3/16/08

कॉपी

प्रश्नांकडे तो निरखुन बघत होता पण त्याला कुठलीच उत्तरं आठवेना. पहिल्या विभागात चार पैकी दोन प्रश्न सोडावायचे होते. त्याला एकुण वीस गुण. आणि दुसर्‍या विभागात पाच पैकी तीन सोडवायचे होते व त्याला पंधरा गुण होते. त्याला एकही प्रश्न येत नव्हता. 'च्यायला' तो पुटपुटला. त्याने उरलेल्या प्रश्नांपैकी जे सोडविता येईल ते सोडवलं पण ७५ पैकी ३५ गुणांच्या नावानी बोंब होती त्याच काय? ईतिहास खरं त्याचा आवडता विषय होता. अहो, पण आवडता विषय असला म्हणुन काय झाल, अभ्यास नको का करायला?

९व्या इयत्तेची सहा-माही परीक्षा जवळ येत होती पण त्याच्या अभ्यासाच्या तयारीच्या नावानी शंख होता. त्याने आता जवळ जवळ अभ्यास करणे बंद केले होते. बास्केटबॉल व एन्.सी.सी. तून त्याला मुळीच फुरसत मिळत नसे आणि थोडा वेळ मिळालाच तर उनाडक्या करण्यात, मस्ती करण्यात तो गुंग असे. थोडक्यात, वेळ वाया घालवण्यात व अभ्यास न करण्याची कारणे शोधण्यात तो पटाईत झाला होता. घरी बरंच चिंतेच वातावरण होत. आई-वडिलांना काय कराव सुचत नव्हत व आजी या शंखाला शिस्त लावण्यात थकुन गेली होती. खर तर तिने स्वतःची, नातेवाईकांची व शेजार-पाजारची बरीच मुलं वाढवली होती. पण 'या सम हाच' अस काहीस तीला या आपल्या सगळ्यात धाकट्या नातवा बद्दल वाटु लागले होते. शाळेतही शिक्षकांना कळेना की हा विद्यार्थी जर का हुशार आहे तर अभ्यास का करत नाही ते. इंग्रजीच्या बाईंनी तर त्याला एकदा बाजुला घेउन विचारलं होत की घरी काही अडचणी आहेत का म्हणुन. एकेकाळी त्याचा वर्गात चांगलाच वरचा क्रमांक येत असे. आता मात्र घसरगुंडी थांबत नव्हती.

आमचे 'गुरु-महाराज' बहुधा निश्चिंत असतं पण सहा-माही परिक्षेचं थोंड टेंशन त्यांना जाणावु लागल होत. नुकताच तो शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातार्‍याला जाउन आला होता. घरच्यांनी सहा-माही होईस्तोवर बास्केटबॉल खेळण्यास बंदी आणली होती. त्यामुळे त्याला आता बराच वेळ असे. 'पढाई फटाकसे खतम कर डालते है।' असला काहीसा विचार करुन तो अभ्यासाला तर लागला होता पण इतर गोष्टींप्रमाणे लक्ष देण्याची सवय लावावी लागते, अभ्यास करण्याचा सुध्दा सराव लागतो. पुस्तक हातात घेउन त्याच्या झोपाच बर्‍याचदा चालु असत. 'आज हा विषय संपवु, उद्या तो मग रिविजन' असले हवेत आराखडे बांधुन, परीक्षेची तारीख जवळ आली तरी त्याचा बहुतांश अभ्यास राहिलाच होता.

परीक्षा सहा-माही असल्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट पध्दतीने बसविल्या जात असे. एका बाकावर आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी बसत असत. कॉपी करु न देण्यासाठी विद्यार्थ्यांना या पद्धतीने बसविले जाई. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आणि पुढे रोल नंबर च्या हिशोबाने त्याच्या वर्गातील मैतर बसलेला असे. परिक्षा चालू असतांना वर्गात शिक्षक असायचे पण त्या व्यतिरिक्त इतर चपराशी, मुख्याध्यापिका किंवा तत्सम व्यक्तीगण वर्‍हांड्यातुन फेर्‍या मारत असत. एकुण बंदोबस्त चोख होता पण बिलंदर लोक कॉपी करायचेच. कोणाला उत्तीर्ण होण्याची धास्ती असे तर कोणाला पहिला क्रमांक न येण्याची. बरेचशे तर उगाचच काही तरी 'धाडस' दाखवायच म्हणुन कॉपी करत. कॉपी करण म्हणजे जवळ चिठ्ठ्या वगैरे ठेवण्याचा प्रकार दुर्मिळ असे. बहुतांश वेळा पुढल्याला किंवा मागल्याला विचारणे असलाच प्रकार असे. जिभकाटेच्या जवळ मात्र चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्याला शाळेतुन काढुन टाकलं होत.

सुरुवातीचे पेपर अपेक्षेपेक्षा बरेच चांगले गेलेत त्यामुळे तो आनंदात होता. सगळे प्रश्न सोडविल्या गेले होते. आता ते चूक का बरोबर असले भलते-सलते विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. अजुन महत्त्वाच म्हणजे समोर बसत असलेल्या सतीश ने या वेळेस चांगलाच अभ्यास केला होता. सतीश त्याचा चांगला मित्र असल्यामुळे आपल्या कथा नायकाचाही बराच फायदा झाला होता. काही अडलं-नडलं तर सतीश त्याची मदत करायचा. कधी कधी सप्लीमेंट बाकावर बाजुला ठेवायचा. एकुण आपली स्वारी खुशीत होती. आता फक्त ईतिहास व भूगोलाचे विषय राहिले होते. 'ये तो अपने बाए हात का खेल है'। असे त्याला वाटत होते.

अर्थात, आज ना उद्या कयामत येणारच होती, ती ईतिहासाच्या रुपाने आली.

त्याने सतीशला ढोसायला सुरुवात केली. "अबे, पहिल्या चार पैकी किंवा दुसर्‍या पाच पैकी किती प्रश्न येतात"?
एकदम इतका मोठा प्रश्न विचारल्यामुळे बराच आवाज झाला असावा? वर्गाच्या दुसार्‍या टोकाला बसलेल्या मुली ही मागे वळुन बघु लागल्या. बाई निवांतपणे बसुन काही तरी वाचत होत्या.
"पागल है क्या बे? मारेगा मुझे भी।" सतीश म्हणाला.
इथे मात्र तो तव्यावर पडल्यासारखा तडफडत होता. "बता ना बे जल्दी"
सतीश ने बोटांनी सांगितले की कुठले प्रश्न त्याने सोडवले आहेत ते.
त्याला हुश्श झालं. त्याने त्याच्या प्रश्न पत्रिकेवर त्या प्रश्नांवर रेघा मारल्यात व वीस पैकी तेरा व पंधरापैकी नऊ असे आकडे लिहिलेत. या आकड्यांना काय अर्थ होता ते त्यालाच माहिती.
"बोलु नका रे. आपापला पेपर सोडवा" बाई उगाचच ओरडल्यात.
"पेपर दिखा मुझे"
"अबे! दोन्-दोन पानांची उत्तर आहेत. एवढ दाखवणार आहे का तुला?"
"क्युं?"
" याने?"
"बस भाई, यही दोस्ती है तेरी"
"पागल झाला का बे?" सतीश म्हणाला.
" अरे कोण बोलतय रे मागे" बाईंनाही संवाद ऐकु गेला असावा. सतीशने अजुन काही न बोलता आपली सप्लीमेंट बाजुला काढुन ठेवली. तो त्यातील उत्तरे बघुन लिहु लागला. पण उत्तरे खरच लांब-लांब होती त्यामुळे सतीशचे आंग व कोपर यातुन त्याला नीटस दिसेना.
"बाजुला हो बे थोडा"
"अजुन बाजुला झालो तर पडीन मी बाका वरुन"
बरीच धुसर-पुसर चालू होती. बाजुला बसलेला दहावीचा पोरग शेवटी मधे पडला.
"अभी किसी ने और आवाज किया तो देख लुंगा पेपर के बाद"
"अस नको करु ना बे. तीस मार्कांच येत नाही या मला. काय करु सांग" तो म्हणाला.
"अभ्यास"
यावर काही उत्तर त्याच्याकडे नव्हते. वर्गातील बरीच मुलं मागे वळुन बघत होती. बाई निवांतच होत्या.
तो सतीशला सारखा पेन नी टोचु लागला. शेवटी सतीशला प्रकरण असह्य झाल. त्याने त्याच्या दोन सप्लीमेंट बाजुला काढल्यात व पायाखालुन त्याच्याकडे सारल्यात.
"घे. डोकं नको खाऊ."
हे अनपेक्षित होत. त्याला आता अजुनच भीती वाटायला लागली. तरी त्यानी खालती वाकुन ती सप्लीमेंट उचलली. खिडकीतुन कोणी बघतय का हे बघीतल व बाकाच्या कप्प्यात सप्लीमेंट ठेउन तो उत्तर भराभरा लिहु लागला. वर्गात परत शांतता पसरली.
बाई अजुनही निवांतच होत्या. चश्मा लाउन झोपल्या होत्या की मुलांवर त्यांचा नको तेवढा विश्वास होता कोण जाणे.
"झाल का रे लिहुन?" सतीशने विचारल.
"हो संपलच"
हवी असलेली उत्तर लिहुन तो अजुन काही मिळतय का हे बघत होता. तेवढ्यात कोणी तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याचं हृदयच धडधडायचं थांबल. त्याने हळुच मागे वळुन बघीतल. बाजुला बाई उभ्या होत्या. त्याने आवंढा गिळला. समोर बघीतल तर सतीश ताठरला होता. त्याचीही हालचाल थांबली होती.
"अरे, अशी सप्लीमेंट मांडीवर घेउन लिहिशील तर मागचे लोक बघीतील ना" बाई त्याला म्हणाल्या.
बाईंनी त्याच्या मांडीवर असलेली सप्लीमेंट हातात घेतली व त्या उत्तर वाचु लागल्या. बाईंच्या हातात सप्लीमेंट गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सतीशने काळ्या शाईने उत्तर लिहिली आहेत व तो निळ्या शाईच्या पेनने उत्तर लिहित होता. त्याला काय करावं सुचेना. जणु त्याला सगळं ब्रह्मांड दिसु लागलं. पकडल्या गेलो तर काय थापा मारायच्या याचा तो विचार करु लागला. पण थापा काय मारणार इथे अक्षरश: रंगे हात पकडल्या जाण्याची पाळी आली होती. बाईंनी उत्तरांवरुन नजर फिरवली व सप्लीमेंट परत त्याला दिली.
"बरोबर लिहिली आहेत उत्तर. पण अभ्यास कमी केलेला दिसतोय यंदा. अजुन केला पाहिजे अभ्यास. अरे, पुढलं वर्ष १०वीच ना? आत्तापासुनच सवय लावली पाहिजे अभ्यासाची. आणि दोन निळे पेन घेउन यायचे असतात परीक्षेला, हे असं वेगवेगळ्या पेनने लिहिशील बोर्डात तर कॉपी केली म्हणतील बोर्डवाले!" बाई हळु आवाजात त्याला म्हणाल्यात.
"हो मॅडम" तो कसाबसा म्हणाला व त्याने सप्लीमेंट उचलुन बाकाच्या कप्प्यात टाकली. एव्हाना समोर सतीशची पाठ घामाने भरली होती.
"अरे, मुलं सप्लीमेंट लंपास करतात एका-मेकांच्या. तुझ्या सप्लीमेंट जपुन ठेव" बाई जाता-जाता परत म्हणाल्यात.
"हो मॅडम"
बाई गेल्याबरोब्बर त्याने सप्लीमेंट सतीशकडे सरकावली. "बता ना था ना बे मॅडम आ रही है कर केत्याचं हृदय भात्यासारखं वर-खाली करत होत.
घंटा झाली. सगळी मुले आपापले पेपर बाईंना देउन घरी जाउ लागले. तो अजुनही काहीच बोलत नव्हता.
"थ्यँक्यु यार" तो सतीशला म्हणाला.
"आज तर आपल्या दोघांची वाट लागली असती." सतीश म्हणाला. जे झालं त्याच्याकडे बघता सतीश बराच शांत होता. आपल्या हिरो चा त्याला फारसा राग आलेला दिसत नव्हता. त्यानी खरी 'दोस्ती' निभावली आज.
त्याने काहीच न बोलता नुसताच आवंढा गिळला. "अभ्यास करायला हवा यार"
"तु १०वीचा क्लास लावला आहे का बाईंकडे?" सतीशने विचारले.
त्याने नुसतीच मान डोलावली.

4 comments:

Anonymous said...

school days memory....golden period of life...!!

Anonymous said...

Masta ahe re....

Anonymous said...

Masta ahe re
Manish

TEJAS THATTE said...

Nostalgic !!!