वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
6/14/08
फिनिक्स
गोष्टी कधी कश्या बदलतील हे सांगण नेहमीच कठीण असत. खुपदा असही होत की आपली काही चूक नसते तरी बराच त्रास अंगावर पडतो. खुप तमाशे केले तरी काही फरक पडत नाही. आगीत पडल की नाचुन थोडीच अंगाला चटके लागण थांबत. आमचं दुकान भेंडी बाजारात होत तरी आम्हाला कधी कशाची भीती वाटली नाही. आजु-बाजुला मुसलमानच होते पण आमच्या दुकानांच्या लाईनीत सगळ्या हिंदुंचीच दुकान होती. आमच्या कडचे बरेचशे पोरे मुसलमानच असत. भेंडी बाजा़र तसा भाई लोगचाच इलाका आहे. आम्ही छोटा शकील, दाउद इब्राहिमला आमच्या डोळ्यांनी बघीतल आहे. तेंव्हा पण तेंव्हा त्यांच्या सारखे बरेच भाई लोक तिथे हिंडत असत. एका जमान्यात हाजी मस्तानचा खुप वचका होता. पण तो बाबांच्या जमान्यात. दाऊद इब्राहिम सारख्या घाणेरड्या लोकांपुढे हाजी मस्तान काय किंवा वरदराजच काय, देव माणुस होता. स्मगलिंग करा किंवा हातभट्टीची दारु विका पण खाल्ल्या थाळीत छेद तर नका करु. ज्या देशात रहाता त्याच्याशी तर गद्दारी करायला नको. अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जेंव्हा पेटायला लागला तेंव्हा आमच्या दुकानाच्या इलाक्यात माहोल तंग होऊ लागला. डिसेंबर मधे ती इमारत पडली त्याच्या भूकंप आमच्या बुडाखाली आला. मुंबई सोबत आमची जिंदगीपण पेटली. आजु-बाजुला मुसलमानच असल्यामुळे आमच दुकान सहाजिकच लॉक-डाउन झाल. हळु-हळु दंगली वाढत गेल्या. आमच्या मुलुंडमधे शांतता होती पण दुकानच्या चिंतेनी मन रमत नव्हत. जानेवारीच्या शेवटाला दुकाना पर्यंत पोचता आल. दुकानात काहीच वाचल नव्हत. व्यवस्थितरित्या दुकान उघडुन सगळा माल चोरुन घेउन गेले होते. कुर्हाडीने लॉक तोडल. मग दिवसा-ढवळ्या माल हलवत होते. नंतर सगळीकडे रॉकेल टाकुन आग लावली. आमच्या कडे काम करणार्या पोर्यानी हे सगळं सांगितल. वीस-तीस वर्ष जुनं फर्निचर, बुकं, सगळ-सगळं जळुन गेल. भिंतीवर धमक्या लिहिलेल्या होत्या. हे सगळं बघुन बाबांच्या छातीत दुखायला लागल म्हणुन त्यांना आधी हॉस्पीटल मधे घेउन गेलो पण नशिबानी हार्ट-अटॅक वगैरे काही नव्हता. आजु-बाजुची सगळीच दुकानं जाळुन टाकली होती. तेंव्हा आगीचे इंन्शुरंस होत पण ते लोक म्हणाले की दंगलीमधे झालेल्या नुकसानाची भरपाई ते करत नाहीत.
दुकानात अक्षरशः काहीच शिल्लक राहिल नव्हत. काय कराव सुचतच नव्हत. धंदा म्हणला म्हणजे पैसा सतत खेळता असतो. आमचं सगळ्यांच जे काही बचत होती त्यावर किती दिवस काढायचे. आमच्या नुकसानी बद्दल सरकार कडुन पंचवीस हजार मिळालेत. लाखो रुपयांच्या मालाची होळी झाली आणि शिमग्याला पंचवीस हजार मिळाले. परत डागडुजी करुन करुन माल भरायच म्हटल तरी गिर्हाईक कधी परत येणार माहिती नव्हत .घरचा धंदा असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे आम्ही भावांनी फारस लक्ष दिलं नव्हत. आम्ही आम्ही दोघे मोठे भाई बी. कॉम होतो पण त्याल कोणी भीक घालत नाही. मी आमच्याच अकांउटंट कडे नोकरी धरली. महिन्याला अडीच हजार पगार होता. काही दिवसांपूर्वीच मी नवा दुकान टाकायच्या खटपटीत होतो आणि आता दाण्याला मोताद झालो होतो. पण परिस्थिती नुसार बदललो नाही तर मोडुन जातो. त्या घडीला घरी दोन्ही वेळेसच जेवण सगळ्यांना मिळायला हव हे महत्त्वाच होत. माझ्या भावानी सेल्समनची नोकरी मिळविली. कपडा मार्केट शी संबंधीतच होती.
पण आम्हा सगळ्यांच्या डोक्यात दुकानच घोळत होत. हाताशी काहीच पैसा नाही. बरं मागची थक-बाकी राहिली होती ती वेगळीच. ज्यांची देणी होती ते पाठीशी लागली होती व ज्यांच्याकडुन घेणी होती ती ओळख दाखवीत नव्हती. हळु-हळु लक्षात येत होत की पुन्हा दुकान चालु करायच तर भेंडी बाजारात ते करण अशक्य होत. जळलेल्या दुकानात आता पहिले सारख सुरक्षितही वाटेनास झाल. एक नविनच गेम सुरु झाला. कोणी तरी येउन दुकान विकता का विचारणार. नाही म्हटल तर धमक्यांचे फोन येणार. काहे दिवसांनी साले पोट्टे लोक येउन दम द्यायला लागले. चाकु-सुरे तर खिशात कंगव्या सारखे ते लोक बाळगत होते. शेवटी एकानी येउन पोटाशी नवी रिव्लॉवर लावली. विषाची परीक्षा कशाला करावी? सर बचा तो पगडी पचास म्हणुन एका बाटग्यालाच दुकान विकुन टाकलं. मातीला जास्त किंमत मिळाली असती. महिन्याच्या आत सगळा ठणठणाट झाला.
कपड्याचा सोडुन अजुन कुठल दुकान टाकयची हिंमत होत नव्हती. दुसर्या तर्हेची दुकान चालविण्याचा मुळीच अनुभव नव्हता. आणि इलेक्ट्रोनिक्स सारख दुकान टाकायला भांडवल कुठुन आणणार? मुंबईत नवी जागा विकत घेउन नवा धंदा टाकायचा म्हणजे लाखो रुपये लागणार. माझ्या सासुरवाड गुजरात मधे होत. ते लोकं मला म्हणत होते गुजारत मधे येउन त्यांच्या धंद्यात हात-भार लावायला. पण इथे आई-बाब आणि भावंडांना एकदम टाकुन जाणं अशक्य होत. त्यातुन एका भावाच अजुन शिक्षण व्हायच होत.
बुकं सांभाळण्याची काम करण्यात फारसा काही अर्थ नव्हता. पण अजुन काय कराव सुचत नव्हत. डोळ्यासमोर नुसताच अंधार होता. जुन्या ओळखींनी नोकर्या मिळत होत्या पण त्या अकांउटंट सारख्याच होत्या. अशीच काही वर्ष गेलीत. पोरग बालवाडीत जायची वेळ आली. खर्च वाढत होते, महागाई वाढत होती आणि उत्पन्न मात्र तेवढच होत. तेंव्हा कंप्युटर क्षेत्राचं वारं थोड-थोड वाहु लागली होती. मी घरा जवळच्या एका इंस्टीट्युट मधे छोटे कोर्सेस करायला सुरुवात केली. ते साले लोक लुबाडत होते. मायक्रोस्फॉट वर्ड शिकविण्याचे हजार रुपये घेत होते. अर्थात हे कळायलाही काही दिवस लागले. मी आपला कोर्सच सर्टिफिकीट घेउन मारे नोकर्या शोधायला जायचो आणि जास्तीत जास्त सेक्रेटरीच्या नोकर्या उघडायच्यात. कंप्युटर क्षेत्रातील कंपन्या फक्त इंजिनिअर लोकांनाच नोकर्या देत असत. खर सांगायच तर इंजिनिअर झालेल्या पोरा मधे आणि माझ्यात काहीच फरक नव्हता. या मोठ्या कंपन्यात नोकर्या मिळाल्यात कि तिथेच सगळं शिकविल्या जात. पण मी आत इंजिनिअर नाही त्याला कोण काय करणार? शेवटी मी ठरवलं कि कितीही कठीण गेलं तरी कोडिंग शिकायच. मी परत क्लासेस सुरु केले. पण कोडिंग गम्मत थोडीच असते. मला चांद-तारे दिसायला लागले. लॉजिक काय ते कळेना, लँग्वेज कशी लिहायची ते जमेना. लुप काय हे साध कळायला महिना लागला. क्लास मधे शिकविणारा साला ढ माणुस होता. थोड पुस्तकाबाहेरच प्रश्न विचारले कि त्याची त्-त्-प्-प् व्हायची. दिवसभर काम करुन मी संध्याकाळभर इंस्टीट्युट मधे कंप्युटर समोर बसुन असे. तासोघंटी स्क्रीनकडे बघत बसायचो. पण जागवरुन हलायचो नाही. इथे बुडाखाली आग लागलेली असली आणि डोळ्यासमोर शुन्य अंधार असला म्हणजे काय स्थिती होते हे सांगण अशक्य आहे. हळु-हळु गोष्टी कळु लागल्या. न-कळुन होणार कस! बिल्डिंग मधल्या इंजिनिअर होत असलेल्या काही मुलांचीही मी मदत घेतली. जमिन-आस्मान एक केल आणि कोडिंग मागुन-पुढुन शिकलो.
इंस्टीट्युटची परीक्षा झाल्यावर मला अचानक खुप छान वाटु लागल इतका अभ्यास केल्यावर ती परीक्षा म्हणजे टाईम-पास होता. पण मला कॉन्फीडंट वाटु लागल. पुढे जायला माझ्यात बळ आल. अजुन हवी तशी नोकरी मिळाली नव्हती पण ती न मिळण्याच्या कारणांवर मी मात केली होती. कंप्युटर मला येत नाही किंवा येऊ शकत नाही असं कोणी म्हणु शकत नव्हत. मी सगळ्या मोठ्या कंपन्यांमधे अर्ज करायला सुरुवात केली. अर्थात, कोणीच भीक घातली नाही. बाबांनी सल्ला दिला कि कुठल्यातरी लहान कंपनीत आधी अनुभव घे. मी मग लहान कंपन्यांमधे अर्ज करु लागलो. पण नशिब अजुन साथ देत नव्हत. नशिबाला बोल देउन काय फायदा? एवढ भरलेलं घर,साथ देणारी बायको आणि मेहनत करण्यासाठी धड-धाकट शरीर. अजुन काय हव माणसाला?
मी डोक शांत ठेवल। जे करायला हव ते सगळं मी केल होत आणि करत होत. आता पुढे काय होणार ते होणार. आमच्या दुकानाचा असा सत्यानाश होइल अस कुणी स्वप्नातही बघितलं नव्हत. पण तस घडल. काहीही घडल तरी पुढे जाण्या शिवाय काही मार्ग नसतो. बाटग्यांचा राग करत आणि झालेल्यावर रडत बसलो असतो तर पोरं-बाळ उपाशी पडली असती. कोणी मदतीला येइल याची वाट बघण्यातही फारसा अर्थ नसतो. स्वतःच किंवा स्वतःच्या कुटुंबाच आपल्यालाच बघाव लागत. मी आणि माझ्या मधल्या भावानी घर चालत ठेवण्यासाठी धड-पडाट चालविला होता. तो महत्त्वाचा.
शेवटी दुबईतल्या एका लहान भारतीय कंपनीत ओळखीनी मला नोकरी लागली कोडिंगच काम होत. पगार फार नव्हता पण तीथे टॅक्स नसतो आणि रहाण्या-खाण्यासाठी पगारा व्यतिरिक्त भत्ता मिळणार होता. थोडक्यात, मिळालेला पगार घरी पाठवता येणार होता. ओळखीनी नोकरी मिळाल्याचं मनात खटकत होत. माझ्या कडे स्कीलस् होते. ओळखीची गरज नव्हती. पण आता या बद्दल विचार करण्याची मुभा मला नव्हती. मुंबईतच नोकरी शोधा अस पत्नी म्हणत होत्या पण अजुन वाट बघण शक्य नव्हत. संधी, मग ती कुठल्या का रित्या असो, सारखी मिळत नाही. काही वर्ष जरी अनुभव मिळाला तरी मग मोठ्या देशी कंपनीत नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढणार होते.
आज घर स्थिर आहे. पोरगा कॉलेज मधे जाइल पुढल्या वर्षाला तर त्याच्या फी चे पैसे मी देउ शकतो. धाकट्या भावाचही शिक्षण नीट झाल. मधल्या भावालाही दुबईत चांगली नोकरी मिळवुन दिली. सेल्स च्या संबंधीतच होती. कमिशन बेसिस मधे टक्केवारी जास्त होती त्यामुळे पैसा जास्त मिळणार होता. त्याचाही संसार नीट मार्गाला लागला.
या सगळ्या घटना थोड्या पिक्चर मधल्या सारख्याच झाल्यात. थोडी नाच-गाणी असती तर मजा आली असती! शेवटही गोड झाला. नेहमीच होतो अस नाही. माझ नशिब अजुन काही नाही. अजुनही आठवण येते आणि परत धंदा करावासा वाटतो. पण ते कधी जमणार माहिती नाही. फारसा विचार करण्यातही अर्थ नाही पण झालेल्या गोष्टींचे चटके मधेच जाणवतात. आमच्या कुटुंबा पैकी कोणाचच काही चुकल नव्हत की त्या साथी एवढी शिक्षा का मिळावी? आयुष्यात आपल्या हातात किती कमी गोष्टी असतात हे मात्र लक्षात आल. शेवटी जेवढं जमेल तेवढ करायच.
मी सगळी शक्ती पणाला लावली होती आणि अजुनही लावतो आहे. बाकी सगळ वरच्याच्या हवाली.
6/7/08
गीता-माऊली
सनातन संस्थेत तत्त्व अनेक। जणु मोगर्याच्या फुलांची रास॥
यावर थोरांची निरुपणे। दरवळे चोहिकडे याचा सुवास॥१॥
पाय फुटले कि अर्भक। धावु लागती वाट फुटेल तिथे॥
तशी स्थिती होते। वाचु लागताच हि निरुपणे ॥२॥
या पामराची मती कुंठित। कळण्यास हा गुढार्थ।
झाकलेली हि शिवज्योती। षड्-रिपुंच्या घोंगडीत*॥३॥
माझ्या सख्या कान्होबास। आहे आमुची काळजी॥
आम्हा प्रश्नांकितांचे शंकानिवारण। करतो युध्दारंभी॥४॥
ऐन युध्दक्षेत्री। कृष्ण अर्जुनास सांगी॥
कर्म-भक्तिचे ज्ञान। भगवद्-गीते रुपी॥५॥
भ्रांत मिटली। युध्द क्षेत्राचे धर्म क्षेत्र झाले॥
कौरवांचे पतन झाले। गीतार्थाने॥६॥
गीतार्थाचे मूळ कठोर कर्मपर। रुप ज्ञानमय गोजिरे॥
गंध भक्तिपर गोड। दरवळे चोहिकडे॥७॥
या गीतेचे रुप काय वर्णावे। जणु आईचे प्रेम कथावे॥
शब्दांचे घडेच्या घडे भरावे। तरी ते अपुरेच॥८॥
या गीता वृक्ष-वल्ली। श्रांत-जन अनेक येती॥
धर्म-मोक्षाचे चिंतन करिती। ईप्सित फळे चाखुन॥९॥
युगा मागुनी युगे गेलीत। गीतार्थ गंगा वाहे अखंड॥
सर्वजन यात नाहुन। सत् चित् नित्य आनंदघन॥१०॥
कान्होबाची भक्ति ऊतु आली हृदयी। लिहिले हे शब्द प्रेमापोटी॥
अन्यथा या अर्भकाची बुध्दी जडभारी। थोरांनी हे साहस घ्यावे पदरी॥११॥
माझ्या राया भगवंता। धन्य झाला चिन्मय जन्मुन भारता॥
मोक्ष होतो जीथे प्राप्त। श्रवुन निव्वळ श्रीकृष्णा उधृत भगवद्-गीता॥१२॥
4/29/08
एक नम्र विनंती
प्रिय वाचक वृंद,
माझी जुन च्या पहिल्या आठवड्यात एक महत्त्वाची परीक्षा आहे। त्यामुळे मला लेखन करण्यास फारस वेळ मिळत नाहीया. मी दोन-चार लेख व एक्-दोन गोष्टी अर्धवट लिहुन ठेवल्या आहेत पण परीक्षा संपल्यावर लिखाण पूर्ण करुन लगेच मी त्या रुद्र शक्तिवर प्रकाशित करीन.
हे संकेतस्थळ जुन पर्यंत कृपया आठवणीत ठेवावे ही आपणांस नम्र विनंती।
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला,
चिन्मय 'भारद्वाज'
4/13/08
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र गेले साठ वर्ष औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे। सुरुवातीला मुंबईचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा झाला. पण पुढे मराठी नेते मंडळीने पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास कौतुकास्पदरित्या केला. सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि थोड्या बहुत प्रमाणात नागपुर अशी विकसित औद्योगिक केंद्रे आहेत. उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्रासारखे राज्य अजुन कुठे सापडणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा सुरळीत चालते व बहुतांश ठिकाणी रात्री ११ नंतरही पोरी-बाळी घराबाहेर हिंडु शकतात. स्त्री-मुक्ती व दलितांची प्रगती या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवरच आहे. थोडक्यात, इतर राज्यांच्या तुलनेत (गुजरात वगळता) महाराष्ट्रात नोकर्या आहेत, सुरक्षितता आहे व सामान्य जनांसाठी कष्ट करुन पुढे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. अजुन काही कमी असेल तर मुंबई हे हिंदि चित्रपट उद्योगाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे इतर राज्यातुन जर का महाराष्ट्रात येणार्या लोकांची रीघ लागत असेल तर त्यात नवलाईची गोष्ट काही नाही.
लोकतंत्राच्या अंतर्गत भारतीय कुठल्याही राज्यात जाउन स्थायिक होउ शकतात। त्यामुळे बिहार मधुन कोणी मुंबईस येत असेल तर तसे करणे त्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांतर्गत मोडते. तसेच या स्थलांतरास विरोध करणे ढेकुण पणा तर आहेच पण त्यापेक्षाही अधिक असली विचार सरणी ही भारत-विरोधी मानायला हवी.
अर्थात, दिसत तसं नसत म्हणुनच जग फसत। गोष्टी इतक्या सोप्या असत्या तर राज ठाकरेंना कोणाचाही पाठींबा मिळाला नसता. अजुन निवडणुका दूर आहेत पण माझ्या मते हे असले सगळे धिंगाणे करुनही त्यांना बर्यापैकी जागा मिळतील. कारण त्यांनी उठविलेले मुद्दे विचार करण्यायोग्य नक्कीच आहेत. फक्त त्या मुद्द्यांचे निदान मूर्खपणाचे आहे. बिहारी लोक मुंबईत येउन हिंदी अवश्य बोलु शकतात पण त्यांनी मराठी शिकण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्यांनी छट पुजा दादर मधे करायला हवी पण गणेश उत्सवात तेवढाच भाग घ्यायला हवा. आणि बहुतांश प्रमाणात अस होत याची मला खात्री आहे. पण राज ठाकरें सोबतच समाजवादी पक्षा सारख्या मतांचा धंदा मांडणारे पक्ष पाणी गढुळ करुन टाकतात.
माझ्या संकेतस्थळावर मागे मी "मराठी माणुस कुठे हरवला?"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा "भूक लागली" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे? मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्यक्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार? बिहारी?.
या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार राज ठाकर्यांनी केला असणार हे मी अगदी मानायला तयार आहे. या प्रश्नांचा कोणी तरी विचार करायलाच हवा, उत्तरे शोधायलाच हवीत. थोडक्यात, राज ठाकरे पूर्ण चूक नाहीत व पूर्ण बरोबर नाहीत. खेदजनक वस्तुस्थिती अशी की सगळ्यांना सोबत घेउन प्रगतीच्या दिशेनी जाण्या ऐवजी, सगळ्यांना सळो का पळो करुन समाज विभाजनाकडे त्यांची वाटचाल झपाट्याने सुरु आहे
इथे अजुन एक लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे ज्या मराठी माणसाबाबत बोलतात तो मराठी माणुस फक्त खर्यात मुंबई निवासी आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रात रहाणारा मराठी माणुस आहे? (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो?) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात। मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रा बाहेर येत सुध्दा नाहीत. राज ठाकरेंच्या मते मराठी माणुस दिसत नाही यात जरी तथ्य असलं तरी यावर उपाय महाराष्ट्रातून बिहारी-उत्तर प्रदेशींना काढुन टाकणे हा नक्कीच नव्हे. मुंबईत बिहारी भैय्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टॅक्सी चालकां पासुन ते दुधवाल्यां पर्यंत तीच लोक सगळीकडे दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लोकं मराठी लोकांच्या नोकर्या हिरावुन घेतायत. मुंबईत सगळ्यांना पुरुन उरेल इतक काम आहे व त्यामुळेच ही लोक मुंबईला येतात.
खर सांगायचं पर-राज्यीय लोकांचा या भानगडीशी काही संबंध नाही. स्वतः शिवसेना सत्तेत असतांना (तेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते) त्यांनी काय दिवे लावले? कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किंवा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात? दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर राज ठाकर्यांना सापडले की मगच आपण मराठी भाषिकांच्या विकासाबद्दल विचार करण्यास मोकळे होऊ.
* कृपया माझे या विषया संबंधीत "येथे मराठेचिया नगरी" आणि "मराठी माणुस कुठे हरवला?" हे दोन लेख अवश्य वाचावेत. *
3/16/08
कॉपी
९व्या इयत्तेची सहा-माही परीक्षा जवळ येत होती पण त्याच्या अभ्यासाच्या तयारीच्या नावानी शंख होता. त्याने आता जवळ जवळ अभ्यास करणे बंद केले होते. बास्केटबॉल व एन्.सी.सी. तून त्याला मुळीच फुरसत मिळत नसे आणि थोडा वेळ मिळालाच तर उनाडक्या करण्यात, मस्ती करण्यात तो गुंग असे. थोडक्यात, वेळ वाया घालवण्यात व अभ्यास न करण्याची कारणे शोधण्यात तो पटाईत झाला होता. घरी बरंच चिंतेच वातावरण होत. आई-वडिलांना काय कराव सुचत नव्हत व आजी या शंखाला शिस्त लावण्यात थकुन गेली होती. खर तर तिने स्वतःची, नातेवाईकांची व शेजार-पाजारची बरीच मुलं वाढवली होती. पण 'या सम हाच' अस काहीस तीला या आपल्या सगळ्यात धाकट्या नातवा बद्दल वाटु लागले होते. शाळेतही शिक्षकांना कळेना की हा विद्यार्थी जर का हुशार आहे तर अभ्यास का करत नाही ते. इंग्रजीच्या बाईंनी तर त्याला एकदा बाजुला घेउन विचारलं होत की घरी काही अडचणी आहेत का म्हणुन. एकेकाळी त्याचा वर्गात चांगलाच वरचा क्रमांक येत असे. आता मात्र घसरगुंडी थांबत नव्हती.
आमचे 'गुरु-महाराज' बहुधा निश्चिंत असतं पण सहा-माही परिक्षेचं थोंड टेंशन त्यांना जाणावु लागल होत. नुकताच तो शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातार्याला जाउन आला होता. घरच्यांनी सहा-माही होईस्तोवर बास्केटबॉल खेळण्यास बंदी आणली होती. त्यामुळे त्याला आता बराच वेळ असे. 'पढाई फटाकसे खतम कर डालते है।' असला काहीसा विचार करुन तो अभ्यासाला तर लागला होता पण इतर गोष्टींप्रमाणे लक्ष देण्याची सवय लावावी लागते, अभ्यास करण्याचा सुध्दा सराव लागतो. पुस्तक हातात घेउन त्याच्या झोपाच बर्याचदा चालु असत. 'आज हा विषय संपवु, उद्या तो मग रिविजन' असले हवेत आराखडे बांधुन, परीक्षेची तारीख जवळ आली तरी त्याचा बहुतांश अभ्यास राहिलाच होता.
परीक्षा सहा-माही असल्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट पध्दतीने बसविल्या जात असे. एका बाकावर आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी बसत असत. कॉपी करु न देण्यासाठी विद्यार्थ्यांना या पद्धतीने बसविले जाई. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आणि पुढे रोल नंबर च्या हिशोबाने त्याच्या वर्गातील मैतर बसलेला असे. परिक्षा चालू असतांना वर्गात शिक्षक असायचे पण त्या व्यतिरिक्त इतर चपराशी, मुख्याध्यापिका किंवा तत्सम व्यक्तीगण वर्हांड्यातुन फेर्या मारत असत. एकुण बंदोबस्त चोख होता पण बिलंदर लोक कॉपी करायचेच. कोणाला उत्तीर्ण होण्याची धास्ती असे तर कोणाला पहिला क्रमांक न येण्याची. बरेचशे तर उगाचच काही तरी 'धाडस' दाखवायच म्हणुन कॉपी करत. कॉपी करण म्हणजे जवळ चिठ्ठ्या वगैरे ठेवण्याचा प्रकार दुर्मिळ असे. बहुतांश वेळा पुढल्याला किंवा मागल्याला विचारणे असलाच प्रकार असे. जिभकाटेच्या जवळ मात्र चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्याला शाळेतुन काढुन टाकलं होत.
सुरुवातीचे पेपर अपेक्षेपेक्षा बरेच चांगले गेलेत त्यामुळे तो आनंदात होता. सगळे प्रश्न सोडविल्या गेले होते. आता ते चूक का बरोबर असले भलते-सलते विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. अजुन महत्त्वाच म्हणजे समोर बसत असलेल्या सतीश ने या वेळेस चांगलाच अभ्यास केला होता. सतीश त्याचा चांगला मित्र असल्यामुळे आपल्या कथा नायकाचाही बराच फायदा झाला होता. काही अडलं-नडलं तर सतीश त्याची मदत करायचा. कधी कधी सप्लीमेंट बाकावर बाजुला ठेवायचा. एकुण आपली स्वारी खुशीत होती. आता फक्त ईतिहास व भूगोलाचे विषय राहिले होते. 'ये तो अपने बाए हात का खेल है'। असे त्याला वाटत होते.
अर्थात, आज ना उद्या कयामत येणारच होती, ती ईतिहासाच्या रुपाने आली.
त्याने सतीशला ढोसायला सुरुवात केली. "अबे, पहिल्या चार पैकी किंवा दुसर्या पाच पैकी किती प्रश्न येतात"?
एकदम इतका मोठा प्रश्न विचारल्यामुळे बराच आवाज झाला असावा? वर्गाच्या दुसार्या टोकाला बसलेल्या मुली ही मागे वळुन बघु लागल्या. बाई निवांतपणे बसुन काही तरी वाचत होत्या.
"पागल है क्या बे? मारेगा मुझे भी।" सतीश म्हणाला.
इथे मात्र तो तव्यावर पडल्यासारखा तडफडत होता. "बता ना बे जल्दी"
सतीश ने बोटांनी सांगितले की कुठले प्रश्न त्याने सोडवले आहेत ते.
त्याला हुश्श झालं. त्याने त्याच्या प्रश्न पत्रिकेवर त्या प्रश्नांवर रेघा मारल्यात व वीस पैकी तेरा व पंधरापैकी नऊ असे आकडे लिहिलेत. या आकड्यांना काय अर्थ होता ते त्यालाच माहिती.
"बोलु नका रे. आपापला पेपर सोडवा" बाई उगाचच ओरडल्यात.
"पेपर दिखा मुझे"
"अबे! दोन्-दोन पानांची उत्तर आहेत. एवढ दाखवणार आहे का तुला?"
"क्युं?"
" याने?"
"बस भाई, यही दोस्ती है तेरी"
"पागल झाला का बे?" सतीश म्हणाला.
" अरे कोण बोलतय रे मागे" बाईंनाही संवाद ऐकु गेला असावा. सतीशने अजुन काही न बोलता आपली सप्लीमेंट बाजुला काढुन ठेवली. तो त्यातील उत्तरे बघुन लिहु लागला. पण उत्तरे खरच लांब-लांब होती त्यामुळे सतीशचे आंग व कोपर यातुन त्याला नीटस दिसेना.
"बाजुला हो बे थोडा"
"अजुन बाजुला झालो तर पडीन मी बाका वरुन"
बरीच धुसर-पुसर चालू होती. बाजुला बसलेला दहावीचा पोरग शेवटी मधे पडला.
"अभी किसी ने और आवाज किया तो देख लुंगा पेपर के बाद"
"अस नको करु ना बे. तीस मार्कांच येत नाही या मला. काय करु सांग" तो म्हणाला.
"अभ्यास"
यावर काही उत्तर त्याच्याकडे नव्हते. वर्गातील बरीच मुलं मागे वळुन बघत होती. बाई निवांतच होत्या.
तो सतीशला सारखा पेन नी टोचु लागला. शेवटी सतीशला प्रकरण असह्य झाल. त्याने त्याच्या दोन सप्लीमेंट बाजुला काढल्यात व पायाखालुन त्याच्याकडे सारल्यात.
"घे. डोकं नको खाऊ."
हे अनपेक्षित होत. त्याला आता अजुनच भीती वाटायला लागली. तरी त्यानी खालती वाकुन ती सप्लीमेंट उचलली. खिडकीतुन कोणी बघतय का हे बघीतल व बाकाच्या कप्प्यात सप्लीमेंट ठेउन तो उत्तर भराभरा लिहु लागला. वर्गात परत शांतता पसरली.
बाई अजुनही निवांतच होत्या. चश्मा लाउन झोपल्या होत्या की मुलांवर त्यांचा नको तेवढा विश्वास होता कोण जाणे.
"झाल का रे लिहुन?" सतीशने विचारल.
"हो संपलच"
हवी असलेली उत्तर लिहुन तो अजुन काही मिळतय का हे बघत होता. तेवढ्यात कोणी तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याचं हृदयच धडधडायचं थांबल. त्याने हळुच मागे वळुन बघीतल. बाजुला बाई उभ्या होत्या. त्याने आवंढा गिळला. समोर बघीतल तर सतीश ताठरला होता. त्याचीही हालचाल थांबली होती.
"अरे, अशी सप्लीमेंट मांडीवर घेउन लिहिशील तर मागचे लोक बघीतील ना" बाई त्याला म्हणाल्या.
बाईंनी त्याच्या मांडीवर असलेली सप्लीमेंट हातात घेतली व त्या उत्तर वाचु लागल्या. बाईंच्या हातात सप्लीमेंट गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सतीशने काळ्या शाईने उत्तर लिहिली आहेत व तो निळ्या शाईच्या पेनने उत्तर लिहित होता. त्याला काय करावं सुचेना. जणु त्याला सगळं ब्रह्मांड दिसु लागलं. पकडल्या गेलो तर काय थापा मारायच्या याचा तो विचार करु लागला. पण थापा काय मारणार इथे अक्षरश: रंगे हात पकडल्या जाण्याची पाळी आली होती. बाईंनी उत्तरांवरुन नजर फिरवली व सप्लीमेंट परत त्याला दिली.
"बरोबर लिहिली आहेत उत्तर. पण अभ्यास कमी केलेला दिसतोय यंदा. अजुन केला पाहिजे अभ्यास. अरे, पुढलं वर्ष १०वीच ना? आत्तापासुनच सवय लावली पाहिजे अभ्यासाची. आणि दोन निळे पेन घेउन यायचे असतात परीक्षेला, हे असं वेगवेगळ्या पेनने लिहिशील बोर्डात तर कॉपी केली म्हणतील बोर्डवाले!" बाई हळु आवाजात त्याला म्हणाल्यात.
"हो मॅडम" तो कसाबसा म्हणाला व त्याने सप्लीमेंट उचलुन बाकाच्या कप्प्यात टाकली. एव्हाना समोर सतीशची पाठ घामाने भरली होती.
"अरे, मुलं सप्लीमेंट लंपास करतात एका-मेकांच्या. तुझ्या सप्लीमेंट जपुन ठेव" बाई जाता-जाता परत म्हणाल्यात.
"हो मॅडम"
बाई गेल्याबरोब्बर त्याने सप्लीमेंट सतीशकडे सरकावली. "बता ना था ना बे मॅडम आ रही है कर केत्याचं हृदय भात्यासारखं वर-खाली करत होत.
घंटा झाली. सगळी मुले आपापले पेपर बाईंना देउन घरी जाउ लागले. तो अजुनही काहीच बोलत नव्हता.
"थ्यँक्यु यार" तो सतीशला म्हणाला.
"आज तर आपल्या दोघांची वाट लागली असती." सतीश म्हणाला. जे झालं त्याच्याकडे बघता सतीश बराच शांत होता. आपल्या हिरो चा त्याला फारसा राग आलेला दिसत नव्हता. त्यानी खरी 'दोस्ती' निभावली आज.
त्याने काहीच न बोलता नुसताच आवंढा गिळला. "अभ्यास करायला हवा यार"
"तु १०वीचा क्लास लावला आहे का बाईंकडे?" सतीशने विचारले.
त्याने नुसतीच मान डोलावली.
3/8/08
जोधा-अकबर
मुसलमानी सत्तेचा आरंभ पृथ्वीराजाच्या पराभवानंतर म्हणजे ११व्या शतकात झाला असला तरी अरबी तसंच पर्शियन मुसलमानांचा रक्तरंजित हैदोस सध्याच्या अफगाणी सीमेपाशी ८व्या शतकापासुन चालू होता. मुहम्मद-बिन-कासिम याने सन ७१२ मधे कराची लुटल्याची नोंद आहे. आरंभी सोन आणि बायका हेच केवळ या आक्रमकांच लक्ष असे. त्या काळात लुटीतील आठ टक्के हिस्सा मुसलमानी साम्राज्याच्या खलिफाला द्यायची प्रथा असे. (पुढे हि प्रथा बंद पडली) त्यामुळे लुटलेल्या मंदिरांमधील सोन्याचा आठ टक्के हिस्सा तर खलिफाला जाईच पण पळवुन नेलेल्या बायकांच्या संख्येमधी आठ टक्के बायका सुद्धा अरब देशात खलिफाच्या दासी म्हणुन पाठविल्या जात असे. उरलेल्या बायका सैनिकांमधे वाटल्या जात असत. आता बायकांच पुढे काय व्हायच हे सांगायची गरज नाही. याच संदर्भात राणी पद्मिनीची कथा तर सर्वज्ञातच आहेपण केवळ हिंदू असल्यामुळे त्यांच्यावर हि दारुण परिस्थिती येत असे हे इथे लक्षात घेतल पाहिजे. बायका पळवुन नेण्याची हि पध्दत अगदी पाणीपतच्या युध्दातही कायम होती. अहमदशहा अब्दाली कित्त्येक मराठी कुळीन स्त्रीया अफगाणीस्थानात घेउन गेला. काही वर्षापूर्वी मी काबुल मधे १९७० च्या दशकात भारतीय परदेश विभागात काम केलेल्या एका सरकारी अधिकार्याचे पुस्तक वाचले. त्यात त्याला कोणी अफगाणी पुरुषाने त्याच्या अफगाणी कुटुंबात जतन करुन ठेवलेले काही दागिने आणुन दाखविले. त्या दागिन्यां मधे नथ, मंगळसुत्र व कुंकवाची पेटी यासारख्या गोष्टी होत्या.
तरुण मुलांना नोकर बनविण्यासाठी व तरुण पोरींना केवळ यौनसंबधीत दासी बनविण्याचा फार मोठा व्यापार मुसलमानी अंमलात चालु असे। बहुतांश व्यापार अरब देशांशी चालत असे. भारतीय उपखंडातून अरब देशापर्यंतच्या प्रवासा महत्वाचा टप्पा म्हणजे हिंदु-कुश पर्वत होय. ही पर्वतमाला पार करण्याचा प्रवास इतका यातनामय असे की बरीच तरुण मुलं-मुलींनी येथे शेवटचा श्वास घेतं. या मृत हिंदुंची संख्या एवढी होती की 'हिंदुची कत्ल जीथे होते' तो हिंदु-कुश असे नाव या पर्वतमालेला पडले. (या पर्वत-मालेचे मूळ संस्कृत नाव काय होते हे नेमंक मला आठवत नाहीया. पण महाभारतात या पर्वत मालेचा उल्लेख आहे.)
थोडक्यात हिंदु बायका या केवळ दासी म्हणुन उपयोगात आणण्याची पध्दती मुसलमानी अंमलात रुढ होती। दुसरी पध्दत म्हणजे की मुसलमानी सत्तेपुढे पराजय झाला तर मांडलिकत्व पत्करण्या अंतर्गत आपल्या घरातील बायका बरेचशे हिंदु राजे मुसलमानी सुल्तानाच्या हारेम मधे दाखल करत. जोधाबाई याच प्रथे अंतर्गत अकबराची 'बायको' मानल्या जात होती. अर्थात, लग्नानंतर ती मरीयम-ए-ज़माना झाली. आता अकबर कोण होता ते थोडं बघुया.
१२व्या शतकानंतर भारत म्हणजे आक्रमकांची खुली बाजारपेठ झाला होता। कोणीही यावे व दिल्लीत राज्य करावे हाच एक कायदा शिल्लक होता. याच देवाण-घेवाणीत बाबर नावाचा अत्यंत निम्न रक्ताचा व क्रुर इसम मध्य आशियातुन दिल्लीत दाखल झाला. हळु-हळु त्याने हात पाय पसरवायला सुरुवात केली. हिंदुंना मुसलमान करणे, मंदिरे तोडणे (अयोध्येचे राम-जन्मभुमीवर मशीद बांधणार हाच उत्साही सुल्तान!) इत्यादी कार्ये उरकल्यावर स्वतःला मोघली रक्तपिपासु टोळीचा वंशज बनवुन त्याने दिल्लीत मोघली अंमलाची सुरुवात केली. याच घराण्यात अकबराचा जन्म झाला. (औरंगझेब हा अकबराचा नातू) त्याने मोघली सत्तेच्या सीमा दख्खन पर्यंत ताणल्या पण राजपूतांशी भांडण्यात त्याचा बराच वेळ जात असे. यावर उपाय म्हणुन त्याने राजपूतांसमोर एक नवीन करार मांडला. जे राजपूत राजे अकबराचे मांडलिकत्व पत्कारतील व घरातील बायका अकबराच्या हारेम मधे दाखल करतील त्यांच्यावर अकबर स्वारी करणार नाही. जयपुरच्या अंबर राजघराण्यानी या कार्यात सर्वात पहिले पुढाकार घेतला. जे अकबरावर थुंकले त्यांच फारस भल झाल नाही. महाराण प्रताप बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण चित्तोडच्या स्वारीत विजय प्राप्त झाल्यावर किल्ल्यातील ३०,००० लोकांची कत्ल अकबराने केली हे फारस कोणाला ठाउक नाहे. (गोवारीकर साहेब ऐकताय का?) अर्थात, हि कत्तल फारशी मोठी नाही. बहमनी सुल्तानांनी कर्नाटक स्वारीत एक लाख लोकांची कत्तल केली. त्या भागातील एकाही माणसाला, बाईला किंवा अर्भकाला जिंदा ठेवला नाही. पण या बहमनी सुल्तांनांचा अकबराशी काही संबंध नाही.
पण थोडक्यात या अश्या वैभवशाली मुसलमानी अंमलातील एक हलक्या रक्ताचा अकबर राजा व तलवारील पाणी नसलेल्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्याची बायको झालेल्या जोधाबाईवरच प्रेमकहाणी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे आपल्या गोवारीकर साहेबांना कसं सुचल? कोणा मुसलमानाला हि सुल्तान आपले वाटत असतील म्हणुन त्याने चित्रपट दिग्दर्शित केला हे मी मानु शकतो.(मुघल-ए-आज़म) पण ज्या मातीने या मुसलमानी सत्तेला यशस्वीरीत्या आव्हान देण्यार्या मर्द-मराठ्यांच्या पिढ्यांन्-पिढ्या जन्मी घातल्यात्याच मातीत हे गोवारीकर कसे जन्मले? पण येथे मुद्दा गोवारीकरांच्याही बराच पुढे जातो. पैशांचा जो मुद्दा मी लेखाच्या आरंभी मांडला तो इथे फार महत्त्वाचा ठरतो. गोवारीकरांनी नसतं दिग्दर्शन केलं तर दुसर्या कोणी केलं असत. पण दिग्दर्शन कोणीही केल तरीही अकबराचा इतिहास तर बदलत नाही. हा असला घृणास्पद, रक्तानी बटबटलेला इतिहास बाजुला ठेउन कोणी त्याच काळावर आधारित प्रेमकहणी लिहु शकतो किंवा त्यावर आधारीत चित्रपट काढण्यासाठी पैसा देउ शकतो (लेखक व निर्माते) येथे भारतीय समाजाचा पराभव आहे.
"चित्रपट केवळ कलेचे माध्यम आहे पण शिवाजीराजे आमच्या मनात कायम आहे असल्या शंढ बाता करण्यात काही हशील नाही." कारण गेल्या शंभर वर्षात शिवाजीराजांवर एकही हिंदी चित्रपट प्रकाशित झालेला नाही. महाराणा प्रतापांवरही नाही किंवा गुरु गोबिंदसिंहजी वरही नाही. जो होउन गेला तो इतिहास पण तो विसरुन, आपल्याच पूर्वजांवर झालेल्या अनन्वीत अत्याचारांकडे कानाडोळा करुन मुसलमानी आक्रमकांवर चित्रपट काढण्याची किंवा तो बघण्याची हिंमत करणार्या भारतीय समाजाची लाचारी वाखण्याजोगीच आहे. अनेक गोवारीकर झालेत आणि पुढे अनेक होतीलही पण या भारतीय समाजाच्या मूढत्वावर काही उपाय आहे का, हे सांगण अशक्य आहे.
3/1/08
श्री गणेश वंदना - भाग ३
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥
कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥
पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्यातील रत्ने। करगोट्याच्या॥
व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥
ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥
तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥
गणपतीच्या रेशमी वस्त्रांना ग्रंथांमधील सुंदर पदरचनांची उपमा देतांना ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की वस्त्रांना शोभतील असेच अलंकार गणपतीचे आहेत. येथे वाण शब्दाचा अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सुवासिनी स्त्रीयांची वाण भरण्याची पध्दत आहे. वाण म्हणुन बहुधा मुठभर गहु, शेंगा इत्यादी गोष्टींनी ओटी भरल्या जाते. येथे गणपतीच्या वस्त्रांना व अलंकारांना वाणाची दिलेली उपमा अप्रतिम तर आहेच ज्ञानेश्वर महाराजांची कल्पनाशक्ती प्रगल्भ असुनही सामान्य जीवनाच्या किती निकट आहे हे बघुन मन विस्मित होते. ज्ञानेश्वरीची महानता यातच दडलेली आहे. श्रुती व स्मृती या दोहोंचा अपूर्व संगम गीतेत होतो. गीतेतील श्लोक गेय तर आहेच पण प्रत्येक शब्दात तत्त्वज्ञान ठासुन भरलेल आहे. ते सहजा-सहजी सामान्य बुध्दीस झेपत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील प्रगाढ तत्त्वज्ञान केवळ मराठीत उतरविले नाही तर अत्यंत रसाळ भाषेत ज्या कल्पना व उपमा सामान्य जनास सहज रुचतिल त्यांचा वापर करुन मराठी मनं पावन केलं.
गणपतीच्या गळ्यातील रुण-झुणणार्या क्षुद्र-घंटांना भारतीय साहित्य व कलेला (काव्य व नाटके) उपमा देतांना महाराज पुढे म्हणतात की या घंटांचा मंजुळवाणा अर्थ-ध्वनी ऐका। येथे अर्थ-ध्वनी शब्द परत मला फार आवडला. मागे आपण अर्थ-शोभा या शब्दाबद्दल बोललो होतो त्याच पठडीत अर्थ-ध्वनी शब्दाचा उपयोग येथे केला आहे. पण भारतीय साहित्य व कला केवळ इंद्रियांनाच सुखावणार नसुन त्यातील विचार हे अर्थपूर्ण आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शविले आहे. महाभारत कथन करण्याचे कार्य आदि व्यासांनी तर लेखनाचे कार्य गणपतीने केले. या अपूर्व संगमातुनच महाभारत व गीतेची निर्मिती झाली. या संगमाचे वर्णन करतांना महाराज गणपती आदि व्यासांच्या मती मेखले सारखा झळाळत होता असे म्हणतात. मेखला म्हणजे तेजस्वी कंबर-पट्टा. (थायलँड मधील एका नदीचेही नाव मेखला आहे!)
गणपतीचे षड्-भुजांना महाराज षड्दर्शनांची उपमा देतात।
वैषशिखा (कानद)
न्याय (गौतम)
सांख्य (कपिल)
योग (पातंजली)
मिमांसा (जैमिनी)
वेदांत (बाद्रायण)
या सहा तत्त्वज्ञानांचा षड्दर्शनां मधे समावेश होतो। हि षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानांचा पाया आहे। प्रत्येक विषयावर लिहिण्याचे ईप्सित येथे नाही. पण यातील वेदांत तत्त्वज्ञान आपण सर्वांस अधिक परिचित आहे. वर्तमान परिस्थितीतील भारतीय समाजाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या बद्दलचे विचार हे आद्य शंकराचार्यांनी प्रसार केलेल्या अद्वैत सिंध्दांतांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पण हा वेदांत सिध्दांत मूळ बाद्रायण ऋषिंनी प्रस्थापित केला होता.
याच ओवीत पुढे महाराज म्हणतात की ही सहा तत्त्वज्ञाने गणपतीचे सहा हात आहेत व या तत्त्वज्ञानातील अभिप्रेत अर्थ हे गणपतीच्या हातातील अस्त्र आहे. तर्काला महाराज परशुची उपमा देतात. परशु म्हणजे परशुरामांचे आवडते अस्त्र. येथे तर्काला परशुची उपमा देण्यामागे काय उद्देश असावा यावर भाष्य करणे थोडे कठिण आहे. परशु एका घावात दोन तुकडे करतो त्याच प्रमाणे जो तर्क कुठल्याही विवादाचे सत्य-असत्य असे दोन तुकडे करतो असा अर्थ अपेक्षित असावा असं मला वाटत. पुढे महाराज म्हणतात की गणपतीच्या हातातील मोदक म्हणजे वेदांत सिध्दांत होय.