9/16/08

शिव-राज्यारोहण - भाग १

मराठी जन-मानसात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विशिष्ट महत्त्व आहे. भारताच्या गेल्या हजार वर्षाच्या गडद इतिहासात फार थोड्या घटना भारतीयांच्या कपाळावर विजयाचा टिळा लावतात. विजयानगरचे साम्राज्य, असाम मधील अहोम राजघरण्याचा अपराजित इतिहास आणि राजांचे राज्यारोहण त्यातील प्रमुख मानल पाहिजेत. विजयानगरच्या हिंदुशाहीबद्दल सगळ्यांना महिती आहेच. असामच्या अहोम राजघराण्याबद्दल मी वेगळा लेख लिहितो आहे. पण मग आधी म्हटल तस की महाराजांच्या राज्याभिषेकाला मराठी मनात विशिष्ट स्थान आहे तर त्यांबद्दल लिहिण्याची काय गरज? त्याच सोपं कारण अस कि मराठी लोकांना या राज्याभिषेका बद्दल काय वाटत त्याल फारसा अर्थ उरलेला नाही. मागल्या लेखात महाराजांना चोर-दरोडेखोर का म्हटल्या जात याचा संक्षिप्तात आढावा आपण घेतला, या लेखात त्यांच्या राज्याभिषेका मागच्या कारणांचा विचार करु या.

मी अक्षरशः दर दोन ओळींमागे महाराजांनी स्वार्थासाठी स्वतःचे सिंहासन स्थापन केले नाही अस म्हणतो आहे. कारण या राज्यारोहणामागे स्वार्थ असता तर त्यांनी १६७४ उजाडण्याची वाट बघितली नसती. १६६८ मधेच तो कार्यक्रम त्यांनी उरकला असता. पण त्यांनी हा लढा स्वतःचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मांडला नव्हता. त्या हिशोबानी चाणक्य शिष्य चंद्रगुप्त मौर्य सोडुन भारतीया परंपरेतील कुठल्याही राजाशी त्यांची तुलना होत नाही. त्यांच्या आधिच्या प्रत्येक राजाचा लढा स्वकियांशीच होता. स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी हे राजे आपापसात लढत असत. चंद्रगुप्तानी नंदाचा नाश जरी केला असला तरी त्याचे (आणि त्यान्वये चाणक्याचे) मुख्य लक्ष अलेक्स्झांडरची सत्ता उलथण्याचा होता. त्याच प्रमाणे महाराजांचे मुख्य लक्ष परकीय मुसलमानांची सत्ता उलथण्याचा होता. म्हणुन त्यांनी स्थापित केलेल्या राज्याला स्वराज्य म्हणायचे. त्यांना अत्याचारी मुसलमानी सत्ता उलथवायच्या होत्या हे तर जगजाहिर आहे पण या मुसलमानी सत्तांमधेही आपापसात एक वेगळे राजकारण चालत असे. दख्खनी बादशाह्या या धर्मांतरीत मुसलमानांच्याच होत्या. त्यामुळेच मुघली सत्ता या दख्खनी बादशाह्यांना निम्न दर्जा देत असत. या 'नविन' मुसलमानांच्या सत्ते ऐवजी 'स्वच्छ' मोघल रक्ताची आणि सच्च्या मुसलमानांची सत्ता अधिक उपयुक्त अशी मुघलशाहीची धारणा होती. त्यापायी त्यांनी दख्खनी शाह्यांवर अनेक आक्रमणे केली. औरंगझेब स्वतः दख्खन मधे दोनदा आला. पहिल्यांदा आला. पहिल्यांदा १६५७ मधे जेंव्हा महाराज जावळी घेण्याच्या उद्योगात होते. आणि दुसर्‍यांदा १६८२ मधे तो खास मराठ्यांना भेट द्यायला आला. मराट्यांनीच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली.

एक गोष्ट मात्र नक्की की मोघल असो किंव्हा नुकतेच धर्मांतर केलेले मुसलमानांच्या सत्ता असो, कोणा हिंदुनी राज्य प्रस्थापित केलेले कोणीच खपवुन घेणार नव्हते. ९व्या १० व्या शतकात इराणी आणि अरब मुसलमान अफगाणीस्थानातील खोकर राज्याशी वर्षानुवर्षे भांडुन त्या राज्याचा पडाव केला. तीच स्थिती गुजरातेतील सोळंकी किंवा देवगिरीच्या रामदेवरायाची झाली. बंगालमधील सेन घराण्याचीही तीच कथा. दख्खनेतील मुसलमानी सुल्तान शतकानुशतके दक्षिणेतील लहान लहान हिंदु राजघराण्यांना नष्ट करण्याच्या मागे होते.मोघलांनी आसाम मधल्या अहोम राज्याला नष्ट करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतलेत. विजयानगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आपापसात भांडणार्‍या पाच मुसलमानी सत्ता एकत्र आल्यात. आणि तालिकोटाच्या विजया नंतर विजयानगरातील प्रत्येक इमारत या आक्रमकांनी जमिनदोस्त केली. प्रत्येक पुरुषाला ठार केले आणि प्रत्येक बाईला बाजारात विकले. या सगळ्या मागचा मुख्य उद्देश हिंदु मनात उठाव करण्याचा विचारच कधी यायला नको हा होता. हिंदु लोक सत्ता चालविण्यास कुचकामी आहेत. ते लढवय्ये मुळीच नाहीत. पळपुटे, भ्याड आणि धर्महिन असली ही हिंदु जात फक्त नोकरशाही करण्यापलिकडे फारशी उपयोगी नाही असली समजुत या मुसलमानी लोकांची होती. हिंदुंना स्वतः बद्दलच लाज वाटावी हा मुख्य उद्देश. .गंमतीचा भाग असा की या मुसलमानी बादशाह्यांच्या चाकरीत लढवय्ये असे बरीच हिंदु मंडळी होती पण हि सगळी लोक गुलामीलाच भूषण मानित असत. मिर्झा राजे जयसिंह हे त्या मिंधेपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. अर्थात, यात काही नविन नाही. सगळे विजेता आक्रमक असच करतात इंग्रजांनीही तेच केले. पण अश्या परिस्थितीत या आक्रमकां विरुध शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणातच यश संपादन केले नाही तर मुत्सद्देगिरीत आणि राज्य व्यवस्थापनेतही ते या परकियांपुढे सर्वस्वी वरचढ ठरलेत. त्यांनी केवळ धर्म रक्षणच केले नाही तर धर्म संवर्धनासाठी हि ते झटले. त्या काळात राज्य हि धर्माच्या आधारावरच ठरवली जात असत. मुसलमानी आक्रमकांच्या राज्यांमधे बहुतांश लोक हिंदु असले तरी हि आक्रमक राज्यकर्ते मुस्लीम धर्म वाढविण्यासाठीच झटत असत. पण इथेही राजे त्यांच्या सांप्रत काळाहुन पुढे होते. ते स्वतःला हिंदु धर्म संरक्षक जरी मानत असले तरी त्यांनी इतर धर्मांना मुळीच त्रास दिला नाही. अगदी चढाया करण्याच्या वेळेसही कुठल्याही धार्मिक स्थळांना हात लाविण्याची परवानगी सैन्यास नव्हती. सुरत लुटण्याच्या वेळेस तिथल्या एका ख्रिश्चन पाद्रीच्या इमारतीस मराठ्यांनी मुळीच त्रास दिला नाही.

१६७४ साला पर्यंत महाराजांनी आदिलशाहीस नेस्तनाभूत केले होते. पोर्तुगीज लोक महाराजांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेउ बघत होते. इंग्रजांची शक्ति थोडा-फार उपद्व्याप करण्या पलिकडे फारशी नव्हती. निजामशाही तर कधीच मोडकळीस आली होती. उत्तरेस बागलकण्यापर्यंत (रामनगर आणि कोळी राज्या पर्यंत. म्हणजे सुरतेपासुन दोन-तीन तासाच्या अंतरापर्यंत) तर दक्षिणेस गोव्या पर्यंत महाराजांची अनभिषिक्त सत्ता होती. पूर्वेस ते अहमदनगर पर्यंत आरामात फेर-फटाका मारून येऊ शकत असत. अहमदनगर तेंव्हा मुघलांचे फार महत्त्वाचे सैन्य विभागाचे ठिकाण होते. मुख्य म्हणजे या सर्व भागातील कर मराठा सत्तेस मिळत असत. तसांच मराठी न्याय या भागात कार्यरत होता. तिथे कुठल्याही बादशहाचा अंमल चालत नसे. या प्रदेशातील कुठलाही भाग जिंकण्यास बादशाही सैन्यास मराठा सैन्याशी टक्कर द्यावी लागत असे. पुणे भागात मिळालेल्या लहानश्या जमिनीच्या तुकड्यापासुन महाराजांनी एवढे मोठे राज्य स्थापन केले. त्यांची शासन व्यवस्था, सैन्य मांडणी तसेच राजा आणि राज्याची कर्तव्ये इत्यादी कारभाराची सर्व अंगे हि प्रस्थापित मुसलमानी सत्तेच्या तुलनेत क्रांतिकारी होती. थोडक्यात सार्वभौम राजा बनण्यासाठी आवश्यक कारणे आणि आवश्यक पराक्रम त्यांनी केलेला होता. राज्य व्यवस्था, धर्म संस्थापन आणि संवर्धन आणि स्वराज्य स्थापन हि सर्व कामे त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केलेली होती. त्यामुळे राज्यारोहण हे खर्‍या दृष्टीने यशाचा मुकुटमणी होता. ही केवळ औपचारिकता नव्हती, ती आवश्यकता होती. काळाची गरज होती. या समारंभाचे प्रतिसाद भारतभर उमटणार होते. मानसिक हार मानलेल्या हिंदु समाजात कणा उत्पन्न करण्याचे कार्य या राज्यारोहणाने केले. स्वातंत्र्यतेचे बीज जरी आधी रोवल्या गेले असले तरी हिंदुंमधे स्वातंत्र्याचा होमकुंड यशस्वीपणे पेटविण्याची शक्ती आहे हे या सोहळ्याने सिध्द केले. पृथ्वीराजा नंतर स्वतःचा बळावर राज्याभिषेक करणारे महाराज हे केवळ तिसरे शूरवीर होते. (हरिहर राय आणि बुक्का हे विजयानगर सत्तेचे संस्थापक सिंहासनधीश होते. तसच 'विक्रमादित्य' हेमू हा दिल्लीत फार थोड्या काळासाठी सत्ताधीश होता.) तर तीन आघाड्यांवर लढा देऊ शकणारे ते फक्त दुसरे लढवय्ये होते. पंड्या किंवा चोला राज्यांनंतर नौदल स्थापन करणारे ते पहिले दूरद्रष्टे होते. या सगळ्या कारणांचा विचार करुनच महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले.

एवढी पार्श्वभूमी ठळकपणे दिसत असली तरी मागे म्हटल्या प्रमाणे मुघली सत्ता १८५७ पर्यंत चालली असे का मानतात? त्यामागच्या राजकारणाचा विचार पुढल्या लेखात करू या.