श्रीकांतनी सायकल भरधाव वेगानी अंगणात घातली. वर्हांड्यात फतकर मारून बसलेल्या माईंना बघुन त्यांनी सायकल चालतीच सोडुन उडी मारली. सायकल विहिरीच्या कडेला दाणकन जाऊन आदळली.
"आई, आई काय झाल?"
माईंनी काही उत्तर दिलं नाही. वरची दोन बटनं सोडलेला शर्ट, खर्रा खाऊन रंगलेल तोंड आणि चोपून मागे केलेले केस अश्या श्रीकांतकडे त्या नुसत्या बघत होत्या. श्रीकांतला सायकल दामटुन श्वास लागला होता. त्याला काहीतरी अर्धवट बातमी कळली होती. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते. माई काहीच बोलत नाही बघुन तो "वहिनी, वहिनी" हाका मारत धावत घरात गेला. आतुन परत रडण्याचे आवाज येऊ लागलेत. श्रीकांत परत धावतच बाहेर आला. सारं घर स्तब्ध होत. आकाशात ढग दाटलेले होते. आणि पान ही हलत नव्हत. अश्यात फक्त श्रीकांतच धावपळ करत होता. त्याने माईंना मिठी मारायचा प्रयत्न केला. पण माईंनी काहीच हालचाल केली नाही.
"आई, तू रडू नकोस. मी आहे" असं काहीस म्हणत तो सायकल कडे धावला. सायकलचे पाईडल जोराने मारण्याच्या प्रयत्नात पाईडल त्याच्या पोटरीला खस्सकन लागले पण त्या कडे त्यांच लक्ष नव्हत. त्याने घाटाकडे सायकल हाणली.
घरात परत सुन्न झाले. पाऊस पडत नव्हता आणि गरमीने श्वास गुदमरायची वेळ आली होती.
"माई, आत या" कोणी मध्यमवयीन बाई उंबरठ्यावर उभी राहुन माईंशी बोलत होती.
"राहु दे इथेच मला. पोरीची काळजी घ्या" माई उत्तरल्या. श्रीकांत झंझावातात त्यांचे रडणे थांबले होते. त्यांच्या शुन्य डोळ्यातून गरम टपोरे अश्रु परत वाहु लागले.
त्यांचं लग्न नुकतच झाल होत तेंव्हाची घटना त्यांना आठवत होती. त्यांच्या सासुबाई त्यांना कोणा बाबा कडे कोंकणात घेउन गेल्या होत्या. बाबा एका झोपडी वजा खोलीत रहात असे. त्याची खोली विचित्रश्या कुबट वासानी भरली होती आणि अंगार्यांचा धूरात काहीच दिसत नव्हते. त्या बाबाच्या पायावर पडुन सासुबाईंनी हंबरडा फोडला. माई जेमतेम विशिच्या असतील तेंव्हा. ती घुसमटलेली खोलीने त्यांचा जीव दडपुन गेला होता आणि सासुबाईंच अभद्र रडण त्यांना असह्य झाल होत. "असं नका करू हो. दया करा. सूनेला सुख लाभु द्या" असं काहीस सासूबाई हुमसुन-हुमसून म्हणत होत्या. पण बाबाने हूं का चूं केलं नाही. थोड्या वेळानी सासूबाईंनी आणलेला प्रसाद बाबाच्या पायावर ठेवला आणि माईंना घेऊन त्या घरी परत आल्या. घडलेला प्रकार इतका भेसूर आणि विक्षिप्त होता की माईंना त्या बद्दल सासूबाईंना काही विचारण्याची हिम्मत झाली नाही. सासूबाईंनीही काही कधी सांगितल नाही. पण जायच्या वेळी मात्र "पोरी, पोरी" म्हणत सासूबाई आपले खरखरीत हात माईंच्या गोल चेहर्यावर सारख्या फिरवत असत. सासूबाई त्या बाबाच्या पाया पडुन का रडत होत्या हे जरी माईंनी कधी विचारल नसलं तरी त्याची प्रचिती त्यांना जन्मभर जणू यायची होती.
माई कणखर व्यक्तीमत्वाच्या होत्या. जन्मभर संसार त्यांनीच रेटला होता. जवळच्या शाळेतच त्या नोकरी करत असत. सध्या त्या मुख्याध्यापिका होत्या. शिस्तबध्द आणि करारीपणासाठी त्या प्रसिध्द होत्या. त्या काळात बायका फारश्या नोकरी करत नसतं. पण नोकरी करावीच लागली तर शिक्षण क्षेत्राकडे जास्त कल असे. माईंची नोकरी करण्यामागची कारणे थोडी निराळी होती. माई लग्न होऊन घरात आल्यात तर घर खाऊन-पिऊन सुखी होतं. त्यांचे यजमान, आपले अण्णा, मोठ्या सरकारी हुद्द्यावर नोकरीस होते. इतक्या लहान वयात एवढा पगार आणि एवढा हुद्दा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचं भविष्य उज्वल होत. लग्नानंतर यथावकाश माईंना दोन सोन्यासारखी पोरं झाली. सगळं कस चित्रपटातल्या सारख चालू होत. पण वाईट काळ दार खटखटवुन येत नाही आणि बाहेर हाकलून बाहेरही जात नाही. खुपदा तो घरचाच होऊन बसतो. घुशीसारखा घरातल्यांची आयुष्य कुरतडत बसतो.
अण्णा स्वभावाने थोडे विक्षिप्त होते पण त्यांना वेड लागणार आहे अस कोणाच्या डोक्यात आलं नसत. पण वयाच्या तीशीत त्यांना फिटस् चा त्रास सुरू झाला. सुरुवातीला औषध देऊन आराम पडत असे पण या रोगाला निदान नेमके असे निदान नाही. हळु-हळु औषधांचा परिणाम कमी होऊ लागला. त्रास अजुन वाढत जाणार याची ती लक्षण होती. घरातील एकट्या कमविणार्या व्यक्तीची होत असलेल्या दुर्दशेचे सावट सगळ्यांवर पडत होते. फिटस च्या त्रासाने अण्णांची मानसिक संतुलन बिघडत होते. लहान असली तरी पोरे वडिलांसमोर दबुन असत. कधी काही चूक नसतांना बेदम मार पडत असे तर कधी कप-बशी फोडली तरी मुके मिळत असत. पण अश्या परिस्थितीतही अण्णांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी माईंचे शिक्षण पुन्हा चालू केले. खरं सांगायच तर अजुन काही मार्ग नव्हताही. माई मुळात हुशार होत्या पण लग्न व्हायच्या वेळेस त्या बी. ए. च्या प्रथम वर्गात होत्या. पण लग्ना नंतर सहाजिकच त्यांच शिक्षण थांबल. सध्य परिस्थितीत मात्र बी.ए. ची पदवी मिळाल्यावर शिक्षिकेची नोकरी पक्की होती. घराजवळच सरस्वती महाविद्यालय होत. माईंनी मुंबईच्या महाविद्यालयात स्वतःचे शिक्षण सुरु केले.
मुंबईला दररोचच जाण-येण आणि घर बघण यात त्यांची फार धाव-पळ होतं असे. अण्णा आजकाल घरीच असत. पण त्यांची फारशी मदत नसे. पण त्यांची होत असलेली दशा माईंना बघवत नसे. त्यांनी खुप उपास-तापास चालू केले. अभ्यास आणि घरा-दारातून वेळ काढुन त्यांनी आजु-बाजुची सगळी मंदिर झाडुन काढलीत. जेजुरी-तुळजा भवानी झालं मंगेश आणि त्र्यंबकेश्वरही आटपला पण त्या हार मानायला तयार नव्हत्या. जे काही घडलय किंवा घडलय त्या मागे काही तरी कारणं असतात. कुठल्या कारणाशिवाय कसं काही घडणार? आपल्या सोन्यासारख्या नवर्यावर अशी परिस्थिती का यावी याचे उत्तर माई शोधत होत्या. स्वत:च्या आयुष्याशी दैव असला अघोरी झिम्मा का खेळत होता हे त्यांना आकलनी पडत नव्हते. त्यांना खरं सांगायच तर शिकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना फक्त छान संसार करायचा होता. आपल्या नवर्याची सुखी ठेवायचे होते. पोरांना छान मोठं करायच होत. एवढ्या साध्या मागण्या त्या, काय चूक आहे त्यात? पण एवढ्या साध्या अपेक्षांचे मागणे देवाजवळ करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजु-बाजुच्या सगळ्यांचे संसार असेच चालू होते. सामान्य. पण ते सुध्दा माईंच्या नशिबी नव्हते. त्यांच्या तळहातावरच्या रेषा सामान्य नव्हत्या. अगम्य, अज्ञात अश्या त्या रेषांना जणु ऐका-मेकांचाही ठावठिकाणा नव्हता.
No comments:
Post a Comment