1/22/08

संक्रातीचे पलायन

संक्रातीचं वार वाहु लागल होतं व शाळेत अभ्यासाचं वार वाहु लागल होत. १०वी च्य परिक्षा जवळ येत होत्या त्यामुळे 'ब' वर्गात फारश्या घडामोडी होत नव्हत्या. बहुतांश मुले आता अभ्यासाला लागली होती. अभ्यासा साठी बरेच विद्यार्थी गैर हजर रहात असत. शाळेत मुलांनी गैर-हजर राहु नये म्हणुन शाळेने कडक नियम लागू केलेत. यातुन मार्ग काढण्यसाठी मुले पहिल्या तासिकेत हजेरी लाउन, मधल्या सुट्टीत घरी पळुन जायचे. पळुन जाणार्‍या विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी शिक्षक मधल्या सुट्टीत शाळेच्या उंटाच्या शेपटी एवढ्या पटांगणात फेर्‍या मारत असत.

शाळेचे आवार फारच लहान होत. त्यामुळे शाळेच्या पुढल्या बाजुला मुली आपल्या सायकली लावत असत तर मागल्या बाजुला मुलं त्यांच्या सायकली लावयचे. या सायकलींची देखभाल करायल एक माणुस असे. तो शाळेचा नोकर वर्गात मोडल्या जात नसावा कारण तो प्रत्येक विद्यार्थ्याकडुन तो वर्षाचे ४० रुपये घेत असे. (पैसे वेळेवर भरले नाहीत की तो चाकाची हवा सोडायचा. फारच उशीर केला तर सायकल लपवुन ठेवायचा!) पन्नाशीच्या घरातील या इसमाला अख्खी शाळा बावाजी म्हणत असे. त्याच खर नाव कोणालाच माहिती नव्हत. अर्थात सायकली कुठे पळुन जात नसत. पण पळुन जाणार्‍या मुलांना पकडण्यसाठी बाजीप्रभुंच्या आवेशात बावाजी व त्याचे असिस्टंट मंडळी शाळेच्या दोन्ही फाटकांबाहेर गस्त घालत असत. शाळेच्या आवारातुन बाहेर पडतांना त्याच्याशी गुफ्तगु कराविच लागे. गेले आठवडाभर चिन्मय आणि त्याच्या 'गँग' चे सदस्य आळी-पाळीने पळत होते. शाळेत येतांना दप्तरच घेउन यायच नाही. चार वह्या पुस्तक घेउन आल कि पळायल सोप होत. पण शिक्षकही काही कच्चे लिंबु नव्हते. त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांनी दप्तर आणली आहेत की नाही हे तपासायला सुरुवात केली. मग ज्या मुलांची पळुन जाण्याची पाळी असे त्यांची द्प्तरे त्यांचे मैतर लोक घरी घेउन जात असत. मग शिक्षकांनी शाळा सुटल्यावर प्रत्येक विद्यार्थी किती दप्तरे आहेत या कडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पण विद्यार्थी पण 'जमे़ हुए खिलाडी़ थे। शाळा सुटल्यावर आपल्या पळुन गेलेल्या मित्राच दप्तर भिंतीवरुन फेकुन द्यायचं किंवा खिडकीतुन बाजुच्या जंगलात फेकुन द्यायच इत्यादी उद्योग मुलांनी चालु केले. या बाणावर शिक्षकांकडे मात्रा नव्हती. अहो, काय बाजुच्या मोकळ्या पडलेल्या प्लॉटवर, तिथल्या वाढलेल्या झाडींमधे उभर रहायचं की काय। शिवाय इतकी अक्कल अभ्यास करण्यात लावली असती तर सगळेच मेरिट आले असते खर तर. पण हे खुद्द ब्रह्मदेवही याबाबतीत मुलांच्या डोक्यात प्रकाश पाडु शकत नाही.

एकुण शिक्षक व विद्यार्थ्यांचा हा लपंडाव दिवसभर चालू असे. आज तेजसची पळुन जायची पाळी होती.

"अबे तुझे ये बस्ता लेके आनेको किसने कहां था?" नागपुरी हिंदीत परागने तेजसला विचारले.

"यार काय करु, आईनी जबरदस्ती दिल द्प्तर. तू घेउन जाशील का आज घरी?" तेजसने विचारल.

"मी आज बहारच घेउन जाणार आहे. तीन-तीन दप्तर घेउन जायला घरी काय दुकान लावायच आहे का?"

" ए चिन्मय, तु घेउन जाशील का बे माझं द्प्तर?"

"नाही"

"घेउन जा ना बे. ऐसा काय को करता?"

"नाही. तु सायकल कुठे लावली आहे आज? बावजी कडे ना"? चिन्मय ने विचारलं.

" यार, अजुन कुठे जागाच नव्हती"

"मरने वाला है बेटा तु आज" सौरभनी आपलं मत स्पष्ट केल.

" बघ यार, तु आज नाही पळाला तर तुला पुढल्या आठवड्यातच पळता येइल. उद्या चिन्मयची पाळी आहे आणि परवा सौरभची" कौस्तुभनी माहिती पुरवली.

तेजस विचार करु लागला. पहिली तासिका झाली. हजेरी लागली होती. शाळेत एकुणच शांतता होती.

"पळुन जाउ नका एवढच मी सांगेन. घरी जाउन तुम्ही मुळीच अभ्यास करत नाही याची मला खात्री आहे. त्यापेक्षा इथेच वर्गात अभ्यास का नाही करत तुम्ही मुलं? रिविजन करा शिक्षकां सोबत. काही प्रश्न असतील तर ताबोडतोब विचारता येतील. आजकालच्या मुलांच काहीच कळत नाही." बाई म्हणाल्या.

इथे तेजसची चुळबुळ चालु होती. त्यानी बर्‍याच मुलांना त्याच दप्तर घेउन जाण्याबद्दल विचारल पण कोणी फारशी उत्सुकता दाखविली नाही. काही मुलांनी दप्तर घेउन जाण्याबद्दल तयारी दाखविली पण त्यांनी स्पष्ट केल की ते दप्तर परत आणणारच नाही! चौथ्या तासिकेनंतर मधल्या सुट्टीची घंटा झाली. जी मुले पळुन जाणार होती ती पळुन जायच्या उद्योगाला लागली. शिक्षक व बावाजी सोबत त्यांचा शिवा-शिवीचा खेळ सुरु झाला. तेजसला कळेना काय कराव ते. त्याने बावजीला मस्का लावण्याचा प्रयत्न केला.

"बावाजी, आज जाने दो ना। घर मे मां की तब्येत खराब है।"

"का बे काल पैदा झालो वाटल का बे तुला?" आता या पुढे काय बोलणार!

तरी तेजस तिथेच घुटमळत होता.

"तेजस लेका कसा फाट्या आहे बे तू? हिंमत है तो भाग के दिखा । मान जाउंगा तुझे।" कौस्तुभनी तेजसला उगाच डिवचल.

शाळेतील मुलं शाळेच्या मागल्या फाटकापाशी उगाच घोळका करुन उभी होती. कोणी पळुन जात नसेल तरी एकदम "हो हो" चा गजर लावित होती. मधली सुट्टी संपायची वेळ आली होती. दहाच मिनिटे उरली होती. तेजस अस्वस्थ होत होता. तेजस वर्गात परतला. " अभी तक तू इधर ही है। मला वाटल की तू पळाला." चिन्मयने कुत्सितपणे विचारले.

"फाट्या आहे ना बे तो. तेजस फाट्या, तेजस फाट्या...हो हो हो हो" कौस्तुभनी गजर लावला.

आता मात्र हद्द झाली होती. तेजसची सहनशक्तीचा तो अंत होता. त्याने आपले दप्तर उचलले व धावत फाटकापाशी गेला. कोणी मुलगा पळुन गेला होता तर बावाजी त्याच्या मागे धावत गल्लीच्या टोकापाशी गेला होता. तेजसनी ती संधी साधली किंवा निदान तसा प्रयत्न केला. त्याने आपली सायकल उचलली व शाळेच्या ५ फुटी भिंतीवरुन ती सायकल पलिकडे टाकायचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात दुरुन बावजी परत येतांना त्याला दिसला. घाई-घाईत त्याचे एकाच खांद्यावर लावलेल दप्तर पडल. भिंतीपलिकडे अर्धवट गेलेली सायकल. तेजस स्वत: भिंतीवर व अलिकडे पडलेल द्प्तर अशी त्याची त्रिशंकु स्थिती झाली. बावाजी अर्थातच, आंधळा नव्हता. त्याने दुरुन हे 'मनोरम' दृश्य बघितलं व तो परत शाळेच्या दिशेनी धाउ लागला. आतापर्यंत भिंतीपाशी बरीच विद्यार्थी जमा झाले होते. कोणी तेजसला मदत करायला तयार नव्हत. त्याचे 'ब' वर्गातील बंधुंना तेजसच्या या 'मर्दुमुकीची' कल्पना नव्हती. इथे मात्र तेजस चांगलाच फसला होता. पण अजुन कयामत नीटशी कोसळली नव्हती. कुठल्या तरी उद्योगी विद्यार्थ्याने हे नाटक बघायला शिक्षकांना आमत्रंण दिल.

"तेजस नालायक खाली उतर" बाई ओरडल्या

"ए सन्नाट्या, कोठे पळुन राहिला बे तू" बावाजीने आरोळी ठोकली व तो तेजसला भिंतीवरुन खाली खेचू लागला.

"अरे बावजी, मेरी सायकल इधर अटक गयी है। वो तो निकालने दो।"

"सायकल गेली भाड्यात. तू आधी खाली उतर. "

"कानाखाली आवाज काढयला हवा या मुलांच्या" बाई म्हणाल्या.

हे ऐकुन आत्ता पर्यंत हो हो चा गजर 'प्रेक्षकांनी' लावला होता त्याचे रुपांतर आता "तेजस को मारो, तेजस को मारो" यात झाला. तेजसचे वर्गबंधु घटनास्थळावर दाखल झाले होते. शेवटी तेजसनी सायकल सोडली व तो भिंतीवरुन खाली उतरला. त्याने आपले दप्तर हातात घेतले. बावाजीने त्याचा दंड घट्ट पकडुन खेचायला सुरुवात केली.

"अरे बावाजी धक्का काय को मार रहे हो"

"तू चाल ना बे. खुप शायना बनुन राहिला होता मगापासुन"

"अबे, काय आयटम आहे बे. सांगायच तर होत आधी, कॅमेरा घेउन आलो असतो." कौस्तुभनी टोमणा मारला.

बाई पुढे, मागो माग बावजी व तेजस व क्षणा-क्षणाला वाढत जाणार जन-समुदाय अशी वरात शाळेच्या पटांगणातुन मुख्याध्यापिकेंच्या कार्यलयाकडे निघाली. तेवढ्यात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. शाळेच्या चपराश्यानी सगळ्या मुलांना हाकलले. मुख्याध्यापिका कार्यालयात नव्हत्या. ज्या बाईंनी तेजसला पकडल होत त्यांही त्यांच्या तासिकेला निघुन गेल्या. बावाजी दमुन गेला होता. विहिरीच्या बाजुच्या भिंतींला लागुन त्याचा झोपण्याचा बाक असे तो तिकडे निघुन गेला. मुख्याध्यापिकेंच्या कार्यालया बाहेर चपराशी व तेजस दोघेच उरले होते.

1/1/08

श्री गणेश वंदना

हे अशेष शब्दब्रह्म। तीच तुझी मूर्ती उत्तम।
वर्ण हीच कान्ति मनोरम । तुझ्या मूर्तीची॥

स्मृती हे तुझे अवयव। ज्यांचा अवर्णनीय आंगीकभाव।
अर्थशोभा ही ठेव। लावण्याची॥

अष्टादश पुराणे। तीच मणिभूषणे।
पदरचना घाट, प्रमेये कोंदणे। त्यामध्ये रत्नांची॥

पदरचना सुंदर। तेच रंगविलेले वस्त्र।
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥

कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥

पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्‍यातील रत्ने। करगोट्याच्या॥

व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥

ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥

तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥

एका हाती भग्नदंत। तेज जाणावे बौद्दमत।
जे वर्तिकांनी खंडित। स्वभावता।

मग जो सत्कारवाद। तोच पद्मकर वरप्रद।
जो धर्मस्थापक स्वभावसिध्द। तो अभयहस्त॥

जो विवेक अति निर्मळ। तोच शुण्डदण्ड सरळ।
जेथे परमानंद केवळ। महासुखाचा॥

जो उत्कृष्ट संवाद। तोच सरळ शुभ्र दात।
ज्ञान हेच सूक्ष्म प्रदीप्त। डोळे विघ्नराजाचे॥

पूर्व उत्तर मीमांसा दोन। तेच ह्याचे कान।
बोधमदामृताचे सेवन। करिती मुनिभृंग॥

प्रमेय तेच तेजस्वी मवाळ। द्वैत-अद्वैत गंडस्थळ।
समान त्यांची शोभा तेजाळ। भासतसे॥

वरी जी दश उपनिषदे। ती सुंगधी मुले मुकुटामध्ये।
ज्ञानाचा मकरंद ज्यामध्ये। ती शोभती भाळी॥

अकार चरणयुगुल। उकार उदर विशाल।
मकार मस्तकस्थल। सर्वश्रेष्ठ॥

हें तीन्ही एकवटले। तेव्हा शब्दब्रह्म झाले।
ते आदिबीज मी वंदिले। सदगुरु कृपेने॥

- श्री ज्ञानदेव कुळकर्णी

मूळ रचना ज्ञानेश्वर महारांजाच्या ज्ञानेश्वरीतील आहे. प्रज्ञाभारती श्रीधर भास्कर वर्णेकरांनी त्याचे 'भाषांतर' सध्याच्या मराठीत केले.

12/23/07

भातुकलीचा खेळ

आज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्‍या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.

मला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार? आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार? पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का? पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.

तो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.

प्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का? मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.

आम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल। मग आमचं का जुळल नाही? आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला? मला असा वार्‍यावर टाकुन कसा गेला?

माझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्रमित होत। हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.

मला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. " ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्‍या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड."

हें काय असलं अभद्र बोलण झाल? माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल? कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का? मग परत का येत नाहीया तो? असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला?.....

12/3/07

॥ निर्वाण-षटकम् ॥

मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोंत्रजिह्ने न च घ्राणनेत्रे।
न च व्योम भूमिर्नतेजो न वायु: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥१॥

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु: न वा सप्तधातु: न वा पंचकोशः।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥२॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥३॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥४॥

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥५॥

अहं निर्विकल्पो निराकार रुपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेद्रियाणाम् ।
न चासङगत नैव मुक्तिर्न मेयः चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥६॥


-- आद्य शंकराचार्य

12/2/07

संगणक जेंव्हा मरतो तेंव्हा!

पंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल। 'प्लग सैल होता का? बॅटरी तर खराब नाही झाली? च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत?' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्‍याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर!) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा? हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात? खर्चाच्या विचाराने पाय लटपाटायची वेळ आली. कानात कुंय्...आवाज येऊ लागले. कसं तरी स्वतःला सांभाळुन मी परत एकदा बॅटरी, प्लग सगळ नीट तपासल. सगळ्या गोष्टी भौतीक जगात आप-आपल्या जागी स्थिर होत्या पर प्राण-पंछी उड गये थे।

'हात्तीच्या कंप्युटरची तर' अस काहीस पुटपुटत मी पुढे काय करायचं याचा विचार करत खोलीत फेर्‍या घालु लागलो। नवीन कंप्युटर घेणं म्हणजे डोक्याला एक ताप आहे. तंत्रज्ञान सश्यासारख उड्या मारत पुढे जातय आणि माझ्या सारख्या कासवाच्या बुध्दीच्या लोकांचा या शर्यतीत मुळीच तगावा लागत नाही. कुठला कंप्युटर घ्यायचा, किती पैशे मोजायचे, काय-काय तंत्रज्ञान त्यात हव याचा हिशोब पूर्ण होई पर्यंत किमान दोन आठवडे कंप्युटर येणार नव्हता. गाणी नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, पिक्चर नाही, काहीही नाही. ठण ठण गोपाळा!

तो रविवार शोक मनविण्यात गेला. पण आठवडा जसा जसा जाउ लागला तस कंप्युटर नसल्याचे बरेचशे फायदे दिसु लागले. संध्याकाळची कामे भराभरा होऊ लागले. अन्न अधिक चविष्ट लागु लागल. कामा व्यतिरिक्त वाचन होउ लागले. आई फोन फर काय बोलतेय ते उमजायला लागलं रेडिओवरही गाणी लागतात आणि वर्तमानपत्रातुन ही बातम्या मिळतात याचा पुनःश्च शोध लागला. कंप्युटरच्या आठवणीने अधुन-मधुन गळा भरुन येतो पण ते तेवढच.

पण या सगळ्यात काही तरी बोचत होत। लाकडाची शिळक तळहातात गेली की मन कस बेचैन होत तस काही तरी रुतत होत. यावर विचार करायला संध्याकाळी बराच वेळ असतो त्यामुळे विचारांची भिंगरी फिरु लागली.

सकाळी ऑफिस, संध्यकाळी कंप्युटर, जेवतांना कंप्युटर, रात्री झोपायच्या आधीसुध्दा कंम्प्युटरच। दुसर्‍या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश्य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात? समस्या दोन पैकी कुठलीही असो पण हा एकाकीपणा समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीची प्रतिमा नक्कीच आहे.

दोन दृष्टींनी समाज झपाट्याने बदलतो आहे. एक, जागतिकीकरणामुळे व त्यान्वये, पैश्यांच्या वाढत्या हव्यासापायी, नात्या-गोत्यांचे धागे सैल व जीर्ण होता आहेत. व दुसरं म्हणजे समाज स्वत:ला एका विशिष्ट प्रतिमेत बघण्याची स्वतःवरच बळजोरी करतो आहे. या दोन कारणांचा संक्षिप्तात विचार करुया.
नाती-गोती म्हणजे रक्ताची नाती एवढाच माझा उद्देश्य नव्हे तर शेजार-पाजार, मित्र-मंडळ व ओळखी-पाळखीतील (आणि प्राची-गच्ची!) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे। मनुष्याचे व्यक्तिमत्व ही सर्व पात्रे रंगवितात. यातील चांगले कोण वाईट कोण, कोण नातेवाईक आवडतो कोण नावडतो हा मुद्दा गौण आहे. पण या सर्वांच्या बोटांचे ठशे आपल्या व्यक्तिचित्रावर उमटलेले असतात. पण व्यक्ति-स्वातंत्र्याचा विपरित अर्थ लाउन, 'मी माझ्यापुर्ताच' किंवा 'मी माझ्या कुटुंबापुर्ताच' या भावनेने आयुष्य जगणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख आहे. सगळ्यांसमोर आपल अगदी उत्तम चाललय हा आव आणायचा आणि इथे मुलं वाया बिघडता आहेत हे बघुन हतबद्ध् व्हायच. काही समस्या कौटुंबिक सीमा-रेषे पलिकडे असतात. तीथे समाजा व्यक्तिला वठणीवर ठेवतो. हे सामाजिक नियम आखलेले नसतात पण ते आवश्यक मात्र असतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे नियम धाब्यावर बसविणे धोक्याचे आहे. व्यक्ति, कुटुंब व समाज या वेग-वेगळ्या संकल्पना नव्हेत तर एक-मेकांच्या प्रतिमा आहेत. हि भावना सगळ्यांनी जपणे आवश्यक आहे.

प्रजातंत्र म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत तर सुदृढ व स्वयंशासित समाज हे प्रजातंत्राचे अंतिम साध्य होय.

दुसरं म्हणजे सगळ्यांना सगळ हव याचा हव्यास. याचा अर्थ असा नव्हे की कमी साधनांमधे जगणे चांगले किंव्हा चैनीच्या वस्तु घेणे चुकिचे आहे. प्रत्येक वस्तुची, कृत्याची, विचारांची, थोडक्यात मानवी पैलुंची किंमत पैश्यात लावण्याकडे जो कल वाढत चालला आहे त्यामुळे समाज निष्प्राण व शुष्क होतो आहे. मला हे हव, ते हव, सगळ हव आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करणार. त्यासाठी लागतील तर सगळी बंधन, रुढी-परंपरा, नाती-गोती मी तोडणार, या गणिताचे उत्तर कधीच बरोबर येणारं नाहीया.

या दोन्ही कारणांमुळे व्यक्ति एकटा पडतो आहे. इंटरनेटवर वेळ तर जातोच पण जे आपल्याकडे नाही किंवा जे आपण नाही ते ही वेबदुनियेत खोटं-नाटं दाखविता येत. हि परिस्थिती भितीदायक तर आहेच पण केविलवाणीसुध्दा आहे. व यावर तोडगा आपला आपल्यालाच काढायचा आहे.

11/23/07

संस्कृत रचना

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तस्मात् कारुण्य भावेन् रक्ष रक्ष परमेश्वर।
रक्ष रक्ष परमेश्वर॥

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत् पुजितं मया देव परिपूर्णं तद्स्तुमे
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्
पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर
क्षम्यतां परमेश्वर॥

कालेवर्षतुपर्जन्य पृथ्वी सश्यशालिनी
देशोयं शोभधरितो ब्राह्मणा संतु निर्भया।
अपुत्रा पुत्रीणःसन्तु पुत्रिणःसन्तु पौत्रिणा
अधना सधना सन्तु जीवन्तु शरदःशतम्॥

सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु
सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु
सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु ॥

ॐ शांति शांति शांति: ॥

टीप -: या रचनेचे रचनाकार कोण आहेत हे मला माहिती नाही.

10/30/07

आद्य शंकराचार्य - भाग १

गीतेतील एक श्लोकात कृष्ण अर्जुनास म्हणतो की धर्म संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात जन्म घेइन. याचा अर्थ बरीच लोकं असा घेतात की विष्णुचे ९ अवतार झाले असुन १० अवतार अपेक्षित आहे. मग गौतम बुध्दाला जरी ९ वा अवतार मानले तर याचा अर्थ असा होतो की गेल्या तीन हजार वर्षात धर्माला कधी ग्लानी आलीच नाही? अर्थात आली. बरेचदा तो मृतवत झाला व प्रत्येक वेळेस थोर-मोठ्यांनी धर्मोत्थापनेस जन्म घेतला. कोणी मुत्सद्दीपणाने तर कोणी शौर्याच्या बळावर धर्माचे रक्षण केले. हे थोर-महात्मे अवतार होते की नाही हा विवाद बाजुला ठेउनच त्यांच्या थोरवीची कल्पना येउ शकते.

ईसवी सन पूर्व पाचव्या शतकात वैदिक धर्माचा र्‍हास झालेला होता व सनातन धर्म अक्षरश: आचके देत होता. अश्या परिस्थितीत केवळ प्रगल्भ बुध्दीच्या बळावर आद्य शंकराचार्यांनी भारतवर्ष अक्षरशः पादाक्रांत करुन सनातन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिसाद आजही सनातन धर्माच्या प्रत्येक कार्यात उमटतात. त्यामुळे भारताच्या मृत्युंजयांच्या मालिकेत आद्य शंकराचार्यांचे नाव अग्रगण्य घ्यावे लागेल.

आद्य शंकराचार्यांनी धर्म संस्थापना केली म्हणजे नेमके काय केले याचा विचार करण्याआधी धर्म म्हणजे काय याचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे. सांप्रत परिस्थितीत 'आपला धर्म कुठला?' अशी पृच्छा केली असता हिंदु-मुसलमान असल्या पैकी कुठले उत्तर द्यावे लागेल. पण भारतीय सनातन जीवनपध्दतीत धर्माची व्याख्या याहुन अधिक व्यापक आहे. धृ धातु पासुन धर्म शब्दाची उत्पत्ती होते. धृ धारयती इति धर्मः। धृ म्हणजे स्थिर. कालामानानेही जे बदलत नाही ते धृ. आणि जी जवाबदारी, जी कर्तव्य कधीही बदलत नाही व ती नेहमीच निभवावी लागते तो धर्म. मनुष्याकडुन अपेक्षित असलेले आचरण, त्याची कर्तव्य, वैयक्तिक नियम व विविध आश्रमांद्वारे अपेक्षित सामजिक नियम इत्यादी सर्व कार्यभार धर्मांतर्गत मोडते. या व्यतिरिक्त त्याचे परमार्थाविषयीच्या तत्त्वज्ञानास धर्मच म्हणतात.

यात लक्षात घेण्यायोग्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमावलीपैकी एकही नियम कोणावर लादलेला नाही. प्रत्येक मनुष्याकडुन विशिष्ट आचरणांची अपेक्षा आहे पण जोरा नाही. असे असताही समाजात या नियमांचे बर्‍यापैकी आपणहुन पालन होतांना दिसते. माझ्या मते यामागचे कारण भारतीय मनावर परमार्थाविषयीचा पगडा होय. कळत- नकळत समाजाचे विविध स्तर परमार्थाविषयीचे तत्त्वज्ञान आत्मसात करित असतात व त्यांचे प्रतिसाद भौतिक आयुष्यात सतत उमटतात.

भारतीय पुरातन इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की विविध विचारप्रणालींनी भारतीय संस्कृतीला नटविले आहे. यातील बौध्द व जैन या नास्तिक विचारधारा वगळता इतर सर्व विचारधारा वेदांशी आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतात. (चार्वक संहितेचा मी या विचार-प्रणालींमधे समावेश केलेला नाही.) यात सर्वात शेवटची संस्था म्हणजे वेदांत होय. आचार्यांच्या बरेच आधी वेदांत विचारप्रणालीचा उगम झालेला होता. आचार्य बद्रायण यांनी 'वेदांत सुत्र' ग्रंथात ५५० सुत्रांद्वारे वेदांतावर भाष्य केले असे मानल्या जाते. या ग्रंथातच ब्रह्मैक्यत्वाचा मुद्दा आढळुन येतो. या तत्त्वावरच पुढे आद्य शंकराचार्यांनी अद्वैत सिध्दांताची मांडणी केली. भारत वर्षात जन्मलेल्या अनेक तत्त्वज्ञानांपैकी आजच्या घटकेला अद्वैत वेदांतच जिवंत आहे यावरुन त्याचे महात्म्य सिध्द होते. याचा अर्थ असा नव्हे की आधीच्या विचारप्रणाली चूक होत्या. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रगतीपथावर अद्वैत शेवटचा मुक्काम मानता येइल.
(क्रमशः)