12/4/09

रेखांकित भाग ४

"कसली आयडिया आहे?" अनिकेत ने बाईक ला किक मारत थंडपणे विचारल.
"वर चल, सांगते?" त्याचा थंडपणा बघुन तिच्या कपाळावर आठ्यांनी घर मांडल.
"पिक्चर वाटतोय का तुला? कि आपण अस करु आणि तस करु. थोडी झाडा भोवती गाणी गाऊ या आणि मग विलन ची एंट्री" तो बारीक डोळे करुन शुन्यात बघु लागला.
"पण इथे विलन कोण आहे याचा विचार करावा लागेल. तुझ्या कपाळावरच्या रेषा कि माझ्या तळव्यात नाहिश्या होणार्‍या रेखा"
मेघनाच्या डोळ्यातुन परत गंगा-जमुना वहायला लागल्यात. दोघेही पावसात चिंब भिजले होते.
पहिल्या मजल्यावरच्या जोशी काकु खिडकी उघडुन भोचक पणे काय चाललय बघु लागल्यात.
"काय काकु, काय म्हणता ?" अनिकेतने कुचक्या आवाजात विचारल.
"काही नाही रे" त्या थोड्या वरमल्या मग चाचपडत म्हणाल्या "आत जा रे दोघे. सर्दी व्हायची. मेघना, नुकतीच तापातुन उठतेयस ना"
"हो खर सांगायच तर मलाही हिच्यासारख सर्दी -ताप हवाय. तुम्ही खिडकी बंद करुन घ्या, तुम्हालाही व्हायची सर्दी. नाहीतर इथे आमच्या जवळ येउन उभ्या रहा. काय बोलतोय ते ऐकु येईल नीट"
जोशी काकुंनी लगबगीने खिडकी लोटली.
"मेघना काय तमाशा लावलायस. जा बर आत. आधीच तब्येत बरी नाही या तुझी"
"लाज नाही वाटत का तमाशा म्हणायला?" मेघना फणकारली.
"तुला आत्ता जिथे जायचय तिथे जा पण मी तुझा पिच्छा असा सोडणार नाही या. मी तुला कधीच सोडणार नाहीया. जिथे जाशिल तिथे मी तुझ्या मागे-मागे येइन. मग तु कुठेही जा"
क्षणभर अनिकेत ला काय बोलाव सुचेना. त्याने गाडी बंद केली आणि स्टँड लाउन तो जिन्याच्या दिशेनी चालायला लागला. मेघना तशीच उभी होती.
"आत्ताच तर मारे सांगत होतीस की जिथे जाशिल तिथे मागे-मागे येइन म्हणुन, मग?"
वरची खिडकी पुन्हा किलकिली उघडली.
"काकु, आल घालुन चहा करा लौकर आणि सोबत भजी पण चालतील"
खिडकी घट्ट बंद झाली.
मेघनाला खुदकन हसु आल.

घरात आल्याबरोब्बर मेघनाने अनिकेतला घट्ट मिठी मारली. अनिकेतने काहीच हालचाल केली नाही.
"अस काय करतोस?"
तिला दूर सारत तो परत खिडकी जवळ गेला. "सांगतेस का काय ते?"
"फोटो काढायला हवा खिडकी जवळ. अनिकेत खिडकीवाले"
"सांग"
"मी दुसर्‍या कोणाशी लग्न करीन" अस म्हणुन ती क्षणभर अनिकेतची प्रतिक्रिया बघायला थांबली
त्याच्या चेहर्‍यावरची माशी सुध्दा हलली नाही.
"मला बोलवु नकोस म्हणजे झाल. अर्थात तो पर्यंत मी असलो तर"
"ऐक तर. बाबा ने सांगितल कि मी ज्याची परीणिता होणार त्याचा मृत्यु अटळ आहे. आणि आपण धरुन बसलोय की मी तुझीच परीणिता होणार. मी जर का दुसर्‍याशी लग्न केल तर प्रश्नच मिटला"
अनिकेत मेघना कडे रोखुन बघत होता.
"अरे म्हणजे तात्पुरत...."
"कळल मला" तो तीक्ष्ण स्वरात तिला कापत म्हणाला. " म्हणजे माझ्या ऐवजी दुसरा कोणी तरी मरणार"
"काय करायच मग तुच सांग. मला काय हौस आहे कोणाला मारायची. माझ्या नशिबी कोणी मरणार तर त्याला मी काय करणार? पण तुला मी काही होउ देणार नाही एवढ नक्की" अस म्हणुन ती परत रडायला लागली.
"किती रडशील? काही झाल की नळ चालु" अनि त्रागाने म्हणाला. "शांत बस बर थोडी. मला विचार करु दे"
"हो, बोल मला अजुन. मीच ऐकुन घेते म्हणुन"
अनिच्या डोक्यात विचारांच अचानक वादळ उठल. त्याने सगळी आशाच सोडली होती पण मेघनाची युक्ती ऐकुन त्याला काही तरी होउ शकत या विचाराने हुरहुरी आली होती. पण अजुन कोणी मरणार या विचाराने त्याच मन कच खात होत.
तो नुसताच येर-झार्‍या मारु लागला.
"बोल ना, अस काय करतोस?"
"काय बोलु, काय अपेक्षा आहे तुझी?"
"हो म्हण फक्त म्हणजे झाल"
"अरे, गंमत वाटतेय का तुला? हो काय राख म्हणु" अनिकेत ओरडला.
"सॉरी, मला ओरडायच नव्हत.
थोडा वेळ अनिकेत काहीच बोलला नाही.
"अस कस अजुन कोणाला मरू देउ मी माझ्या ऐवजी?"
"अनि, तू कोणाला मारत नाहीयास. तू उगाचच मनाला घोर लाउन घेतोयस. आपण इथे कोणाच्या खुनाचा प्लॅन करत नाहीया. अस बघ की माझ्या नशिबी त्या दिवशी जसलीन सोबत त्या बाबा कडे जाण होत. मी नाही म्हणत असतांना त्या बाबा कडुन हे सगळ ऐकल, उगाचच का अस सगळ घडुन आल? यातुन मार्ग काढता यावा, यातुनही मार्ग निघु शकतो याची चिन्ह आहेत ही सगळी. काहीच माहिती नसत तर काय केल असत? आता सगळ माहिती असुन काहीच न करण हेच चुकीच ठरेल."
मेघनाचा युक्तीवाद वर्मी लागला.
"बरं ठीक आहे. तु म्हणतेयस तस करु"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजला.
"आई येतेय परत"
अनि ने मोठ्ठा उश्वास सोडला.
"आई येतेय तर मी काय करु?"
"नाही ग, तस काही म्हणत नाही या. निघतो मी. मगासचे ओले उभो आहोत. तु तर नुकतीच तापातुन उठलीयस. आराम कर आता. मला ही खुप थकल्या सारख वाटतय"
"हस ना एकदा"
"रात्री फोन कर."
"हो करीन पण तू हस ना एकदा.
"काय करतेयस लहान पोरी सारख"
"प्लीज..."
"मेघना..." अनिकेतला हसु आल. तो दारा बाहेर पडला.
"नाही सोडणार अशी. माझ्याशी गाठ आहे." डोळे बारीक करत तिने हसत दरवाजा लावला.

---
अनिकेतने गाडीला किक मारली. वर बघितल तर मेघना खिडकीतुन बघत होती. त्याने गाडी वळवली आणि अंगणातुन बाहेर पडला. पाऊस अजुनही पडत होता. त्याला घरी जावस वाटत नव्हत. हळु-हळु गाडी चालवत तो मुख्य रस्त्यावर आला. कुठल्या मित्राकडे चक्कर मारावी याचा विचार तो करत होता. पण त्याच मन सारख मेघनाने सुचवलेल्या गोष्टी भोवती वळसे घालत होत. खरच का मेघना ने दुसर्‍याशी लग्न केल तर आपला जीव वाचु शकतो? पण नशिब अश्यानी बदलत असत तर त्याला नशिब म्हणलच नसत. मेघना दुसर्‍या कोणाशी लग्न करणार या विचाराने त्याच्या अंगावर काटा आला. तेवढ्यात समोरुन कोणीतरी अनि अशी आरोळी देत वेगाने निघुन गेल. कोण होत ते अनिच्य लक्षात नाही आल. त्याने उगाचच पाठमोर्‍या आकृतीला हात दाखवला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन तो पुढे काय करायच याचा विचार करु लागला.

इकडे मेघनाला हलक वाटत होत. असल्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढला या वर तिचा अजुनही विश्वास होत नव्हता. नविन मार्ग कठीण होता खरा पण असल्या अभद्र खेळाला असलीच शहनिशा देण आवश्यक होत. तिने भिजलेले कपडे बदलले. आणि अंथरुणावर अंग टाकल. तिच्या डोक्यात गेले दोन तास घडलेल सगळ घिरट्या मारत होते. अनिकेतचे बाणासारखे टोचणारे शब्द, त्याच असहाय रडण, आपल्या डोक्यातली भन्नाट कल्पना सगळ सगळ चित्रपटासारख डोळ्यासमोर फिरत होत. जोशी काकुंचा भोचकपणा आठवुन तिला हसु आल. त्या आईला नक्कीच काहीतरी बोलणार मग आईला काय सांगायच याचा विचार ती करु लागली. आईने मागेच आडुन-आडुन अनिकेत बद्दल विचारल होत. आता अचानक माझ्यासाठी स्थळं बघा हे कस सांगायच. आणि अमेरिकेला जायच काय करायच? आणि लग्न करण म्हणजे काय गंमत थोडीच आहे. दुसरा पुरुष आपल्याला स्पर्श करणार या विचाराने तिच्या अंगावर काटा आला. तिने पांघरुण घट्ट छातीशी घेतल. एका उत्तराने प्रश्नांच नविन जाळ विणल होत. तिला डुलकी लागली.

अनिकेतने गाडीला परत किक मारली. अक्षरशः वाट फुटेल तिथे तो जात होता. आत्ता खर तर मेघना सोबत पावसात भिजत फिरायला मजा आली असती. रस्त्यावरचे खड्डे चुकवत तो एक हात सोडुन संथपणे गाडी चालवत होता. पाऊस परत सपाट्याने पडायला लागला होता. पावसाचे थेंब छोट्या-छोट्या सुया टोचाव्यात तसे तोंडावर टोचत होते. 'च्यक्' असा आवाज काढत त्याने गाडी परत रस्त्याच्या कडे लावली आणि एका मोठ्ठ्या डेरेदार झाडाच्या आडोश्याला जाउन उभा राहिला. आजु-बाजुला बरीच लोक उभी होती. कोणीच कोणाशी फारस बोलत नव्हत. सगळे नुसताच पाऊस बघत होते. बाजुच्या ठेल्यावरचा चहावाल्याने नविन आधण चढवलेल होत. त्या वासाने सगळीच लोक चहा घेत होती. अनिही चहाचे भुरके मारायला लागला. त्याच्या डोक्यात विचार परत घोळका मांडायला लागलेत. 'लग्न करण म्हणजे गंमत थोडीच होती. मागेच मेघना सांगत होती की तिची आई विचारत होती आपल्या बद्दल ते. आता मेघना त्यांना काय सांगणार त्यांना? स्थळं बघा म्हणुन? च्यायला थोडं बर वाटत होत तर हे सगळे प्रश्न समोर बोहारल्या सारखे उभे. कसल्या जाळ्यात फसतोय, निघण्याचा जितका तडफडात करतोय तितकाच अजुन अडकतोय. तेवढ्यात झाडा समोर उभी असलेल्या लाल गाडीचा दरवाजा एका माणसाने उघडला. त्याला भरगच्च मिश्या होत्या आणि अंगाने तो चांगलाच बलदंड होता. हा माणुस इतक्या वेळ आपल्याच बाजुला उभा होता हे त्याच्या लक्षात आल. या माणसाला कुठे तरी आधी बघितल होत. गाडीत बसतांना तो अनिकेत कडे बघुन उगाच हसला. अनिकेतला कळेना तो माणुस का हसला ते कळेना. तो डोळे बारीक करुन त्या माणसाला बघायला लागला. ती लाल गाडी निघुन गेली. अनिकेतला परत तंद्री लागली. 'अमेरिकेला जायच काय करायच? मी पुढे जायच का, की पुढल्या वर्षी पर्यंत वाट बघायची. बरं, अमेरिकेला नाही गेलो तर आई-बाबा विचारणार, तर त्यांना काय उत्तर द्यायच? मेघनाच लग्न झाल्यावर तिला भेटण पूर्ण बंद होइल. किती दिवसां साठी? शी..आपणही निर्लज्जा सारख कोणाच्या तरी मरण्याची वाट बघत बसायच, गिधाडा सारख.
"साहेब, पैसे" पोर्‍याने अनिचा हात धरुन हलवल.
अनिने त्याला पैसे दिले. त्या पोर्‍याच्या कपाळावरच धगधगीत लाल गंध मजेशिर दिसत होत.
'आपण टेकडीवरच्या मंदिरात चक्कर मारायला हरकत नाही'
पाउसही कमी झाला होता पण अजुन थांबला नव्हता.
त्याने गाडीला किक मारली. पण गाडी रस्त्याच्या कडेवरुन अचानक घसरली आणि किक त्याच्या पोटरीवर सपकन बसली.
अनिकेतने शिवी हासडली.
"संभाल के भाऊ" झाडाखालुन कोणी तरी ओरडल. "रूक जाओ अभी. और एक चाय मार के जाओ"
अनि ने लक्ष दिल नाही. तो मंदिराच्या रस्त्याला लागला.
'बाबावर आपण एवढा विश्वास का टाकतोय याचा तो विचार करु लागला.
'त्याच चुकल असेल तर कोणी मरायच नाहीच आणि मेघना दुसर्‍याशी लग्न करुन बसायची. म्हणजे मी घर का ना घाट का असा अधांतरी लटकत राहीन.'
त्याला हे सगळे विचार नकोसे झाले होते. मंदिरात जाउन बर वाटेल अस त्याला वाटत होत.
समोरचा गाडीवाला इतकी हळु चालवत होता. ते बघुन अनिकेतला राग आला. त्याने दोन-तीनदा हॉर्न वाजवला पण ती गाडी ढिम्म हलेना. शेवटी त्याने गती वाढवली आणि उजवीकडुन गाडी घातली. ती गाडी कोण चालवतय बघितल तर झाडाखाली उभा असलेला मुच्छड गाडी मंदपणे गाडी चालवत होता. त्याला बघण्याच्या भानगडीत अनिच्या समोरच्या दिव्याच्या खांबाकडे गेल नाही. रस्ता रुंदीकरण्याच्या भानगडीत आधी रस्त्याच्या कडेला असलेले दिवे आता जवळपास रस्त्याच्या मधे आले होते. शेवटच्या क्षणाला अनिने त्या खांबाकडे बघितल पण तो पर्यंत उशीर झाला होता.
'म्हणजे एवढ सगळ करुनही तो मीच होतो' असा काहीसा विचार त्याच्या मनात वीजेसारखा चमकला आणि क्षणार्धात, पाखरु खिडकीच्या काचेवर आपटाव तसा तो खांबावर फाटकन आदळला.


"मेघना, उठ बाळा ५ वाजायला आलेत. कधीची झोपलीयस. "
मेघनाने डोळे खाडकन उघडलेत. तिच ह्र्दय धड-धड करत होत.
"आई, परिणिता म्हणजे नक्की काय?" तिने घाबरत आईला विचारल.
"म्हणजे?"
तेवढ्यात मेघनाचा सेल वाजायला लागला.

(क्रमशः)

हा भाग लिहायला बराच उशीर झाला त्या साठी क्षमा असावी. पुढल्या भाग या गोष्टीचा शेवटचा असणार आहे. श्री अंबरीश यांनी प्रत्येक भागाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

5 comments:

TEJAS THATTE said...

Busss kaa ?
maza naav visarlas...
mi pun (usfurta nahi) pratisad dila thodafar :-@
Lolz !

काय चालूये.. said...

apratim kathavastu... :-)

Chinmay 'भारद्वाज' said...

तेजस,
राजे, तुमचा प्रतिसाद नेहमीच उत्स्फुर्त होता. :-)

भानस said...

वाचतेय... :)

TEJAS THATTE said...

Hahaha...thanks..
lolz...
pun katha masttach ahe... ata adheek utkantha na tanta lokarat lokar...shevtcha bhag release kara !