल म्हणजे मग इस्लामी हिरवा झेंडा सगळीकडे रोवला जाईल ही त्यांची मनिषा होती.

---

तुर्की साम्राज्या जवळपास ७ शतके टिकुन होत. इतकी शतके ब्रिटिशही टिकले नाहीत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला उस्मान ने स्थापन केलेल्या लहानस राज्य पुढल्या दोन शतकात पश्चिमेस इजिप्त पासुन ते पूर्वेस इराण पर्यंत तर उत्तरेस बल्गेरिया, सर्बिया ते दक्षिणेस सिरिया आणि अरब वाळवंटापर्यंत पसरत गेले. छत्रपतींच्या बोलण्यात यवन-तूर्क अस उल्लेख आल्याच आढळत पण माझ्या माहिती नुसार कोणी तूर्की भारतात कधी आले नाहीत. (त्यांच नेमक तेच चुकल. पण ते पुढे)
तुर्की सम्राट स्वतःला खलिफा म्हणवुन घेत असत. मध्यंतरी ते स्वतःला रोमन साम्राज्याचे वंशज मानु लागलेत आणि स्वतःला कैसार (सिझर) म्हणवुन घेऊ लागलेत. १९२२ ला ब्रिटिशांनी हे साम्राज्य मोडले पण १६ व्य शतकाच्या उत्तरार्धा पासुन साम्राज्याचे पसरणे थांबले होते आणि एकाहुन एक शूर लढवैय्ये आणि मुत्सद्दी पैदा करणारे या राजघराण्यातील वंशज शंख निघायला लागलेत.

तुर्की लोक इतिहासाच्या पटलावर १३ व्या शतकात उदयास आलेत. ते नेमके कुठले या बद्दल बराच वाद आहे. मध्य आशियातील एक टोळीने अनाटोलिया आणि आशिया मायनर म्हणजे सध्य स्थितीतील तुर्की भागात स्थलांतर केले. मंगोल लोकांनी घातलेल्या १२ व्या शतकातल्या विध्वंसा नंतर हा प्रदेश नमोहराम झालेला होता. अश्या परिस्थितीत या लोकांनी आपला जम बसविला. हळु हळु तुर्की टोळीचे बरे आमिर लोकांनी (जमिनदार) या भागात गर्दी करु लागले. ही लोक मुळात मुसलमान नसावित. पण अरब भागात वसल्यावर यांनी इस्लाम स्विकारला असावा. पण धर्म कुठलाही असला तरी ही लोक शूर होती यात काही वाद नाही. त्या काळात तलवारीला पाणी असल्याशिवाय गत्यंतर नव्हते. या टोळ्यां पैकी ओस्मान पहिला याने जमिनदारी मिळवुन तुर्की साम्राज्याचा नारळ फोडला. अर्थात, त्यावेळेस त्याला आपण एका महान राजघराण्याचा पाया बांधतो आहोत अस काही वाटल नसणार. पण तो फार मुत्सद्दी होता यात वाद नाही. त्याने आजु-बाजुच्या भांडणांचा फायदा उठवित आपली जमिनदारी वाढवायला सुरुवात केली. त्या कालावधीत बरीच तूर्की टोळ्या लहान लहान जमिनदार्‍या चालवित होत्या. त्यांच्याशी भांडण घेण्या ऐवजी ओस्मान (त्याला इंग्रजी भाषेत ओथ्मान अस म्हणतात) त्याने आशिया मायनर मधल्या ख्रिस्ती लोकांशी भांडण घेतलीत आणि त्यांची जमिन घ्यायला लागला. पण तो स्वतःला सुल्तान म्हणवुन घेत नसे. तो फक्त "आमिर" होता. याला कारण दोन होती. एक म्हणजे, पहिले सांगितल्या प्रमाणे, आजुबाजुल बरीच तूर्की जमिनदार्‍या होत्या आणि स्वतःला सुल्तान म्हणवुन घेणं म्हणजे त्यांच्या शेपटीवर पाय देणे होते. आणि दुसर म्हणजे अविश्रांतपणे जरी ओस्मान पहिला, याने राज्य वाढविले असले तरी साम्राज्य म्हणवुन घेण्याजोगी त्याच्याकडे जमिन मुळीच नव्हती. पण अखंड राज्यविस्ताराचा पायंडा त्याने घातला आणि त्यामुळे तूर्की लोकांची पुढली तीनशे वर्ष प्रचंड भरभराट झाली.

या राजघराण्यातील सुल्तानांची अर्धी यादी मी पुढे देतो आहे. सुरुवातीपासुन ते लपांटोच्या युध्दा पर्यंतच्या सुल्तांनांचीच नावे यात आहेत.

१)ओस्मान पहिला ( १२९९-१३२४)

२) ऑर्खन (ऑराहन) पहिला (१३२४-१३६०)

३)मुराद पहिला ( १३६० - १३८९) याने स्वतःला सुल्तान घोषित केले.

४) बायझाद पहिला (१३८९-१४०२) हा तैमुरलंग च्या कैदेत मेला.

५) मेहमद पहिला (१४१३-१४२१)

६) मुराद दुसरा (१४२१-१४४४)

७) मेहमद दुसरा (१४४४-१४४६)

८) मुराद दुसरा (१४४६-१४५१) - मेहमद दुसरा हा याचाच मुलगा. दोघ जण जणु आट्या-पाट्या खेळत होते!

९) मेहमद दुसरा (१४४६-१४८१) - याने कॉन्स्टंटिनोपोल (सध्याचे इंस्तबुल) जिंकले आणि तेंव्हापासुन ते शहर तूर्कीची राजधानी आहे.

१०) बायझाद दुसरा (१४८१ - १५१२)

११) सलिम पहिला ( १५१२ - १५२०)

१२) सुलेमान पहिला (१५२०- १५६६) हा तूर्की साम्राज्याचा सगळ्यात नावाजलेला सुल्तान मानावा लागेल.

१३) सलिम दुसरा (१५६६-१५७६) याच्या कारागिर्दित लपांटोचे युध्द झाले.

या घराण्याचा पहिले पासुन उद्देश युरोप जिंकुन इस्लामी धर्माचा प्रसार करण्याचा होता. या मागे दोन कारणे असावीत.

1) स्पॅनिश भागातुन म्हणजे आयबेरिया प्रांतातुन मूर या मुसलमानी सत्तेने आठव्या शतकापासुन जवळ-जवळ पाचशे वर्ष राज्य केले. त्या काळात संपूर्ण स्पेन आणि पोर्तुगाल मुसलमान होता. पण १३ व्या शतकात ख्रिश्चनांनी मूर लोकांचा पराभव करुन तिथे परत ख्रिस्ती धर्माची स्थापना केली. तेंव्हापासुन युरोप खंडात मुसलमान धर्म नामशेष झाला. पण तेंव्हा युरोपची म्हणजे ख्रिस्ती धर्माची सीमा बायझेंटाईन साम्राज्य होती. आणि त्याची राजधानी कॉन्स्टंटीनोपोल होती. पोप चा त्या राज्याला पाठिंबा असल्यामुळे त्याला 'पवित्र' साम्राज्य मानल्या जात असे. तूर्की लोकांच्या प्रांत विस्ताराच्या वेळेस या बायझेंटाईन साम्राज्य खिळखिळ झालेल होत पण १४५३ ला त्या राज्या शेवटची घटका मोजली आणि कॉन्स्टंटीनोपोल चे इस्तंबुल झाले. त्या नंतर मात्र आपला पुढला मुक्काम रोम याची खुणगाठ तुर्की लोकांनी मनाशी बांधली आणि त्या साठी सतत युध्द केलीत. त्यांना पूर्व युरोपातुन पुढे जाता येईना म्हणुन त्यांनी समुद्री मार्गाने इटलीवर स्वारीचीही खटपट केली. याच भानगडीत लपांटोचे युध्द झाले.

2)आणि दुसर म्हणजे त्यांना टक्कर देणार युरोपिय भागात कोणी फारस मिळाल नाही. त्या मानाने पूर्वेला भारताकडे जाण्याच्या मार्गावर बरीच सुल्तान पडली होती . अजुन अस की भारत ११ व्या शतका नंतर मुसलमानी अंमलाखाली असल्यामुळे तो भाग लौकरच मुसलमान होणारच होता अस वाटण सहाजिक होत. त्या तुलनेत युरोप अजुनही धिम्मी होता. त्यामुळे त्यांनी संपूर्ण लक्ष युरोपाकडे केंद्रित केले आणि भारताकडे दुर्लक्ष केले.

हे झालं तुर्की साम्राज्याचा संक्षिप्तात आढावा. पुढल्या भागात युरोपिय सत्तांचा आणि पोपचा आढावा घेऊया.

(क्रमशः)

--------------------
खालील पुस्तकांतुन मी ही सगळी माहिती गोळा केली आहे.

Empire of the Sea - The siege of Malta, the battle of Lepanto and the contest for the center of the World by Roger Crowley

Empires of the Monsoon by Richard S. Hall

Turkish Empire - Its Growth and Decay by Lord Eversley

2 comments:

काय चालूये.. said...

सुंदर लेख.. फक्त काही क्षुल्लक सुधारणा.. इबेरिया आयबेरिया नाही .. तद्वत बिझेंटीयम साम्राज्य..

TEJAS THATTE said...

पुढील लेखात बॅटल ऑफ लेपांतो बद्दल अधीक वाचायला मिळेल अशी अपेक्षा करतो !
परंतु लेख आवडला, अभ्यास पूर्ण आहे. लेखावर तू घेतलेल्या मेहेनतीचि दाद देतो !
धन्यवाद !